Subhashitratnani  Sakal
सप्तरंग

अन्योक्ती

संस्कृत काव्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे अन्योक्ती. एकाला उद्देशून बोलायचं; पण सुचवायचं असतं काही वेगळंच.

सकाळ वृत्तसेवा

-मंजिरी धामणकर

संस्कृत काव्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे अन्योक्ती. एकाला उद्देशून बोलायचं; पण सुचवायचं असतं काही वेगळंच. थोडक्यात म्हणजे, ‘लेकी बोले सुने लागे’. पुढच्या काही भागांमध्ये अशाच अन्योक्तींची निवडक उदाहरणं बघू या.

अशोक

गर्वायसे विकचकोरकमञ्जुगुञ्ज-

दुद्वृत्तषट्पदघटाविभवेन किं नु?

वामभ्रुवां चरणताडनदोहदानि

किं नाम न स्मरसि तावदशोक! तानि?

अनुवाद : अशोकवृक्षा गर्व करिसि का फुलांभोवती-

- मंजुळ गुंजत फिरणाऱ्या भृंगांचा तू रे!

हे वैभव तुज लाभे खाउनी लत्ता-

युवतींच्या, हे तू विस्मरसी का रे!

शब्दार्थ : हे अशोकवृक्षा, आज तुझी फुलं फुलली आहेत आणि त्यांच्याभोवती भुंग्यांच्या झुंडी मंजुळ गुंजारव करत आहेत. या वैभवामुळं तुला एवढा गर्व का बरं झाला आहे? तरुणींच्या लाथा खाण्याचे डोहाळे तुला नुकतेच लागले होते, त्या लाथा खाऊनच तुला हे वैभव प्राप्त झालं आहे हे तुला आठवत नाही का?

सूचितार्थ : तरुणींच्या लत्ताप्रहारानं अशोक वृक्षाला फुलं येतात असा संस्कृत साहित्यात संकेत आहे. वरिष्ठांच्या लाथा खाऊन इतरत्र बढाया मारत ऐट दाखवणाऱ्या किंवा ज्यांच्या साह्यानं हे वैभव प्राप्त झालं आहे त्यांचं स्मरण न ठेवता आजचं वैभव मिरवणाऱ्या कृतघ्नांना उद्देशून ही अन्योक्ती आहे.

कोकिल

अ) रे रे कोकिल मा भज मौनं किन्चिदुदञ्चय पञ्चमरागम्।

नो चेत् त्वामिह को जानीते काककदम्बकपिहिते चूते।।

अनुवाद : कोकिळ पक्ष्या, मौन नको रे...गात रहा पंचम रागा

नाहीतर काकांच्या झुंडीत कोण ओळखे तुजसी गा?

शब्दार्थ : अरे कोकिळा, तू गप्प बसू नकोस. थोडासा तरी पंचम स्वर कंठातून काढ. नाहीतर कावळ्यांच्या थव्यांनी झाकून गेलेल्या या आम्रवृक्षावर तुला कोण ओळखणार? (तुला सगळे कावळाच समजतील.)

सूचितार्थ : गुणहीन माणसांनी भरलेल्या या जगात गुणिजनांनी विनयानं मागं न राहता पुढं येऊन जगाला आपले गुण दाखवले पाहिजेत.

ब) भद्रं कृतं कृतं मौनं कोकिलैः जलदागमे।

दर्दुराः यत्र गायन्ति तत्र मौनं हि शोभनम्।।

अनुवाद : कोकिळ पक्ष्या पाउसकाळी मौन राहसी तेच बरे

बेडुक जेथे गाती तेथे गप्प राहणे शोभे रे

शब्दार्थ : पावसाळा आल्यावर कोकीळ गप्प बसले हे त्यांनी चांगलं केलं. कारण, जिथं बेडूक गातात तिथं कोकिळांनी मौन धारण करणं हेच भूषणावह आहे.

सूचितार्थ : जेव्हा काव्यगुण अंगी नसलेले कवी जिकडं तिकडं दिसून येतात तेव्हा खऱ्या कवीनं गप्प राहणंच बरं. त्याच्या काव्याची कदर तिथं होणार नाही. वरील दोन्ही कोकिलान्योक्ती परस्परविरोधी वाटतात. मात्र, त्यांतून घेण्यासारखा बोध म्हणजे, कुठं बोलावं आणि कुठं मौन राहावं याचा विवेक गुणी माणसाला असावा.

तराजू

प्राप्य प्रमाणपदवीं को नामास्ते तुलेऽवलेपस्ते।

नयसि गरिष्ठं अधस्तात् तदितरं उच्चैस्तरां कुरुषे।।

अनुवाद : अरे तराजू, प्रमाण बनता गर्वाने तू चढलासी

थोरां आणसि खाली आणिक हलक्यांना वरती नेसी

शब्दार्थ : अरे तराजू, तुला प्रमाण म्हणून श्रेष्ठ पद प्राप्त झाल्यावर किती गर्व चढला आहे! त्या गर्वाच्या भरात उद्दामपणे तू गुरू (जड) पदार्थांना खाली आणतोस आणि इतरांना (हलक्यांना) वर चढवतोस.

सूचितार्थ : अपात्र माणसाला अधिकार मिळाला तर त्याच्या जोरावर तो थोरा-मोठ्यांचा अपमान करतो आणि हलक्यासलक्या माणसांना उच्च स्थान देतो.

कमळ

अयि दलदरविन्द स्यन्दमानं मरन्दम्

तव किमपि लिहन्तो मञ्जु गुञ्जन्तु भृङ्गाः।

दिशि दिशि मधुगन्धं तावकीनं विवृण्वन्

परिमलमयं अन्यो बान्धवो गन्धवाहः।।

अनुवाद : रे कमळा! तव मधू चाखण्या

करोत भुंगे मधु गुंजारव

तुझी कीर्ति जो दिगंत नेतो

तो वारा तव विशेष बांधव

शब्दार्थ : हे उमलणाऱ्या कमलपुष्पा, तुझा गळणारा मध चाटणारे भुंगे मंजुळ गुंजन करत तुझ्याभोवती कितीही रुंजी घालोत; पण तुझा सुगंध दिशादिशांत पसरवणारा वारा हा तुझा आगळाच बंधू, मित्र आहे हे जाण.

सूचितार्थ : स्वार्थासाठी गुणगान करत भोवती घोटाळणारे तुमचे खरे मित्र नसतात, तुमचं गुणवर्णन निरपेक्षपणे करणारे हेच तुमचे खरे मित्र.

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT