Sandip-Khare 
सप्तरंग

अताशा असे हे...

वैभव जोशी Vaibhav.joshee@writer.com

सन २००० नंतर आलेल्या सुंदर गाण्यांबद्दल, विशेषत: गीतलेखनाच्या अंगानं, हे सदर लिहायचं ठरवल्यापासून हे गाणं मनाला साद घालत होतं. खरं तर या सदराची सुरुवातच या गाण्यानं करायची असं ठरवलं होतं, इतकं हे जिवाच्या जवळचं गाणं. असं असूनही लिहिणं दोन कारणांनी मागं पडत होतं. एक म्हणजे, सिनेमाच्या बाहेरचं गाणं घ्यावं की नाही हा विचार. शेवटी या वेळी ठरवलं की गाणं सिनेमातलं असो वा नसो, ते उत्तम आहे हीच एकमेव कसोटी. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, जेव्हा जेव्हा या गाण्याबद्दल लिहायला बसायचो तेव्हा तेव्हा एक तर ही कविता वाचतच बसायचो किंवा ऐकतच राहायचो. आत्तासुद्धा मी महत्प्रयासानं तटस्थतेच्या किनाऱ्यावर पाय घट्ट रोवून संदीपच्या विचारांच्या मनमोहक लाटांकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठल्याही क्षणी पायाखालची वाळू सरकू शकते आणि मी आत आत खेचला जाऊ शकतो... पण बघू या.
दर्शनी वेगळी दिसणारी कडवी एका कवितेत किंवा गाण्यात ओवली गेली की अधिक सुंदर दिसतात, असं खूप कमी वेळा होतं. या गाण्याचं मला जाणवलेलं आणखी एक दुर्मिळ वैशिष्ट्य म्हणजे हे एकाच वेळी ‘स्वगत’ही आहे आणि ‘संवाद’ही.

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो 
कशी शांतता शून्य शब्दात येते 

‘अताशा’ या एका शब्दानं संदीप अधोरेखित करतो की हे जे काही होतंय ते क्षणिक नाहीये. अलीकडे बऱ्याच दिवसांपासून माझी ही अवस्था आहे की कधीचं तरी, काहीतरी आठवून डोळे पाणावतात. तसा मी जगात वावरतो, इतरांशी आणि स्वत:शीही माझं चांगलं जमतं, मन सतत रुसून बसलेलं नसतं, जगण्यात रमतं...पण! या ‘पण’पाशी आपलापण ठोका चुकतो. हेच ते खेचून घेणं, ज्याबद्दल मी सुरुवातीला बोललो.

अमुक एक अशी घटना नाही, व्यक्ती नाही की जिच्यामुळे असं होतंय. डोळे नक्की कशामुळे पाणावतात हे माहीत नसणं फार जीवघेणं. कारण, मग माणूस गर्दीत असूनही माणसातून उठतो आणि त्या अश्रूंच्या स्रोताचा मागोवा घेत सुटतो, बोलता बोलता ‘स्तब्ध’ होतो. गाण्यातल्या प्रत्येक शब्दाला, विरामचिन्हाला अनन्यसाधारण महत्त्व असतं त्याचं हे अत्यंत चपखल उदाहरण. 

असे योग्य शब्द सुचणं हे खरं भाग्याचं लक्षण! ‘भुजंगप्रयात’चं मीटर निभावताना या ‘स्तब्ध’च्या जागी मूक, गप्प, मौन, शांत असे कितीतरी शब्द येऊ शकले असते; पण त्यात ‘स्तब्ध’चा रंग नाही. गाण्यातल्या नायकासह जणू काही त्याचा आणि आपलाही काळ स्तब्ध होतो. डोळ्यांतलं पाणी डोळ्यांतच थांबतं आणि तरीही त्यात कसलंही प्रतिबिंब दिसत नाही. अशी ही अवस्था! 

कधी दाटु येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

दु:ख जगाला सांगता येतं, त्यातून मोकळं होता येतं; पण मनाला लागलेली अनामिक चुटपुट फार वाईट. तिच्यावर थेट बोट ठेवता येत नाही आणि समजा तीबद्दल बोलता आलं तरी सुहृदांना त्याचं विशेष काही वाटत नाही. ‘असे हालते...’ या दोन ओळींतून संदीपनं हे ‘न सांगता येणं’ फार सुंदर ‘सांगितलंय’. माहीतच नसलेल्या कुठल्या तरी काळच्या कुठल्या तरी गोष्टीचं देणं राहून गेलंय, आत खोल जाणवतंय अशा माणसाच्या डोळ्यांत हसता हसता अचानक पाणी येईल नाहीतर काय! ‘मुस्कुराऊँ कभी तो लगता है, जैसे होटों पे कर्ज़ रक्खा है’ तशी ही अवस्था! 

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही 

या गाण्यातली कडवी दर्शनी वेगवेगळी दिसतात; असं मी म्हणालो ते अशा काही ओळींमुळे. अर्थात्, त्यामुळे गाण्याशी जुळलेली आपली नाळ अजिबात तुटत नाही. उलट, त्या हरवलेपणात आणखीच हरवायला होतं. 

‘जसा’ किंवा ‘असा’ यांसारख्या शब्दांनी जेव्हा गाण्यातल्या ओळी सुरू होतात तेव्हा फार मोठी जबाबदारी येऊन पडते. त्यापुढच्या अत्यंत कमी जागेत मनाचा ठाव घेईल असं उदाहरण हातून उतरावं लागतं. ‘जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा’ ही या गाण्यातली आणखी एक नितांतसुंदर ओळ आहे, जिथं दाद दिली जातेच जाते. सुगंधाचा प्रवास सगळा वाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून, तसंच माझ्या आयुष्याचं बोट या मनातल्या काहुराच्या हातात आहे अशी ही अवस्था! 

असा ऐकु येतो क्षणांचा इशारा
क्षणी दूर होतो दिशांचा पसारा 
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागु जातो किनारा

‘तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही’ ही कविवर्य सुरेश भट यांची रचना वाचली होती, तेव्हापासूनच मी या प्रतिमेच्या प्रचंड प्रेमात आहे. संदीपनं ही वाट आणखी वेगळ्या वळणानं पुढं नेली आहे. मुळात नभात बुडणं, रोज रोज झोकून देणं आणि पुन्हा त्यालाच किनारा मागणं हे आवर्तन स्तिमित करणारं आहे. स्वत:च स्वत:ला रोज स्वत:चं अर्घ्य द्यावं अशी ही अवस्था!

कशी ही अवस्था...कुणाला कळावे?
कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो 
असा तोल जाता कुणी सावरावे?

अशा सगळ्या अवस्था सांगून शेवटी संदीप स्वगत बोलतो, ‘कशी ही अवस्था!’ आणि म्हणूनच गाण्याच्या सुरुवातीला जो ‘असे काय होते?’ हा प्रश्न विचारला आहे तो आणखी टोकदार होत जातो, वरवरच्या शांततेत आत आत बोचत राहतो. 
या गाण्याला संगीत स्वतः संदीप खरेचंच आहे आणि हे गाणं सलिल कुलकर्णीच्या कातर, पाणावलेल्या आवाजात ऐकताना आपण बुडून जातो. होय, मी पाणावलेल्या आवाजात म्हणतोय...कारण, ही संपूर्ण कविताच अनाम अस्वस्थतेची एक नदी आहे, जिच्या डोळ्यांत अधूनमधून अनोळखी पाणी येतं, ज्याचा उगम तिलाही माहीत नाही. 
संदीप, काय लिहिलंयस यार!

(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: महाराष्ट्रासाठी अर्शिन कुलकर्णीचं शतक, तर पृथ्वी शॉची फिफ्टी, मुंबईकडूनही तिघांची अर्धशतकं; पण विदर्भाचा डाव गडगडला

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

Vanaz Metro Subway Issues : रस्ता ओलांडायचा तर भुयारी मार्गातूनच; पण अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT