सप्तरंग

युरोपात धारातीर्थी पडलेला मराठी योद्धा

पहिल्या महायुद्द्धात ब्रिटिश सैन्यामध्ये भारतीय सैनिकही होते. त्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या यादीमध्ये एका मराठी सैनिकाचेही नाव आढळते, ते म्हणजे दादू शिंदे.

अवतरण टीम

- वैभव वाळुंज

पहिल्या महायुद्द्धात ब्रिटिश सैन्यामध्ये भारतीय सैनिकही होते. त्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या यादीमध्ये एका मराठी सैनिकाचेही नाव आढळते, ते म्हणजे दादू शिंदे.

इंग्लंडच्या दक्षिणेकडील भाग जसा निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, तसाच येथे झालेल्या ऐतिहासिक लढायांसाठीदेखील इतिहासात नोंदवला जातो. या इतिहासाचे भारताच्या व अजून खोलवर गेल्यास महाराष्ट्राच्या इतिहासाशी धागेदोरे सापडतात.

येथील नौकानयन आणि शेजारील युरोपीय राष्ट्रांशी होणारी लष्करी व नाविक चढाओढ यामुळे विविध देशातील संस्कृती यांच्याशी येथील नागरिकांचा संपर्क झाला. म्हणूनच भारतातल्या वसाहतीकरणात येथील सरदारांचा व नाविक अधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता.

१८१८ मध्ये महाराष्ट्र काबीज केल्यानंतर ब्रिटिशांनी येथील अनेक संस्थानांतील मराठी फौजांना आधुनिक युद्धशास्त्राचे शिक्षण देऊन जगभरातील आपल्या वसाहतींमध्ये लढण्यासाठी वापरले. सूर्य मावळत नाही, असे साम्राज्य इंग्रजांनी उभे केले खरे, पण त्याचा पाया भारतीय नागरिकांच्या रक्तावर उभारला होता. याचाच एक वस्तुपाठ ससेक्स प्रांतातील पॅचम गावाच्या घाटमाथ्यावर सापडतो.

येथील साऊथडाऊन राष्ट्रीय उद्यानाजवळ भाताची शिवारे आणि मेंढ्यांची कुरणे पार केल्यानंतर अचानक जंगलाला लागूनच एक मेघडंबरी आढळते. मुख्य शहर व गावापासून दूरवर इथे बनवलेल्या या स्मारकाला भारतीय सैनिकांसाठी बनवण्यात आले आहे. या स्मारकाला छत्री मेमोरियल असे म्हणतात.

पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यामध्ये अनेक हिंदू व शीख सैनिकांचा भरणा होता. भारतातून एकूण दहा लाखांच्या आसपास सैन्य युरोपच्या भूमीवर लढण्यासाठी आणण्यात आले. जवळपास ७४,१८७ भारतीय सैनिक या युद्धामध्ये मरण पावले होते व ६७ हजार सैनिक कायमचे जायबंदी झाले होते.

युरोपातील विविध देशांमध्ये लढताना जखमी झाल्यानंतर दवापाण्याची व आरामाची सोय म्हणून त्यांना इंग्लंडच्या सर्वात दक्षिणेकडील सरे व ससेक्स प्रांतांमध्ये ठेवण्यात आले. लढाईत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची शवे याच भागात आणण्यात आली होती.

ब्रिटिश सैन्यातील सर्व सैनिकांना त्यांच्या धर्म व जातीप्रमाणे वर्तणूक दिली जाई. म्हणूनच या सर्व सैनिकांना त्यांच्या धर्माप्रमाणे अग्नी देण्यात आला. त्यांना अग्नी देण्यासाठी शहरापासून दूर अशा ‘पॅचम डाऊन घाट’ या भागाची निवड करण्यात आली. म्हणून आजही या भागाला इंग्रजीतही घाट असेच म्हणतात. या छत्रीवर हिंदी, पंजाबी व इंग्रजी भाषेमध्ये खालील मजकूर लिहिला आहे.

‘आपल्या सम्राटासाठी महायुद्धात आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या आठवणीत बनवलेले हे स्मारक हिंदू व शीख सैनिकांच्या चितांवर उभारले आहे. अग्निपथावर चालणाऱ्या शूरवीरांसाठी असीम आदर व सौहार्दपूर्ण बंधुभावाचे प्रतीक म्हणून हे स्मारक त्यांना समर्पित करण्यात येत आहे.’

भारतीय सैनिक फ्रान्सच्या भूमीवर लढताना धारातीर्थी पडले होते. तेथील सैनिकांच्या मृतदेहांचे काही अवशेष इथे आणून चितेवर चढवण्यात आले होते. राष्ट्रकुल युद्ध स्मारक समिती ही इंग्लंड सरकारची स्वतंत्र कमिटी जगभरातील इंग्रजी फौजांच्या स्मारकांवर लक्ष ठेवते. १९२१ मध्ये तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते या स्मारकाचे उद्‌घाटन करण्यात आले होते.

त्यानंतर बराच काळ ही जागा विस्मरणात गेली होती; मात्र ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या भारतीय व पाकिस्तानी वंशाच्या अनेक व्यक्तींनी या स्मारकाचे पुनरुज्जीवन केले. दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात. येथील परिसरात राहणारे भारतीय नागरिक यात हिरिरीने सहभाग घेतात.

येथे धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या यादीमध्ये एका मराठी सैनिकाचेही नाव आढळते - दादू शिंदे. ब्रिटिश कागदपत्रांमध्ये दादू शिंदे हे १०७ व्या पायोनियर इन्फंट्री रेजिमेंटचे नाईक असल्याचा उल्लेख आहे. त्यांचे पूर्ण नाव दादू यशवंत शिंदे असे होते.

तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील अथनी गावच्या कारगवाड खेड्यातून आलेल्या शिंदे यांनी १३ जुलै १९१५ रोजी झालेल्या चकमकीत आपल्या प्राणांची आहुती दिली. युद्धात सहभागी असलेले मराठी शिपाई ब्रिटिशांसाठी आफ्रिका व युरोपच्या बिकट वातावरणात धारातीर्थी पडले. या सैन्याने लढलेले हे शेवटचे युद्ध होते.

यानंतर ब्रिटिश सैन्याची पुनर्रचना करण्यात आली व मराठा रेजिमेंट सिस्टीम एका खानेसुमारीत आणण्यात आल्या. पुढे आर्थिक कारणावरून ही इन्फंट्री रद्दबातल करण्यात आली. या सैन्याच्या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयासमोर एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे.

आपल्या देशाच्या शहीद शिपायांविषयी अभिमान असला, तरी एका परकीय साम्राज्याचे भले व्हावे म्हणून गरीब शेतकऱ्यांना युरोपात लढायला लावणाऱ्या व शेवटी त्यांना नागरी वसाहतीपासून दूर माळरानावर खितपत ठेवणाऱ्या इतिहासाचे स्मरण करताना मिश्र भावना मनामध्ये येतात.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये युके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Pune Flood: इंद्रायणीला पूर, आळंदीत २५० वारकऱ्यांचे स्थलांतर; पूल पाण्याखाली... कठडे अन् चेंजिंग रूम वाहून गेल्या, दुकानांसह घरांमध्ये पाणी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Mumbai Rain : मुंबईतील पावसाचा फटका लोकल सेवेला; तिन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने...

Pune Rain : मावळमध्ये पावसाचे रौद्र रुप ! पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकासह वाहून गेला, NDRF ने खासगी बसमधील ३७ जणांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT