वारी म्हणजे सुखाचा सोहळा. शब्दांमध्येही वर्णन करता येणार नाही असं सुख वारीत मिळतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळं, अन्य हौशी लोकांच्या सहभागामुळं, इतर काही गोष्टींमुळं काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यांचाही सर्वांनीच साकल्यानं विचार करायला हवा.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।
धरिले केशवा पाय तुझे ।।
वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरीची वारी करत नाही, तो वारकरीच नाही, अशी अलिखित व्याख्या संप्रदायात रूढ आहे. सुखासाठी सारं जग धावत आहे. हवं तसं सुख मिळत नाही. परिणामी हे धावणं दुःखाला कारण ठरत आहे. हे वास्तव आहे. संसारिक आणि पारमार्थिक असे दोन सुखाचे प्रकार असतात. वारकरी संप्रदायानं संसारिक सुखाला कधीच थारा दिला नाही. कारण ते क्षणिक असतं. परमार्थामध्ये त्याच्या उलट असतं. परमार्थातलं सुख आत्मिक समाधान देते, जे समाधान दीर्घकाळ टिकते. वारीतले वारकरी वर्षभर संसारात राहतात. त्यातला सुख-दुःख भोगतात. वारीचे वीस-बावीस दिवस वारकरी संसारातलं सर्व काही विसरून संतांच्या संगतीत पंढरीच्या सावळ्या विठुरायाचे गोडवे गात वारी करतात. वारीत निर्माण होणाऱ्या तात्कालिक दुःखालाही वारकरी सुखात परावर्तित करतात. वारीत चालताना येणाऱ्या अडचणीवर मात करून वारकरी आपलं आत्मिक समाधान मिळवतात. वारी जाती, धर्म यांच्या भेदाच्या पलीकडं चालते. कोण कोणत्या जातीचा, धर्माचा हे पाहिलं जात नाही. वारीत एकच जात आणि धर्म असतो तो वारकरी. वीस-बावीस दिवस एकमेकांच्या संगतीत राहून केवळ प्रेमाची भक्ती केली जाते. संतांच्या संगतीनं देवाच्या भेटीला निघालेला हा सोहळा म्हणजे प्रेमभक्तीचा अथांग सागरच आहे- जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकवटतो आणि पंढरीमध्ये एकरूप होतो. अनेकदा वारकऱ्यांना विचारलं, की वारीत येऊन काय मिळते, तर बहुंताश वारकऱ्यांचं एकच उत्तर असतं ः आनंद, समाधान! इतके परिश्रम करून लाखो वारकरी इतकी मोठी वाटचाल करतात, त्यातून समाधान कुठं शोधतात, असे प्रश्न पडतात, तेव्हा त्यातून उत्तर मिळतं ते म्हणजे वारीत जे जीवन जगतात त्याला भक्तीची, निष्ठेची झालर असते. या निष्ठेच्या बळावर केलेली साधना म्हणजेच पंढरीची वारी होय. जी वर्षानुवर्षं अव्याहतपणे सुरू आहे. वारी हा सकारात्मकतेचा अखंड प्रवाह आहे. इथंच ऊर्जा नावाच्या भावनेचा उगम आहे. संतांच्या संगतीत सुख अनुभवण्यासाठी वारीइतकं चांगलं साधन नाही. अनेकदा नवल वाटतं. देवाला भेटण्यासाठी हे वारकरी शेकडो किलोमीटरची पायी वाटचाल करतात. संसाराचा सर्व व्यवहार सोडून वारीत सहभागी होतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वीस-बावीस दिवस अपार कष्टातून पंढरीसमीप येतात, तेव्हा त्यांची अवस्था उलट असते. त्यांना वारीचा प्रवास संपवण्याची इच्छा नसते. थेट विठ्ठलदर्शनाची ओढ नसते. तेव्हा लक्षात येतं, की वारी ही जरी भगवंताला भेटण्याची साधना असली, तरी त्या विठ्ठलाचं दर्शन त्यांना निरनिराळ्या माध्यमातून वारीतच होत असतं. कारण विठ्ठलभेटीच्या आनंदाचे क्षण तो वारीच्या वाटचालीत रोज अनुभवत असतो. पंढरीत आपली वारी पांडुरंगाच्या चरणी समर्पित केली, तरी त्यांच्या चेहऱ्यावर निव्वळ आनंदच नसतो. पुन्हा कधी वारी येईल याची ओढ जास्त असते. भगवंताच्या दर्शनापेक्षा त्याच्या ओढीतली अवस्था वारकऱ्याला सुखाची प्राप्ती करून देते.
अवघाचि होशी तू सुखरूप
तरी तू पंढरीसी जाय एक वेळ
वारीतल्या वाटचालीत वारकऱ्यांना मिळणारं सुख, समाधान ते संतांच्या संगतीत शोधतात. रिंगण असो वा धावा, वारकरी संतसंगतीनं विठ्ठलाला आपल्याशी एकरूप करून आनंद लुटतात. त्यामुळंच संतांनीही सांगितलं आहे, तो पंढरीतला विठुराया वारीत आपल्या भक्तांसाठी सामोरा येतो. वारीत जीवन जगत असताना माऊली हा पर्वणीचा शब्द होऊन जातो. कोण कोणत्या स्वरूपात आपल्याला मदत करतो, हे समजून येत नाही. वारीत सकारात्मक भावना क्षणोक्षणी अनुभवायला मिळते.
गेल्या काही वर्षांपासून वारीत आमूलाग्र बदल होत चालले आहेत. वर्षांनुवर्षं चालत आलेल्या परंपरांमुळं वारीत वाढ होत आहेच. परंतु गेल्या दशकात प्रसारमाध्यमांमुळं वारीतल्या वारकऱ्यांची संख्या वाढू लागल्याचं वास्तव नाकारता येत नाही. मोठ्या प्रमाणात तरुणाईही वारीत सहभागी होत आहे. वारीत आत्मिक सुख मिळतं, हे वारी एकदा केली, की लक्षात येतं. एकदा का कोणी वारीत आला, की तो वारीचा होऊन जातो, त्याला कोणीच अपवाद नाही. वारी बदलते आहे, तिनं आधुनिकता स्वीकारली आहे. वारीतल्या परंपरामध्ये अनेक आधुनिक गोष्टीचा समावेश मोठ्या मनानं केला आहे. व्यवस्थापनातही आधुनिक साधनांचा भरणा वारीत वाढत आहे. वारीच्या वाटेवर अनेक जण वारकऱ्यांची सेवा करतात. अनेक गावांमधून वारकरी दिंड्यांना; तसंच अनेकांना अन्नदान केलं जातं. वारकऱ्यांचा पाहुणचार पुण्यात जोरदार केला जातो. मात्र, काही वेळा ज्या पद्धतीनं काही वस्तूंचं वाटप केलं जातं, ते योग्य वाटत नाही. वारीतल्या दिंड्यांत चालणाऱ्या वारकऱ्यांना सेवाभावी संस्था करत असलेल्या खाद्यपदार्थांच्या वाटपाची गरज नसते. त्यांची पूर्ण व्यवस्था दिंडीत असते. मात्र, मोकळे वारकरी चालतात. ते घेतात. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून विचित्र चित्र वारीत पाहायला मिळतं. पोटाची चिंता असलेल्यांची गर्दी असते. अशा वाटप करणाऱ्या संस्था-संघटनांनी त्या घटकांसाठी संबंधित ठिकाणी वाटप करावं, म्हणजे त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळतील. वारीतल्या चुकीच्या चित्रामुळं वारकऱ्यांची प्रतिमा मलीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक मंडळं स्वागत करताना मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावतात. त्यामुळं दिंड्यांतल्या भजनांमध्येही व्यत्यय येतो. अनेकदा देवस्थान, मानकरी, दिंडीकऱ्यांनी सांगूनही ती प्रथा बंद होत नाही. "आम्हाला भजन करू द्या. तुम्हीही ते ऐका,' असं सांगितलं जातं; पण ध्वनिवर्धकामुळं कोणालाच काही कळत नाही. अशा प्रकारच्या स्वागताचा हा अट्टहास बंद व्हावा, अशी वारकऱ्याची मागणी आहे. वारीत अनेक गोष्टी बदलण्याची गरज आहे. सध्या मोठ्या प्रमाणात रजिस्टर दिंड्यांव्यतिरीक्त अन्य समाज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही. त्यामुळं परंपरेनं वर्षानुवर्षं भजन करत, शिस्तीनं येणाऱ्या वारकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वाढलेल्या नागरीकरणामुळं गावांतल्या जागा कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळं आगामी काळात या वाढीव संख्येचा विषय चिंतेचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं काही दिंडीचालकांनी मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा घेण्यास सुरवात झाली आहे.
सोशल मीडियाद्वारे वारी काही मिनिटांत जगभर पोचवली जाते. मात्र, त्याचा वापर योग्य पद्धतीनं करण्याची गरज आहे. कारण त्याचा अतिरेक आगामी काळात वारीला त्रासदायक होणार हेही तितकंच खरं आहे. हा सुखाचा सोहळा आहे. त्यात कायम आनंद आणि आनंद नांदावा असं वाटत असेल, तर आधुनिकतेबरोबर त्याचा अतिरेक होणार नाही, याचीही काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.