Hardik pandya
Hardik pandya Sakal
सप्तरंग

...या बदलांबद्दल ‘हार्दिक’ अभिनंदन!

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

या आयपीएलचं फलित काय, याची क्रमवारी तयार करायची म्हटली तर पहिलं नाव हार्दिकचं येईल.

भव्यतेचं प्रदर्शन करत पार पडलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये कुणी रावाचं रंक झालं, तर कुणी अचानक स्टार होऊन प्रकाशझोतात आलं. आयपीएलच्या विजेतेपदासाठी झोकून देणाऱ्या विराट कोहली याला यंदाही करंडकाला हात लावता आला नाही, तर सर्वाधिक सहा वेळा विजेतेपदाचा करंडक उंचावणाऱ्या रोहित शर्मा याच्या ‘मुंबई इंडियन्स’ या संघाला तळातच राहावं लागलं. विराट आणि रोहित हे दोघं भारताचे माजी आणि आजी कर्णधार. या पिढीनंतर केएल राहुल, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची नावं भविष्यातील नेतृत्वासाठी चर्चेत येत असताना हार्दिक पंड्यानं कमालच केली. यंदाची ही आयपीएल सुरू होईपर्यंत तो कर्णधारपदाच्या चर्चेतही नव्हता, आयपीएलमध्ये आत्तापर्यंत चमत्कार घडत असायचे; पण एवढे टोकाचेही चमत्कार इथं घडतात याची हार्दिककडे पाहून खात्री पटते.

या आयपीएलचं फलित काय, याची क्रमवारी तयार करायची म्हटली तर पहिलं नाव हार्दिकचं येईल. हाच हार्दिक, ज्यानं ‘कॉफी विथ करन’ या कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्यामुळे त्याच्यावर काही महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी भारतीय संघातील तो एक वाह्यात खेळाडू म्हणून ओळखला जात होता. नोव्हेंबर २०१९ मधील ती घटना आणि आता २९ मे २०२२ या दिवशी त्यानं आयपीएल करंडक उंचावला तो दिवस. ‘टपोरी’ हार्दिकमध्ये आता प्रगल्भ आणि सुसंस्कृत होण्याइतपत बदल झाला आहे. आयपीएलमध्ये आठाचे दहा संघ झाले आणि त्याचं नशीबच उजळलं. अन्यथा तो ‘मुंबई इंडियन्स’मध्ये मधल्या फळीतील खेळाडू म्हणूनच राहिला असता. त्याचा नवा अवतार क्रिकेटविश्वापुढं आलाच नसता; पण प्रगती करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली तर मार्गही खुले होत असतात. हार्दिकबाबत हेच घडलं. ‘मुंबई इंडियन्स’नं त्याला संघात कायम राखलं नाही आणि नव्यानं तयार झालेल्या गुजरात संघानं त्याला थेट कर्णधारच केलं, तेसुद्धा मोठा धोका पत्करून. कारण, दुखापतीमुळे तो अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता. तंदुरुस्त होत होता; पण गोलंदाजी करू शकेल की नाही याची खात्री नव्हती. आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाऊन तंदुरुस्ती सिद्ध करावी लागली. तिथून त्याला आयपीएल खेळण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. म्हणजेच, गुजरात संघव्यवस्थापन आणि फ्रँचाईजनं हार्दिकला कर्णधार करून जुगारच खेळला होता; पण एखादी व्यक्ती जेव्हा मागील कलंक पुसण्यासाठी आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्यासाठी झपाटलेली असते तेव्हा ती व्यक्ती उत्तुंग झेप घेत असते. हार्दिकनंही तेच केलं.

उत्तम पती आणि जबाबदार वडील अशा भूमिकेत आल्यानंतर हार्दिकच्या सामाजिक वर्तनात बदल तिथूनच घडू लागले होते. आता क्रिकेटच्या मैदानावर त्याला प्रगल्भ क्रिकेटपटू झाल्याचं सिद्ध करायचं होतं. आयपीएल विजेता कर्णधार होऊन त्यानं त्यातही बाजी मारली.

शेन वॉर्न, अॅडम गिलख्रिस्ट, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि डेव्हिड वॉर्नर असे आत्तापर्यंतचे आयपीएल विजेते कर्णधार आहेत. सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहली या भारतीयांना आणि क्रिकेटविश्व गाजवणारा रिकी पाँटिंग यालाही आयपीएल जिंकता आली नाही, ते हार्दिकनं करून दाखवलं. यात गुजरात संघातील प्रत्येक खेळाडूनं दिलेलं योगदान जेवढं महत्त्‍वाचं आहे, तेवढंच कार्य हार्दिकचंही आहे.

नेतृत्वात धोनीची छबी...

सध्या समालोचक असलेले संजय मांजरेकर रोखठोक मतं व्यक्त करण्यास मागं-पुढं पाहत नाहीत. या सवयीमुळे त्यांनी स्वतःवर संकटंही ओढवून घेतलेली आहेत. अशा मांजरेकर यांनी ‘हार्दिकमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाची छबी दिसते,’ असं विधान केलं, यातच सर्व काही आलं. आयपीएल विजेतेपद मिळालं म्हणून हार्दिक मोठा होत नाही, तर संपूर्ण स्पर्धेत कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यानं दाखवलेला संयम धोनीसारखा होता. एखादा सामना गमावला म्हणून तो भर मैदानावर निराश होत नव्हता किंवा अनपेक्षित विजय मिळवल्यावर उन्मादही दाखवत नव्हता. केवळ स्मितहास्य करून तो संघासोबत विजय साजरा करत होता. धोनीकडे पाहून अशा संयमी वर्तनाचे धडे हार्दिकनं घेतले असतीलच. कारण, तो धोनीचा फार मोठा चाहता आहे. गेल्या जुलै महिन्यात कोरोनाची साथ कायम असताना आणि त्या वेळी प्रत्येक जण प्रवास करताना सावधगिरी बाळगत असताना हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल यांनी धोनीला वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी थेट रांची गाठली होती.

आता सातत्य हवं

‘हार्दिकनं तंदुरुस्ती सिद्ध करावी, आम्ही त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहत आहोत,’ असं काही महिन्यांपूर्वी म्हणजेच, आयपीएलपूर्वी, निवड समितीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

कर्णधार म्हणूनही आपल्याकडे पाहिलं जावं इतकी मोठी प्रगती हार्दिकनं आता केली आहे. भारतीय संघातलं स्थान तर त्यानं मिळवलंच, शिवाय वर्तनातही सुसंस्कृपणा आणला. आता सर्वच आघाड्यांवर यात सातत्य राहायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तंदुरुस्ती कायम राहायला हवी. भारतीय क्रिकेटमध्ये सभ्य झालेल्या हार्दिकनं टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत इतर सहकाऱ्यांच्या साथीनं विजेतेपदाचा इतिहास घडवावा हीच सर्वांची अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT