Ravindra Shobne
Ravindra Shobne 
सप्तरंग

राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे संपूर्ण भाषण... वाचा

डॉ. रवींद्र शोभणे

चांदा क्‍लब, चंद्रपूर आणि विदर्भ साहित्य संघातर्फे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी असे तीन दिवस राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या भाषणाचा संपादित अंश.

आज आपण 2020 मध्ये वावरत आहोत. याला इंग्रजीत आणि क्रिकेटच्या भाषेत twenty twenty असेही म्हणू शकू. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारूनही जवळ 30 वर्षे उलटून गेली आहेत. एखाद्या पिढीचा कार्यकाळ 30 ते 35 वर्षे एवढा असतो. म्हणजे एक पिढी या काळात उलटून गेली, असे जरी म्हटले तरी या पिढीसोबत साधारणतः तीन पिढ्या बांधलेल्या आहेत. पहिली मावळती, दुसरी कर्ती आणि तिसरी उगवती. कुठल्याही काळाचे संचित या तीन पिढ्यांभोवती गुरफटलेले असते. मधल्या तीन दशकांच्या संदर्भात विचार करायचा झाला, तर आमच्या पिढीच्या मागची पिढी, आमची पिढी आणि आमच्या मागून येणारी पिढी, असा हा तीन पिढ्यांचा एक मोठा पट आहे. या काळात आमच्या पिढीने या समाजात फार मोठे बदल पाहिले. हे बदल जसे सामाजिक-भौतिक होते. तसेच ते भावनिक, मानसिकही होते. या बदलांनी आम्ही अंतर्बाह्य ढवळून निघालो.

भरडून निघालो. हे ढवळणं बाह्य आक्रमणांनी झालेलं होतं. हे सगळे का झाले? कसे झाले? या मागच्या दृश्‍य आणि अदृश्‍य शक्तींना आपण ओळखतो. हे का घडते, हेही आपल्याला ठाऊक आहे; पण त्यापलीकडे आपण केवळ हतबल असतो. कुठला तरी एक अदृश्‍य, अजस्त्र हात आपल्या तोंडावर जबरीपणे आवळला जातो. आणीबाणीच्या काळात शासनाच्या आणि तत्कालीन सरकारविरोधात जाणाऱ्या म्हणून ओळखल्या गेलेल्या "सिंहासन' आणि "जनांचा प्रवाह चालीला' या दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वाङ्‌मय पुरस्कार द्यावेत म्हणून परीक्षकांनी शिफारशी करूनही शासनाने ते पुरस्कार नाकारले. शासनाच्या त्या निर्णयाची तत्कालीन आदरणीय, पूज्यनीय नेतृत्वानेही, पाठराखण केली होती. हा काहीसा आपल्या विस्मरणात गेलेला इतिहास इथे मला पुन्हा एकदा आठवतो आहे.

आपल्या समाजात राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता अशा सत्तासमूहात आम्ही सर्जनशील कलावंत आणखी एक सत्ता महत्त्वाची मानतो. ती म्हणजे शब्दसत्ता. या सगळ्या सत्तांपेक्षा आम्ही शब्दसत्तेला अंतिम आणि स्वयंभू मानत असलो, तरी शेवटी ही शब्दसत्ता या पूर्वोक्त सत्तांवर निर्धारित असते, हेही नाकारता येत नाही. या सत्तेची बटिक म्हणून जरी आपण आपल्या या शब्दसत्तेकडे पाहत नसलो तरी आपल्याला सर्जनाच्या पातळ्यांवर या सत्तांच्या मुळांशी जाऊन आपल्या स्रोतांचा विचार करावा लागतो. त्या अर्थाने आपली ही शब्दसत्ता या सत्तांच्या परिघातच कुठेतरी आपले सत्त्व शोधत असते. त्याअर्थाने आपण स्वयंभू नसतोच कधी; पण या सत्तेवर जर अन्य सत्तांची कुरघोडी होत असेल, तर आपल्या सत्तांच्या अस्मितेचे टोकदार भाले आपण सरसावून उभे राहतोच. ही अशी परिस्थिती का निर्माण होते? त्यामागची कारणे कोणती असू शकतात याचीही उत्तरे शोधणे गरजेचे होऊन बसते.

राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता किंवा शब्दसत्ता या कुठल्याच सत्ता सुट्या किंवा स्वयंभू नसतात, असे मी आताच विधान केले. या सत्ता एकमेकींवर स्थिरावलेल्या असतात. आणि एकमेकीत गुंतलेल्याही असतात. हा गुंता, हा तिढा सोडवणे सोपे नसतेच कधी. तसा प्रयत्न कुणी करीतही नाही. पण, या गुंत्याचा, या तिढ्याचा आपापल्यापरीने अर्थ लावण्याचा प्रयत्न शब्दशक्तीचे शिलेदार करीत असतात. सर्जनाची प्रक्रिया सुरू झाली ती या टप्प्यानंतरच. वेद, उपनिषदे, रामायण- महाभारतासारखी आर्ष काव्ये याच प्रक्रियेचा भाग होती, हे पुन्हा सांगायची गरज नसावी.

सहिष्णुभाव हा कधीही एकपक्षीय नसतो, हे खरे असले तरीही त्याचे उत्तर नृशंस हत्या हे नसतेच नसते, हा समज आपण आज सोयीस्करपणे विसरत चाललो आहोत की काय, याचा शोध आणि बोध घ्यायची वेळ आलेली आहे. कलावंताला आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रसंगी लक्षणेचा आणि व्यंजनेचाही आश्रय घेणे गरजेचे असते. अशा वाटेने समकालाविषयी अधिक कठोरपणे बोलता येऊ शकते, याचे मोठे उदाहरण म्हणजे गिरीश कर्नाडांचे देता येईल. राजसत्तेचा अन्वय वेगळ्या अर्थाने मांडू पाहणारे टी. एस. इलिएटचे अ मर्डर इन अ कॅथेड्रल तोवर आपल्यापर्यंत आले होते. सर्जनशील लेखकाने इतिहास घडविणाऱ्यांच्या बाजूने उभे न राहता इतिहास भोगणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणे महत्त्वाचे ठरते, हा सुप्रसिद्ध पाश्‍चात्य विचारवंत नित्शेने दिलेला इशाराही आपणापर्यंत आला होता. तरीही आपण पुराणातील-इतिहासातील रम्यत्वच शोधत होतो.

आपण आज ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सतत धडपडतो आहोत, ते प्रश्न साधारणतः मागच्या शतकच्या उत्तरार्धात निर्माण झालेले आहेत, असे दिसते. मागच्या शतकाच्या नव्वदच्या दशकात आपण खाउजा संस्कृती स्वीकारली आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न शेतीचे होते, संस्कृतीचे होते, पर्यावरणाचे होते, लोकसंस्कृतीचे होते, बोलीभाषेचे होते. यातले काही प्रश्न निश्‍चितच तुमच्या-आमच्या जगण्याला मुळातूनच उखडून टाकणारे होते. उदाहरणच द्यायचे झाले, तर शेतीचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, नैसर्गिक संपत्तीच्या ऱ्हासाचे प्रश्न. हे आणि असेच इतर प्रश्न नक्कीच आपल्याला झडझडून जागे करणारे आहेत. यावरचे उपायही आपण आपल्यापरीने शोधण्याचे प्रयत्न करू लागलो आहोत. शेतीचे आणि शेतकरी आत्महत्येचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत.

या गंभीर प्रश्नासोबतच दोन प्रश्नांच्या बाबतीत आमचे साहित्यिक अधिक संवेदनशील होताना दिसतात. ते दोन प्रश्न म्हणजे बोली भाषेचा प्रश्न आणि संस्कृतीसंकराचा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न खाउजा संस्कृतीचीच देण आहे, हेही नाकारता येत नाही. संस्कृतीसंकराच्या प्रक्रियेत आपल्या मानसिक, भावनिक परिघात जसे बदल होतात तसेच बदल भाषेत आणि भाषेतून व्यक्त होणाऱ्या साहित्यातसुद्धा अपेक्षित नव्हे, तर अपरिहार्य असतात. हे बदल भारतीय समाजात जसे घडून आलेत तसेच ते मराठी माणसाच्या जगण्याच्या कक्षेतही घडून आले आहेत. या बदलांचा परिणाम आपल्यावर काय झाला ते पाहणे महत्त्वाचे आहे.

आज जगाच्या पाठीवरील असंख्य बोली आणि त्या बोलीतील शब्द नामशेष होत आहेत, बोली नाहीशा होत आहेत, प्रादेशिक बोलीभाषेचा क्षय होत आहे आणि त्याची जागा जागतिक भाषा म्हणजे इंग्रजी भाषा घेत आहे, अशी प्रमेये, युक्तिवाद मोठमोठ्या भाषावैज्ञानिकांकडून मांडला जातो. त्यासाठी ते तळमळीने प्रयत्नही करताना दिसतात. माझं एक साधं निरीक्षण आहे. ते म्हणजे भाषा कधी शुद्ध होती? आणि शुद्ध भाषा म्हणजे काय? भारतीय इतिहासाच्या पटावर मोहोंजोदारो आणि हरप्पापासून किंवा मराठीचा विचार करायचा, तर गाथा सप्तशतीपासून तर आजच्या आपल्या दैनंदिन व्यावहारिक बोलीभाषेपर्यंतचा विचार केला, तर कधी भाषिक संकर झाला नाही? बोलीतील अनेक शब्दांची रूपे कालानुसार बदलतात, इतर जवळच्या-संपर्कातील बोलीभाषांचा संस्कार, प्रभाव सतत होतच असतो. त्यातून प्रत्येक काळाची बोली-भाषा आकाराला येते. आपली बोली घेऊन जगणारे मानव समूह आजही अनेक पट्ट्यात आहेत. ते आपले संस्कार, आपली बोली, आपल्या रीतीभाती घेऊन दैनंदिन व्यवहार करीत असतात. आपल्या बोलीचे संरक्षण करावे म्हणून त्यांनी जागतिक भाषा शिकूच नये, केवळ आपल्या बोलीभाषेतच आपली प्रगती करावी, ज्ञानाच्या भाषेकडे त्यांनी वळूच नये, असा विचार मांडणाऱ्यांचा हेतू पुन्हा नव्या वर्णवर्चस्ववादाच्या पलीकडे जात नाही, हेही ओळखणे गरजेचे आहे.

एकूणच साहित्याचे वाचक रोडावले आहेत. मराठी साहित्याचेही वाचक रोडावले आहेत; किंबहुना मराठी साहित्याला आता वाचकच राहिला नाही, असाही एक सूर सर्वत्र काढला जातो. हीही फार गमतीची गोष्ट म्हणावी लागेल. मराठी साहित्याला वाचकच राहिला नाही, असं नेमकं कोण म्हणतं? लेखक, पुस्तकविक्रेता की प्रकाशक? ज्यांच्या मते मराठी वाचक ज्या काळात भरपूर प्रमाणात वाचत होता तेव्हाही सात सक्कं त्रेचाळीस या जाणकारांनी वाखाणलेल्या किरण नगरकरांच्या कादंबरीची पहिली आवृत्ती संपायला सत्तावीस वर्षे का लागलीत? तेव्हा वाचकांची संख्या खूप होती, असा अर्थ काढायचा का? आज लिहिणारे नवे लेखक भरपूर प्रमाणात आहेत. ते आपल्यापरीने आपल्या लेखनाची दिशा शोधत आहेत. तेच आपला वाचनाचाही वाटा उचलून घेत आहेत. त्यातल्या काहींना आपली दिशा नक्कीच गवसेलही. असे वाचक सर्वत्र आहेत. अनेक बऱ्यापैकी पुस्तकांची पहिली आवृत्ती एका वर्षात संपते हे लक्षण वाईट आहे, असे म्हणायचे का?

प्रत्येकच अ. भा. मराठी साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तक विक्री झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. ज्याला आपले अनुभव साहित्याच्या कुठल्या ना कुठल्या आकृतिबंधात मांडायचे आहेत, असा गावखेड्यातला उद्याचा लेखक आपली वाचनाची भूक भागविण्यासाठी धडपडतो आहे. "शहरातली पांढरपेशी माणसे पुस्तके वाचत नाहीत' अशी विधाने करून ती लोकप्रिय करण्यात ज्यांना रस आहे त्यांनी ती करावी. पण, त्यामुळे वस्तुस्थितीचा अपलाप होतो, हेही लक्षात घ्यायला हवे. असले निष्कर्ष ज्या मध्यमवर्गीय मानसिकतेतून काढले जातात ते किती खरे मानायचे, हेही ठरविणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात जशी शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य ही विभागणी झाली आहे, अशी विभागणी इतर कुठल्याही भारतीय भाषेतील साहित्यात नाही. हे पाहिले तर आपल्या साहित्याला पडलेली कुंपणे लक्षात येतील. आणि ही कुंपणे उखडून टाकण्याचे काम नव्वदोत्तरी साहित्याने प्रामाणिकपणे केले, हेही नाकारता येत नाही.

आजच्या एकूणच आपल्या जगण्याचा विचार केला, तर आपल्यासभोवती माध्यमांचे अजस्र जाळे पसरले आहेत. यात इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे जशी आहेत तशीच मुद्रित माध्यमेही आहेत. सकाळी वर्तमानपत्र आणि पुढे दिवसभर घरातला छोटा पडदा आणि खिशातला सहा इंची पडदा यात आपण हरवून बसतो. आता तर मुद्रित माध्यमेही आपल्या खिशातल्या मोबाईलवर पाहण्याची सोय झाली आहे. या माध्यमंचा उपयोग संस्कारांसाठी, आदर्शांच्या जपणुकीसाठी करता येतो, हा विचार आज नामशेष झालेला आहे. आजची वर्तमानपत्रेही याला अपवाद नाहीत. एकेकाळी याच वर्तमानापत्रांच्या रविवार पुरवण्यांच्या भरवशावर आमची पिढी उभी राहिली. तिला व्यक्त व्हायला ते माध्यम होते. आज एखाद दुसरे वर्तमानपत्र सोडले, तर साहित्यापासून या पुरवण्या कितीतरी दूर गेल्या आहेत. या पुरवण्यांमधून कविता, कथा, ललितलेख यासारखे वाङ्‌मय पूर्णतः बाद झाले आहेत.

तुम्हा-आम्हाला सुन्न करणाऱ्या घटना आज अवतीभवती फार निर्दयीपणे घडत आहेत. त्या म्हणजे निर्भयांच्या लैंगिक अत्याचारांच्या आणि नृशंस हत्यांच्या. या घटना कालही घडत होत्या. पण, आज आपल्या घरातल्या पडद्यावर त्यांच्या बातम्यांनी त्यांची तीव्रता आपल्याला सुन्न करून सोडणारी आहे. दररोज या घटना घडत आहेत. यामागे कुठली कारणे असतील? पुरुषी अहंकार? स्त्रीशोषणाची निर्घृण राक्षशी प्रवृत्ती? विकृत मानसिकता? बळी जाणारी ही निर्भया कुणाची तरी मुलगी असते, बहीण असते, बायको असते, आई असते.

या विकृतीला कशाने चाप बसेल? कायद्याच्या चौकटीत वर्षानुवर्षे चालणाऱ्या या प्रकरणांची लोकांना नंतर आठवणही राहत नाही. पण, एक आयुष्य मात्र पूर्णपणे उद्‌ध्वस्त झालेलं असतं. पुरुष या नाटकाच्या माध्यमातून लेखकाने सांगितलेला उपाय योग्य की हैदराबाद पोलिसांनी अवलंबिलेला मार्ग अधिक सोयीचा? म. फुले-आंबेडकरांनी, आगरकर-रानड्यांनी मांडलेले स्त्रीविषयक विचार शालेयस्तरापासून शिक्षणात आणले, तर काही प्रमाणात या प्रवृत्ती थांबू शकतील, असे वाटते. संस्कारक्षम वातावरणाची आज अधिक गरज आहे, असेही वाटू लागते; पण हा एक कयासच. एक गोष्ट मात्र नाकारता येत नाही; आणि ती म्हणजे या सगळ्याच बाबतीत आपण सगळेच सुन्न आणि क्षुब्धही आहोत.


आतापर्यंत मी माझ्या-आपल्या समकालाविषयीच बोलत आहे. या समकालाविषयी बोलताना काही आगे-मागेही पाहण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या अल्पमतीनं मी त्याचा अन्वय लावण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही जाणकारांना विसंगतीही जाणवेल. चुकाही जाणवतील. पण, जे आहे ते माझं आहे. म्हणूनच मी माझ्या या आकलनावर ठाम आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT