न्यू झीलंडचा महत्त्वाचा खेळाडू ट्रेंट बोल्ट यानं आपल्या क्रिकेट नियामक मंडळाच्या करारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि या बातमीनं क्रिकेटच्या खेळाचा अभ्यास करणारे लोक विस्मयचकित झाले. तसं बघायला गेलं तर कधी तरी कोणत्या तरी खेळाडूच्या बाबतीत हे होणारच होतं. बोल्ट त्या वेगळ्या प्रवासातला पहिला वारकरी ठरला. क्रिकेटच्या खेळाला वेगळंच वळण लागत असल्याच्या सर्व खुणा स्पष्ट दिसत असूनही पालकसंस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं काणाडोळा केल्यानं क्रिकेटचा खेळ अचानक भलत्याच वळणावर येऊन ठाकला आहे.
बोल्टच्या निर्णयाचा अर्थ काय?
बोल्टच्या निर्णयाचे दूरगामी पडसाद काय असू शकतील अशी शंका वाचकांच्या मनात नक्कीच आली असेल. सांगतो. ३३ वर्षांच्या बोल्टनं आजवर ७८ कसोटी सामने खेळले आहेत व ३०० पेक्षा जास्त बळी कसोटी क्रिकेटमध्ये घेतले आहेत. न्यूझीलंडनं भारतीय संघाला पराभूत करून टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली, त्या विजयी संघाचा बोल्ट हा अत्यंत मोलाचा खेळाडू होता. त्यानं सर्वांगीण करार स्वीकारायला नकार दिला आहे. याचा अर्थ असा आहे की, बोल्ट आता न्यूझीलंडच्या संघाला सदैव उपलब्ध असेलच असं नाही.
‘न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं देऊ केलेल्या ‘सेंट्रल काँट्रॅक्ट’वर सही करणाऱ्या खेळाडूंनाच येणाऱ्या मोसमाकरिता न्यूझीलंडच्या संघनिवडीसाठी प्राधान्य दिलं जाईल,’ असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच, कदाचित् बोल्टचं आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून असलेलं अस्तित्व धोक्यात आलं आहे.
यावर बोल्टनं व्यक्त केलेलं मनोगत असं - ‘करारावर सही न करण्याच्या माझ्या निर्णयानं मला परत ‘ब्लॅक कॅप्स’चा खेळाडू म्हणून मैदानात पाऊल ठेवता येईलच असं नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे...पण काय करू, एक वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असताना शरीरावर आणि मनावर येणार ताण, माझ्या कुटुंबानं माझं क्रिकेटचं ध्येय पूर्ण करण्यासाठी केलेला त्याग आणि वय वाढत असल्यानं, क्रिकेटनंतर काय करायचं, याचा मनात सतत चाललेला विचार...या कारणांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मला माझ्या कुटुंबाला आता नक्कीच जास्त वेळ द्यायचा आहे.’
दूरगामी परिणाम
बोल्टच्या निर्णयानंतर इतकी चर्चा होण्याचं कारण असं की, ऐन उमेदीत आणि कामगिरीच्या भरात असताना त्यानं हा निर्णय घेतला आहे. बोल्ट न्यूझीलंड संघाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० असे तिन्ही प्रकार खेळत होता. चांगली कामगिरी करत होता. त्याचं तिन्ही संघांतील स्थान अभेद्य होतं आणि तरीही त्याला असा निर्णय घ्यावा लागला आहे, म्हणून याचे दूरगामी परिणाम आहेत.
अगोदर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सनं उत्तम खेळ सुरू असताना आंतरराष्ट्रीय खेळातून अचानक निवृत्ती जाहीर केली. कारण, त्याला आयसीसी स्पर्धांत योग्य यश मिळवून दाखवता न आल्यानं दडपण आलं. त्याच देशाच्या फाफ डू प्लेसिस यानंही आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती स्वीकारली आणि विविध टी-२० स्पर्धांत खेळत राहून ‘रोजीरोटी तुपा’सह कमावण्याचं ठरवलं. इतकंच नव्हे तर, क्विंटन डिकॉक यानं वयाची तिशी गाठण्याअगोदरच कसोटी क्रिकेटमधून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला. आणि, आता बोल्टचा तर त्याही पुढचा निर्णय जाहीर झाला आहे.
असा बदल होतोय...
येत्या मोसमात दक्षिण आफ्रिकी संघानं ऑस्ट्रेलियादौऱ्यावरील एकदिवसीय मालिका न खेळता स्वतःच्या देशात नव्यानं सुरू होणाऱ्या टी-२० स्पर्धेकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे. असं पहिल्यांदाच घडलं.
‘‘आमच्या देशातील क्रिकेट ‘जिवंत’ ठेवण्यासाठी अर्थकारण भक्कम करण्याची नितांत गरज होती. त्यासाठी टी-२० स्पर्धा सुरू करण्याशिवाय आमच्या पुढं कोणताच पर्याय नव्हता, म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला,’’ असं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे मुख्य अधिकारी, माजी कप्तान ग्रॅमी स्मिथ यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या बाजूला, संयुक्त अरब अमिरातीमध्येही नवीन टी-२० लीग सुरू होत आहे. स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू खेळावेत म्हणून मोठ्या रकमेच्या कराराचं आमिष आहे. थोडक्यात, आयपीएलच्या धर्तीच्या दोन नवीन टी-२० लीग स्पर्धा खेळाडूंना साद घालत आहेत. देशासाठी खेळायचं की या टी लीग-स्पर्धांत खेळून भविष्याचा विचार करून आर्थिक सुबत्ता मिळवायची असा पर्याय खेळाडूंसमोर आहे.
अगदी सत्य सांगायचं तर, भारत-ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या देशांच्या संघांकडून खेळणाऱ्या खेळाडूंना आपल्या बोर्डाच्या करारावर सही केल्यावर मिळणारा मोबदला चांगला भरघोस आहे. बाकीच्या देशांच्या खेळाडूंची अवस्था तशी नाही हे उघड सत्य आहे. त्याचा सर्वात मोठा फटका वेस्ट इंडीजला सहन करावा लागत आहे.
वेस्ट इंडीज संघाचे महान माजी खेळाडू आणि निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष डेस्मंड हेन्स म्हणतात, ‘‘टी-२० वर्ल्ड कप काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना वेस्ट इंडीजचे काही मुख्य खेळाडू संघनिवडीसाठी उपलब्ध असणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. टी-२० वर्ल्ड कपसाठी संपूर्ण ताकदीचा संघ निवडायला आम्हाला खूप आवडेल; पण ‘वेस्ट इंडीजसाठीच खेळा,’ असं बंधन आम्ही खेळाडूंवर घालू शकत नाही ना...! ’’ हे सांगताना हेन्स यांच्या स्वरात हताशा होती.
भारत सुस्थितीत
जगातील क्रिकेट मंडळांपुढं समस्या निर्माण होत असताना एका अर्थानं भारतीय क्रिकेट सुस्थितीत आहे. याला कारण आहे बीसीसीआयनं आयपीएल सुरू करताना केलेला नियम. तो नियम असा आहे - ‘मंडळाबरोबर करार केलेल्या कोणत्याही खेळाडूला जगातील कोणत्याच एकदिवसीय किंवा टी-२० स्पर्धेत व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळता येणार नाही.’ परिणामी, इंग्लिश कौंटी खेळणारे भारतीय खेळाडू फक्त तीन आणि चार दिवसांचे सामने खेळतात. मर्यादित षटकांचे सामने खेळत नाहीत.
काय होणार?
फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल आणि गोल्फ यांसारख्या खेळांत खेळाडू व्यावसायिक म्हणून खेळू लागतो तेव्हा मुख्यत्वेकरून तो खुल्या स्पर्धेत खेळतो. देशाच्या संघातून असे खेळाडू फक्त निवडक ठिकाणी खेळतात. क्रिकेटच्या खेळाचा ढाचा तसा नाही. दोन देशांतील सामन्यांतील थरारावर क्रिकेट बहरतं. आता त्याच प्रकाराला धक्का लागणार आहे. मुख्य खेळाडू देशाच्या संघासाठी न खेळता खासगी टी-२० स्पर्धेत खेळून पैसे कमावण्याचा पर्याय निवडू लागले तर मोठा बदल होणं अपरिहार्य असेल.
या बदलात मोठा धक्का एकदिवसीय क्रिकेटला आणि दोन देशांतील मर्यादित षटकांच्या मालिकांना बसणार आहे. आयसीसीला या सर्व बदलांची पूर्वकल्पना असूनही पालकसंस्था या नात्यानं तिनं काही पावलं उचलली नाहीत म्हणून तिला दोष द्यावा की जे जे होईल ते ते पाहणं हेच फक्त पालकसंस्था म्हणून आयसीसीच्या हाती आहे असा प्रश्न पडतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.