Saptrang
Saptrang 
सप्तरंग

हृदयस्थ संबंधांचं सिंहावलोकन...

saptrang.saptrang@gmail.com

‘संस्थात्मक कार्यासाठी घरादाराकडे दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ घालवणं आणि हे सगळं करीत असताना आपल्यातला लेखक-कलावंत मरू नये म्हणून सतत सजग राहून ही कसरत करणं सोपं नाही, पण श्रीपाद जोशींनी आयुष्यभर ती केली, हे कुणीही नाकारू शकणार नाही आणि हा माणूस माझा मित्र, सहकारी, प्रसंगी सल्लागार आहे यात मला मनापासून धन्यता वाटते.” ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांच्याबद्दल लिहिताना रवींद्र शोभणे यांनी लिहिलेल्या लेखातील ही वाक्यं शोभणे यांच्या लेखनशैलीचा परिचय करून देणारी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘गोत्र’ या पुस्तकात शोभणे यांनी आपल्या स्नेही व मित्र परिवारातील काही निवडक लोकांवर लिहिले आहे. दहा जणांवर लिहिलेल्या या लेखसंग्रहात मराठी साहित्यिक क्षेत्रातील विविध नामवंत भेटतात. माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस, ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी, लेखक मनोहर तल्हार, आनंद यादव, प्राचार्य या. वा. वडस्कर, डॉ. आशा सावदेकर, रवींद्र गोडबोले, श्रीपाद जोशी, मनोहर म्हैसाळकर या साऱ्यांवर लिहिताना शोभणे यांनी केवळ त्यांचे कोडकौतुक करणे इतकाच हेतू ठेवलेला नाही. या माणसांचे गुण सांगताना त्यांच्या मर्यादाही त्यांनी आवर्जून सांगितल्या आहेत. त्यामुळे केवळ एखाद्या गौरवग्रंथातले लेख असे या पुस्तकाचं स्वरूप नाही. 

या संग्रहात लिहिलेल्या व्यक्ती राज्यात अनेकांना माहित असल्या तरी इथं त्या शोभणे यांच्या नजरेतून समोर येतात. मग ते मनोहर म्हैसाळकर असोत की आनंद यादव. म्हैसाळकर आणि विदर्भ साहित्य संघ हे दोन घटक म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू अशी परिस्थिती आहे, पण म्हैसाळकरांमध्ये असलेली संघटक वृत्ती, त्यांचं तिथल्या साहित्य क्षेत्रात असलेलं मोलाचं काम, विदर्भ साहित्य संघाच्या संकुलाबद्दल त्यांची असलेली बांधिलकी या साऱ्या गोष्टी तपशीलवारपणे येथे दिल्या आहेत. त्यांच्याब़द्दल लिहिताना शोभणे म्हणतात ‘‘कुणी त्यांना निवडणूक मॅनेज करणारे म्हणतात, तर कुणी त्यांना सत्तालोलुपही म्हणतात, पण हे सगळं असूनही याबाबतीत शेवटचा शब्द मात्र त्यांचाच चालतो. त्यांच्यावर परोक्ष अपरोक्ष टीका करणारेही त्यांच्या शब्दाबाहेर जात नाहीत किंवा त्यांच्यासमोर नांगी टाकतात. याला कारण त्यांची मतदारांवर असलेली पकड आणि मतदारांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर. यावेळी नेमकं तेच झालं. त्यांनी दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांना सांगितलं- माझ्या द़ृष्टीने संकुल हा विषय महत्त्वाचा आणि आणि संकुल तयार होईपर्यंत मी अध्यक्षपदी रहावं हे मला सोयीचं वाटतं. त्यांनी अशी इच्छा प्रकट केल्यावर मग काय? दोन्हींकडच्या तलवारी म्यान झाल्या.’’

म्हैसाळकरांबद्दल इतक्या चपखलपणे लिहून शोभणे यांनी संपूर्ण लेखात म्हैसाळकरांबद्दलचे वर्णन इतक्या नेमक्या शब्दात केले आहे की विदर्भाबाहेरच्या मंडळींना देखील म्हैसाळकर डोळ्यासमोर उभे राहतील. प्रत्येक माणसाची बलस्थाने सांगताना अतिशयोक्ती न करता त्याचं वर्णन करणं आणि त्याचे दोष सांगताना अकारण प्रतिमाभंजनाचा विडा उचलल्यासारखे अतिरेकी लिखाण न करणे असा समतोल शोभणे यांनी इथल्या सर्वच लेखांमध्ये सांभाळला आहे. लक्षवेधी शीर्षके देताना तो माणूसही त्यातून पटकन डोळ्यासमोर यावा आणि त्याच्या आयुष्यातील कर्तृत्वाचे देखील मूल्यमापन व्हावे असा हेतू ठेवून त्यांनी ही शीर्षके दिली आहेत. त्यामुळेच श्रीधर शनवारे यांच्याबद्दल शीर्षक देताना ‘चिमूटभर उजेडासाठी निघालेला कवी’ तर म्हैसाळकरांना ‘एक मनोहर कहाणी’, द. भि. कुलकर्णी यांच्याबद्दल ‘शापित ज्ञानयोगी’ तर आनंद यादवांवरील लेखाचं ‘शोकांतिका जगलेला न-नायक’ अशी शीर्षकं कौतुकास्पद आहेत. ‘सांजधुक्यातल्या कवितेच्या सहवासात’ या शीर्षकाखाली ग्रेस यांच्यावर लिहिलेल्या लेखात ग्रेस यांच्याबरोबर संबंध असे जुळत गेले आणि ग्रेस यांचं प्रेम कसं लाभलं त्याचबरोबर ग्रेस यांच्याबरोबरच्या स्नेहसंबंधांना पूर्णविराम कसा मिळाला हे त्यांनी मोकळेपणानं लिहिलेलं आहे.

ग्रेस यांच्याकडून काय, काय शिकायला मिळालं आहे हे ज्या कृतज्ञ भावानं त्यांनी लिहिले आहे त्याच ग्रेस यांनी गैरसमज करून घेतल्यानंतर कशी वागणूक दिली याबद्दलही तितक्याच कोरडेपणानं लिहिलं आहे. त्यांच्या त्या वागणुकीबद्दल अकारण आपल्यावर अन्याय झाल्याची हाकाटी किंवा मेलोड्रामा केलेला नाही. इथं ते दुसऱ्याचं व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करतात. ‘आय एम फ्री बट नॉट अ‍ॅव्हेलेबल’ अशी आपल्या घराच्या दारावर पाटी लावणाऱ्या ग्रेस यांच्या लहरीपणाचा नमुना सांगणाऱ्या अशा उदाहरणासारखी बरीच उदाहरणे त्यांनी तिथे दिली आहेत, पण ही उदाहरणे देताना ग्रेस यांच्याबद्दल वाचकाचं मत कलुषित व्हावं असा हेतू नाही. ग्रेस यांना कॅन्सर झाल्यानंतर त्यांच्या शरीरयष्टीवर जे परिणाम झाले आणि त्यांचं रूप बदललं त्याबद्दलची वेदनादेखील शोभणे आणि तितक्याच असोशीनं मांडली आहे. या संपूर्ण संग्रहात त्यांनी या सगळ्या माणसांबद्दल विलक्षण जिव्हाळ्याने त्याचबरोबर त्या माणसांबरोबरच्या हृदयस्थ संबंधांचे कुठलेही अवडंबर न माजवता शक्य तितकं मूल्यमापन करत नातसंबंधांच्या गुत्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

केवळ समीक्षकी भावनेने कुणाच्याही व्यक्तिमत्त्वाचा आलेख इथं मांडलेला नाही. उलट या संबंधातला ओलावा, संबंध जोडले जाण्यामागे त्या व्यक्तीत असलेल्या गुणांचा खूप मोठा भाग, भावविश्वाचं जुळलं जाणं हे सारं या लेखांमध्ये उमटले आहे. माणसं आपल्याला कळली, आपल्याला त्यांनी पूर्णपणे स्वीकारली असे आपण बिनधास्तपणे म्हणत असतो, पण आयुष्यात असे काही प्रसंग येतात की या सगळ्या संकल्पना परत परत तपासून पहाव्याशा वाटतात. या सगळ्या लेखांमध्ये जगण्याच्या प्रवासामधील ही सगळी आंदोलने नेमकेपणाने व्यक्त झाली आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT