सप्तरंग

उपनिषदांमधील तत्त्वज्ञान

सर्व उपनिषदे ही त्या त्या ‘ब्राह्मणां’तील ज्ञानकांडाचे प्रबंध होत. यादृष्टीनं जरी त्यांचा ‘ब्राह्मणां’त अंतर्भाव केला गेलेला असला तरी ती कर्मकांडाशी तत्त्वतः विरुद्ध अशा एका नवीन धर्मविचाराची द्योतक आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com

सर्व उपनिषदे ही त्या त्या ‘ब्राह्मणां’तील ज्ञानकांडाचे प्रबंध होत. यादृष्टीनं जरी त्यांचा ‘ब्राह्मणां’त अंतर्भाव केला गेलेला असला तरी ती कर्मकांडाशी तत्त्वतः विरुद्ध अशा एका नवीन धर्मविचाराची द्योतक आहेत. देवांप्रीत्यर्थ यथासांग यज्ञकर्मे करून ऐहिक सुख व मृत्यूनंतर यमलोकी सुख मिळवावं असा त्यांचा मुळीच हेतू नसून यथार्थ ज्ञानाच्या योगानं जीवात्म्याचं परमात्म्याशी ऐक्य होऊन या नश्वर देहातून मुक्त व्हावं हेच त्यांचं ध्येय आहे. म्हणून उपनिषदांत कर्मकांड निरुपयोगी होऊन ज्ञानकांडाला संपूर्ण महत्त्व प्राप्त झालेलं आहे.

विश्वात्म्याचं म्हणजे परब्रह्माचं स्वरूप हा उपनिषदांचा मुख्य विषय आहे. जगदुत्पादक सगुण प्रजापतीपासून सर्व चिद्वस्तूंचं उद्भवकारण जे निर्गुणब्रह्म आहे, त्यापर्यंत झालेल्या वेदान्तविचाराच्या विकासातील शेवटची अवस्था उपनिषदांनी व्यक्त होते.

ॠग्वेदात आत्मा हा शब्द केवळ ‘श्वास’ या अर्थी योजिलेला आहे. उदाहरणार्थ : वरुणाच्या श्वासाला आत्मा अशी संज्ञा दिलेली आहे. ‘ब्राह्मण’ग्रंथांत या शब्दाचा जीवात्मा अशा अर्थानं उपयोग होऊ लागला.

पुढं उपनिषदांमध्ये आत्मा या शब्दाला ‘सर्व विश्वाच्या चेतनेचं पवित्र कारण’ असा अर्थ प्राप्त झाला. उपनिषदांत आत्मा आणि ब्रह्म या दोन्ही कल्पना सामान्यपणे समानार्थी आहेत; परंतु खरं पाहिलं तर, ब्रह्म या प्राचीन शब्दानं ‘मनुष्यामध्ये व्यक्त असणारी चिद्शक्ती’ या अर्थाचा बोध होतो आणि अशा रीतीनं अज्ञेयब्रह्माचं स्पष्टीकरण करण्यासाठी ज्ञात आत्म्याची योजना केलेली आहे.

अधिक सगुण अशा प्रजापतीचं स्थान उपनिषदांत जगत्कारण असा जो आत्मा आहे त्याला दिलेलं आहे.

बृहदारण्यकात म्हटलं आहे की, प्रारंभी आत्मा किंवा ब्रह्म हेच विश्व होतं. तो एकाकी असल्यामुळे त्याला भीती वाटू लागली व आनंद वाटेना. आपण द्वितीय व्हावं अशी त्याला इच्छा झाली व तो पुरुष आणि स्त्री होऊन त्यापासून मानवजात निर्माण झाली.याप्रमाणे त्यानं पुढं प्राण्यांमध्ये नर व नारी या जाती निर्माण केल्या; शेवटी त्यानं जल, अग्नी, देव वगैरे उत्पन्न केले.

‘सर्व जग माया आहे व ब्रह्म मायिन् असून त्यानं ती माया उत्पन्न केली आहे’ हा वेदान्तमतांतील प्रमुख सिद्धान्त पहिल्याप्रथम श्वेताश्वतरनामक एका उत्तरकालीन उपनिषदात आढळतो. तथापि, हे मत मुळापासूनच प्राचीन उपनिषदांमध्ये अंगभूत झालं आहे. ‘दृश्य वस्तू खऱ्या सद्वस्तूंच्या केवळ छाया आहेत’ या ग्रीक तत्त्वांत प्लेटोच्या मताशी, तसंच ‘दृश्य वस्तू तदंतर्गत सद्भावाचे दृश्य चमत्कार होत’ या कांटनामक जर्मन तत्त्ववेत्त्याच्या मताशी वरील उपनिषदांचं मत अगदी सदृश दिसतं.

‘जीवात्म्याचं परमात्म्याशी ऐक्य आहे’ हा उपनिषदांचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धान्त आहे. छांदोग्योपनिषदात पुनःपुन्हा त्याच मताची, त्याच शब्दांत वारंवार पुनरावृत्ती केली गेली आहे. ती अशी - ‘हे सर्व जग ब्रह्ममय आहे, हेच ब्रह्म सत् आहे, तेच आत्मा... हे श्वेतकेतू, तेच तू आहेस.’ ‘तत्त्वमसि’ या वाक्यात उपनिषदांच्या सर्व वेदान्तमताचं सार आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ याही वाक्यात वरील मतच मांडलेलं आहे. या ब्रह्मात्मैक्याविषयी बृहदारण्यक, मुंडक इत्यादी उपनिषदांत वारंवार उल्लेख आलेले आहेत.

सत्यज्ञानाच्या योगानं ब्रह्माशी जीवात्म्याचं तादात्म्य होऊन परमसुखाची प्राप्ती होते, या सिद्धान्ताबरोबरच संसारसिद्धान्त (पुनर्जन्म अगर जन्मांतर) रूढ झाला. या सिद्धान्ताचा विकास अत्यंत प्राचीन उपनिषदांमध्ये झाला आहे. आणि, तो बौद्ध धर्माची संस्थापना झाली, त्या वेळी पूर्णपणे संस्थापित झालेला असला पाहिजे. कारण, तो गौतम बुद्धांनी निर्विवाद मान्य केला होता.

या सिद्धान्ताचं अगदी प्रारंभीच स्वरूप ‘शतपथ ब्राह्मणां’त आढळतं. इहलोकी पुनर्जन्म होतो असं मानून उपनिषदांत या वरील कल्पनेस संसारवादाचं स्वरूप दिलेलं आहे. ‘कर्माच्या योगानं पुनर्जन्मप्राप्ती होते व मनुष्याच्या स्वतःच्या कर्मावर ती अवलंबून आहे’, या कर्मवादाचा प्रारंभ बृहदारण्यकात झालेला आढळतो.

वेदकालीन संसारवादाचं अत्यंत महत्त्वाचं व सविस्तर वर्णन छांदोग्योपनिषदात आहे. ते असं - ‘ज्ञानसंपन्न व श्रद्धावान वानप्रस्थ तपस्वी, मृत्यूनंतर देवयानात प्रविष्ट होतो व तेणेकरून ब्रह्मांत त्याचा लय होतो; परंतु यज्ञकर्म व सत्कर्म करणारा गृहस्थाश्रमवासी पितृयानानं चंद्रलोकास जातो व तेथे त्याचं कर्मफल संपेपर्यंत तो वास करतो.

नंतर तो पृथ्वीवर पुन्हा परत येतो व प्रथम वनस्पती-रूपात जन्म घेऊन नंतर तीन उच्च वर्णांपैकी एका वर्णांत मानवरूपात जन्म घेतो. यांत प्रथम परलोकी व नंतर पुनर्जन्माच्या योगानं इहलोकी याप्रमाणे दुहेरी कर्मफलप्राप्ती झालेली दिसते.’ अशाच प्रकारचं वर्णन बृहदारण्यकात आहे.

सर्व उपनिषदं मिळून किंवा एकाच उपनिषदात वेदान्तमताचा न्यायशास्त्रानुसार पद्धतशीर विकास झालेला आहे व त्याचं सुसंगत व संपूर्ण ज्ञान आपणास होऊ शकेल असं मात्र म्हणता येत नाही. त्यामध्ये काही अंशी काव्यमय व काही अंशी आध्यात्मिक असे विचारसंवाद, चर्चा यांचं मिश्रण झालेलं असून त्यात तत्त्वविचार आनुषंगिक आहे. त्या तत्त्वविचाराला कालांतरानं पद्धतशीर वेदान्तशास्त्राचं स्वरूप पुढं देण्यात आलं.

नीतितत्त्वे : उपनिषदांमध्ये जरी ब्रह्म, आत्मा, जग यांच्या स्वरूपाविषयीचे परमोच्च विचार मुख्यत्वेकरून प्रकट करण्यात आलेले आहेत तरी त्यांत नैतिक तत्त्वांचा अगदीच ऊहापोह नाही असं मात्र नाही. आध्यात्मिक चर्चांबरोबरच मधूनमधून नैतिक तत्त्वांचीही चर्चा बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोक्षप्राप्तीसाठी जी साधनं आहेत त्यांत चित्तशुद्धी हे एक प्रमुख साधन आहे व ती चित्तशुद्धी प्राप्त होण्यासाठी मनुष्यानं दम, तप, सत्य, इत्यादी गुण अंगी बाणून घेतले पाहिजेत अशा प्रकारचा उल्लेख केनोपनिषदात आढळतो.

ईशावास्यात अशाच प्रकारचे विचार आढळतात; पण हे जग मायिक असून, या नश्वर देहापासून मनुष्यानं मुक्तता करून घेऊन ब्रह्मस्वरूपी लीन झालं पाहिजे, हे मनुष्याचं वास्तविक ध्येय आहे, हे ठसवण्याचा उपनिषदांचा प्रमुख हेतू आहे ही गोष्ट निर्विवाद होय.

उपनिषदांतील तात्त्विक विचारांचा हिंदूंवर किती प्रभाव आहे हे या पूर्वी सांगितलंच आहे. हिंदू धर्माचे जे आचार्य व पुरस्कर्ते होऊन गेले त्यांनी या उपनिषदांतील तत्त्वेच मूलभूत मानून त्यांवर आपल्या तत्त्वज्ञानाची टोलेजंग व सनातन इमारत बांधली.

हिंदू धर्माच्या निरनिराळ्या सांप्रदायिकांनी, आपल्या संप्रदायाला वजन प्राप्त व्हावं म्हणून, उपनिषदांचा आधार आपल्या संप्रदायाच्या तत्त्वांना आहे, असं सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला, इतकं उपनिषदांना प्रामाण्य प्राप्त झालं आहे. मात्र, या उपनिषदांचं महत्त्व केवळ हिंदूंनाच पटलं आहे असं नाही. ज्या ज्या भाषांमध्ये उपनिषदांचं भाषांतर झालं आहे त्या त्या भाषांच्या लोकांना उपनिषदांचं तत्त्वज्ञान वाचून उपनिषदांची योग्यता पटली आहे.

शोपेनहावरनामक पाश्चात्त्य पंडितानं उपनिषदांचं मोडकंतोडकं भाषांतर ज्या वेळी वाचलं त्या वेळी त्याला उपनिषदांतील तत्त्वज्ञानाविषयी इतका आदर उत्पन्न झाला की त्यानं, ‘या उपनिषदांच्या अभ्यासानं माझ्या मनाला कायमची शांतता प्राप्त झाली व तीच शांतता माझ्या मृत्यूपर्यंत राहील’ असे उद्गार काढले. अशाच तऱ्हेचे उद्गार कित्येक पाश्चात्त्य पंडितांच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत.

सन १६५६ मध्ये उपनिषदांचं उर्दू भाषांतर शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह यानं अनेक हिंदू पंडितांकडून करवून घेतलं. सन १७७५ या उर्दू भाषेतील उपनिषदांंचं लॅटिनमध्ये आंकेतिल दुपेरां यानं भाषांतर केलं. हे सन १८०१ व १८०२ मध्ये स्ट्रॉसबर्ग इथं दोन भागांत प्रसिद्ध झालं. नंतर शोपेनहावर यांनी ते भाषांतर वाचलं व नंतर त्याचा प्रसार युरोपमध्ये होऊन मॅक्समुल्लर, डायसन आदी विद्वानांनी उपनिषदांचा अभ्यास सुरू केला. (संदर्भ - श्री. व्यं. केतकरकृत ‘ज्ञानकोश’)

उपनिषदांची साधारण विभागणी आढळते ती अशी: (१) प्रमुख उपनिषदे-अर्थात् परतत्त्वदर्षी उपनिषदं, यांना ‘दशोपनिषदं’ असंही म्हणतात. यांत प्रामुख्यानं ‘ब्रह्म’विषयक विवेचन आढळतं. व्यासांनी ब्रह्मसूत्रांमध्ये फक्त दश-उपनिषदांचाच उल्लेख केलेला आढळतो, तसंच आद्य शंकराचार्यांनी या दहाही उपनिषदांवर भाष्य केलेलं असल्यामुळे या दशोपनिषदांचाच प्रामुख्यानं अभ्यास केला जातो.

उर्वरित ९८ उपनिषदांचं वर्गीकरण असं: (२) : चौदा वैष्णव उपनिषदं - राम, कृष्ण आदी विष्णू-अवतारांशी संबंधित, (३) : पंधरा शैव उपनिषदं, (४) : आठ शाक्त उपनिषद, (५) : चोवीस सामान्य उपनिषदं, (६) : सतरा संन्यास-उपनिषदं आणि (७) : वीस योगोपनिषदं. वैष्णव-शैव-शाक्त ही परमेश्वराच्या त्या त्या सगुणरूपासंबंधीची ही उपनिषदं आहेत, हे दैवोपनिषदांच्या त्या त्या नावावरूनच समजून येतं.

सामान्य उपनिषदांमध्ये सर्व पंथांसाठी वा संप्रदायांसाठी उपयुक्त विवेचन आढळतं. संन्यास-उपनिषदांमध्ये संन्यास या चतुर्थाश्रमाबद्दल विवेचन आढळतं. योगोपनिषदं ही अर्थातच ‘योग’विषयक आहेत. उपलब्ध असलेल्या २२०-२२५ उपनिषदांपैकी प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला १०८ उपनिषदांचा अभ्यास करण्यास सुचवलं होतं, असं म्हटलं जातं. म्हणून याच १०८ उपनिषदांचाच विचार करायचा आणि जमेल तसा त्यांचा मराठी अनुवाद करायचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT