कलावंतीण दुर्ग/सुळका हा स्वराज्याच्या काळातील टेहाळणीबुरूज... आणि त्याच्या समोर दिमाखात उभा असलेला प्रबळगड हा स्वराज्यातील अनोखा दुर्ग. या सुळक्याची उंची आहे २२५० फूट, तर प्रबळगड आणि कलावंतीण मिळून किल्ल्याचा विस्तार आहे सुमारे ७०० एकर. प्रत्येक दुर्गप्रेमीला कधी ना कधी वाटतं, की आपण ‘कलावंतीण’चा ट्रेक करायला हवा. त्या कोरलेल्या पायऱ्यांवरून चढत सह्याद्रीचं अफाट आणि विशाल सौंदर्य आपल्या डोळ्यांनी बघावं. असंच काहीसं मलाही वाटत होतं. मग ठरवलं ‘कलावंतीण’चा ट्रेक करायचं.
मी हा बुरूज तसा आधी फोटोत, व्हिडिओत पाहिलेला होता. फोटोत आणि व्हिडिओतून पाहताना तो तसा अगदी सोपा आहे असं वाटत होतं; पण प्रत्यक्षात मात्र त्यानं पूर्ण दमछाक केली.
रात्री नऊ-साडेनऊच्या दरम्यान आम्ही पुण्याहून ग्रुपबरोबर निघालो. पुणे-मुंबई महामार्गावर रहदारी सुरूच होती आणि त्यात आम्हा पोरांच्या गप्पा... असं करत करत आम्ही रात्री बारा-साडेबाराच्या सुमाराला पायथ्याशी पोहोचलो. मग सगळ्यांची ओळख करून दिली गेली. गडाची माहिती समजून घेत आम्ही रात्री एकच्या सुमाराला ट्रेक सुरू केला. हा ट्रेक दोन टप्प्यांत पूर्ण करायचा होता. पहिला टप्पा प्रबळमाचीपर्यंत आणि दुसरा मुख्य रस्ता.
दीड तास पायपीट करून आम्ही प्रबळमाची या गावात पोहोचलो. खूप थकून गेलो होतो. तिथं पोहोचताक्षणीच सगळ्यांनी तिथल्या जमिनीवर, मातीत अंग टाकलं काही मिनिटं. सुरुवातीला काहीच नाही वाटलं. कारण, चढावरच्या पायपिटीमुळे अंग गरम झालं होतं. शरीर जसजसं मूळ तपमानावर आलं तसतशी थंडी वाजू लागली. कुणी काय, तर कुणी काय करत होतं. मात्र, मी आणि दोन मित्र -रोहित व प्रसाद- अशा आम्हा तिघांच्या पडल्या पडल्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. त्यातच एक मुलगा लाकडं घेऊन आला शेकोटी करायला; पण इतक्या वर हवेनं लाकडं काही पेटेनात; मग आमच्यातील एका हुशार मुलानं लाकडावर थोडं सॅनिटायझर टाकून शेकोटी पेटवली. कोरोनामुळे सगळ्यांच्या जवळ सॅनिटायझर होतंच.
कारण, दिवस उगवेपर्यंत आम्हाला तिथं थांबणं गरजेच होतं. जर आम्ही अंधारात त्या दुर्गाची सफर केली असती तर एखाद्या दुर्घटनेला आम्ही स्वतःहून आमंत्रण दिल्यासारखं झालं असतं. त्या कोरीव उंच उंच पायऱ्या आणि खाली थेट खोल दरी...त्यामुळे आम्ही दोन-अडीच तास आराम केला. पहाटे पाच-साडेपाचला मस्तपैकी ताजेतवाने होऊन चहा-न्याहारी केली आणि पुढचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झालो...
सुळक्याकडे जाताना म्हणजेच प्रबळमाची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात कोरलेली गणपतीची अन् हनुमंताची अशा दोन मूर्ती आहेत. तिथून पुढची वाट अजूनच अरुंद आणि घसरणीची आहे. कलावंतिणीच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा असून तिचं प्रवेशद्वार लहानसं आहे. गुहेत जायचं असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणं हा एकमेव पर्याय. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे. ते बघून बाहेर पडलं की तिथून थोडं पुढं गेल्यावर दगडात कोरलेल्या ८०-९० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक-दीड फूट उंच पायऱ्या आहेत. ही वाटचाल अगदी स्थिर चित्तानं करावी लागते.
त्या काळ्या पाषाणाला हात टेकवत टेकवत पायऱ्या चढत चढत वर जायचं...पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतिणीचा अखेरचा वीस-पंचवीस फुटांचा ‘रॉकपॅच’चा एक छोटासा भाग लागतो. हा काळ्या कातळांचा ‘रॉकपॅच’ म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी असलेला ‘नैसर्गिक बुरुज’ म्हणता येईल. या रॉकपॅचवर दोराच्या मदतीनं चढून कशीबशी मी कलावंतीण सुळक्याच्या टोकाला पोहोचले...
काय नजारा होता तो...! मग काय, बॅग उशाला घेतली मस्तपैकी आणि सह्याद्रीतून उगवणारा सूर्य सुळक्याच्या कड्यावरून बघत बसले. हे काही तरी वेगळंच होतं. इतकं अद्भुत दृश्य मी याआधी फार कमी वेळा अनुभवलं होतं.
दिवस वर येऊ लागला तसा एक कडा शोधला आणि कड्यावरून पाय खाली सोडून बसत सुळक्याच्या कड्यावरून दिसणारी माथेरानची डोंगररांग, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शाळगड, कर्नाळा किल्ला हे अगदी सहजपणे दिसू लागले. मात्र, तितक्यात मनात एक विचार आला...एवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश...त्या प्रकाशात चमचमणारी नदी आणि तिचा तीराशी चाललेला रोमान्स...असं दृश्य आणि त्यातून मिळणारा आनंद जगातल्या कुठल्याही मल्टिप्लेक्समध्ये अनुभवायला मिळणार नाही...
आता मनात बरेच प्रश्न वेगाच्या वाऱ्यासारखे घोंघावत होते...कलावंतीण आणि प्रबळगड यांचा नक्की इतिहास काय...त्यावर जरा शोधाशोध आणि विचारणा सुरू केली. त्यानंतर समजलं ते असं...
उत्तर कोकणातील या किल्ल्याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी होत असे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुळक्यावर तर कुठं काय आहे? म्हणून तर, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कलावंतीण हा फक्त नजर ठेवण्यासाठी होता.
जिजाऊसाहेबांनी शिवबा तीन वर्षांचे असताना प्रबळगडावर वास्तव्य केलं होतं. सन १६३३ ते १६३६ या कालखंडात...आणि ज्या वेळी म्हणजे १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला, त्यात जे २३ किल्ले मोगलांना देण्यात आले, त्यातच प्रबळगडसुद्धा शिवाजीमहाराजांनी तहात दिला होता...हा आहे प्रबळगडाचा इतिहास.
आता प्रबळगडावर राजवाड्यांचे काही अवशेष, पाण्याची सहा टाकी, गणेशमंदिर, महादेवमंदिर, तलाव, बंधारे, दोन गुंफा हे इतकंच बघायला मिळतं.
‘कलावंतीण’ या नावाबद्दल मला उत्सुकता होती. हे नाव या सुळक्याला कस पडलं हे मी समोरच्या व्यक्तीला विचारलं. त्या व्यक्तीनं सांगितलेल्या आख्यायिकेनुसार, ‘कुण्या एका राजाचं कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होतं. कलावंतीनं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून त्या राजानं तिच्यासाठी किल्ल्यावर महाल बांधला होता, म्हणून त्या सुळक्याला कलावंतीण अस नाव पडलं.’ मात्र, याबाबतचे कुठलेही पुरावे नाहीत, असंही तिथल्या काही स्थानिकांनी सांगितलं.
थंड हवेचं ठिकाण म्हणून काही काळ ब्रिटिश अधिकारीदेखील प्रबळगडावर येऊन राहिले होते; परंतु कालांतरानं गडावर पाण्याची टंचाई जाणवली म्हणून त्यांनी तिथला मुक्काम हलवला. जसजसं ऊन्ह डोक्यावर येऊ लागलं तसतशी आमची उतरायची लगबग सुरू झाली होती.
उतरताना पोटात अक्षरशः गोळे येत होते. कारण, तोल गेला किंवा पाय घसरला की खाली सरळ खोल दरीच. त्यामुळे जीव मुठीत धरून आम्ही उतरत होतो. खाली उतरून प्रबळमाचीवर पोहोचेपर्यंत सकाळचे दहा वाजले होते. तिथंच एका घरात जेवणाची व्यवस्था केली गेली होती. आम्ही छानपैकी ताजेतवाने झालो आणि अकरा-साडेअकराच्या सुमाराला गरमागरम जेवणावर ताव मारला. जेवता जेवता गप्पा रंगल्या हे सांगणं नकोच. आता दुपारचे १२ वाजले होते. कडक ऊन्ह लागत होतं; पण पायथ्याला पोहोचायला हवं होतं. झाडांच्या सावलीचा आधार घेत घेत अखेरीस पायथ्याला पोहोचलो. तिथं लिंबूसरबताची एक छोटीशी टपरी होती. बसायला बाकडं होतं. झाडाची सावली होती. मस्तपैकी थंडगार लिंबूसरबत घेतलं. आमच्या बरोबरचे बाकीचे लोक उतरून येईपर्यंत काही वेळ बाकड्यावरच अंग टाकलं. थोडीशी विश्रांती घेतली. पडल्या पडल्या विश्रांती घेत असताना माझ्या डोळ्यांपुढे सकाळपासूनचं एकेक दृश्य तरळत होतं...डोंगराआडून उगवणारा सूर्य...दरीत पडलेला तो सोनेरी प्रकाश...त्या प्रकाशात चमचमणारं नदीचं पाणी...गडावरच्या त्या कोरीव पायऱ्या...
एकंदरीत, कलावंतिणीची सफर हा माझ्या लेखी रोमांचकारी अनुभव होता!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.