book review
book review 
सप्तरंग

पुस्तक परिचय: संपवलेल्या माणसांच्या कथा...

रामदास खरे

‘ते हातापायांच्या काड्यांवर आपलं भलंमोठं डोकं सांभाळत हेलपाटत चालणारं, चळचळा मुतायला लावणारी नजर बाळगणारं, पेनच्या निबेसारखी नखं असणारं मूल म्हणजे या कथेचा लेखक होतं, ज्याचं नाव 'जावेद' आहे, जो आजही जिवंत आहे आणि कायम जिवंत असेल...’ हा उतारा आहे कथाकार किरण येले यांच्या ‘तिसरा डुळा’ या कथासंग्रहातल्या ‘जावेद जिवंत आहे’ या कथेतला. किरण येले हे उत्तम कवी आहेत. (वाचा : ‘बाईच्या कविता’ कवितासंग्रह) माणसाच्या स्वभावांचं, भोगांचं ते तटस्थपणे चित्रण करीत असतात. (वाचा : मोराची बायको) माणसाच्या जगण्यातली घसरण टिपण्याची त्यांच्याकडं एक प्रकारची विलक्षण फोटोजेनिक दृष्टी आहे. ‘मोराची बायको’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहातील कथा या अमूर्त शैलीतल्या, तर ‘ तिसरा डुळा’मधल्या कथा वास्तववादी आहेत. 'तिसरा डुळा'मधल्या कथा वाचताना कथेतल्या व्यक्तिरेखा, वातावरण, संदर्भ आणि महानगरातला परिसर हा आपल्या चांगल्या परिचयाचा असला, तरी त्यात आलेले फ्रेमचं दुकान असलेला हारुन, रोजंदारीवर काम करणारा जमील, धनकू, कचरा वेचणारी रखमा, मुसलमान असून हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साक आणि जत्रेत रस्त्यावर चित्रं काढणारा जगल्या यांचं जग आणि जगणं आपल्याला अजिबात माहीत नाही. त्यांचं सुख, दुःख, वेदना, हसणं आणि हसत हसत भुकेशी लढणं आपल्याला माहीत नाही. हे सगळं ‘तिसरा डुळा’मुळे आपल्याला कळतं. 'तिसरा डुळा'मध्ये एकूण सात कथा आहेत. या सातही कथांमधल्या व्यक्तिरेखा आपल्याभोवती फेर धरत अस्वस्थ करतात आणि काही प्रश्नदेखील विचारतात, ज्यांची उत्तरं देण्याचं बळ आपल्याजवळ नाही. अशा प्रकारच्या झपाटलेपणाच्या वावटळीत वाचक गरगरत राहतो.

कथासंग्रहाच्या प्रारंभीच लेखक किरण येले यांनी 'मी का लिहितो' म्हणून आपली भूमिका मांडली आहे. किरणला या कथा कुठं गवसल्या हे महत्त्वाचं नाही. त्यापेक्षा भोवतालच्या विचित्र संदर्भांनी गजबजलेल्या पार्श्वभूमीनं, तिथल्या रसरशीत माणसांनी किरण येले यांना कथा लिहावयास कसं प्रवृत्त केलं ते अधिक भावतं. मनोगताच्या अखेर येले यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. काय आहे ते ? "Survival of the Fittest' हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे, असं हा नियम सांगतो. थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना जगवण्याचा प्रयत्न करतो तो माणूस, अशी खरंतर माणूसपणाची व्याख्या आहे. अशाच आजारी, पिचलेल्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत... आणि या कथा अशा संपत चाललेल्या माणसांच्या आहेत.

या सात कथा वाचल्यावर त्यांतील व्यक्तिरेखा आपल्याला दाहक अनुभूती देतात. संपलेपणाची भावना किती विलक्षण आणि तीव्र असते, याचा प्रत्यय सारखा येत राहतो. सातही कथांची मांडणी अप्रतिम झाली आहे. हिंदू-मुस्लिम दंग्याची पार्श्वभूमी यातील काही कथांना आहे. विविध व्यक्तिरेखांमधून साकारलेल्या कथांमध्ये जगण्याची अपरिहार्यता, अगतिकता दृष्टीस पडते. 'हारुन फ्रेम वर्क्स'मधली शाहिदाबी, हारुन, रशीद काहीबाही बोलू लागतात. दंग्याचं लोण हारुनच्या दुकानापर्यंत, घरापर्यंत आणि नंतर गिळून टाकतं त्याचं अस्तित्व, जगणं, अगदी फ्रेमसकट. उरते फक्त राख. 'झुंबर' कथेत भेटतात धनकू, दगडूशेठ, ती वरात, मिरवणूक. धनकूच्या डोक्यावर आहे लखलखतं झुंबर; दारिद्र्याचं, जगण्याचं, वेदनेचं. झुंबर कोसळतं, धनकूला घेऊन. 'ईस्साक पक्का हिंदू होता' कथेतला हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साकही 'धर्म' नावाच्या चक्रात भरडला जातो. 'प्रॉपर्टी एक्झिबिशन' कथेत बंद पडलेल्या फॅक्टरीचे सांगाडे, त्यांना चिकटलेलं कामगारांचं रक्त आणि घाम आणि तिथं उभी राहणारी टॉवर संस्कृती. पुन्हा जुन्यांना संपवण्याची भाषा वाचकाचा तिसरा डोळा उघडते. 'जावेद जिवंत आहे' कथेमध्ये नूर हॉटेलचा मालक नूर, जमील, जमीलशी निकाह करून मुसलमान झालेली रखमा, उस्मान, नवीनभाई, अशा व्यक्तिरेखांनी रेखाटलेल्या नाट्यामध्ये शेवटी तो जावेद कोण होता, हे कळल्यावर आपण नखशिखान्त हादरून जातो.
संग्रहातील शेवटची कथा 'तिसरा डुळा' आहे. प्राचीन शिवमंदिराच्या पार्श्वभूमीवरची ही एक वेगळीच कथा. जत्रेत डोंबारी खेळ करणारी मंगळी आणि रस्त्यावर देवाचं चित्र काढणाऱ्या जगल्याचा मुलगा. जगल्या मेल्यावर मंगळीवर उपासमारीची वेळ येते आणि तेव्हाच तिला मार्ग सापडतो; शंकरासारखं डमरू वाजवणाऱ्या, तांडव करणाऱ्या, शंकराची गाणी पाठ असणाऱ्या म्हादूला शंकराचं सोंग बनवून पैसे कमावण्याचा. म्हादूला हे कळताच आनंद होतो, त्याच्यासाठी शंकर बनणं पैसे कमावण्याचा मार्ग नाही. शंकरावर प्रचंड भक्ती असलेला म्हादू शंकर बनतो आणि मग जे होतं ते म्हणजे ‘तिसरा डुळा’ कथा. या सर्व कथा वाचल्यावर संपून गेलेल्या माणसांचं जग पाहण्यासाठी आपल्याला तिसरा डोळा लाभतो.

पुस्तकाचं नाव : तिसरा डुळा
लेखक : किरण येले
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई (०२२ - २४२१६०५०, २४३०६६२४)
पृष्ठं : १९४, मूल्य : २५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT