s s virk
s s virk 
सप्तरंग

एका जस्सीची कहाणी : 2 (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क

माणसांची निवड फार काळजीपूर्वक करावी लागणार होती. कारण, काम खूप जोखमीचं होतं; पण सुरजितसिंगनं त्या माणसाला साफ सांगितलं होतं : ""लोक लवकर शोधा, एकदम जालीम, क्रूर, दया-माया नसलेले "पेशेवर' लोक आणा. पैसे लागतील तेवढे मिळतील; पण काम आम्ही म्हणतो तसंच झालं पाहिजे.''

आपल्या लग्नाबद्दल कुणालाही कळू नये यासाठी जस्सी आणि मिठ्ठूनं आटोकाट प्रयत्न करूनही त्यांच्या लग्नाची बातमी षट्‌कर्णी व्हायला वेळ लागला नाही. गावात कुजबूज सुरू झाल्यावर दर्शनसिंग आणि मनजितकौरच्या नातेवाइकांपर्यंत ही बातमी
लगेचच पोचली.

मनजितकौरच्या एका दूरच्या नातेवाइकानं - हरदेवसिंग यानं - मनजितकौरला फोन करून जस्सी आणि मिठ्ठूनं नोंदणी पद्धतीनं लग्न केल्याचं कळवलं. गावातल्याच काही लोकांकडूनही त्याला ही बातमी समजली होती. जस्सीनं मात्र गावातल्या चर्चेकडं फारसं लक्ष दिलं नव्हतं. कधी ना कधी त्यांना हे कळणार होतंच याची जस्सीला जाणीव होती. ""कळू देत कळलं तर. मला काही फारसा फरक पडत नाही,'' जस्सीनं स्वतःचीच समजूत घातली; पण तिकडं कॅनडात मनजितकौरच्या अंगाचा तिळपापड झाला होता. ""जस्सी असं करूच कसं शकते? ती इतकी बंडखोर कधीपासून झाली? आणि लग्न कुणाशी केलं? तर त्या "जोकर' मिठ्ठूशी! मी जिवंत असेपर्यंत हे घडू देणार नाही. हे लग्न कसं टिकतं तेच मी पाहते,'' मनजितकौर स्वतःशीच धुमसत होती.
""आम्हाला न सांगता तू त्या विदूषकाशी लग्न केलंसच कसं?'' जस्सी घरी आल्या आल्या मनजितकौरनं तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ""ममा, वाटेल ते बोलू नकोस. काहीही झालं तरी आता तो नवरा आहे माझा,'' जस्सीनंही आईला सुनावलं. ""खड्ड्यात गेला नवरा तुझा. तू इतकी वर्षं माझं प्रेम अनुभवलं आहेस; पण माझा राग तू अजून पाहिला नाहीयेस. मी तुम्हा दोघांना सुखानं जगू द्यायची नाही. बरबाद करेन मी तुम्हाला दोघांनाही,'' मनजितकौर रागानं थरथरत होती.
या वादावादीनंतर घरातली भांडणं नेहमीचीच झाली होती. तापलेल्या वातावरणात आई आणि मामासमोर जस्सी एकटी पडली होती. तिच्या वडिलांनी बायकोची समजूत घालायचा प्रयत्न केला; पण मनजितकौरनं त्यांनाही उडवून लावलं. मात्र, जस्सी ठाम होती.
""मिठ्ठूनंही कॅनडात यावं यासाठी मी प्रयत्न करेन आणि नाहीच जमलं तर भारतात जाऊन मिठ्ठूबरोबर राहाण्याचीही माझी तयारी आहे,'' असं तिनं आई-वडीलांना सांगितलं. काही दिवस असेच तणावात गेल्यावर सुरजितसिंग युक्ती-प्रयुक्तीनं जस्सीचा विश्वास संपादन करण्याच्या प्रयत्नाला लागला.

""मला तुझी काळजी आहे आणि अवघड असलं तरी मी तुझ्या आई-वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न करेन,'' असं सुरजितसिंगमामानं जस्सीला सांगितलं. ""मिठ्ठूला जावई म्हणून स्वीकारण्यासाठी मनजितकौरची समजूत घालायला थोडा वेळ लागेल; पण त्याआधी मिठ्ठूला कॅनडात आणायला हवं,'' असं सांगून मामानं जस्सीला यावर शांतपणे विचार करायला सांगितलं. यात काही काळंबेरं असेल अशी शंकाही जस्सीला आली नाही. तिनं मामाच्या म्हणण्यानुसार वागण्याचं ठरवलं.
एक दिवस सुरजितसिंगनं तिला काही कागदांवर सह्या करायला सांगितल्या. मामाच्या सांगण्यानुसार मिठ्ठूच्या इमिग्रेशनसाठी त्या कागदांवर जस्सीच्या सह्या लागणार होत्या. सह्या करून जस्सीनं कागद परत दिले आणि मोठ्या उत्कंठेनं ती मिठ्ठू कॅनडाला येण्याची वाट पाहू लागली. दरम्यान, इकडं भारतात जगराओंच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडं जस्सीच्या सहीचा एक तक्रारअर्ज दाखल झाला. सुखविंदरसिंग ऊर्फ मिठ्ठूसिंग यानं तिला फसवून, खोटी माहिती देऊन, जबरदस्तीनं, तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी कोर्ट मॅरेज केल्यानं त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असं त्या अर्जात म्हटलं होतं. श्रीमंत घरातल्या एका मुलीनं गरीब घरातल्या एका मुलावर फसवणुकीचा आरोप केल्यावर एरवी आपल्याकडचे पोलिस जसे वागतील तसेच जगराओं पोलिस वागले. त्यांनी तातडीनं मिठ्ठूविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध सुरू केला. नशिबानं आपल्याविरुद्ध असं काहीतरी होत आहे याची कुणकुण लागल्यानं मिठ्ठू निसटू शकला. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांच्या मित्रांच्या घरी छापे घातले; पण मिठ्ठू पोलिसांच्या हाती लागला नाही.
जस्सीनं असा अर्ज केल्यानं मिठ्ठू दुखावला गेला होता. मुळात जस्सीबरोबर मैत्री वाढवायलाही त्याचा विरोधच होता. त्यानंतर आपण रजिस्टर्ड विवाह करू असं जस्सीनं सुचवल्यानंतरही त्यानं तिला विरोध केला होता. चांगल्या श्रीमंत घरातल्या मुलींनी गरीब घरातल्या मुलांच्या प्रेमात पडून, लग्न करून नंतर घरच्यांच्या दबावाखाली माघार घेऊन लग्न मोडल्याच्या कितीतरी कहाण्या मिठ्ठूनं ऐकल्या होत्या; पण जस्सी त्या इतर मुलींसारखी नाही, ती आपल्याला कधीच एकटं पडू देणार नाही, असं त्याला वाटत होतं. आणि आता त्याच जस्सीनं त्याच्यावर फसवून, इच्छेविरुद्ध लग्न केल्याचा आरोप केला होता. म्हणजे हे सगळं जस्सीचं नाटकच होतं? पोलिस त्याला शोधत असल्यानं मिठ्ठूला लपून-छपून राहावं लागत होतं. एक दिवस त्यानं कॅनडात जस्सी जिथं काम करायची तिथं फोन लावला. फोनवर जस्सीचा आवाज ऐकल्यावर मात्र तो स्वतःला आवरू शकला नाही, ""जस्सी, काय केलंस हे?'' त्यानं ओरडून विचारलं.

"तुला फसवून मी तुझ्याशी लग्न केलंय अशी तक्रार केलीस तू माझ्याविरुद्ध पोलिसांत? तू माझ्या प्रेमात पडावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी हात जोडून वारंवार तुला सांगत होतो; पण तुझाच आग्रह होता. आता कुठं गेल्या तुझ्या त्या प्रेमाच्या सगळ्या आणा-भाका? जस्सी, कुणी कुणाला फसवलंय? पोलिस माझ्या मागं लागले आहेत आणि गेले काही दिवस मी त्यांच्यापासून स्वतःला वाचवत पळतो आहे. जस्सी, तू माझं आयुष्य उद्‌वस्त केलंस...'' आता त्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता आणि तो लहान मुलासारखा रडत होता. इकडं जस्सीला काहीच समजत नव्हतं. मिठ्ठू का चिडला आहे, तो आपल्यावर का ओरडतो आहे?
""मिठ्ठू, शांत हो. तू काय म्हणतो आहेस, मला काहीच समजत नाहीये. हे बघ, शांत हो, पाणी पी थोडं आणि नेमकं काय झालंय ते मला पुन्हा सांग. मी जस्सीच आहे, तुझीच जस्सी. आणि नेहमी मी तुझीच राहणार आहे. हे बघ, तू शांत हो. आणि पुन्हा फोन कर,'' जस्सी त्याला समजावत होती. मिठ्ठूचाही स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. जस्सीनं आपला विश्वासघात केला असाच समज झाल्यानं जस्सीच्या या बोलण्यानं तोही गोंधळला होता. थोडं सावरल्यावर मिठ्ठूनं जस्सीला पुन्हा फोन करून तिला जगराओं पोलिसांकडं आलेली जस्सीची तक्रार, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, त्याच्या मागचा पोलिसांचा ससेमिरा आणि तो कसा स्वतःला वाचवत पळतो आहे हे सगळं सविस्तर सांगितलं. ही सगळी कहाणी ऐकून जस्सीला धक्काच बसला. थोडा विचार केल्यावर हे सगळं आपल्या मामाचंच कारस्थान आहे हे तिच्या लक्षात आलं. सुरजितसिंगनं मिठ्ठूच्या इमिग्रेशनच्या म्हणून काही कागदांवर तिच्या सह्या घेतल्या होत्या, हे तिला आठवलं. मामा त्यांना मदत करत आहे म्हणून तिनं त्याआधी मिठ्ठूशी बोलताना मामाचं कौतुकही केलं होतं.

""हे सगळं माझ्या मामाचं कारस्थान आहे. यातला खरा खलनायक तोच आहे. सॉरी, मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या कागदांवरचा मजकूर पंजाबीमध्ये लिहिलेला होता त्यामुळे मला तो वाचता आला नाही. मामावर विश्वास ठेवून मी त्यानं सांगितलं तिथं सह्या केल्या; पण त्यामुळे तुला खूप त्रास झाला. माफ कर मला,'' असं म्हणत जस्सीनं मिठ्ठूला, ""आजच हा विषय संपवते, तू काळजी करू नकोस,'' असं सांगून फोन ठेवला.
काही ओळखीच्या लोकांकडून थोड्या खटपटीनं तिनं जगराओं पोलिसांचे नंबर मिळवले आणि तिथल्या वरिष्ठ अधीक्षकांच्या नावे एक फॅक्‍स मेसेज पाठवला.
""मिठ्ठूनं मला फसवलेलं नाही. त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय माझा स्वतःचा होता आणि माझ्या सह्या असलेला तक्रारअर्ज हीच खरी लबाडी आहे,"" असं तिनं त्या फॅक्‍स मेसेजमध्ये लिहिले होतं. या फॅक्‍स मेसेजच्या प्रती जस्सीनं इतरही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्या होत्या.

""शक्‍य तितक्‍या लवकर भारतात येऊन मी न्यायालयासमोर आणि जिथं कुठं आवश्‍यक आहे त्या सर्व अधिकाऱ्यांसमोर स्वतः सर्व वस्तुस्थिती सांगेन,'' असंही जस्सीनं लिहिलं होतं. तोपर्यंत मिठ्ठूला संरक्षण द्यावं आणि त्याच्या विरुद्ध काही कारवाई करू नये, अशी विनंतीही तिनं या सगळ्या अधिकाऱ्यांना केली होती. हा फॅक्‍स मिळाल्यावर मात्र मिठ्ठूच्या मागचा पोलिसी ससेमिरा एकदम थांबला. घरी गेल्यावर जस्सीनं आईला आणि मामाला त्यांच्या या कृत्याबद्दल जाब विचारला. त्यांचा एकंदर विरोध पाहून जस्सीनं ताबडतोब घर सोडण्याचा निर्णय घेतला. एक जागा बघून ती तिथं राहायला गेली. दरम्यान, सुरजितसिंगनं जस्सीचा पासपोर्ट फाडून फेकून दिला होता आणि मिठ्ठूविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून तो भारतात आला होता. कॅनडातल्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगून जस्सीनं नवीन पासपोर्ट मिळवला आणि तीदेखील भारतात आली. हा गोष्ट एप्रिल 2000 मधली. मिठ्ठूची आणि तिची भेट झाल्यावर दोघांनाही अश्रू अनावर झाले. त्यांचे काही मित्र आणि हितचिंतकही आता त्यांच्याबरोबर होते. मग पोलिसांकडं जाऊन जस्सीनं तिच्या नावानं देण्यात आलेली खोटी तक्रार मागं घेण्यासंबंधी अर्ज दिला.
या प्रकरणाची सुनावणी ज्या दिवशी होती त्या दिवशी सुरजितसिंग आणि जस्सीचे आणखी काही नातेवाईक न्यायालयात आले होते. जस्सीनं स्वतःच न्यायालयासमोर तिची बाजू मांडली. आपण स्वखुषीनं मिठ्ठूशी लग्न केलं आहे आणि मिठ्ठूच्या विरोधातली तक्रार खोटी आहे, हेही न्यायालयात सांगून त्याच्याविरुद्धची तक्रार रद्द करावी अशी विनंतीही तिनं न्यायालयाला केली. न्यायालयानं तिच्या बाजूनं निकाल दिल्यावर मिठ्ठूचा हात हातात घेऊन विजयी मुद्रेनं मामासमोरून ती बाहेर पडली. सुरजितसिंगही असं काही सहन करणाऱ्यातला नव्हता.
""वेळ आल्यावर मी तुम्हा दोघांनाही बघून घेईन,'' तो स्वतःशीच पुटपुटला. आता मिठ्ठूला पोलिसांची भीती नव्हती. त्यानं आणि जस्सीनं पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात जगायला आता ते मोकळे होते.

मनजितकौरही भावासारखीच होती. - मत्सरी, रागीट, अदूरदर्शी आणि खुनशी. जस्सीनं आपल्या इच्छेविरुद्ध मिठ्ठूशी लग्न केलंय हे त्यांना मान्यच नव्हतं. मिठ्ठूला जर या चित्रातून बाजूला केलं तर जस्सी आजही परत येईल, असं त्यांना वाटत होतं. तिकडं कॅनडात बसून ते दोघं मिठ्ठूचा अडसर कसा दूर करायचा, त्याला ठार मारायचं किंवा काहीतरी करून त्याला बाजूला करायचं याचा प्लॅन करायला लागले होते. काही दिवसांनी सुरजितसिंग भारतात परतला. आता तो मिठ्ठूचं जे काही करायचं होतं त्यासाठी कोण मदत करेल याच्या शोधात होता.

दरम्यानच्या काळात मिठ्ठू आणि जस्सी गोपाळपूरहून मिठ्ठूच्या मामाच्या गावी संगरूरला स्थायिक झाले होते. मागच्या सगळ्या कटू आठवणी विसरून त्यांनी आता नव्या आयुष्याला सुरवात केली होती. त्यांनी एक स्कूटरही खरेदी केली होती. ते दोघं स्कूटरवरून नेहमी फिरायला जात असत. दुसरीकडं जस्सी पुन्हा मिठ्ठूला कॅनडात घेऊन जाण्यासाठी आवश्‍यक ते सोपस्कार पूर्ण करण्यामागं लागली होती.
सुरजितसिंग मात्र मिठ्ठूला मारण्याची सुपारी घेणाऱ्या लोकांच्या शोधात होता. या कामात त्याला गावपातळीवर समाजकार्य करणाऱ्या त्याच्या चुलतभावाची - हरदेवसिंगची- मदत होती. काही गुंडांबरोबर संधान बांधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. पोलिस खात्यात सबइन्स्पेक्‍टर असणाऱ्या जोगिंदरसिंग नावाच्या आपल्या एका जुन्या मित्राबरोबर या विषयावर आपण बोलल्याचं हरदेवसिंगनं सुरजितसिंगला सांगितलं. ठाणेदार जोगिंदरसिंगनं सुरजितसिंगचं आणि त्याच्या बहिणीचं काम करण्याची तयारी दाखवली होती. आता तो प्रत्यक्ष ते काम करण्यासाठी माणसांच्या शोधात होता. माणसांची निवड फार काळजीपूर्वक करावी लागणार होती. कारण, काम खूप जोखमीचं होतं; पण सुरजितसिंगनं त्याला साफ सांगितलं होतं : ""लोक लवकर शोधा, एकदम जालीम, क्रूर, दया-माया नसलेले "पेशेवर' लोक आणा. पैसे लागतील तेवढे मिळतील; पण काम आम्ही म्हणतो तसंच झालं पाहिजे.''
(उत्तरार्ध - 1)
(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडं आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT