- डॉ. कैलास कमोद
ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है जागो, उठकर देखो...जीवनज्योत उजागर है निद्रितावस्थेतल्या कृष्णकन्हैयाला भल्या पहाटे मंद मंद स्वरात भूपाळी आळवून जागं केलं जातं. मंदिरातून येणारे ते भूपाळीचे सूर ऐकणाऱ्यांची मनं प्रसन्न करतात.
‘घन:श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ किंवा ‘उठी गोविंदा, उठी गोपाला उषःकाल झाला’ अशा पुष्कळ सुंदर सुंदर भूपाळ्या मराठीत आहेत. प्रस्तुत हिंदी गीत हे कन्हैयासाठी जरी नाही तरी ती एक भूपाळीसदृश रचना आहे.
लहानसं गाव आहे. गावातल्या शिवमंदिरातल्या पुजाऱ्याची एकुलती एक कन्या रूपा बालपणापासून आपल्या वडिलांसोबत मंदिरात पूजा-अर्चा करत आली आहे. शिवाय मंदिरात आरती, भजन यांसारखी गाणीसुद्धा ती गात असते.
एकदा तर ती फार लहान असताना तिचे वडील भजन गात होते...गाता गाता त्यांचा आवाज बसला तेव्हा या बालिकेनं त्यांचं भजन पुढं सुरू ठेवलं. ते ऐकून गावकऱ्यांचे कान तृप्त झाले. आता ती यौवनात आली आहे. मंदिरात रोज सकाळी भूपाळी गात गात पहिला प्रवेश तिचाच असणार असा पायंडा पडला आहे.
तिची भूपाळी ऐकूनच गाव जागा होत असतो अशी काहीशी स्थिती त्या गावाची झाली आहे. मंदिराची रोज स्वच्छता करता करता तिचं गाणं सुरू असतं. यौवनात आलेली ती कन्या देखणी, बांधेसूद आहे. मात्र, तिच्या चेहऱ्याची उजव्या कानाच्या पुढची एक बाजू भाजल्यानं विद्रूप झाली आहे.
आपल्या केशसंभारातल्या काही जाड बटा उजव्या कानाच्या पुढं लोंबत्या ठेवून ती चेहऱ्याचा तो तितकाच भाग झाकून ठेवत असल्यानं तेवढा लहानसा विद्रूप भाग पाहणाऱ्याच्या सहजासहजी लक्षात येत नाही. गावात नवीनच आलेला एक शहरी इंजिनिअर बाबू मंदिराच्या समोरच्या घरात राहायला आहे.
उष:काल झालेला आहे. भगवान सहस्ररश्मी आपली ऊर्जा उधळत प्राची उजळून काढत आहेत. गावातसुद्धा तांबडं फुटून झुंजुमुंजु झालं आहे. आपल्या नित्यनियमानुसार आजही पाण्यानं भरलेला घडा कटीवर घेऊन रूपा मंदिरात आली आहे.
मंदिरातल्या घंटेला टोल देत ती गाऊ लागली आहे...‘ईश्वर सत्य है...’. समोरच्या घरातला नुकताच झोपेतून जागा होत असलेला इंजिनिअर बाबू आता पूर्णपणे जागा होत मंदिराच्या दिशेकडून लहरीसारखं येणारं ते गीत कान देऊन ऐकू लागला आहे.
‘हा आवाज कुणाचा आहे?’ बाबू घरातल्या वयस्क नोकराला विचारतो. नोकर उत्तरादाखल सांगतो : ‘याच गावातली मुलगी आहे. रोज सकाळी (मंदिरात येऊन) गाणं गात गावाला जाग आणते. कधी कधी तर असं वाटतं की हिनं गाणं गायिलं नाही तर...
‘...तर जणू सूर्य उगवणार नाही!’ बाबू वाक्य पूर्ण करतो. ‘नाव काय आहे तिचं?’ बाबू विचारतो. ‘रूपा’ असं उत्तर येताच बाबू उत्स्फूर्तपणे उद्गारतो : ‘जिस की आवाज इतनी सुंदर है, उस का रूप कितना सुंदर होगा...’
राम अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में दया करो प्रभू, देखूँ इन को हर घर के आँगन में राधामोहन शरणम्स त्यं शिवं सुंदरम्भ गवान शंकराची दोन रूपं आहेत. एक शिव, तर दुसरं रौद्र. शिवरूप हे प्रसन्न आणि प्रासादिक आहे, तर रौद्र रूप हे भयकारक तांडव करणारं असं आहे. बुजुर्ग कवी, गीतकार पंडित नरेंद्र शर्मा यांनी या गाण्यात शिवाचं जे रूप शब्दबद्ध केलं आहे ते प्रासादिक या अर्थानं. शिव हा शब्द त्याच अर्थानं योजिला गेला आहे.
ईश्वर हाच सत्य असून, तो प्रसन्नमुख, प्रासादिक आहे. सत्य असल्यानं त्याचं प्रासादिक रूप अधिक सुंदर आहे. ‘राम अयोध्येत आहे...महादेव काशीत आहे...कृष्णभगवान वृंदावनात आहे तरी घरोघरीच्या अंगणात त्यांनी भक्तांना दर्शन द्यावं’ अशी इच्छा, प्रार्थना ती करत आहे.
एक सूर्य है, एक गगन है, एक ही धरतीमाता
दया करो प्रभू...एक बने सब
सब का एक से नाता
राधामोहन शरणम्
सत्यं शिवं सुंदरम्
‘मोहना, सगळ्या प्राणिमात्रांना तुझ्यामध्ये एकरूप होऊ दे’ अशा आशयाची शर्मा यांनी केलेली ही रचना भक्तिभावपूर्ण आहे.
गाण्याची चाल बांधली गेली आहे ‘दरबारी कानडा’ या रागात. ही चाल बांधताना आणि गीताचे शब्द संगीतबद्ध करताना संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी कमालीचं कसब दाखवलं आहे. इंट्रोला बासरीसोबत सॅक्सोफोनची हलकीशी सुरावट आणि वीणेचा लहानसा सूर वाजून गीताची गद्यानं सुरुवात होते.
‘ईश्वर सत्य है’ या पहिल्या वाक्यानंतर लगेच देवळातल्या घंटेचा पहिला टोल येतो. ‘सत्य ही शिव है’ अशा दुसऱ्या वाक्यापाठोपाठ घंटेचे दोन टोल येतात आणि गाणं धीमे धीमे वेग घेतं. स्वराच्या पार्श्वभूमीला तबल्याचा सुंदर ठेका आणि इंटरल्यूडला सतारीचा झंकार अशा सगळ्या वाद्ययोजनेत अतिशय कल्पकता दिसून येते.
टाळ, मृदंग, चिपळी, पखवाज अशा भक्तिसंगीतातल्या वाद्यांचा सुरेख मेळ लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी साधला आहे. लता मंगेशकर यांनी प्रत्येक वाक्याला योग्य ठिकाणी पॅाजेस घेत केलेले उच्चार आणि थेट सप्तकापर्यंत नेलेल्या सुरात शेवटी घेतलेली तान त्या गाण्यालासुद्धा तितक्याच उंचीवर नेते. कोरसच्या स्वरामुळे ते भक्तिगीत सगळ्या गावाचा स्वर बनतं!
उष:काल होताना नभांगणात विखुरलेले तांबूस, नारंगी, पिवळसर, निळसर, किरमिजी असे सप्तरंग फार सुंदररीत्या चित्रित केले गेले आहेत. रंगांच्या त्या करिष्म्यामुळे गाण्याची दृश्यमानता वाढली आहे.
मंदिराच्या पायऱ्या, त्यांवरची कमान, प्रवेशद्वारावर मोठी घंटा, मंदिराचे नक्षीदार खांब आणि मोठं दगडी शिवलिंग अशी नेपथ्यरचना वास्तव आहे. घंटा वाजताच मंदिराच्या छतावर बसलेले पक्षी चिवचिव करत उडून जातात. सूर्य जसजसा वर येतो तसतसा अंधार फिटून हळूहळू तांबूस पिवळसर रंग पसरू लागतो. वातावरणाचं असं सुंदर चित्रीकरण क्वचित् पाहायला मिळतं.
इंजिनिअर बाबू, म्हणजे शशी कपूर, झोपेतून उठून आवाजाच्या रोखानं आणि मंदिराच्या दिशेनं एकटक पाहत असतो. कपडे न झटकता, न बदलता तो बाहेर येऊन सहजपणाने गाणं ऐकतो. त्याचं ते लहानसं दर्शनपण सुखद वाटतं.
रूपाच्या भूमिकेत असेलेली झीनत अमान गाण्याचा मुख्य केंद्रबिंदू. खरं तर तिचे लाँग शॅाट्स जास्त आहेत. त्यामुळे आपल्या कमनीय शरीरावर तिनं ल्यायलेल्या अपूर्ण वस्त्रांतून तिच्या चालण्याची लकब छान दिसते. रंगांच्या पार्श्वभूमीवर शुभ्र वस्त्रं नजरेत भरतात. त्यांत कुठंही बीभत्सता असल्याचं जाणवत नाही हे दिग्दर्शकीय कसब.
गावातले लोक मंदिरात प्रवेश करतात त्यापूर्वीच शिवलिंगावर घड्यातलं पाणी ओतून त्याला न्हाऊ घालून, तसंच मंदिराच्या पायऱ्यांची स्वच्छता उरकून ती अलिप्ततेनं एका खांबाजवळ आपलं गाणं सुरू ठेवत उभी राहते. तिच्याकडं गावकऱ्यांपैकी कुणी फारसं लक्ष देत नाही. तिच्या कामाचं मोल लक्षात घेतलं जात नाही हा त्याचा अर्थ. या सगळ्या कृतीत झीनतनं स्वतःचे छान रंग भरले आहेत.
‘सत्यं शिवं सुंदरम्’ १९७८ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमातल्या या गाण्यात दाखवलेल्या आकाशाचे रंग...अचूक नेपथ्य...नायिका म्हणून झीनतची निवड आणि अर्थातच तिचा शुभ्र पोशाख...अशी सगळं नीटनेटकी, चोखंदळपणे निवड करायला दिग्दर्शक कलारसिकच असायला पाहिजे. असा दिग्दर्शक राज कपूरशिवाय कोण असू शकतो!
गाण्यातल्या प्रत्येक फ्रेममधे आपल्याला राज कपूर दिसतो.
‘एक सूर्य है, एक गगन है, एक है धरतीमाता’ असं गीतकारानं लिहिलं असलं तरीही ‘माणसामाणसात भेदभाव का,’ असा अप्रत्यक्ष प्रश्न विचारण्यातून राज कपूरची समाजवादी विचारसरणीसुद्धा डोकावते.
(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.