Maroli Suryamandir Sakal
सप्तरंग

मरोलीचं सूर्यमंदिर

वैदिक साहित्यात सूर्याला सवितृ, विवस्वत्, पूषन् अशी विविध नामं दिलेली आहेत. ऋग्वेदात सूर्याला ‘विश्वाचा आत्मा’ म्हटलेलं आहे. सूर्योपासना भारतात फार प्राचीन काळापासून रूढ आहे.

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

सूर्य, आदित्य, प्रभाकर, भास्कर, रात्रीचा अंधार संपवून प्रकाशाकडे नेणारा तारा, सर्व जीवनाचा आणि ऊर्जेचा स्रोत! सूर्य त्याच्या तेजस्वी रूपामुळे फार प्राचीन काळापासून मानवाला वंद्य वाटत आलेला आहे. केवळ भारतीयच नव्हे तर, जगभरातल्या अनेक प्राचीन संस्कृतींनी सूर्याला देवता मानून त्याची उपासना केलेली आहे. सदैव उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहणारा सूर्य हा प्रज्ञेचा, ऊर्जेचा स्रोत, तो सार्वभौम परोपकारी जीवनदाता अशी कृतज्ञतेची भावना सदैव मानवी मनात होती.

वैदिक साहित्यात सूर्याला सवितृ, विवस्वत्, पूषन् अशी विविध नामं दिलेली आहेत. ऋग्वेदात सूर्याला ‘विश्वाचा आत्मा’ म्हटलेलं आहे. सूर्योपासना भारतात फार प्राचीन काळापासून रूढ आहे. भारतात अनेक ठिकाणी भव्य सूर्यमंदिरं होती, त्यातली कोणार्क, मोढेरा आणि काश्मीरमधलं मार्तंडमंदिर तर आपण जाणतोच. दुर्दैवानं इस्लामी आक्रमकांनी या तिन्ही मंदिरांची तोडफोड केलेली आहे आणि या तिन्ही मंदिरांतली गर्भगृहं आज रिकामी आहेत व तिथं पूजा-अर्चा होत नाही; पण भारतात आजही अनेक ठिकाणी अशी सुंदर सूर्यमंदिरं आहेत जिथं आजही सूर्यनारायणाची उपासना होते. कुंभकोणमचं द्रविड शैलीतलं सूर्यनारायण मंदिर, कोकणातलं कशेळी इथलं खास कोकणी शैलीत बांधलेलं देखणं कनकादित्य मंदिर, बिहारमधील गया इथलं दक्षिणार्क आणि उत्तरार्क अशी दोन सूर्यमंदिरं आणि आज आपण ओळख करून घेणार आहोत ते कर्नाटकमधलं मंगळूरजवळचं मरोली इथलं सूर्यनारायणमंदिर...ही काही आवर्जून बघितलीच पाहिजेत अशी सध्या पूजेत असलेली प्रसिद्ध सूर्यमंदिरं.

एका कार्यक्रमासाठी नुकतीच मी मंगळूरला गेले होते. तिथं मला स्थानिक लोकांनी या मंदिराबद्दल सांगितलं. मंगळूरपासून जवळजवळ २२ किलोमीटरवरील मरोली या गावात असलेलं हे मंदिर खरोखरच अतिशय भव्य आणि सुंदर आहे. पूर्णपणे केरळी शैलीत बांधलेल्या या मंदिराच्या बाहेरच्या भिंती या भागात मुबलक मिळणाऱ्या लाल जांभ्या दगडाच्या म्हणजे एक्स्पोज्ड् लॅटेराईटच्या आहेत, तर आतली गर्भगृहं म्हणजे श्रीकोविल आणि त्यापुढचा नमस्कारमंडप पूर्णपणे काळ्या पाषाणाचा आहे. छत केरळी शैलीनुसार उंच, उतरतं आणि लाल मातीच्या कौलांनी शाकारलेलं आहे. छतावर आतल्या बाजूला निव्वळ अप्रतिम असं लाकडी कोरीव काम आहे.

मंदिराच्या बाहेर भव्य दीपस्तंभ आहे आणि त्याच्या पायथ्याशी काळ्या पाषाणात कोरलेले सूर्याच्या रथाचे सात घोडे आहेत. सप्ताहाच्या सात दिवसांचं प्रतीक असलेल्या या घोड्यांची नावं तरी किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत! गायत्री, वृहति, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ति... सर्व संस्कृत काव्यछंदांची नावं असलेलं हे डौलदार अश्व मंदिरात आपलं स्वागत करतात.

मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभांवरदेखील दोन डौलदार अश्व कोरलेले आहेत. मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना पिंगल आणि दंड या सूर्याच्या दोन द्वारपालांच्या भव्य एकपाषाणी प्रतिमा भक्तांचं स्वागत करतात.

इथल्या स्थानिक जनतेचा असा विश्वास आहे की, मरोलीच्या या सूर्यमंदिराचा इतिहास बाराशे वर्षं जुना आहे...इथं एकेकाळी घनदाट तपोवन होतं आणि तिथं तपश्चर्या करणाऱ्या ऋषी-मुनींना एका प्रकाशवलयाचा दृष्टान्त झाला...ते प्रकाशवलय मूर्तिस्वरूपात बंदिस्त करून त्यांनी इथं सूर्यमूर्तीची स्थापना केली.

पुढं या भागात राज्य करणाऱ्या अनेक राजवंशांनी वेळोवेळी या सूर्यमंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार केला.

मात्र, सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी राजाश्रयाअभावी या मंदिराची पडझड झाली होती. त्या काळी या भागातील एका जैन महिलेनं या मंदिराला परत ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आणि सप्ताहाच्या सात दिवसांचं प्रतीक म्हणून जवळच्या मरोली, पडवू, आलापे, बजल, कन्नूर, जेप्पू आणि कंकनडी या सात गावांच्या ग्रामसमूहातील लोकांनी मरोलीच्या सूर्यनारायणाला आपली कुलदेवता म्हणून स्वीकारलं. अगदी आजही या सात गावांमधले हिंदू कुठंही स्थायिक झाले तरी घरात काही शुभकार्य करण्यापूर्वी या मंदिरात संकल्प सोडतात.

या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच झालेला आहे. विशेष म्हणजे, प्राचीन मंदिरस्थापत्याशी कुठंही तडजोड न करता हा जीर्णोद्धार केला गेलेला आहे आणि हे सर्व काम करणारे विश्वकर्मा स्थपती जवळच्याच कारकला गावातील आहेत हे विशेष. मरोलीच्या या श्रीसूर्यनारायणमंदिरात मुख्य गर्भगृहात श्रीसूर्यनारायणाची स्थानक म्हणजे उभी मूर्ती आहे, मूर्तीच्या दोन्ही हातांत कमळं आहेत. मुख्य सन्निधीच्या बाजूला हरी, हर, ब्रह्मा आणि शक्ती यांची स्वतंत्र गर्भगृहं आहेत. संपूर्ण मंदिरपरिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे. मंदिरात एका वेगळ्याच शांततेची आणि समाधानाची अनुभूती येते. यापूर्वी कोणार्क आणि मोढेराच्या सूर्यमंदिरांचा आक्रमकांनी केलेला विध्वंस पाहून उद्विग्न झालेल्या माझ्या मनाला हे देखणं, पूजेत असलेलं भव्य, सुंदर आणि स्वच्छ सूर्यमंदिर पाहून एक वेगळीच शांतता लाभली.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT