sanjay kalamkar 
सप्तरंग

आमचा गंगाराम टेलर... (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com

आमच्या गावच्या चौकात एका दुर्लक्षित कोपऱ्यात गंगाराम टेलरचं मातीनं लिंपलेलं छोटंसं दुकान होतं. त्या कोपऱ्यातून कायम शिलाई मशिन चालवल्याचा आवाज यायचा. मशिनच्या मागं ठेवलेल्या लाकडी स्टुलावर, कोपरी घातलेला हडकुळा गंगाराम टेलर तन्मयतेनं कपडे शिवताना दिसायचा.

आख्ख्या गावाचे नवे कपडे शिवणाऱ्या गंगारामच्या अंगावर मात्र कधी कुणाला नवे कपडे दिसले नाहीत. त्याच्या अंगावर सदैव ठिगळाची बंडी असायची. त्याच्या छोट्याशा जीर्ण दुकानाच्या कोपऱ्यात डुगुडुगु हलणारं लाकडी टेबल भिंतीच्या आधारानं कसंबसं तग धरून उभं होतं. त्यावर गंगाराम नवं कापड अंथरून त्याची कटाई करायचा. एक जुनाट लोखंडी कात्री व मेणचटलेली लाकडी पट्टी दुकानात कुठंही पडलेली दिसायची. भिंतीला जाड दोरीच्या अस्ताव्यस्त वलणी बांधलेल्या होत्या. शिवून तयार असलेले कपडे त्यावर फाशी दिल्यासारखे लटकताना दिसायचे! गंगारामच्या हाताशी ठेवलेला रेडिओ मात्र सदोदित सुरू असायचा. त्याला गाण्याची आवड होती. रेडिओतल्या गाण्यांबरोबर तोही मोहोळाच्या माशीसारखा गुणगुणत राहायचा. गंगारामनं कपडे शिवण्यासाठी कधी कुणाच्या अंगाचं माप घेतलं नाही. माणूस कापड घेऊन आला की तो त्याला नजरेनं नखशिखान्त जोखायचा. नंतर त्याला पाठमोरा उभा करून एकदा त्याची मागची बाजू पाहून घायचा. कधी कधी तो गिऱ्हाइकाला स्वतःभोवती प्रदक्षिणाही घालायला लावायचा. जणू माप घेण्याचा टेप त्याच्या डोळ्यातच बसवलेला होता! तरी एखादं गिऱ्हाईक टेपनं माप घेण्याचा आग्रह धरायचं तेव्हा गंगाराम म्हणायचा : ‘‘आता तुमचं सारं अंग बेमाप होत चाललंय तिकडं ध्यान द्या. कपडे कमी-जास्त करणं सोपं असतं महाराज; पण अंगाचा बोंगा होत चालला का काय खरं नाय.’’

गंगारामच्या या बोलण्याचा व्हायचा तोच परिणाम व्हायचा. कधी कुणाच्या सदऱ्याची एक बाही लांब व्हायची तर दुसरी आखूड. गिऱ्हाईक तक्रार घेईन आलं तर गंगाराम हसत म्हणायचा : ‘‘एवढं काय घाबरता महाराज? बाहीच लांब झाली, हात तर नाय ना! जे दुरुस्त करायची सोय आहे ते बिघडलं तर एवढं बिघडायचं नसतं!’’ दुकानात बसलेल्या लोकांना सर्रास अशा गमती पाहायला मिळायच्या. एकदा कोंडीभाऊ घाईनं कुठल्या तरी लग्नाला निघाले होते. त्यांनी गंगारामकडे नवा सदरा शिवायला टाकला होता. आल्याबरोबर ‘आवर’ म्हणून त्यांनी घाई उडवून दिली. तेव्हा गंगाराम त्यांचाच नेहरू शर्ट शिवत होता. एकदाचा शर्ट शिवून तयार झाला. कोंडीभाऊंनी तो घातला अन्‌ दुकानात बसलेले सारेच हसू लागले. कारण, गंगारामनं घाईत शर्टचा खिसा पुढं शिवण्याऐवजी पाठीवर शिवला होता. चूक लक्षात आल्यावर गंगाराम म्हणाला : ‘‘अरारा..खिसा पाठीवर गेला. काढा खमीस. दोन मिनिटांत त्याला पुढं घेतो.’’
तर कोंडीभाऊ घाईनं बाहेर पळत म्हणाले : ‘‘तुझ्या या खिशापायी माझा वऱ्हाडाचा ट्रक निघून जाईल. आता लग्नाहून आल्यावर त्याला पुढं घी...’’ तसा गंगाराम ओरडला : ‘‘खमीस मी शिवलंय असं लग्नात सांगू नका महाराज...नायतर तुमच्या पाठीवरची चूक आमच्या पोटावर यायची...’’

एकदा तर शिरूतात्यांच्या पायजम्याला गंगाराम नाडीच ओवायचा विसरला. घरी जाऊन पायजमा घातल्यानंतर तात्यांच्या लक्षात आलं नि मग ते तसेच कंबर आवळून थेट गंगारामच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले. त्यांचा रागावलेला चेहरा पाहून गंगाराम हसत म्हणाला :‘‘ पायजम्याचीच नाडी राहिली ना...? हाताची तर चालू हाय ना...! ते बघा, त्या वलणीवर नाड्याच नाड्या लटकवून ठेवल्यात. कोणती पण ओवून घ्या आन् असे कसे आले तुम्ही...? मी घरी आलो असतो महाराज, नाडी घेऊन...रस्त्यावरचं एखादं कुत्रं मागं लागलं असतं तर काय हालत झाली असती...!’’
त्याच्या या बोलण्यावर शिरूतात्याही हसू लागले. कितीही संतापलेला माणूस गंगारामसमोर मेणासारखा पाघळत असे. गावचे सारे कार्यक्रम चौकात व्हायचे. दुकानात बसल्याजागी मशिनवर पाय चालवताना गंगाराम हे सारे कार्यक्रम ऐकायचा. बहुश्रुततेनं त्याच्या बोलण्यात वेगळीच खुमारी आली असल्याचं जाणवायचं.
दुकानात अड्डा करून बसलेले लोक राजकारणाच्या गप्पा काढायचे तेव्हा गंगाराम मधेच म्हणायचा: ‘‘इथं बसून खड्ड्यांवर बोलण्यापेक्षा उठा. आपण सारे मिळून चौकातले खड्डे बुजवून टाकू. सरकारला कुठवर नावं ठेवता? तुम्ही मत द्यायला सरपंचाकडून पैसे घेतले तिथंच तुम्ही खरे खड्ड्यात गेले.’’

कुणीतरी म्हणायचा : ‘‘तुम्ही तरुण असतानाचे पुढारी चांगले असतील, गंगाराम!’’ तेव्हा तो मशिनवर हलणारे पाय स्थिर करत म्हणायचा :‘‘त्यांनी खरा देश उभा केला. आता तुमच्यासारखी नवीन पोरं याचं त्याचं ऐकून नेहरूंना नावं ठेवतात. ‘गांधीबाबा या देशात जन्माला आले नसते तर बरं झालं असतं’ असं बोलण्यापर्यंत तुमची मजल गेली आहे. हे देश संपायचं लक्षण आहे. नवा कपडा शिवतानासुद्धा त्याला आतून जुन्या कापडाचं अस्तर लावावं लागतं, महाराज. तरच तो खूप दिवस टिकतो. मी नवीन कपडे शिवायला लागलो तेव्हा माझं स्वप्न होतं...नेहरू या भागात आले तर आपल्या हातानं शिवलेला नेहरूशर्ट त्यांना भेट द्यायचा; पण तो योग काही जुळून आला नाही.’’
गंगारामच्या मशिनच्या व तोंडाच्या आवाजानं गावाचा चौक असा सतत जिवंत राहायचा.
***

खूप दिवसांनी गावी गेलो. चौकाच्या बदललेल्या चेहऱ्यामोहऱ्यात गंगारामचं दुकान विरघळून गेलं होतं. गल्लीतून जाताना मला घराच्या पडवीत उघड्या अंगानं बसलेला कृश गंगाराम दिसला. अर्धांगवायूनं तो गलितगात्र झाला होता. कुटुंबानं त्याला जीर्ण कपड्यासारखा पडवीत टाकला होता. मी जवळ जाऊन नमस्कार घातला. त्याच्या डोळ्यात अनोळखी भाव होते. गावाची शरीरं झाकणारा गंगाराम अशा उघड्या अंगानं बसलेला पाहून डोळ्यांत पाणी तरळलं. मी जड पावलानं निघताना पाहिलं, गंगारामाचा एक पाय अविरत हलत होता... शिलाई मशिनचा पायटा मारत असल्यासारखा...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

SCROLL FOR NEXT