Book Sadhar aani Sadetod
Book Sadhar aani Sadetod Sakal
सप्तरंग

लेखणीच्या ताकदीचा शोध आणि बोध...

सुरेंद्र पाटसकर

पत्रकारितेच्या स्वरुपात गेल्या ५०-६० वर्षांत आमूलाग्र बदल झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून हे बदल विशेषत्वानं जाणवू लागले.

पत्रकारितेच्या स्वरुपात गेल्या ५०-६० वर्षांत आमूलाग्र बदल झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून हे बदल विशेषत्वानं जाणवू लागले. नंतर जगभरातील अनेक देशांत उलथापालथी झाल्या. या बदलांची नोंद पत्रकारांनी घेतली.

युद्धपत्रकारितेपासून आर्थिक विषयांपर्यंत, राजकारणापासून समाजकारणापर्यंत, नव्या डिजिटल युगातील टीव्हीपासून वेबसाईट-ब्लॉगपर्यंत जगभरातील पत्रकारांनी लिखाण केले आणि व्यवस्था बदलण्याची ताकद लेखणीत असते हेच दाखवून दिलं.

अत्यंत छोट्या घटनांतूनच बातमी साकार होते. या घटना जोडल्या की त्यातून मोठ्या कॅनव्हासवरील चित्र तयार होते. कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाणारी शोधपत्रकारितेची कास ज्या पत्रकारांनी धरली, त्यातील १३ पत्रकारांच्या कामाची ओळख निळू दामले यांनी साधार आणि सडेतोड या पुस्तकातून करून दिली आहे. रिशार्द कापुश्चिन्स्की, बॉब बुडवर्ड, जॉन हर्सी, रानिया अबूझैद, जोसेफ मिचेल, अहमद रशीद, मेरी कोल्विन, सिमोर हर्श, ओरियाना फलाची, एलिएट हिगिन्स, ख्रिस्तिआन अमानपूर, वेद मेहता आणि स्टीव कोल अशी या पत्रकारांची नावे आहेत. या सर्वांनी आपल्या कामाने जगासमोर एक आदर्श निर्माण केला.

न्यूयॉर्क टाइम्स, दी इकोनॉमिस्ट, न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स, पॅरिस रिव्ह्यू ऑफ बुक्स, विविध इंग्रजी पुस्तके, नियतकालिके आदींमधून या बातमीदारांची ओळख झाल्याचे लेखकाने नमूद केले आहे. बातम्यांच्या माध्यमातून भेटणारे हे बातमीदार नंतर पुस्तक रुपानेही भेटले, त्यातूनच या पुस्तकाच्या लेखनाला चालना मिळाली, असे निळू दामले यांनी नमूद केले आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या मार्फत निवडक वर्तमानपत्रांतील मजकूर एकत्र करून पुरवणी प्रसिद्ध केली जात असे, या पुरवणीच्या माध्यमातून जगातील घडामोडींचे भान आल्याचा विशेष उल्लेख निळू दामले यांनी केला आहे. जागतिक घडामोडी सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी निळू दामले यांच्याकडे आहे. या पुस्तकातही त्याची प्रचिती येते. पुस्तकात पहिली ओळख करून दिली आहे ती रिशार्द कापुश्चिन्सकी यांची. ते एक पोलिश पत्रकार. सरकारी गुप्तहेर संस्थेशी संबंधित असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यांनी २७ देशांतील राजकीय घडामोडींवर लिहिले आहे. हुकूमशाही सरकारांच्या विरुद्ध त्यांनी प्रामुख्याने लिहिले. या लिखाणामुळे त्यांना ४० वेळा तुरुंगवास भोगावा लागला आणि चारवेळा फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. यातून ते सहीसलामत सुटले आणि पुढे लिहितच राहिले. भारत, अफगाणिस्तान, रशिया, इराण, इथिओपिया, अंगोला येथील सामाजिक स्थितीबरोबरच प्रमुख लोकांचे व्यक्तिचित्रणही त्यांनी केले.

इथिओपियाचा राजा हेले सेलासी यांच्यावर द एम्परर हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्यात राजाच्या विलासीपणाचे वर्णन करताना कापुश्चिन्सकी लिहितात.. ``...पार्टीत वाढप्यांची फौज होती. माणूस जेवायला बसलाय. समोरच्या ताटातला पदार्थ संपलेला नाहीये, अशा स्थितीत पदार्थाने भरलेली दुसरी बशी समोर येई. उरलेल्या अन्नाची बशी घेऊन एक वेटर निघून जाई. दालनाला वेढणारी एक भिंत होती.. त्या भिंतीच्या पलीकडे शेकडो आशाळभूत मुले, माणसे उभी. धड उजेडही नाही, धड काळोखही नाही. फाटक्या कपड्यांतील कृश माणसं. लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व वयांची. बश्या त्यांच्याकडे पोचत. माणसं. लपालप बश्यांवर तुटून पडत, अन्न फस्त करत. रिकाम्या बशा टाकून देत, नव्या बशीची वाट पाहत.``

वॉटरगेट प्रकरणामुळे जगप्रसिद्ध झालेले पत्रकार म्हणजे बॉब वुडवर्ड. नौदलातील सुरुवातीची नोकरी ते पत्रकारिता असा त्यांचा प्रवास झाला. अमेरिकेचे अध्यक्ष आणि व्हाइट हाऊस यांच्यासंबंधीच्या बातम्या यावर सर्वाधिक बातम्या त्यांनी लिहिल्या. सर्वाधिक पुस्तकेही त्यांनी याच दोन घटकांशी संबंधित विषयांवर लिहिली. संपर्क कसे मिळवावेत, त्यांना कसे बोलते करावेत, कसे टिकवावेत याचे कसब त्यांनी पत्रकारितेची सुरुवात करण्यापूर्वीच मिळविले होते. शोधपत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना म्हणून वॉटरगेट प्रकरणाकडे पाहिले जाते. वॉटरगेटचे प्रकरण सुरू झाल्यापासून वुडवर्ड यांना आलेले अनुभव, त्यांची काम करण्याची पद्धत याचे वर्णन सोप्या भाषेत पुस्तकात केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांच्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंतच्या अध्यक्षांच्या कामकाजावर वुडवर्ड यांनी प्रकाश टाकला आहे. हा सर्व प्रवास वाचण्यासारखा आहे.

जागतिक पातळीवर गाजलेले आणखी एक पत्रकार म्हणजे वेद मेहता. परदेशात राहून जागतिक कीर्ती मिळविलेला भारतीय पत्रकार असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांनी न्यू यॉर्कस साप्ताहिकात १९६१ ते १९९३ या कालावधीत शेकडो लेख लिहिले. त्यांची २६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लेखनाचा दर्जा आणि त्यातील वादग्रस्त विषय यामुळे वेद मेहता गाजले. स्वतः अंध असूनही अत्यंत डोळसपणे त्यांनी लिखाण केले. भारतातील अंधशाळेतून सुरू झालेले शालेय शिक्षण ते अमेरिका व ब्रिटनमध्ये घेतलेल्या पदव्युत्तर पदव्या असा त्यांचा प्रवास झाला. मेहता यांनी लिखाणासाठी घेतलेल्या कष्टांचे वर्णन इतरांना प्रेरणादायी असेच आहे. शब्दचित्र हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी लेखन कौशल्य कसे मिळविले याच्या आठवणीही दामले यांनी पुस्तकात नमूद केल्या आहेत.

मेरी कोल्विन हिने सीरिया, रशिया, इराक, श्रीलंका, इत्यादी ठिकाणी फिरली. युद्ध सुरू असताना, बॉम्बफेक सुरू असताना ती तिथे जात असे. संकटात सापडलेल्या लोकांशी बोलून त्यांची हकिकत लिहीत असे. युद्धग्रस्त माणसांचे जीवन तिने जगासमोर आणले. सीरियातील बॉम्बस्फोटातच तिचे निधन झाले. असेच आणखी एक अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणजे जोसेफ मिचेल. समाजात ज्यांची कोणी दखल घेत नाही, अशा माणसांच्या बातम्या मिचेल करत असे.

पुस्तकात उल्लेख केलेले सर्वच पत्रकारांनी वैशिष्ट्यपूर्ण काम केले आहे. जगभरात पत्रकारितेचा प्रवास कसा झाला व होत आहे याची कल्पना या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न निळू दामले यांनी केला आहे. पत्रकारिता किती निडर असू शकते, याचा वस्तुपाठ पुस्तकातून मांडला आहे.

पुस्तकाचं नाव : साधार आणि सडेतोड

लेखक : निळू दामले

प्रकाशक : समकालीन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७०८९६)

पृष्ठं : १८४

मूल्य : २०० रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT