novak djokovic
novak djokovic sakal
सप्तरंग

काय म्हणावं या खेळाडूला!

सुनंदन लेले (saptrang.saptrang@gmail.com)

‘सध्याचा किंवा अगदी नजीकच्या भूतकाळातील लाडका टेनिसपटू कोण,’ असा प्रश्न विचारला तर बहुतेक लोक रॉजर फेडरर किंवा रफाएल नदालचं नाव घेतील. अर्थातच फेडररची बात और होती. त्याच्या खेळात सहजता, नजाकत आणि काव्य होतं. नदालच्या खेळात जिद्द दिसायची.

टेनिस कोर्टवरची परिस्थिती कशीही असली तरी आणि समोरचा खेळाडू विजयाच्या जवळ पोहोचलेला असला तरी नदाल हार मानायचा नाही. लढत राहायचा आणि डाव उलटवून कधी कधी जिंकायचाही. उगाच नाही फेडररनं २०, तर नदालनं २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदं पटकावली. सन २००३ मध्ये फेडररनं आणि नदालनं २००५ मध्ये पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं.

त्याच २००५ मध्ये युद्धानं ग्रासलेल्या आणि टेनिसच्या सुविधा अत्यल्प असलेल्या सर्बीयासारख्या देशातून एक खेळाडू पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पात्र ठरला. नंतरच्या १८ वर्षांच्या कालखंडात त्या खेळाडूनं फेडरर-नदाल आणि अँडी मरे यांच्यासारखे दर्जेदार खेळाडू राज्य करत असताना २४ ग्रँड स्लॅम जिंकण्याची अशक्यप्राय वाटणारी कामगिरी करून दाखवली.

त्या खेळाडूचं नांव आहे नोवाक जोकोविच. आपण फेडरर-नदालवर प्रेम करू या; पण ‘गोट’ म्हणजेच ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ म्हणून आता तरी नोवाक जोकोविचला रास्त मान देऊ या का?

अत्यंत कठीण बालपण

फेडररचा स्वित्झर्लंड किंवा नदालचा स्पेन...या देशांच्या तुलनेत सर्बीया अत्यंत अस्थिर देश होता. कित्येक रात्री जोकोविचच्या कुटुंबानं घराच्या तळघरात बॉम्बफेकी विमानांची घरघर ऐकत काढल्या आहेत. लहान असताना टेनिसचे प्राथमिक धडे गिरवताना घरासमोरच्या भिंतीवर टेनिसच्या जाळ्याचं चित्रं काढून नोवाक एकटाच सराव करायचा.

‘तुला कोण व्हायचं आहे,’ असं कुणी त्याला विचारायचं, तेव्हा तो आत्मविश्वासानं सांगायचा ‘मला जगातला अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू व्हायचे आहे.’

ऐकणारे हसून निघून जायचे; पण जोकोविचचं स्वप्न हे दिवास्वप्न नव्हतं. ते साध्य करण्यासाठी त्यानं केलेली मेहनत जगाला बरंच काही शिकवून गेली.

मानसिक तयारीचं महत्त्व

जोकोविच मानसिक तयारीचं मोल पहिल्यापासून जाणून होता. ‘सर्वोत्तम टेनिसपटू’ म्हणूनच तो स्वतःकडे लहानपणापासून बघत असे. मग त्यानं स्वप्नपूर्तीसाठी अथक् परिश्रम घेतले.

जोकोविच म्हणतो : ‘मोठ्या सामन्याअगोदर तयारी करताना मी सरावाबरोबरच तंदुरुस्तीवर आणि मनाच्या तयारीवर भर देतो. तंदुरुस्त असणं नितांत गरजेचं आहे; कारण, सामन्यादरम्यान थकवा आला तर निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. टेनिसच्या खेळात प्रत्येक क्षणी निर्णय घ्यावा लागत असतो.

त्यात गल्लत झाली तर खेळ ‘खलास’ होऊ शकतो. याच कारणानं माझ्या सपोर्ट-स्टाफनं मला खूप मेहनत करायला लावून तंदुरुस्त ठेवलं आहे. समोरचा खेळाडू मला कोणता प्रश्न विचारणय्ची शक्यता आहे...माझ्या कोणत्या कमजोरपणावर आघात करण्याची शक्यता आहे याचा सखोल विचार मी सामन्याअगोदर करतो.

तसं बघायला गेलं तर, सामना मनात अगोदर खेळून मगच मी कोर्टवर उतरतो! तुम्हाला खोटं वाटेल; पण जे मी मनात बघतो त्यातलं बरंच कोर्टवर जसंच्या तसं घडतं! मी विजेता झालोय, असं कल्पनाचित्र मी सामन्याअगोदर रंगवत राहतो. त्या सकारात्मक विचारांचा मला फायदा होतो.

सर्वोच्च पातळीवर खेळत असताना स्वत:शी प्रचंड संघर्ष सुरू असतो. कधी भावनिक, कधी शारीरिक, तर कधी वैचारिक. गडबडलेलं मन, भरकटलेले मन परत एका जागी स्थिर करून खेळणं हाच प्रत्येक खेळाडूचा सर्वोच पातळीवरचा संघर्ष असतो.’

मनावर नियंत्रण

जोकोविच म्हणतो : ‘भूतकाळात रमू नका आणि भविष्याचा विचार करू नका...फक्त वर्तमानकाळात जगायला शिका. त्या त्या क्षणात जगायला शिका, असं बरेच प्रशिक्षक-विचारवंत नेहमी सांगत असतात. मान्य आहे मला हा विचार. मात्र, माणसाला असं करणं प्रत्यक्षात शक्य आहे का असा भाबडा विचार माझ्या मनात येतो.

मानवी मन एखाद्या प्रवाशासारखं असतं असं मला वाटतं.ते सतत भूतकाळात चक्कर मारून येतं, तर कधी भविष्यात डोकावून येतं. असं होणे माझ्यासाठी नॉर्मल आहे. फक्त हा विचार बाजूला सारून, त्यात न रमता मन परत ताळ्यावर आणून, वर्तमानात काय करायचं आहे, यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं असतं. भूतकाळ आणि भविष्यकाळ या चक्रातून जितक्या लवकर वर्तमानकाळात येता येईल तितकं चांगलं.’

अबब २४!

ज्यांनी एक ग्रँड स्लॅम विजेतेपद कसंतरी पटकावलं, असे खूप चांगले चांगले खेळाडू आहेत उदाहरण देऊ? जोकोविचचा प्रशिक्षक, दर्जेदार डावखुरा खेळाडू गोरान इवानोविच यानं फक्त एक ग्रँड स्लॅम जिंकलं आहे. टेनिसच्या इतिहासात फक्त आठ खेळाडूंनी दहापेक्षा जास्त ग्रॅंड स्लॅम जिंकले आहेत. वीसपेक्षा जास्त जिंकणारे अवघे तीनजण आहेत.

फेडरर, नदाल आणि जोकोविच. त्यातही फेडरर निवृत्त झाला आहे. नदाल दुखापतीतून सावरायचा प्रयत्न करतोय आणि जोकोविचवनं २४ ग्रँड स्लॅम जिंकूनही तो एकदम तंदुरुस्त आहे. जिंकायला भुकेला आहे!

ग्रँन्ड स्लॅम जिंकणं हे कमाल असतंच. त्यात परत जोकोविच कोणत्या जमान्यात जिंकला आहे याचा विचार करायलाच हवा; म्हणजे त्याची महानता अजून उमगेल आपल्याला. जोकोविचनं केलेली कामगिरी अजून एका कारणासाठी लक्षणीय ठरते.

जोकोविचनं सतत फेडरर, नदाल आणि मरे यांच्यासारख्या चिवट आणि गुणवान, तसंच कधीही हार न मानणाऱ्या खेळाडूंच्या खेळाच्या कालखंडात खेळून कमाल कामगिरी करून दाखवली आहे. इतकंच नाही तर, नव्या जमान्यातील मेदवेदेव आणि अल्काराझ यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूंनाही तो टक्कर देतो आहे.

जोकोविच ‘गोट’ आहे

२४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांवर नाव कोरणारा जोकोविच हा आत्तापर्यंतचा सर्वात महान टेनिसपटू आहे हे आता तरी मान्य व्हायला हवं. फेडररइतका जोकोविच लोकप्रिय नाही याची मला कल्पना आहे, तरीही त्याच्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची अजब संख्या त्याला सर्वोच्च स्थानी विराजमान करते. चोविसावं विश्वविक्रमी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावल्यावर तो कपडे बदलून बक्षीससमारंभाला आला.

त्याच्या जॅकेटवर ‘२४’ आकडा अभिमानानं कोरला गेला होता. त्याच्या सगळ्या सपोर्ट-स्टाफनं आणि जोकोविचच्या कुटुंबीयांनीही २४ हा आकडा कोरलेली जॅकेट्स घातली होती. आपल्या लहान मुलीला घट्टं मिठी मारून जोकोविचनं विजयाचा आनंद साजरा केला.

सरतेशेवटी जोकोविचनं त्याच्यातला हळव्या माणसाचं दर्शन घडवलं. त्यानं बक्षीससमारंभानंतरच्या मुलाखतीनंतर जॅकेटची चेन काढली. त्यानं आत निळा टी शर्ट घातला होता ‘फॉरेव्हर मंबा’ असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. जोकोविचनं तो टी शर्ट खास तयार करून घेतला होता...त्याच्या मित्राला, म्हणजे महान बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटला, मानवंदना देण्यासाठी.

काही वर्षांपूर्वी कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरच्या अपघातात मरण पावला. जोकोविचची आणि ब्रायंटची चांगली मैत्री होती. जोकोविचच्या कठीण काळात कोबे ब्रायंटनं त्याला धीर दिला होता... मार्गदर्शन केलं होतं. कोबे ब्रायंट खेळताना नेहमी २४ क्रमांकाची जर्सी घालायचा. आपल्या या मित्राला खास मानवंदना देताना जोकोविचनं चोविसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद त्याची आठवण वेगळ्या प्रकारे काढून साजरं केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT