Marathon Sakal
सप्तरंग

मॅरेथॉनविषयी सर्व काही...

क्रीडाक्षेत्रातल्या घडामोडी आणि विविध खेळ यासंबंधीची माहिती विविध माध्यमांतून मिळत असते. खेळाडू किंवा प्रशिक्षक, त्यांचे अनुभव किंवा मार्गदर्शनपर लेखन करत असतात.

प्रतिनिधी saptrang@esakal.com

क्रीडाक्षेत्रातल्या घडामोडी आणि विविध खेळ यासंबंधीची माहिती विविध माध्यमांतून मिळत असते. खेळाडू किंवा प्रशिक्षक, त्यांचे अनुभव किंवा मार्गदर्शनपर लेखन करत असतात. खेळाडूंची आत्मचरित्रं यासाठी महत्त्वाचीही ठरतात. मात्र, आपल्याकडं क्रिकेटला सर्वाधिक प्रसिद्धी मिळत असते. याच खेळासंबंधी मोठ्या प्रमाणात लेखन केलं जातं आणि यातील खेळाडूही किंवा त्याचे समीक्षक सर्वाधिक लेखन करत असतात. भारतात तरी हेच चित्र आहे. मात्र गेल्या काही वर्षांत यात बदल होतोय. क्रिकेट सोडून अन्य खेळांबद्दलही आता लोक जागरूकतेनं बोलायला आणि लिहायला लागले आहेत. डॉ. संदीप सूर्यकांत काटे यांचं नुकतंच आलेलं ‘म - ‘मॅरेथॉनचा’ - कहाणी एका आरोग्यदायी चळवळीची...’ हे पुस्तक सातारा इथं भरवल्या जाणाऱ्या ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ या उपक्रमाविषयी माहिती देतंच; पण एकूणच मॅरेथॉन या क्रीडाप्रकाराविषयी जास्तीत जास्त माहिती देऊन या उपक्रमाबद्दल नुसतं ज्ञानच देत नाही, तर या उपक्रमाकडं तुम्ही कसं बघायला पाहिजे, याची दृष्टीही देतं.

डॉ. काटे यांनी स्वतः विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला. २०१२ मध्ये ७ एप्रिलला त्यांनी हैदराबादला जाऊन मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम भाग घेतला आणि मग याप्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये त्यांची सतत हजेरी राहिली. त्यानंतर त्यांनी अशी स्पर्धा आपल्या गावात, अर्थात साताऱ्यात भरवण्याचं स्वप्न पाहिलं. प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी हे स्वप्न केवळ प्रत्यक्षात आणलं असं नाही, तर त्या गावातली ती सर्वांत मोठी चळवळ ठरली आणि आरोग्यविषयक जागृतीचा मोठा उपक्रम ठरला. काटे यांनी एक ध्यास घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत सहभागी होणं अनेक धावपटूंना आपला गौरव वाटू लागला, यातच या स्पर्धेच्या यशस्वितेची पावती आहे.

दीपस्तंभ प्रकाशनाच्यावतीनं हे पुस्तक प्रकाशित करताना या प्रकाशनाचे यजुवेंद्र महाजन हे केवळ प्रकाशक नाहीत, तर स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन करणारे, तसंच दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ मनोबल फाउंडेशनचे प्रमुखही आहेत. त्यांनी हे पुस्तक तयार करताना केवळ निर्मितीमूल्यं उच्च ठेवली आहेत असं नाही, तर या वेगळ्या विषयाचं पुस्तक वाचलं कसं जाईल, त्याचबरोबर नवी पिढी सोशल मीडिया आणि यू-ट्यूबसारख्या माध्यमांशी कशी कनेक्‍ट आहे हे लक्षात घेऊन, पूरक माहिती क्‍यू-आर कोडद्वारे कशी मिळेल, याचीही तजवीज पुस्तकात केली आहे. मुळात डॉ. काटे यांनी हे पुस्तक लिहिताना खूप वेगळा विचार केला आहे, त्यामुळं पुस्तकात केवळ सातारा हिल हाफ मॅरेथॉनचं कोडकौतुक असं मानलं नाही. मॅरेथॉन या वेगळ्या प्रकाराची ओळख, त्याच्यामुळं आरोग्य कसं बदललं जातं, मॅरेथॉनच्या क्षेत्रात जगात काय चाललं आहे, मॅरेथॉनमध्ये भाग कसा घ्यायचा, त्याच्यात यशस्वी कसं व्हायचं याचीही माहिती त्यांनी दिली आहे. ही माहिती देताना त्यांनी पुस्तकाचे सहा भाग केलेले आहेत. या भागांमध्ये बाराखडीमधील विविध अक्षरांच्या साह्यानं प्रकरणांची सुरुवात केलेली आहे. अर्थात, मॅरेथॉन या क्रीडाप्रकाराशी संबंधित विविध शब्दांचा वापर करून त्यांनी प्रत्येक प्रकरणाचं शीर्षक दिलं आहे आणि मॅरेथॉनविषयी जास्तीत जास्त माहिती देताना वाचक मॅरेथॉनच्या जगात कसा गुंतला जाईल, याची काळजीही घेतली आहे. मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करताना डॉ. काटे यांच्या डोळ्यांवर मोठं संकट आलं होतं, दृष्टी जाण्याची वेळ आली होती; पण हे संकट टळलं. सातारा शहरात मॅरेथॉनविषयक केवळ जागृती न करता प्रत्येकाच्या दिनक्रमामध्ये आणि वार्षिक उपक्रमांमध्ये याला अविभाज्य स्थान कसं असेल, याकडे काटे यांनी लक्ष दिलं. केवळ डॉक्‍टर म्हणून नाही, तर या स्पर्धांतून काटे यांनी प्रचंड माणसं जोडली. ही स्पर्धा कशी आयोजित करायची, याबद्दल अनेक जण त्यांना सल्ला विचारायला यायचे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी स्पर्धा आयोजित करण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स या पुस्तकातून दिल्या आहेत. मॅरेथॉन ही चळवळ बनवत त्यांनी महिलांनादेखील यात सहभागी करून घेतलं.

इंग्रजीमध्ये मॅरेथॉन या विषयावर बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. मात्र, मराठीत मॅरेथॉनबद्दल सर्वांगीण माहिती देणारं असं पुस्तक उपलब्ध नव्हतं. मॅरेथॉनचं संयोजन कसं करावं, या उपक्रमामध्ये काय-काय अडचणी येऊ शकतात, याची व्यवस्थित माहिती देऊन डॉ. काटे यांनी मॅरेथॉन हा केवळ क्रीडाप्रकार नसून, ती एक चळवळ कशी होऊ शकेल, याबद्दल नेमकं मार्गदर्शन केलं आहे. आपल्या वैद्यकीय पेशातून वेळ काढून, मॅरेथॉनचा ध्यास घेऊन त्यांनी सातारा शहरात मॅरेथॉनची स्पर्धा, ही शहराच्या मानाचा बिंदू बनविली. हा प्रवास साधा नव्हता. अनेक चांगले तसंच वाईट अनुभवही त्यांना आले. या सगळ्या अनुभवांचा वेध त्यांनी येथे घेतला आहे. सातारा येथील मॅरेथॉन स्पर्धेची स्मरणिका असं या पुस्तकाचं स्वरूप नाही. गल्ली ते दिल्ली अशा धर्तीवर सातारा शहरात सुरू केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेची कहाणी सांगता-सांगता डॉ. काटे मॅरेथॉनचा उगम, त्याचा इतिहास, त्यानंतर भारतात मॅरेथॉनच्या क्षेत्रात काय चाललं आहे, याचा थोडक्‍यात आढावा घेतात. हे पुस्तक केवळ मॅरेथॉनपटूंना आवडेल असं नाही, तर एकूणच क्रीडा आणि आरोग्य यांच्यात कशी नेमकी सांगड घालायची आणि कुठल्याही खेळाकडं कसं बघायचं याबद्दलची मानसिकता तयार करतं. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस या खेळांपलीकडं अन्य खेळांची माहिती खूप कमी प्रमाणात मिळते. मॅरेथॉनबद्दल या काळात बरीचशी जागृती झाली असली, तरी त्याकडं बघण्याचा उत्सवी दृष्टिकोनच सर्वसाधारणपणे आढळतो. हे पुस्तक हा उत्सवी दृष्टिकोन बदलून, आपलं आरोग्य चांगलं करून जीवनाचा उत्सव कसा साजरा करायचा या मार्गावर नेतं, हे नक्की.

दीपस्तंभ प्रकाशनानं या पुस्तकाच्या विक्रीतून येणारी सर्व रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निश्‍चय केला आहे. सामाजिक बांधिलकीचा हा स्तुत्य आणि प्रेरक उपक्रम म्हणावा लागेल. काटे यांनी वाचकाला कुठंही कंटाळा येणार नाही या पद्धतीनं माहिती दिलीच; पण कुटुंब या प्रकरणात त्यांनी ‘सातारा हिल मॅरेथॉन’ ही कशी देशव्यापी ठरली याचं गुपितच उलगडलं आहे. छोटी-छोटी प्रकरणं आणि काटे यांची रंजक शैली यामुळं हे पुस्तक चांगलं काही तरी वाचल्याचा आनंद देतं.

पुस्तकाचं नाव : म - ‘मॅरेथॉन’ चा -

कहाणी एका आरोग्यदायी चळवळीची...

प्रकाशक : दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव

(०२५७-२२२३२१८. मोबा. - ८३८०००४४९५, ९९२२००४१८२)

पृष्ठं : ३९०, मूल्य : ३२५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT