Mount Shivling Sakal
सप्तरंग

माउंट शिवलिंग : कलाटणी देणारी मोहीम

शिवलिंगमोहिमेची तयारी आम्ही अतिशय शिस्तबद्धरीत्या व काटेकोरपणे केली होती. ठरल्यानुसार, मोहिमेसाठी आवश्यक उच्च दर्जाची साधनं आम्ही परदेशांतून मागवली.

उमेश झिरपे

शिवलिंगमोहिमेची तयारी आम्ही अतिशय शिस्तबद्धरीत्या व काटेकोरपणे केली होती. ठरल्यानुसार, मोहिमेसाठी आवश्यक उच्च दर्जाची साधनं आम्ही परदेशांतून मागवली. त्या काळी भारतात अती उंचीवर गिर्यारोहण करण्यासाठी आवश्यक साधनं सहजासहजी मिळत नसत. त्यामुळे परदेशातून ऑर्डर करून ही साधनं मागवावी लागली. या साधनांसोबतच खाण्या-पिण्याच्या सामानाचं दिवसानुसार नियोजन केलं होतं, मोहिमेचं डॉक्युमेंटशन उत्तम पद्धतीनं व्हावं, गिर्यारोहणमोहिमेतील थरार, आव्हानं व गिर्यारोहकांचा संयम व कौशल्यं सर्वांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी आम्ही मोहिमेच्या व्हिडिओग्राफीवर कटाक्षानं लक्ष दिलं. माउंट शिवलिंगमोहिमेची आम्ही सर्वंकष तयारी केली होती.

राहुल येलंगेच्या नेतृत्वाखाली अविनाश कांदेकर, रुपेश खोपडे, आनंद माळी, टेकराज अधिकारी, नीलेश आवारे, आनंद पाथरे व यशदीप माळवदेचा संघ माउंट शिवलिंगच्या आव्हानासाठी सज्ज होता. संजय डोईफोडे व अजित ताटे पूर्ण वेळ बेस कॅम्पवर ठाण मांडून होते. बेस कॅम्पच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या दोघांवर होती. अविनाश फौजदार हा नेहमीप्रमाणे मोहिमेचा पालक असल्याप्रमाणे आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा होता. मोहिमेच्या सर्व तयारी दरम्यान मी मात्र तिहेरी भूमिका बजावत होतो. एकीकडे मोहिमेची तयारी, दुसरीकडे माझ्या ऑफिसचं काम व तिसरी बाजू म्हणजे माझ्या वडिलांचं आजारपण. या काळात माझे वडील आजारी असल्यानं सतत रुग्णालयाच्या फेऱ्या कराव्या लागत असत. जेव्हा वडील रुग्णालयात दाखल असत तेव्हा मी मोहिमेची तयारी रुग्णालयातून बघत असे. या सर्व गदारोळात मला मोहिमेला जायला मिळतं की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, माझी इच्छाशक्ती दांडगी होती. रुग्णालयाच्या गडबडीतून वेळ काढत १० दिवसांसाठी का होईना, गंगोत्री हिमालयात असलेल्या तपोवन येथील बेसकॅम्पवर मी दाखल झालो.

शिवलिंगमोहीम आव्हानात्मक होती. मात्र, ‘गिरिप्रेमी’चे गिर्यारोहक तयारीचे होते. हिमप्रपातांच्या धोक्याला, लहरी हवामानाला ते बधले नाहीत. शिखरचढाई अंतिम टप्प्यात असताना शिखरमाथ्याच्या आधी असलेल्या ९० अंश कोनातील हिमभिंतीनं गिर्यारोहकांना चांगलंच झुंजवलं.

सन १९९४ ‘गिरिप्रेमी’चा संघ शिवलिंगशिखरावर चढाई करत होता तेव्हा प्रसाद ढमाल व सुरेंद्र चव्हाण यांच्यावर याच हिमभिंतीजवळ जीवघेणा प्रसंग आला होता. नशीब बलवत्तर होते म्हणून जीव वाचला, नाहीतर त्यांचा खूप मोठा अपघात झाला असता. शिवलिंगशिखराआधी असलेली ही हिमाभिंत अतिशय आव्हानात्मक आहे. या मोहिमेतील हा सर्वात मोठा अडथळा आहे. भारतीय असोत वा परदेशी मोहिमा असोत, अनेकांना या हिमभिंतीनं असं झुंजवलं आहे की, अनेकांना मोहीम अर्ध्यावर सोडून परतावं लागलं होतं. अशीच वेळ ‘गिरिप्रेमी’च्या संघावर येते की काय असं वाटत होतं. तेव्हा नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रकारे चढाई करण्याचा विचार माझ्या मनात आला. या हिमभिंतीवर असलेलं हिम हे ठिसूळ होत असे, त्यामुळे येथे चढाईसाठी आवश्यक ‘ग्रिप’ मिळत नसे.

माझ्या अनुभवानुसार पहाटेच्या वेळी, सूर्योदयाच्या आधी हे हिम भिंतीवर घट्ट असे, वातावरणातील तापमान वाढण्याच्या आधी जर चढाई केली तर ही भिंत पार करता येईल व चढाईसाठीचा रोप लावता येईल असा माझा कयास होता. संघानं सांगितल्यानुसार, भल्या पहाटे उठून चढाईला सुरवात केली. अपेक्षेनुसार, सर्वांना चढाईदरम्यान ग्रिप मिळाली, त्यामुळे दोरखंड लावता आलं व हिमभिंत पार करून शिखरचढाई यशस्वी करता आली. संघातील पहिल्या गटानं यश मिळवल्यानंतर त्यांच्या मागं दुसरा गटदेखील शिखरावर पोहोचला आणि ‘गिरिप्रेमी’चं ‘ड्रीम माउंटन’चं स्वप्न साकार झालं. शिवलिंगमोहीम ही गिरिप्रेमीच्या गिर्यारोहणप्रवासाला कलाटणी देणारी मोहीम ठरली. चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेल्या शिखराला गवसणी घातल्यानं ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांचा आत्मविश्वास दुणावला.

हिमालयातील अती उंचीच्या, चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेल्या शिखरांवर आपण चढाई करू शकतो हा विश्वास निर्माण झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मोहिमेची सर्वांगीण तयारी केली तर १० लाख एवढं निधिसंकलनही कठीण नाही हे या मोहिमेनं दाखवून दिलं होतं. माउंट शिवलिंगमोहीम ही ‘गिरिप्रेमी’च्या गौरवशाली परंपरेच्या सुरवातीची नांदी होती. या मोहिमेमुळे एक बोचणारा अनुभवही आला. शिवलिंगमोहिमेच्या यशाबद्दल आमचं कौतुक होत होतं... सत्कारसमारंभ, विविध स्लाईड शो आयोजित केले जात होते...अशाच एका कार्यक्रमानंतर एक साठीतल्या काकू मला भेटल्या. त्यांच्याबरोबर एक तरुण मुलगाही होता. काकू भेटल्यावर आमचं कौतुक करतील, कुतूहलानं काही प्रश्न विचारातील असं मला वाटलं.

माझ्याबरोबर अविनाश कांदेकर होता, त्यानं शिवलिंगशिखरावरील अवघड मोहीम अत्यंत धाडसानं पूर्ण केली होती. मी त्याची ओळख करून देत असताना त्या काकूंनी मला थांबवत, त्यांच्याबरोबर असलेल्या तरुणाची ओळख करून दिली. तो त्यांचा जावई होता आणि नुकताच तोही अविनाशप्रमाणेच ‘हिमालयात जाऊन आला होता’ असं काकूंनी सांगितलं. म्हणजे काकूंच्या लेखी, शिवलिंगसारख्या पर्वतशिखरावरील चढाई आणि पर्यटन-देवदर्शनानिमित्त हिमालयाला भेट हे एकच होतं!

याचा अर्थ गिर्यारोहण-हिमालयातील आव्हानं ही सर्वसामान्य लोकांपर्यंत नीटशी पोहोचली नव्हती असं मला जाणवलं. या प्रसंगामुळे मला खूप वाईट वाटलं; पण त्याबरोबरच गिर्यारोहण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी झपाटून काम करण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणादेखील मिळाली. शिवलिंगमोहिमेच्या यशातून, गिर्यारोहकांच्या अथक् परिश्रमांतून व गिर्यारोहणाबद्दल जनजागृती झाली पाहिजे या विचारांतून एक व्यापक मोहीम जन्माला आली ती म्हणजे माउंट एव्हरेस्ट. सन २०१२ मध्ये ‘गिरिप्रेमी’नं जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या ‘माउंट एव्हरेस्ट’वर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम आयोजित केली व यशस्वीही केली.

एव्हरेस्टनंतर जगातील इतर सात अती उंच शिखरांना साद घातली. या सर्व मोहिमांचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला मिळालं. या सर्व प्रवासाची नांदी ही शिवलिंगमोहिमेत होती. शिवलिंगमोहिमेसाठी १० लाख रुपये उभे करू शकलो, म्हणूनच एव्हरेस्ट-मोहिमेसाठी साडेतीन कोटी रुपये निधी उभारण्याचंही बळ आम्हाला मिळालं. शिवलिंगशिखराच्या आधी असलेल्या हिमभिंतीवर, हार न मानता, चढाई केली म्हणूनच एव्हरेस्ट शिखरमाथ्याच्या आधी असलेल्या ‘हिलरी स्टेप’वर गिर्यारोहक आत्मविश्वासानं चढू शकले.

शिवलिंगमोहिमेनं ‘गिरिप्रेमी’च्या उज्ज्वल प्रवासाची पायाभरणी केली. तो प्रवास आजही सुरू आहे. या संपूर्ण प्रवासाचा मी एक भाग बनू शकलो, यातच माझं गिर्यारोहक म्हणून आयुष्य कृतकृत्य झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT