सप्तरंग

प्रेम की प्रेमाचा अभिनय!

मानवी मन, मनाचे खेळ, मनोव्यापार या कमालीच्या गूढ आणि गंभीर बाबी. कदाचित त्यामुळेच ‘मना’वर सर्वाधिक कविता आणि कथा लिहिल्या गेल्या. त्यातल्या काही साहित्यकृतींवर चित्रपटही तयार झाले.

डॉ. सुनील देशपांडे

मानवी मन, मनाचे खेळ, मनोव्यापार या कमालीच्या गूढ आणि गंभीर बाबी. कदाचित त्यामुळेच ‘मना’वर सर्वाधिक कविता आणि कथा लिहिल्या गेल्या. त्यातल्या काही साहित्यकृतींवर चित्रपटही तयार झाले.

मानवी मन, मनाचे खेळ, मनोव्यापार या कमालीच्या गूढ आणि गंभीर बाबी. कदाचित त्यामुळेच ‘मना’वर सर्वाधिक कविता आणि कथा लिहिल्या गेल्या. त्यातल्या काही साहित्यकृतींवर चित्रपटही तयार झाले. बंगाली भाषेतले प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अशुतोष मुखोपाध्याय यांची ‘नर्स मित्रा’ ही पहिलीवहिली कथा मनोव्यापार आणि मानसोपचार या विषयाला स्पर्श करणारी होती. साहित्यजगताचं लक्ष वेधून घेणाऱ्‍या या कथेवर दिग्दर्शक असित सेन यांनी बनवलेला ‘दीप ज्वेले जाय’ (१९५९) हा बंगाली चित्रपट चांगलाच गाजला. विशेषतः त्यात सुचित्रा सेनने साकारलेल्या मध्यवर्ती भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बरोबर दहा वर्षांनंतर असित सेन यांनीच ‘खामोशी’ या नावाने हा चित्रपट हिंदीत आणला. संगीतकार हेमंत कुमार यांनी त्याची निर्मिती केली होती. मुख्य भूमिकेत होती वहिदा रहमान. कृष्ण-धवल रूपातला ‘खामोशी’ तिकीटबारीवर फारसा यशस्वी झाला नसला, तरी वहिदाचा कमालीचा उत्कट अभिनय, हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेली ‘तुम पुकार लो...’ (हेमंत कुमार), ‘वो शाम कुछ अजीब थी’ (किशोर कुमार) आणि ‘हम ने देखी है ऊन आखों की महकती खुशबू’ (लता मंगेशकर) ही गुलजार यांची गाणी व गुलजार यांचेच संवाद आणि कमल बोस यांचं कलात्मक छायाचित्रण या गुणांनी ‘खामोशी’ आजही आठवणीत आहे.

कोलकता शहरातली ‘नॅशनल सायको ॲनालिटिकल क्लिनिक’ ही नावाप्रमाणेच टोलेजंग असलेली शुभ्र इमारत. हे आहे मनोरुग्णांवर उपचार करणारं हॉस्पिटल. अर्थात, ‘वेड्यांचं इस्पितळ’. चित्रपटाची सुरुवात होते ती या इस्पितळातून पूर्ण बरा होऊन घरी जाणारा एक रोगी आणि वरच्या मजल्यावरून उदास नजरेने त्याला न्याहाळणारी नर्स राधा (वहिदा रहमान) यांच्या दृश्याने. या इस्पितळाचे प्रमुख असलेले डॉ. कर्नल (नझीर हुसेन) हे सध्या मनोरुग्णांच्या उपचार पद्धतीत एक वेगळा प्रयोग करू पाहतायत.

विशिष्ट प्रकारच्या मनोरुग्णासोबत परिचारिकेने प्रेमाचं नाटक करायचं, त्याच्याशी मानसिक पातळीवर स्नेहबंध जुळवायचा आणि तो रोगी बरा झाला की त्याला घरी पाठवायचं, असा हा प्रयोग.

राधाने त्याआधी देव कुमार नावाच्या एका मनोरुग्णाला (धर्मेंद्र) या पद्धतीने बरा केलाय. मात्र, या प्रक्रियेत प्रेमाचा अभिनय करताना ती स्वतःच त्याच्यात गुंतत गेलीय. त्या मानसिक अवस्थेतून बाहेर येणं तिला कठीण झालंय. चित्रपटाच्या आरंभी घरी जाताना दाखवलेला रोगी तो हाच. बरा झालेल्या रोग्याच्या २४ नंबरच्या खोलीत त्याच आजाराने ग्रस्त असा दुसरा रोगी येतो, तेव्हा डॉ. कर्नल त्याच्यावरही याच पद्धतीने उपचार करायचं ठरवतात. हा दुसरा रोगी असतो अरुण चौधरी (राजेश खन्ना). कविमनाचा, कथा-कवितांमध्ये बुडालेला देखणा तरुण, सुलेखा नावाच्या एका गायिकेच्या प्रेमात पडलेला. त्यांचं प्रेम ऐन बहरात असताना ही मुलगी स्वार्थापायी त्याचं प्रेम लाथाडून निघून जाते. या आघाताने अरुणच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो.

देवच्या ताटातुटीच्या धक्क्यातून राधा अद्याप सावरलेली नसते, त्यामुळेच सुरुवातीला अरुणवर उपचार करायला ती नकार देते. ‘‘अशा प्रकारे उपचार करताना मला त्रास होतो, मी आणखी अभिनय करू शकत नाही,’’ असं ती डॉक्टर कर्नल यांना सांगू पाहते. परंतु, ‘‘हा अभिनय नसून एक उपचारपद्धती आहे, जी केवळ तूच परिणामकारकरीत्या अमलात आणू शकतेस. केवळ तुझ्या भरवशावर मी या रोग्याला दाखल करून घेतलंय. हा प्रयोग सफल झाला तर आपल्या उपचारपद्धतीला जगभरात मान्यता मिळेल,’’ असं सांगून ते तिला राजी करू पाहतात.

मात्र, तिचा नकार कायम असतो. रुग्णालयात दाखल झालेला अरुण ‘हिंसक’ बनल्याने त्याला विजेचे धक्के द्यायची वेळ येते, तेव्हा मात्र राधाला आपला निर्णय बदलणं भाग पडतं. अरुणची केस हाती घेतल्यानंतर मात्र ती या कामात स्वतःला झोकून देते. अरुणचा पूर्वेतिहास जाणून घेताना तिला त्याच्या प्रेयसीची - सुलेखाची माहिती मिळते. अरुणला सुधारण्यासाठी सुलेखाची मदत घ्यायचं ती ठरवते. तो प्रयत्न फोल ठरतो, मात्र ती जिद्द सोडत नाही. औषधोपचाराबरोबरच अरुणचं साहित्यावरचं प्रेम फुलवून ती त्याला कथा-कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहन देते. त्याला बाहेर फिरायला नेते. अरुणही सुलेखाला विसरून जात राधावर प्रेम करू लागतो. राधा त्या प्रेमाला प्रतिसाद देत असली, तरी तिला अद्याप देवचा विसर पडलेला नसतो. अरुणमध्ये तिला देवचा भास होत असतो. एका बाजूला अरुण सुधारत असताना दुसरीकडे राधाची मानसिक घालमेल सुरू असते. अखेर अरुण पूर्णपणे बरा होतो.

डॉक्टर कर्नल यांच्या दृष्टीने ती अत्यानंदाची बाब असते, ते राधाचे मनापासून आभार मानतात. राधा त्यांना एकच विनंती करते, ‘‘यापुढे माझी आणि अरुणची भेट होऊ देऊ नका.’’ घरी परत निघालेल्या अरुणला भेटायचंदेखील ती टाळते. राधाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या अरुणला डॉक्टर कर्नल समजावून सांगतात, ‘‘राधा आणि तुझ्यात निर्माण झालेलं नातं हा इथल्या उपचारपद्धतीचा भाग होता. तिचं तुझ्याशी प्रेमाने वागणं हा निव्वळ अभिनय होता.’’ अरुण खिन्न होऊन जायला निघतो. पुन्हा ताटातूट, पुन्हा निरोप! छिन्नमनस्क अवस्थेत राधा डॉ. कर्नल यांच्यासमोर प्रथमच उन्मळून पडते. ‘‘खरं सांगते डॉक्टर, तो माझा अभिनय नव्हता हो, अभिनय नव्हता...! मला अभिनय करता येत नाही....’’ तिचा आक्रोश थांबत नाही. याच अवस्थेत तिला वेड लागतं. वेडाच्या भरात ती विकट हास्य करू लागते. आता ती नर्स राधा नसते, तर एक मनोरुग्ण असते. पूर्वी देव कुमारला आणि नंतर अरुणला जिथं ठेवलं, त्याच ‘रूम नंबर २४’मध्ये राधाला उपचारासाठी ठेवण्यात येतं. तिची नजरानजर तरी होईल या आशेने आलेला अरुण जाळीच्या दाराबाहेरून तिला सांगतो, ‘‘मी तुझी वाट पाहीन राधा... मी वाट पाहीन!’’ राधाच्या कानावर त्याचा आवाज जातो; पण तिच्या नजरेसमोर कधी अरुण तर कधी देव तरळत असतो. देव की अरुण? अरुण की देव? लोखंडी दारामागे असलेली राधा सुन्न नजरेने बघत राहते. पृष्ठभूमीवर देवच्या गाण्याचे सूर तरळत असतात, ‘तुम पुकार लो... तुम्हारा इंतजार है...’

मूळ बंगाली चित्रपटात नर्स राधा साकारणारी सुचित्रा सेन आणि ‘खामोशी’मधली वहिदा या दोघींची तुलना करायची वेळ कुणावर येऊ नये; पण तशी ती आलीच, तर म्हणावं लागेल - नर्स राधाच्या भूमिकेत सुचित्राचा अभिनय थक्क करणारा होता, तर वहिदाचा अभिनय सुन्न करणारा होता. एवढंच.

(सदराचे लेखक हिंदी - मराठी चित्रपटांचे अभ्यासक आणि सुगम संगीताचे जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT