दुलारी देशपांडे
बोरिवलीत पश्चिमेला हत्तीसारखा आकार असलेल्या खडकात ‘वजिऱ्याचा गणेश’ आहे. हत्तीच्या डोळ्यात गणेशाची मूर्ती आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ‘वजिऱ्याच्या गणपती’ची गोष्ट... कुबोरिवली पश्चिमेतलं वजिरा नावाचं गावठाण.
या गावात साधारणपणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धातलं म्हणजे पोर्तुगिजांच्या काळापासूनचं ‘स्वयंभू श्रीगणेशा’चं देवस्थान आहे. हे देवस्थान पंचक्रोशीत ‘वजिऱ्याचा गणपती’ या नावानं प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळापासूनच वजिऱ्यात सोमवंशीय क्षत्रिय पाठारे समाजाची आणि कोळी समाजाची वस्ती आहे. गणपती देवस्थान या दोन समाजांच्या सामायिक मालकीचं आहे. स्वयंभू गणेश ‘स्वयंभू’ कसा, याची एक अतिशय सुरस दंतकथा आहे.
साधारणत: सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. वजिरा भागात तेव्हा मोठमोठे खडक होते, त्या काळात रस्ते बांधण्यासाठी हे खडक फोडून त्याची खडी वापरली जायची. खडक फोडण्याचं काम दगड फोडणारे कामगार करीत. वजिरा गावात असंच एकदा रस्ताबांधणीसाठी खडी हवी म्हणून दगड फोडण्याचं काम सुरू होतं.
सूर्य हळूहळू जसजसा डोक्यावर आला आणि टळटळीत उन्हाची वेळ झाली तसं कामगारांनी दगड फोडण्याचं काम थांबवून ऊन उतरेस्तोवर विश्रांती घ्यायचं ठरवलं. लगोलग त्यांनी मिळेल ती सावलीची-आडोशाची जागा पाहून आपापल्या पथारी पसरल्या.
सकाळपासून दगड फोडण्याच्या कष्टाच्या कामानं शिणलेले हे कामगार बघता-बघता झोपेच्या केव्हा अधीन झाले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. दुपारच्या वेळी विश्रांती घेत असलेल्या दगड फोडणाऱ्या कामगारांमधल्या एका कामगाराला तो झोपेत असताना -‘हा खडक फोडू नका, इथं माझं स्थान आहे,’ असा गणपतीचा स्वप्न-दृष्टांत झाला.
कामगारानं जाग आल्यावर आपला स्वप्न-दृष्टांत इतरांना सांगितला. या स्वप्न-दृष्टांतावर गावठाणातल्या लोकांचा विश्वास बसला. अशा तऱ्हेनं दगड फोडणाऱ्या कामगाराला झालेल्या स्वप्न-दृष्टांताच्या माध्यमातून वजिऱ्याला ‘स्वयंभू श्रीगणेश’ प्रकट झाला. त्या वेळेपासून स्थानिक ग्रामस्थ घरात काही शुभकार्य निघालं, की स्वयंभू श्रीगणेशाच्या दर्शनाला यायला लागले.
सन १९७४ मध्ये ‘श्रीगणेश ग्रामस्थ सेवामंडळ’ या ट्रस्टची स्थापना झाली. या विश्वस्त मंडळावर फक्त सोमवंशीय क्षत्रिय पाठारे समाजाचे तसंच कोळी समाजाचे लोक विश्वस्त म्हणून काम करू शकतात. गणेशाचे पुजारी मात्र वजिरा गावठाणाबाहेरचे असतात. ट्रस्टतर्फे मुलाखतीद्वारे त्यांची निवड केली जाते.
‘श्रीगणेश ग्रामस्थ सेवामंडळ’ या ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष विजयकुमार रावते देवस्थानाविषयी एक किस्सा सांगताना म्हणतात, ‘‘सन १९८८ मध्ये ‘श्री ग्रामस्थ सेवा मंडळा’वर नवीन ट्रस्टी आले त्यावेळची गोष्ट. त्या काळात एकदा मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’चे काही विद्यार्थी गणपतीच्या दर्शनाला आले होते.
त्यांनी सर्व्हे केल्यावर सांगितलं की मूर्तीवर खूप शेंदूर असल्यामुळं मूर्तीचा आकार स्पष्ट दिसत नाही. आकार स्पष्ट दिसण्यासाठी मूर्तीवरील शेंदूर काढणं गरजेचं आहे. शेंदूर काढताना मूर्ती विद्रूप होईल, या भीतीनं त्यावेळच्या ट्रस्टींनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या त्या विद्यार्थ्यांकडून रात्रीच्या वेळी मूर्तीवरचा शेंदूर काढण्याचा प्रयत्न केला.
त्या रात्री जवळपास साडेबारा किलो शेंदूर मूर्तीवरून निघाला. विद्यार्थी जसजसा मूर्तीवरून शेंदूर काढत गेले तसतसा मूर्तीचा आताचा सुबक आकार प्रकट झाला.’’ वजिऱ्याचा स्वयंभू गणेश ज्या खडकात प्रकटला, त्या खडकाचा आकार हत्तीसारखा आहे.
या हत्तीच्या डोळ्यात स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे. स्वयंभू गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची असून ती बसलेल्या स्थितीत आहे. स्वयंभू गणेश मंदिराचा संपूर्ण परिसर एकवीसशे चौरस मीटर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला देवस्थानातर्फे गुलाब, जास्वंद, डाळिंब, पेरू, नारळ, आंबा, फणस यांसारखी फुलझाडं-फळझाडं लावण्यात आली आहेत.
त्यामुळं मंदिराच्या पाठीमागचा परिसर नयनरम्य झाला आहे. मंदिराच्या पश्चिमेला सुमारे वीस ते पंचवीस फूट खोलीचा नैसर्गिक तलाव आहे. तलावाच्या मध्यभागी एक मोठ्या आकाराचा नैसर्गिक खडक आहे. देवस्थान ट्रस्टनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं तलावाला कुंपण घातलेलं आहे.
याच तलावात गणेश विसर्जनांच्या दिवशी दरवर्षी तीन फुटांपर्यंतच्या जवळपास साडेचार हजार गणेश मूर्तींचं देवस्थानातर्फे मोफत विसर्जन केलं जातं. मात्र गणेश चतुर्थीला देवस्थानाचा वेगळा गणपती बसत नाही. गणेशाच्या जोडीला इथे शितला देवीचं तसंच हनुमानाचंही मंदिर आहे. याच मंदिराच्या परिसरात अलजी देव या ग्रामदेवतेचंही मंदिर आहे.
दर वर्षी २६ जानेवारीला देवस्थानातर्फे ‘गणेश याग’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. ‘गणेश यागा’च्या निमित्तानं देवस्थानातर्फे भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. त्या दिवशी जवळपास दहा हजार माणसं या भंडाऱ्याचा लाभ घेतात. याखेरीज देवस्थानातर्फे दरवर्षी गणेश चतुर्थी, अंगारिका, दुर्गाष्टमी यांसारखे विविध उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात.
स्वयंभू गणेश मंदिरासमोर एक पटांगण आहे. तिथे देवस्थानातर्फे विविध समारंभ साजरे होत असतात. देवस्थानाच्या पूर्वीच्या परिस्थितीविषयी सांगताना विजयकुमार रावते सांगतात की, ‘‘पूर्वी देवस्थानच्या परिसरात दलदल, खड्डे आणि मोठमोठे खडक होते.
१९६५ पासून इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी भरावाचं काम करायला सुरुवात केली. हळूहळू भाविकांना मंदिराच्या ट्रस्टतर्फे सोयी-सुविधा पुरवण्यात येऊ लागल्या. गणेशाच्या दर्शनाला गणेशचतुर्थी, अंगारिकासारख्या दिवशी लाखोंच्या संख्येनं गणेशभक्त येऊ लागले.
पंचक्रोशीत या देवस्थानाचं महत्त्व लोकांच्या सांगोवांगी वाढू लागलं. गणेशाची कीर्ती जसजशी पसरायला लागली तसतशी दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांमध्ये शाहीर साबळे, सुप्रिया-सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, अरुणा इराणी, वर्षा उसगांवकर यांसारख्या नामवंत कलावंत मंडळींचीही भर पडली.’’
श्री गणेश ग्रामस्थ मंडळाच्या दानपेटीत जसजशी गणेशभक्तांनी उदार हस्ते दिलेल्या देणग्यांची रक्कम जमा होत गेली, तसतशी समाजाकडून मिळालेल्या या धनाची रक्कम मंडळानं ज्या-ज्या वेळी समाज संकटात सापडला त्या-त्या वेळी आर्थिक मदत करून, समाजाची रक्कम समाजालाच पुन्हा परत केली.
कोरोनाकाळात मंडळानं मुख्यमंत्री निधीला भरघोस मदत तर केलीच; शिवाय वजिरा परिसरातील हजारएक लोकांना अन्नधान्याचं वाटप केलं. आजही देशावर, राज्यावर आलेल्या अनेक संकटांच्या वेळी वजिरा ग्रामस्थ मंडळातर्फ आर्थिक मदत केली जाते.
जसं केरळची पूरपरिस्थिती, गुजरात तसंच खिल्लारीचा भूकंप अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये मंडळानं आपत्तीग्रस्तांना सढळ हातानं मदत केली आहे. देवस्थानच्या तिजोरीतल्या पैशातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वाटली जातात.
दर वर्षी बोरिवली परिसरातल्या सर्व शाळांतून इयत्ता आठवी-नववीच्या वर्गातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंडळातर्फे सत्कार केला जातो. थोडक्यात, श्री गणेश ग्रामस्थ सेवामंडळ आपल्या विविध उपक्रमांतून आपलं धार्मिक आणि सामाजिक ऋण फेडण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचं दिसून येतं. जवळपास पाच-सहाशे वर्षांइतक्या जुन्या-प्राचीन गणेशमूर्तीचं दर्शन प्रत्येक गणेशभक्तानं आवर्जून घ्यावं, इतकं गणेशाच्या या स्थानाचं निश्चितचं माहात्म्य आहे.
dularid111@gmail.com (लेखिका विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.