हिमालय म्हटलं की हिमाच्छादित हिमशिखरं, सतत होणारी हिमवृष्टी, कडाक्याची थंडी असंच चित्र अनेकांच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र, हिमालय याहून खूप वेगळा आहे. सदाहरित वनांचा, विविध प्राणी-पक्ष्यांना आपलंसं करणारा आहे. हिमालयाची वेगळी अशी एक जीवनसृष्टी आहे, तीत जसा मानव हा महत्त्वाचा घटक आहे, तेवढंच महत्त्वाचं तिथलं प्राणिविश्व आहे. तिथं सापडणारे अनेक प्राणी-पक्षी हे फक्त हिमालयाचेच. जगात इतर कुठं शोधूनही सापडणार नाहीत. माझ्या ‘हिमालयातील दिवसां’मध्ये अशा अनेक प्राण्यांचा सहवास मला लाभला. यांतील काही अनुभव हे भीतीनं गाळण उडवणारे, काही अनुभव हे पोट धरून हसायला लावणारे, काही अनुभव हे आनंद देणारे, तर काही अनुभव हे आश्चर्यचकित करणारे होते. या सर्व अनुभवांतून माझं हिमालयातील प्राणिविश्वाशी एक अनामिक नातं जडलं.
हिमालयातील मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेला प्राणी म्हणजे याक. बैलापेक्षाही मोठा, दिसायला भारदस्त अन् तेवढाच बेदरकार वाटणारा हा प्राणी. या याकला बघून एखाद्याला भीती वाटू शकते. मात्र, हा याक खऱ्या अर्थानं मानवाचा मित्रच.
याकला पाहिलं की सह्याद्रीतील गव्याची आठवण येते. आपल्याकडे पठारी भागात गाईंची जशी उपयुक्तता आहे तशीच; किंबहुना त्याहूनही अधिक, उपयुक्तता याकची हिमालयात आहे. याकच्या केसांपासून लोकरी कपडे शिवता येतात. हिमालयातील काही भागांत याकचं मांसदेखील खातात. नेपाळमध्ये तर याकचं ताजं रक्त पिण्याचा वार्षिक उत्सव आयोजित केला जातो. याकचं ताजं रक्त कावीळ, पोटाचे आजार इत्यादी घालवण्यासाठी उपयुक्त आहे, असा समज आहे. याकच्या जिवाला धोका पोहोचणार नाही अशा बेतानं त्याच्या गळ्याच्या भागातून रक्त काढून घेतलं जातं. रक्त काढून घेण्यासाठी केलेली ही जखम नंतरच्या काळात भरून-मिळून येते.
नेपाळ असो व भारतीय हिमालय, संपूर्ण हिमालयाच्या पट्ट्यात कॅटल फॅमिलीतील याक दिसून येतोच. हिमालयातील मोहिमेला गेलं की याकचं दर्शन ठरलेलं आहे. पाठीवर शंभर किलोहून अधिक वजनाचं सामान वाहून नेण्याची क्षमता असलेल्या याकचा वापर गिर्यारोहणमोहिमांमध्ये गेल्या शंभर वर्षांपासून होत असल्याची नोंद आहे.
आजही एव्हरेस्ट व इतर अती उंचीवरील मोहिमांचं सामान बेस कॅम्पवर पोहोचवण्यासाठी याकचाच वापर केला जातो. मानवाच्या वजन वाहण्याच्या क्षमतेपेक्षा तिप्पट ते चौपट क्षमता असलेल्या याकचे जथेच्या जथे एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेक मार्गावर नजरेस पडतात.
याकचं दूधदेखील तेवढंच प्रसिद्ध आहे. खरं तर या प्राण्यातल्या नराला ‘याक’ आणि मादीला ‘नाक’ असं नाव आहे, तेव्हा ‘याकचं दूध’ म्हणण्यापेक्षा ‘नाकचं दूध’ असं म्हटलं पाहिजे. अनेकदा हिमालयीन भागातील; विशेषतः नेपाळच्या दुर्गम भागातील दुकानांत, टी हाऊसमध्ये, बाहेरून आलेली व्यक्ती याकच्या दुधाचा चहा किंवा याकच्या दुधापासून तयार केलेल्या चीजची मागणी करते तेव्हा तेथील स्थानिक लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. ‘याक नव्हे तर, नाक दूध देते,’ असं सांगून ते समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानात भर घालतात. हा अनुभव मीदेखील सुरुवातीच्या दिवसांमध्ये घेतला आहे.
हिमालयात अनेक अभयारण्यं आहेत. अनेक हिंस्र प्राणी असलेली घनदाट जंगलं हिमालयाच्या विविध भागांत आढळतात. हिमालयाच्या पायथ्याच्या भागांत जंगलं व उंचीवरील भागात हिमवर्षाव असं समीकरण आहे, त्यामुळे गिर्यारोहण असो व ट्रेकिंग, जंगलातून मार्गस्थ होऊनच बेस कॅम्प व पुढं शिखरमाथा गाठावा लागतो. अशाच एका ‘हाय ॲल्टिट्यूट ट्रेक’साठी मी व माझा मित्र अविनाश फौजदार १९९८ मध्ये हिमाचल प्रदेशातील ३७०० मीटर उंचीवरच्या बियास कुंड इथं ट्रेकला जात होतो. आमच्या बरोबर स्थानिक गाईड रामसिंदेखील होता. सोलंग व्हॅलीतून ट्रेक करत असताना आम्ही तिघं गप्पांमध्ये दंग होतो. तितक्यात वाटेत काही मीटर अंतरावर भलं मोठं अस्वल आमच्या समोर येऊन उभं ठाकलं. पाच-साडेपाच फूट उंचीचं, १२० ते १५० किलो वजन असेल एवढं धिप्पाड, काळ्या रंगाचं अस्वल समोर बघून आमची गाळणच उडाली. ते आमच्या समोर स्तब्ध उभं होतं अन् आम्ही त्याच्या समोर! प्रसंग बाका होता. अस्वलाला इतक्या जवळून, तेही समोरासमोर, बघण्याची माझी व अविनाशची ती पहिलीच वेळ. रामसिंगला मात्र अस्वलांचा फार वाईट अनुभव होता, त्यामुळे तो तर आणखीच घाबरला होता. तरीही त्यानं आम्हाला ‘बिलकूल हालचाल न करता स्तब्ध राहा’ असं सांगितलं. थोडा वेळ आमचा अंदाज घेऊन अस्वल आहे त्या जागेवरून परत फिरलं व जंगलात निघून गेलं. आम्ही बालंबाल बचावलो होतो. अस्वल गेल्यावर रामसिंगनं सांगितलं, ‘अस्वल सहसा स्वतःहून हल्ला करत नाही. आपल्या पिल्लांना धोका जाणवत असेल तरच मादी हल्ला करते. मात्र, जेव्हा हल्ला करते तेव्हा तो जीवघेणा हल्ला असतो.’
नंतरच्या ट्रेकदरम्यान रामसिंगनं आणखी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या गावातल्या एका व्यक्तीवर अस्वलानं असा हल्ला केला होता व त्यात त्या व्यक्तीचा संपूर्ण चेहरा फाटला होता व त्यानंतर रामसिंगच्या मनात अस्वलाची भीती बसली होती.
हिमालयातील अस्वलं जशी प्रसिद्ध आहेत तसेच इथले हिमबिबटे किंवा स्नो लेपर्डही प्रसिद्ध आहेत. एका विशिष्ट उंचीवर आढळणारा हा बिबट्या जगातील दुर्मिळ प्राण्यांपैकी एक. याची एक झलक पाहण्यासाठी व ती आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकार महिनोन् महिने लडाखच्या व हिमालयाच्या अती उंचीवर थंडीवाऱ्याची पर्वा न करता प्रतीक्षा करत राहतात. हा बिबट्या नेमका कसा राहतो, त्याच खाद्य काय याविषयी माहितीपट उपलब्ध आहेत. ते अतिशय रंजक आहेत. हिमालयात गेल्यावर एकदा तरी हा हिमबिबट्या आपल्याला दिसावा असं मलाही अनेकदा वाटलं आहे. मात्र, बिबट्याचं जरी दर्शन झालं नसलंं तरी हिमालयातील मस्क डिअर (कस्तुरीमृग) मात्र आम्हाला जवळून पाहायला मिळाला. सन २०१८ मध्ये मी व रूपेश खोपडे जेव्हा कांचनजुंगा जैवसंवर्धन परिसरात ट्रेकिंगसाठी गेलो होतो तेव्हा चपळपणे पळणारं मस्क डिअर आम्हाला दिसलं होतं, त्यामुळे आम्ही आनंदून गेलो होतो. असाच आनंद ‘मोनाल’ या नेपाळच्या राष्ट्रीय पक्षाला बघूनही होतो. त्याचं रूपच निराळं आहे.
हिमालयात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये ‘आयबेक्स’ किंवा ‘माउंटन गोट’ हादेखील प्राणी तेवढाच विस्मयकारी आहे. अती उंचीवर एखाद्या सराईत गिर्यारोहकाला लाजवेल अशा पद्धतीनं डोंगर-दऱ्यांत, हिमवर्षावात इतक्या चपळतेनं वावरणारा हा प्राणी गिर्यारोहणमोहिमांत अनेकदा नजरेस पडतो. एवढ्या वर्षांत अनेकदा आयबेक्स पाहिला असेल, मात्र त्यापासून कधीही धोका जाणवला नाही. सशासारखा दिसणारा, अत्यंत भित्रा; पण दोन पायांवर उभा राहून आपल्याकडे टकमक बघणारा ‘मारमोट’ हाही तेवढाच सुंदर प्राणी आहे. एकदा तर या भित्र्या मारमोटला स्वतःच घाबरून रस्ता चुकणाऱ्या माझ्या एका ट्रेकर-मित्रानं धमाल आणली होती. मारमोटनं नजरेला नजर भिडवत बघितल्यामुळे एखादा हिंस्र प्राणी मागं लागल्यावर भीतीनं धूम ठोकावी तसा आमचा हा मित्र पळाला होता. हिमालयातील प्राणी-पक्षीजीवन विलक्षण आहे. गिर्यारोहणमोहिमेसाठी आम्ही कितीही उंचीवर बेस कॅम्प लावलेला असू द्या, हिमालयातील उंदीर तिथं येणारच! तसंच आकाशात घिरट्या घालणारे हिमालयीन गरुडदेखील आमच्या मोहिमेत आमचे सखे-सोबती असतात. जोडीला कधी कधी पिवळ्या चोचीचा कावळाही (Alpine Chough) मांस खाण्यासाठी तंबूबाहेर ठाण मांडतात, तर भरलदेखील मांस खाण्यासाठी आवर्जून आलेले आम्ही प्रत्येक मोहिमेत पाहतो. हा कावळा असो की कांचनजुंगा परिसरात आढळणारा, बांबूचं कोवळं फळ खाऊन जगणारा लाल पांडा असो, हे सर्वच प्राणी हिमालयाची ‘इको-सिस्टिम’ टिकवून ठेवण्यास मदत करतात. कधी कधी आपणच त्यांच्या जगात लुडबूड करतो आहोत असं वाटून जातं. त्यामुळे कोणत्याही प्राण्याला आमच्याकडून सहसा त्रास होणार नाही, याची काळजी घेतच आम्ही गिर्यारोहक हिमालयात वावरत असतो. गेल्या चार दशकांपासून हिमालयात जातोय, असंख्य प्रकारचे प्राणी पाहिले, त्यांच्या तऱ्हा अनुभवल्या. तरीही आजदेखील हिमालयात गेलं की कोणता नवीन प्राणी-पक्षी दिसेल याची उत्सुकता कायम असते.
(सदराचे लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.