Education sakal
सप्तरंग

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

निसर्गात घडणाऱ्या बदलांची पहिली चाहूल पक्षी, प्राणी आणि कीटकांना लागते. त्याप्रमाणे ते तयारी सुरू करतात. हा निसर्गाचा नियम आहे, अनुभव आहे...

अवतरण टीम

- शोभना कसबेकर

निसर्गात घडणाऱ्या बदलांची पहिली चाहूल पक्षी, प्राणी आणि कीटकांना लागते. त्याप्रमाणे ते तयारी सुरू करतात. हा निसर्गाचा नियम आहे, अनुभव आहे... त्या धर्तीवर ज्येष्ठजन हवामानाचा अंदाज वर्तवतात. कधी कधी तर विज्ञानाचे अंदाज चुकतात आणि अनुभवाचे बोल खरे ठरतात. अशा वेळी अनुभवाचे महत्त्व अधोरेखित होते...

आमच्या कॉलेजात नुकताच आयोजित करण्यात आलेला संवादाचा कार्यक्रम फारच रंगतदार झाला. संवादाचा विषय होता सर्वांच्याच आवडीचा ‘अनुभव श्रेष्ठ की ज्ञान?’ आयोजकांनी विद्यार्थ्यांबरोबर आम्हा अध्यापकांनाही आमंत्रित केले होते हे विशेष. तरुणांबरोबर विचारमंथन करण्याची नामी संधी आम्हाला मिळाली होती. अनुभव म्हणजे, प्रत्यक्षातला असतो किंवा ज्येष्ठांकडून मिळालेला... विद्यार्थ्यांनी शिक्षणाला संमती दिली होती.

त्या उलट अध्यापकांनी मात्र शिक्षणाला अनुभवाची जोड हवीच, असे ठाम मत मांडले होते. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने अनुभवाच्या जोरावर शहाणपण येते हे तरुणांना फारसे रुचले नाही. एवढे खरे की, हा कार्यक्रम आम्हा सर्वांना शहाणपण शिकवून गेला. प्रत्येक अनुभवातून शिक्षण परिणामकारक ठरते याचा विचार करायला एक संधी मिळाली.

आमची पिढी मोठी झाली ती अनुभवाचे बोल ऐकतच. त्या काळात ‘गुगल’ नव्हते. आज मात्र या ‘गुगल’ने अनुभवाची जागा भरून काढली आहे. तरुणाईला तर ज्येष्ठांच्या अनुभवांपेक्षा ‘गुगल’चा आधार मोठा वाटतो. त्यात चूक कसली? खरे तर आज आपल्या मुलांना येणारे अनुभव आपण अनुभवलेलेच नाहीत. हल्ली सकाळ होते ती तरुणांना आव्हाने दाखवतच.

अशा वेळी नवीन विचार आत्मसात करण्याची क्षमता आपल्यात असावी लागते. चाकोरीबाहेर पडून विचार करण्याची गरज असते. अशा वेळी अनुभवाची शिदोरी फारशी मदत करू शकत नाही. तरीसुद्धा अनुभव हा व्यवहारी ज्ञानाचा पाया आहे हे विसरून कसे चालेल?

अनुभव आणि ज्ञान दोन भिन्न विषय असले, दोघांचे प्रांतही वेगळे वेगळे असले तरी दोघेही एकमेकांशी निगडित आहेत. ज्ञान हे उपजत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ते मिळवायचे आहे. त्या उलट अनुभव हे जगताना अनुभवलेले ज्ञान आहे. कधी हा अनुभव चांगला असतो; तर कधी वाईट. वाईट अनुभव हेही मिळवलेले ज्ञान आहे. एवढेच की, हा अनुभव संपादन करण्यासाठी कृतीची अपेक्षा असते. कृतीतूनच अनुभव उदयास येत असतो.

या दोघांची सांगड घालणे मात्र खूप वेळा लाभदायक ठरते. अनुभवाला ज्ञानाची जोड मिळाली, की यशाचा आलेख उंचावतो. खूप पावसाळे पाहिलेत मी, असे दिमाखाने म्हणणाऱ्या आजोबांकडे अनुभवाचा ठेवा असतो; पण जोड देणाऱ्या ज्ञानाची ददात असते. यश काही मिळत नाही. त्याउलट एखादा तरुण शिक्षणात पुढे असतो; पण अनुभवाच्या कमतरतेमुळे यश हातातून निसटते. त्यामुळे आज अनुभवजन्य शिक्षणाची गरज पावलोपावली भासते.

एक जिवंत अनुभव सर्व काही सांगून जातो, शिकवून जातो... लक्षात घ्या, जेव्हा आपण शिकत असतो, शिक्षण पूर्ण झाल्यावरही एखाद्याला जर अनुभवाची जोड असेल तर त्याची मूल्यता वाढते. नवीन कौशल्ये हाताळता येतात. तसेच हे आहे. हेच नोकरी मिळवताना आपण अनुभवतो. जीवनातील अनुभव गुरूप्रमाणे उपयोगी पडतात ते खाचखळगे चुकवण्यासाठी. याचा अर्थ असा की, जगताना पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही तर अनुभवी ज्ञानाची आज गरज आहे.

ज्ञान हे आपण दोन स्वरूपात मिळवू शकतो. एक पुस्तकी आणि दुसरे, अनुभवपूर्ण... पुस्तकी ज्ञानाने यश मिळते हे जरी खरे असले तरी काही संकटे, अडचणी अशा येतात की तिथे अनुभव जास्त कामी येतो. पुस्तकी ज्ञान फिके पडते. हल्लीच्या दिवसांत मात्र पुस्तकी ज्ञानावर भर दिला जातो. नवीन पिढीला अनुभवाचे महत्त्व फारसे रुचत नाही. प्रत्येकाकडे कमी-जास्त अनुभव असतात.

जितके आपले आयुष्य चपळ, नावीन्यपूर्ण असेल, आपण वेगवेगळ्या प्रसंगांशी सामना केला असेल तर जास्त अनुभवांचा साठा आपल्या पदरी पडेल. कधी कधी तर या अनुभवातून आपले ज्ञान तर वाढतेच; पण शहाणपणही येते. त्यासाठीच ज्ञानाला अनुभवांची जोड हवीच. कधी कधी तर विज्ञानाचे अंदाज चुकतात आणि अनुभवाचे बोल खरे ठरतात. अशा वेळी अनुभवाचे शिक्षण खरे ठरते.

विशेषतः शेतकी व्यवसायात, मुलांचे संगोपन करताना अनुभवांचा आधार खरा ठरतो. अनुभवांच्या शाळेतील शिक्षण महत्त्वाचे ठरते. हे शिक्षण आपण फुकट मिळवत असतो. त्यासाठी ना डिग्री मिळते ना मान्यता. ज्येष्ठांची परीक्षा घ्यायला सगळेच तत्पर असतात. तरीही आजही या अनुभवाचे महत्त्व टिकून आहे, हेही कौतुकास्पद. अनुभवांचा कुणाला फायदा झाला की आपली मान उंचावते. आत्मशक्ती वाढते. म्हणूनच अनुभवाची जोड असलेलेच ज्ञान श्रेष्ठ.

आपले बालपण आठवा बरे! बाल्यावस्थेत मुलांना आई-बाबा जवळचे वाटतात. आईने काही सांगितले, की ती गोष्ट ‘ग्रँटेड’चा शिक्का मिळवतेच. आई मुलांना उपदेश करते. मुलांच्या मनावर आपले विचार बिंबवते. हाच असतो संस्कार. त्याचा पाया अनुभवच असतो. या संस्काराची व्याप्तीही खूप खोलवर असते. त्यासाठी मला वाटते जर आपण अनुभवांच्या माध्यमातून सहजपणे संस्कार करू शकलो तर लाभदायक ठरेल; पण त्याची बिलकूल बळजबरी नको.

‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही म्हण आपण नेहमीच आळवतो. दुसऱ्यांच्या अनुभवांतून आपण शहाणे होणे हे लाभदायक लक्षण ठरते; पण अनुभवांपेक्षा पुस्तकी ज्ञानाला जास्त महत्त्व देणे आणि त्यातून आपले स्वतःचे मत बनवणे, यात चुकीचे काहीच नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतानुसार जीवनात अनुभवाला महत्त्व किती द्यायचे, हे ठरवायचे आहे. शिक्षण घेताना दुसऱ्याच्या अनुभवांचा विचार करणे योग्य आहे. कदाचित त्यात थोडाफार धोका असू शकेल. जर त्यात यश मिळाले तर तुम्ही कौतुकाचे धनी असणार; नाहीतर अनुभवांचे साक्षीदार. तेही अप्रत्यक्ष यशच असेल.

दुसऱ्यांचे अनुभव ऐकल्याने जसे आपले ज्ञान वाढते तसेच आपले मनोरंजनही होत असते. वेळेअभावी तरुणांना हे साध्य होत नाही ही आजची परिस्थिती आहे. वेळ काढून दुसऱ्याच्या अनुभवांचा आपल्या मतीने विचार करा; पण मनाला पटेल तीच कृती करा. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ ही उक्ती सार्थ ठरेल. चौफेर विचारांची देवाणघेवाण ही आजची गरज आहे. आपण स्वतः आनंदात जगावे आणि जगताना दुसऱ्यांचाही विचार व्हावा हे अपेक्षित आहे.

हाच जगण्याचा खरा अर्थ आहे. लक्षात घ्या, पुस्तकी ज्ञानात कोरडेपणा आहे. तो अनुभवांच्या पोतडीत नाही. त्या उलट अनुभव देणाऱ्या प्रसंगांत जिवंतपणा असतो. आजही विज्ञानाने विश्वाचे शोध घेण्यासाठीचे प्रयोगच नाहीत; तर अनुभवांचाही आधार घेण्यास संमती दिली आहे ही जमेची बाजू आहे. इथे विज्ञानाने अनुभवांना प्रमाण म्हणून मानले आहे. हे आपल्याला मिळालेले मोठे यश आहे. त्यासाठीच अनुभव आणि शिक्षण या दोघांना एकमेकांत गुंफून जगायला शिकायचे आहे. हाच खरा जीवनाचा मंत्र ठरेल.

shobhana.kasbekar.gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

अक्षय कुमारचा मुलगा असूनही कपडे धुतो, भांडी घासतो, जेवण सुद्धा स्वत:चं बनवतो! १५व्या वर्षी सोडलं घर, नक्की कारण काय?

Ichalkaranji Dairy Raid : तुकाराम मुंढेंचा आदेश, कोल्हापुरातील अन्न प्रशासन विभाग अॅक्शन मोडवर, इचलकरंजीजवळ डेअरीवर छापा

युद्धाचा पुन्हा भडका! इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडल्यानं ट्रम्प संतापले, अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यांनी होर्मुझ हादरलं

Pune Accident: नवले पुलाखाली सिमेंट टँकर उलटला, दुचाकीसह चिरडलेल्या बीडच्या तरुणाचा मृत्यू; मध्यरात्री भीषण अपघात

SCROLL FOR NEXT