Sonali Lohar writes about ed raid festival mom raid in child bedroom sakal
सप्तरंग

आमची ईडीची रेड...

सणासुदीच्या निमित्ताने घराची आवराआवर करताना मुलांच्या खोलीत डोकावायची संधी मिळते आणि कधीकधी ‘नवनवीन साक्षात्कार’ होतात.

अवतरण टीम

सणासुदीच्या निमित्ताने घराची आवराआवर करताना मुलांच्या खोलीत डोकावायची संधी मिळते आणि कधीकधी ‘नवनवीन साक्षात्कार’ होतात.

- सोनाली लोहार

सणासुदीच्या निमित्ताने घराची आवराआवर करताना मुलांच्या खोलीत डोकावायची संधी मिळते आणि कधीकधी ‘नवनवीन साक्षात्कार’ होतात. मुलं याला ‘मम्मीची रेड पडली’ असं म्हणतात. कारण त्यानंतर अनधिकृत साहित्य जप्त करणे, आरोपींचे जाबजबाब, साक्षीदारांची चौकशी वगैरे सोपस्कारही साग्रसंगीत पार पडतात. त्यामुळे हल्ली मुलं या छाप्यांना ‘ईडीची रेड’ असंही म्हणायला लागल्याचं नुकतंच सूत्रांकडून समजलंय.

विशीतली मुलं असलेल्या आमच्या पिढीला ‘मुलांचं वैयक्तिक स्वातंत्र्य’ वगैरे विषय पचवणं आजही जरा अवघडच जातं. ‘आमच्या वेळी हे असं नव्हतं बुवा’ हा भाव अजूनही आमच्या डोक्यात असतो आणि खरोखरच आमच्या वेळी असं नव्हतं. काळ आणि परिस्थिती दोन्ही प्रचंड वेगाने बदलत गेलीय. दोन किंवा तीन खोल्यांच्या संसारात ‘मुलांची खोली’ हा प्रकारच नसायचा. आणि अगदी मोठा वाडा जरी असला, तरी लेकरं मोठी होईस्तोवर आईच्या कुशीतच झोपायची. जरा मोठी झाली की फारतर अभ्यासाचं टेबल नाहीतर दप्तर ठेवायचा एखादा स्वतःचा कोपरा तेवढा मिळायचा. इतक्या मर्यादा असूनही आमच्याही पालकांकडून तेव्हा दप्तरातल्या चिठ्ठ्या-चपाट्या, पुस्तकांवरल्या खाणाखुणा, गणवेशाच्या खिशात सापडलेले चार-आठ आणे आणि पुढे जरा मोठं झाल्यावर पिक्चरची तिकीटं वगरै, यावर आमच्याही हजेऱ्या घेतल्या जायच्या.

मुलं घराबाहेर काय करताहेत यावर घरातल्यांचंच काय, पण शाळेतल्या पी.टी.च्या शिक्षकांपासून ते कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानदार काकांपर्यंत सगळ्यांचं लक्ष असायचं आणि आपलंच घरचं पोर असल्याच्या आत्मीयतेने वेळप्रसंगी पोरांचे कान परस्परच उपटलेही जायचे. यात कोणालाच काहीच गैर वाटायचं नाही. उलटपक्षी ‘सामाजिक बांधिलकी’च्या भावनेने काम करणारी ही इतकी सारी ‘दक्षता पथकं’ असल्याने आमचे पालकच बऱ्यापैकी निवांत असायचे. आम्ही असेच मोठे झालो.

आता बाहेरच्यांचं सोडाच, पण माता-पित्यांनीही मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात किती डोकावायचं यालाही मर्यादा आल्या आहेत. आजच्या घडीला पालकांना मुलांच्या घरातल्या खोल्यातच काय, पण त्यांच्या ‘सोशल मीडियावरील खोल्यांत’ही डोकावून बघायला परवानगी नसते. मिनिटागणिक बदलणाऱ्या भवतालाचा आणि जीवनशैलीचा मुलांच्या मानसिक जडणघडणीवर होणारा परिणाम ही या विषयाची दुसरी गंभीर बाजू. या बदलानुरूप त्यांच्याही ‘मानसिक संरक्षण यंत्रणा’ किंवा ‘डिफेन्स मेकॅनिझम’ बदलत जाणं हे अपेक्षितच आहे. जरा खोलात जाऊन विचार केला, तर लक्षात येतं की ‘वैयक्तिक गोपनीयतेची गरज भासणं’ हा खरंतर मुलांच्या वाढीचा आणि विकासाच्या प्रक्रियेचाच एक भाग असतो, तो नाकारून चालत नाही.

अगदी आमच्याही काळी ‘आमची रोजनिशी कुणीही वाचू नये’ अशी आमचीही इच्छा होतीच की. आता पालक म्हणून मात्र मुलांच्या गोपनीयतेच्या स्वातंत्र्याचा आदर करायचा की त्यांच्या काळजीपोटी सतत सावध राहायचं, या दोहोत आमची कधीकधी गफलत होते.

या सगळ्याचा संबंध शेवटी पालक आणि मुलांच्या नात्यातील परस्पर विश्वासार्हतेवर असतो. विशीच्या आतली मुलं ही बौद्धिकदृष्ट्या परिपक्व असतीलच असं नव्हे. त्यामुळे विश्वास टाकणं हे जरा अवघडच असतं; पण तरीही ही वेळ एक स्वतंत्र जबाबदार व्यक्तिमत्त्व घडवण्याची असते. त्यामुळे त्यांच्या जगात त्यांना लहान-मोठे निर्णय घेऊ द्यावे. थोडे धडपडतील, पडतील, जखमाही होतील. त्या वेळी मात्र पालक म्हणून हात द्यायला काठावर आपण ‘जागं असणं’ गरजेचं. कदाचित यालाच सावध राहणं म्हणतात. प्रवाहातल्या धोक्याच्या जागा आपल्याला आधीच दिसल्या किंवा लेकराचं पाऊलच डगमगतंय असं वाटलं, तर प्रवासाचे नियम आपणच जरूर बदलावेत; पण ते करताना दरवाजे-खिडक्या इतक्याही घट्ट बंद करू नयेत, की मुलाला श्वासही घेणं अशक्य व्हावं.

माझे वडील नेहमी म्हणायचे, मुलांना धाक असावा; पण तो ‘प्रेमाचा’, भीतीचा नव्हे. आजचं आधुनिक शास्त्रही दुसऱ्या भाषेत हेच सांगतं की ‘मुलांचे पालक आणि मित्र दोन्ही बना’. ही मैत्री जर ‘आश्वासक’ असेल, तर त्यांचे खोल्यांचे दरवाजे जरी बंद असले, तरी मनाचे दरवाजे मात्र नक्कीच उघडे राहतील. ‘आमच्या ईडीच्या रेडही’ बहुतांश वेळा भेळपार्टीनेच आटोपतात बरं का!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT