Saptarang Marathi features
Saptarang Marathi features 
सप्तरंग

चांदनी (पंकज पराशर)

पंकज पराशर

कमालीचे बोलके डोळे आणि शांत, स्निग्ध सौंदर्य यांच्यामुळं प्रत्येकाला मोहवणारी, अभिनयाचा आदर्श निर्माण करणारी, 'बॉलिवूडची एकमेव स्त्री सुपरस्टार' असं बिरुद लागलेली श्रीदेवी कोट्यवधी चाहत्यांना धक्का देऊन अनंताच्या प्रवासाला निघून झाली. तिचं आयुष्य म्हणजे खरी 'परी'कथा होती. संपूर्ण पडदा उजळवून टाकणारी श्रीदेवी प्रत्यक्षात कशी होती, माणूस म्हणून तिच्यात काय वेगळेपण होतं, तिच्या अभिनयातल्या समर्पणामागची प्रेरणा काय होती आदी गोष्टींबाबत माहिती. 

माझी आणि श्रीदेवीची काहीही ओळख नव्हती. पूरणचंद राव यांनी तिच्याशी माझी ओळख करून दिली. पूरणचंद राव यांनी 'आखिरी रास्ता', 'इन्कलाब' वगैरे मोठमोठे चित्रपट काढलेले आहेत. माझ्या 'जलवा' या चित्रपटाची प्रिंट प्रसाद स्टुडिओमधून निघणार होती. तिथं असलेल्या प्रोजेक्‍शनिस्टनं एल. व्ही. प्रसाद यांना सांगितलं ः ''पराशर यांचा 'जलवा' हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे आणि तुम्ही तो पाहिलाच पाहिजे.'' त्यानुसार प्रसाद यांनी तो चित्रपट पाहिला आणि माझं कौतुक केलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पूरणचंद राव यांना फोन केला. ''तू नेहमीच फॅमिली चित्रपट बनवितोस. तुला काही वेगळं करायचं असेल तर यांना (पराशर) साइन कर,'' असाही सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार पूरणचंद राव यांचा मला मुंबईला फोन आला आणि त्यांनी मला भेटायला बोलावून घेतलं. ही बाब मी माझ्या वडिलांना सांगितली. कारण तेदेखील निर्माते होते. त्यांनी मला सांगितलं ः ''पूरणचंद राव जे काही सांगतील त्याला नकार देऊ नकोस. त्यांना हो असं सांग.'' त्यानुसार मी राव त्यांना भेटायला गेलो. पहिल्याच भेटीत मी त्यांना 'श्रीदेवीची आणि तुमची चांगली ओळख आहे का,' असं सहजच विचारलं. ते म्हणाले ः ''अगदी कौटुंबिक संबंध आहेत. तिला आणि तिच्या आईला मी चांगलंच ओळखतो. मात्र, ती स्क्रीप्टवर अडकते. कथेवर ती खूप विचार करते. तिला साइन करणं खूप कठीण आहे.'' खरं तर ते साहजिकच होतं. कारण ती नंबर वन हिरॉईन होती आणि ती हिरोपेक्षाही जास्त मानधन आकारत होती. मात्र, त्याच वेळी मी मनात विचार केला, की हा चान्स सोडता कामा नये. मी लगेच सहजपणे पूरणचंद राव यांना म्हणालो, की आपण 'सीता और गीता' बनवूया. ते म्हणाले ः ''खूप चांगली कल्पना आहे. पण स्क्रीप्ट कुठं आहे?'' मी म्हणालो ः आता माझ्याकडं कोणतीही स्क्रिप्ट नाही. मग ते म्हणाले ः 'तुम्ही मला उद्या सकाळी येऊन भेटा.'' ठरलेल्या वेळेनुसार मी सकाळी त्यांना भेटलो, तर त्यांनी अकरा हजार रुपयांचा चेक माझ्या हातात दिला आणि सगळं काही झालं आहे, असं सांगितलं. मी श्रीदेवीबद्दल त्यांना विचारलं, तर ते म्हणाले ः ''मी तिला फोन केला होता आणि फोनवरच तिला अमुकअमुक चित्रपट बनवत आहोत, असं सांगितलं. ती काम करण्यास तयार आहे. सध्या ती अमेरिकेत आहे. जूनपासून तिनं तारखा दिल्या आहेत. अमेरिकेतून आल्यानंतर तू तिला फोन कर आणि तुझा 'जलवा' हा चित्रपट दाखव.'' मी आश्‍चर्यचकित झालो. कोणतीही स्क्रिप्ट नसताना ती लगेच तयार कशी काय झाली, असा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. त्यानंतर त्या प्रश्‍नाचं उत्तर नंतर मला मिळालं. कारण मुळातच ती हुशार होती. त्यानंतर आठ-दहा दिवस मी टेन्शनमध्ये होतो. 'जलवा' चित्रपट पाहिल्यानंतर तिची काय रिऍक्‍शन असेल, असं मला वाटलं होतं. 

त्यानंतर लगेच मला फोन आला, की श्रीदेवी तुम्हाला भेटू इच्छित आहे. खरं तर तोपर्यंत मी तिला भेटलेलो नव्हतो. मग काय...ठरलेल्या दिवशी आणि वेळेनुसार मी आणि पूरणचंद तिला भेटायला एका स्टुडिओत गेलो. ती मेकअपरूममध्ये होती. तिथं माझी आणि तिची पहिली भेट झाली. तिनं मला 'स्क्रिप्ट ऐकवा,' असं सांगितलं. मी पूरणचंद यांच्या चेहऱ्याकडं पाहत बसलो. कारण माझ्याकडं स्क्रिप्टच नव्हती. तरीही मी तिला 'सीता और गीता'ची संपूर्ण कथा ऐकवली. चित्रपटात रजनीकांत आणि सनी देओल काम करणार आहेत, असं सांगितलं. तिनं ते सगळं ऐकलं आणि तेलुगू भाषेत पूरणचंद यांना काही तरी सांगितलं. आम्ही तेथून बाहेर आलो आणि पूरणचंद यांनी लगेच माझ्याशी शेकहॅंड केला. मी म्हणालो, की काय झाले?...तर ते म्हणाले, की तिचा होकार आहे. मी राव यांना म्हणालो, की मी तर तिला फक्त 'सीता और गीता'ची कहाणी सांगितली आहे. ते म्हणाले ः ''ती खूप हुशार आहे. तिला चित्रपटाचा बेसिक फॉर्म्युला समजला आहे. चित्रपट कोणत्या पद्धतीनं बनणार आहे, हे तिला कळलेलं आहे. आता तू विचार करू नकोस. चित्रपट लिहायला घे.'' 

सांगायचा मुद्दा असा, की 'चालबाज' या चित्रपटाची कथा वगैरे न ऐकताच तिनं आम्हाला होकार दिला होता. मग मी चेन्नईला गेलो आणि दोनेक महिन्यात स्क्रिप्ट तयार केली. त्यानंतर चित्रीकरण सुरू झालं. दोन-तीन रिळांचं चित्रीकरण झाल्यानंतर आम्ही ते तिला दाखवलं आणि काय...ती कमालीची खूश झाली. संपूर्ण चित्रपट तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यानंतर तिनं काही सूचना केल्या. 

'चालबाज'मधल्या 'ना जाने कहांसे आयी है ये लडकी...' या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळची गोष्ट. मेहबूब स्टुडिओत या गाण्याचं चित्रीकरण होतं. तीन दिवस ते चालणार होतं. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. त्यानंतर लगेच ट्रान्सपोर्टवाल्यांचा संप होता. त्यामुळं ते लगेच संपवणं आवश्‍यक होतं. रविवारी अर्थात शेवटच्या दिवशी चित्रीकरणाला सुरवात झाली. श्रीदेवीचा मेकअप चाललेला होता. एवढ्यात मला मेकअपरूममध्ये बोलावण्यात आलं. मी तिथं गेलो, तर पाहतो तर काय!...तिला 102 ताप होता. तरीही ती चित्रीकरण करणार होती. ''पंकज चित्रीकरण पूर्ण करायचं आहे,'' असं ती मला म्हणाली. आम्ही सेटवरची तयारी पूर्ण करू लागलो. एवढ्यात तिचा सेक्रेटरी आला आणि म्हणाला, की मॅडमची तब्येत ठीक नाही...पॅकअप करा. आम्ही पॅकअपला सुरवात केली. ही बाब श्रीदेवीला समजली. तिनं मला बोलावलं आणि पॅकअप करायला कुणी सांगितलं, असं विचारलं. मी तिच्या सेक्रेटरीचं नाव सांगितलं. तिनं त्याला मेकअपरूममध्ये बोलावलं आणि असा काही त्याला दम भरला, की काही विचारू नका. अंगात ताप असतानाही तिनं ते गाणं पूर्ण केलं. चित्रीकरण संपल्यानंतर युनिटमधल्या सगळ्यांना शंभर रुपये गिफ्ट म्हणून वाटले. त्याच गाण्याला सरोज खानला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीचा 'फिल्मफेअर'चा पुरस्कार मिळाला. रजनीकांत तिला 'श्रीदेवा श्रीदेवा' असं म्हणायचा. एखादा सीन तिनं वाचला, की त्याची रिहर्सल न करता ती लगेच टेक द्यायची. 'वन टेक आर्टिस्ट' होती ती. तिच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. 'चालबाज'मध्ये तिनं दुहेरी भूमिका साकारली आणि तो चित्रपट व तिची भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली. ती एक 'ग्रेट आर्टिस्ट' होती. 
(शब्दांकन : तेजल गावडे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT