Gargoti museum
Gargoti museum esakal
सप्तरंग

दगडांच्या देशा : अमर्याद कल्पनाशक्तीचा विलास म्हणजेच गारगोटी

सकाळ डिजिटल टीम

लेखक - के. सी. पांडे

आपल्याकडे अमर्याद कल्पनाशक्ती असते. अनेकांना या शक्तीची कल्पना नसते. त्यामुळे ध्येयप्राप्तीसाठी त्याचा वापर करण्यात ते अपयशी ठरतात किंवा त्यामुळे त्यांना मिळणारे परिणाम हे फक्त सरासरी इतकेच असते. जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त आणि अतिजागरुक मनाच्या शक्तीचा शोध घ्यायला लागता किंवा ती मुक्त करता, तेव्हा तुम्ही अल्पावधीतच तुमच्या अपेक्षेहून अधिक यश प्राप्त करू शकाल. मग तुम्हीदेखील कल्पना करू शकणार नाहीत, की तुम्ही इतक्या वेगाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कशी करू लागला. मात्र, त्यासाठी मनात कल्पना, कुतूहल व जिज्ञासा आवश्यक आहे.

प्रत्येक गोष्ट कशारीतीने घडली आहे, नैसर्गिक अथवा मानवनिर्मित याकडे आपलं निरीक्षण असणे गरजेचे आहे. कल्पनाशक्तीची अफाट शक्ती आपल्याला दिलेली आहे. या पद्धतीचा वापर करणे मात्र आपल्या हातात आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले आहे, की कल्पना ही वास्तवापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. तर नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, की कल्पना या जगावर राज्य करते. व्यक्तीचे मन जे काही करू शकते आणि ज्यावर विश्‍वास ठेवू शकते, ते मिळवू देखील शकते. कुतूहल, जिज्ञासा हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, हे आपण सर्व जाणतोच. झाडावरून पडलेले फळ त्यांनी बघितलं आणि हे फळ खाली कसे पडले, याबद्दल त्याला कुतूहल व जिज्ञासा निर्माण झाली. खरंतर या अगोदरही झाडावरून फळे खाली पडतच होती. पण, कोणीही तसं निरीक्षण केलेले नव्हते. काहींना या गोष्टीचे कुतूहल देखील वाटलेले असू शकेल. मात्र, जिज्ञेसेअभावी त्याकडे दुर्लक्ष झाले.

माझ्यादेखील आयुष्यात वयाच्या सोळाव्या वर्षी जिज्ञासेमुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. गारगोटीची जगाला ओळख होईल, असा प्रसंग घडला व त्यामुळे एका ऐतिहासिक टप्प्याची एकप्रकारे मुहूर्तमेढ रोवली गेली. माझे जीवन जणू एका वेगळ्या, उन्नत दिशेने गेले. गारगोटीची चमक मी ईश्‍वर कृपेमुळे जगाला दाखवू शकलो. नौदलात प्रवेशाची तयारी करत असताना हा अलौकिक क्षण घडला आणि माझ्या मनाने गारगोटीचा ठाव घेतला. पनवेल येथे सुटीच्या दिवशी मी त्या परिसरात जात असे. नैसर्गिक वस्तूंची निरीक्षणं करण्याची वृत्ती माझ्यात उपजतच होती. पनवेल, मुंबईपाडा येथील जोशी लॉज परिसरात मी गेलो असता, एक मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत छोट्याशा चकाकणाऱ्या दगडाबरोबर खेळत होता. त्या दगडाबद्दल मला आकर्षण वाटले. मी निरीक्षण करत उभा राहिलो. त्या मुलांनी मला विचारले हा दगड हवा आहे का? मी विचारले, ‘विकत मिळेल?’ त्या मुलाला सहज किंमत विचारली, तर त्याने चार आणे (पावली) सांगितले. मी त्याच्याकडून तो दगड विकत घेतला. दगडाचे निरीक्षण करत करत मी चहा पिण्यासाठी एका चहाच्या टपरीवर गेलो. तो दगड समोर टेबलावर ठेवला व त्यास न्याहाळत बसलो. तेवढ्यात एक परदेशी दांपत्य तेथे आले, त्यांनाही तो दगड आवडला. ते दोघे देखील बराच वेळ दगडाचे निरीक्षण करत होते. शेवटी त्यांना राहावले नाही. मला दीडशे रुपये देऊन त्यांनी तो दगड माझ्याकडून घेतला. चार आण्याला घेतलेला दगड हा दीडशे रुपयांना सहजपणे विकला गेला, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. तेव्हाच गारगोटीबद्दलची माझी ओढ वाढली. तेव्हा माझ्या मनात डोकावले आणि जाणीव झाली, की हा दगड म्हणजेच गारगोटी जशी चमकत आहे, तसेच आयुष्यभर जगभर मला चमकत राहायचे असेल, तर गारगोटी कायमस्वरूपी माझ्या जीवनात अविभाज्य घटक बनायला हवी. हेच माझं पहिलं प्रेम नौदलातून निवृत्त होईपर्यंत मी जोपासून ठेवलं. म्हणूनच मी युवा पिढीला सांगू इच्छितो, की चिकित्सकवृत्ती आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहे. छोट्या निरीक्षणातून आपण आपल्या आयुष्यात क्रांती घडवून आणू शकतो, याबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही.

उराशी बाळगलेली ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. जीवनात नशीब हा भाग अविभाज्य असला, तरी त्याला या तीन गोष्टींची जोड आवश्यक असते. त्याचबरोबर युवापिढीने चांगली मूल्ये अंगी बाणावीत आणि सुजाण नागरिक बनत कौशल्यबुद्धीचाही विकास करावा.

(लेखक सिन्नरस्थित आंतरराष्ट्रीय गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT