बांगलादेश युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाची अभिमानास्पद कामगिरी आहे. या युद्धाच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. युद्धातील कामगिरीचे दाखले आजही दिले जातात. या युद्धात प्रत्यक्षात सहभागी झालेल्या योद्ध्यांच्या थेट युद्धभूमीवरील पराक्रमाची गाथा सांगताना ऊर भरून येतो. त्यांच्या मनातील अभिमानही दिसतो. या योद्ध्यांच्या आठवणींचा हा लेखाजोखा...
विजयी क्षणाचा साक्षीदार ठरल्याचा अभिमान!
तानाजी पवार, कमांडंट अपशिंगे (मिलिटरी, जि. सातारा)
माझे सद्भाग्य की, मला बांगलादेश मुक्ती संग्रामात सहभागी होण्याची संधी मिळाली. माझे आजोबा केशवराव पवार हे १८९५ ते १९१० या काळात सैन्यात होते. वडील डी.वाय.एस.पी. वामन पवार यांचा दुसऱ्या महायुद्धात सहभाग होता. चुलते सुभेदार डी. बी. पवार यांनीही बांगलादेश युद्धात पराक्रम गाजविला. स्वाभाविकच सैनिकी रक्त माझ्या नसानसांत होते. बेळगावातील लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये माझी वर्णी लागली. तो १९७१चा काळ. सैन्यात रुजू झाल्यानंतर काही काळातच आमच्या तुकडीला पूर्व सीमेवर जाण्याचे आदेश मिळाले. कोलकत्त्याहून आम्ही हिली या प्रदेशात रवाना झालो. हे संपूर्ण क्षेत्र दुर्गम, पर्वतीय होते. प्रत्यक्ष युद्धापूर्वीच म्हणजेच तीन डिसेंबरला आमच्या तुकडीतील सैनिक सीमा ओलांडून पलीकडे पोचले होते. ते सर्वांत आघाडीवर होते. फुलबारी, चरकाई, गोविंदगंज, रंगपूर आदी ठिकाणी परिस्थिती हातघाईची होती. अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. सातत्याने गोळीबाराच्या घटना सुरू होत्या. हवामान, दलदलीचा प्रदेश, रस्त्यांची वानवा अशा प्रतिकूल परिस्थितीतही आमच्या तुकडीने पराक्रमाची शर्थ बजाविली. या मोहिमेत १७ सैनिक शहीद झाले. त्यात बहुतेक कोकणातील होतील. आमच्या तुकडीने तेथील ठाण्यावर ताबा मिळविला. आपण या मोहिमेत सहभागी होतो, विजयी क्षणाचे साक्षीदार होतो त्याचा आज ५० वर्षांनीही निश्चितपणे अभिमान वाटतो.
बॉम्बवर्षाव अन् अंदाधुंद गोळीबार
सूर्यभान रामभाऊ भद्रे (माजी सैनिक-लान्स नाईक) रा. चिचोंडी पाटील, जि. नगर
बांगलादेशाला स्वतंत्र मिळविण्यासाठी प्रत्यक्ष युद्धात मी सहभागी होतो. पाकिस्तानकडून हल्ला होताच आम्ही तितक्याच ताकदीने त्यांना उत्तर दिले. बॉम्ब वर्षाव, अंदाधुंद गोळीबार, विचित्र आवाज अजूनही माझ्या कानात घुमतात. मेजर जनरल गुजराल यांच्या नेतृत्वाखाली आमची तुकडी युद्धात सक्रिय सहभागी होती. रात्री साधारण ८.३० वाजता पाकिस्तानकडून बॉम्ब हल्ला झाला. वरिष्ठांचा आदेश मिळताच आमची तुकडी सतर्क झाली. पुढे मराठा इन्फन्ट्री सीमेवर लढत होती. बॉम्ब वर्षाव, अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. आम्ही जिवाची पर्वा न करता ५ किलोमीटर कम्युनिकेशन लाईन पोचविली व येणाऱ्या आव्हानाला तोंड दिले. मी माझ्याकडील रायफल, रिव्हॉल्वर हाती घेऊन शत्रूशी दोन हात केले. सर्वत्र धूर, धूळ, अचानक पडणारे बॉम्बगोळे, चित्र-विचित्र आवाज अजूनही माझ्या कानी गुंजत आहेत. आम्ही शत्रूवर तुटून पडलो होतो. माझे चार सहकारी लढताना शहीद झाले. मी सैन्यात भरती झाल्यानंतर पहिली नेमणूक गोवा राज्यातील मडगाव व पणजी येथे झाली. तेथे सहा महिने प्रशिक्षण झाल्यानंतर पंजाबमधील पठाणकोट येथे दाखल झालो. त्यानंतर सिक्कीम येथे मला जावे लागले. बर्फाळ प्रदेश असल्याने हेलिकॉप्टरने आम्हाला तेथे पोचविण्यात आले. कमी ऑक्सिजन असलेल्या व उंच ठिकाणी मी तब्बल चार वर्षे होतो. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सीमा सुरक्षा दलासाठी पाहणी करण्यासाठी भेट होती. मी त्यांच्या संरक्षणासाठी होतो. माझ्या क्षमतेचे कौतुक करून त्यांनी मला शाबासकी दिली होती. प्रारंभी ते हिंदीतून बोलले, नंतर मी महाराष्ट्रीयन असल्याचे समजल्याने त्यांनी माझ्याशी मराठीतून संवाद साधला. त्यानंतर माझी नेमणूक जम्मू-काश्मीरच्या सुंदरबन या ठिकाणी झाली. तेथेही मी चार वर्षे सेवा दिली. त्यानंतर युद्धभूमीकडे जावे लागले.
अगदी शेजारीच बॉम्ब येऊन फुटला....
श्रीरंग राघोपंत सातपुते, रा. भिंगार, जि. नगर
बांगलादेश स्वातंत्रतेसाठी भारताने मोठी कामगिरी केली. त्या युद्धाचा थरार अंगावर शहारे आणणारा आहे. भारताने पाकिस्तानशी युद्ध करून बांगला प्रांताला संरक्षण दिले. त्या युद्धात पूर्व पाकिस्तान हा प्रांत बांगलादेश झाला. बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी भारताने मोठी साथ दिली. या लढाईत आम्ही कारगिलमध्ये होतो. त्यावेळी तेथे उणे १५ ते २० सेल्सिअस तापमान होते. एका रेजिमेंटमध्ये मी होतो. मी स्वतः लढाईमध्ये सहभागी झालो होतो. त्या ॲडव्हान्स पार्टीत मी इंजिनिअर होतो. वरिष्ठांच्या आदेशानुसार मला लढण्याची वेळ आली. पाकिस्तानी सैनिक आणि आमच्यात फेस-टू फेस फाईट होती. एकीकडे तोफांची बंबांर्डिंग, तर दुसरीकडे रायफलिंतून गोळ्यांचा संचार, अशा अडचणीत लढण्याची वेळ येत होती. कारगिलमध्ये तीन-चार फूट बर्फाचा थर होता. काकडलेल्या हातांनी रायफलचा टायगर ओढण्यासाठीही अवघड होते. अशा परिस्थितीत वरिष्ठांकडून आदेश आले. आम्ही फायरिंग करीत होतो. शेजारीच एक बॉम्ब पडला आणि त्याचा स्फोट झाला. आमचे बरेचशे साथीदार जखमी झाले. मी उचलून जोरात आपटलो. याच वेळी रायफलचे टोक माझ्या गुडघ्यात घुसले. डोळ्यालाही मार लागला. त्यामुळे झालेल्या रक्तस्रावामुळे मी बेशुद्ध झालो. त्यानंतर तब्बल दीड ते दोन महिने मी कोमामध्येच होतो. या दरम्यान माझा गुडघा उपचाराने नीट झाला, मात्र डोळा कायमचा निकामी झाला. या आठवणी आजही अंगावर शहारे आणतात.
गोळी पायातून आरपार गेली...
बबन भैरू भोसले, शिपाई, अपशिंगे (मिलिटरी, जि. सातारा)
मला कळत्या वयापासून सैनिकी सेवेचे आकर्षण होते. त्याचे कारण आमच्या गावची सैनिकी परंपरा. अपशिंगे गावात घरोघरी सैनिक. त्यामुळेच माझाही कल सैनिकी नोकरीत जाण्याचा होता. सुदैवाने मला तशी संधीही लगेच मिळाली. साताऱ्यात सैनिकी भरती होती. त्यात माझी निवड झाली. तो १९७१मधील जून महिना. भरती होऊन तीन महिने उमटतात न् उलटतात तोच पूर्व सीमेवर युद्धाचे वादळ घोंघावू लागले. लगोलग आमची तुकडी तिकडे रवाना झाली. कोलकत्ता ओलांडून आम्ही पूर्व पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश मिळविला. तिथे मोठी धुमश्चक्री सुरू होती. अशातच आमच्या तुकडीवर पाकिस्तानी सैन्याने बाँम्बहल्ला केला. त्यात आमच्या तुकडीतील १२ सैनिक शहीद झाले. याच वेळी जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या मदतीसाठी मी पुढे धावलो. त्याच क्षणी सू सू करत आलेली गोळी माझ्या डाव्या पायातून आरपार गेली. मात्र तशाही अवस्थेत आम्ही हिंमत हरली नव्हती. पुढे जखमी अवस्थेत मला कोलकत्याला हलविण्यात आले. नंतरच्या काळात शस्त्रक्रिया करण्यात आली. माझा डाव पाय गुडघ्यापासून कापण्यात आला. तिथून मग पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ उपचार सुरू होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पुरते नामोहरम केले. भारतीय सैनिकांचे कौतुक झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संदेश पाठवून सदिच्छा व्यक्त केल्या. अपशिंगे गावातही माझा सत्कार करण्यात आला. पुढे खडकी येथील ॲम्युनिशेन फॅक्टरीत मला नोकरी देण्यात आली. जायबंदी झाल्यामुळे जेमतेम वर्षभरात मला सैनिकी सेवेतून बाहेर पडावे लागले. मात्र देशासाठी आपण लढलो, एका अविस्मरणीय लढ्यात सहभागी झालो याचा मला आजही अभिमान वाटतो.
दोन हजार युद्धकैद्यांवर ठेवली नजर
गणपती वडगावे, मलिकवाड (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव)
भारतीय सैन्याने १९७१ च्या युद्धात पराक्रम करत पाकिस्तानला नामोहरम केले. पाकिस्तानी सैनिकांची दाणादाण उडवताना ईस्टर्न कमांडचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल अरोरा यांनी शिताफीने मोहीम यशस्वी केली. अतिशय कमी वेळेत भारतीय सैनिकांना यश मिळाले. बांगलादेश मुक्तीसाठी सुरू या युद्धावेळी सीमेवर चकमकी झाल्या आणि भारतीय सैन्याने पराक्रम गाजवून विजय मिळविला. या युद्धात पाकिस्तानचे ९५ हजार सैनिक युद्धकैदी व समर्थकांनी शरणागती पत्करली. त्यांची देखभाल करणे मोठे जिकिरीचे काम होते. या युद्धकैद्यांना अनेक छावण्यांमध्ये ठेवून त्यांना कामे देण्यात आली होती. त्यापैकी ६१ क्रमांकांच्या छावणीत माझी नेमणूक झाली होती. आमच्या छावणीत दोन हजार युद्ध कैदी होते. त्यांच्यावर नजर ठेवण्याचे काम सोपवले होते. सैन्यदलातील रँक व हुद्यानुसार युद्धकैद्यांना वागणूक देण्यात येत होती. अधिकारी असणाऱ्या युद्धकैद्यांसाठी वेगळी वागणूक दिली जात होती. आंतरराष्ट्रीय निर्देशानुसार या युद्धकैद्याची व्यवस्था केली होती. युद्ध कैद्यांसाठी वेगळा ड्रेस कोड देण्यात आला होता. वेळोवेळी ‘युनो’चे वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर येऊन त्यांची व्यवस्था पाहत होते. सिमला करार होईपर्यंत तीन वर्ष युद्धकैद्यांची देखभाल करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटारी सीमेवर मुक्त करण्यात आले. युद्ध जिंकल्याचा अभिमान बाळगत दिलेले काम मी निष्ठेने बजावले.
सहकाऱ्यांचा पराक्रम आजही ठळक आठवतो
सुभेदार कृष्णा रवळू पाटील, तेऊरवाडी, (ता. चंदगड, जि. कोल्हापूर)
बांगलादेश युद्धात मी आणि सहकाऱ्यांनी प्राणांची बाजी लावली. माझ्याच चंदगड तालुक्यातील माझे दोन सहकारी युद्ध करताना हुतात्मा झाले. त्यांचा पराक्रम आठवून आजही अंगावर रोमांच उभे राहतात आणि अभिमानाने ऊर भरून येतो. मुंबईत १९६५ मध्ये सैन्यात भरती झाली आणि बेळगावात मराठा लाईट इन्फंट्रीमधून प्रशिक्षण पूर्ण केले. काही काळ लडाख येथे सेवा बजावली. तेथे असतानाच १९७१च्या बांगलादेश युद्धाचे नगारे वाजू लागले. आम्ही ११ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानातील बक्षी गंजे येथे होतो. १६ डिसेंबरला ढाक्याला पोहोचलो. या दरम्यान मोरा येथे आम्ही शत्रू सैन्यासाठी सापळा लावला होता; मात्र शत्रूचे काही सैनिक रात्री अकराच्या सुमारास तेथे आले. आम्ही हिंदुस्तानी सैनिक आहोत असे सांगितले. त्यांच्यासोबत चर्चा सुरू असतानाच त्यांनी विश्वासघाताने हल्ला चढविला. त्याला मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी जोरदार प्रतिकार केला. या चकमकीत आपले दहा सैनिक शहीद झाले. त्यामध्ये चंदगड तालुक्यातील कालकुंद्रीचे परशराम पाटील व नागरदळेचे शंकर मनगुतकर यांचा समावेश होता. आम्ही शत्रू सैन्याला तोडीस तोड उत्तर दिले. त्यानंतर शहीद झालेल्या माझ्या दोन्ही सहकाऱ्यांच्या वस्तू आणि कपडे नातेवाईकांकडे सोपवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपण्यात आली. संबंधितांच्या नातेवाईकांकडे ते कपडे आणि वस्तू सोपवताना वाईट वाटत होतेच पण त्याहीपेक्षा अभिमानच जास्त वाटत होता. त्यांच्या पराक्रमामुळे शत्रूला शरणागती पत्करावी लागली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या धाडसी निर्णयामुळे आणि पाठिंब्यामुळेच आम्ही युद्ध जिंकू शकलो.
भारतीय लष्कर कोणत्याही गणवेशाचा अपमान करत नाही
मेजर शांताराम टेकावडे, (निवृत्त) पुणे, कंपनी हवालदार
बांगलादेश युद्धात मी सहभागी झालो होतो. त्यावेळी मी कंपनी हवालदार मेजर होतो. भारतीय सैन्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हे युद्ध जिंकले आणि पाकिस्तानाला गुडघ्यावर आणले. युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान सेना प्रमुख तसेच अनेक सैनिकांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी आम्ही गणवेशात आहोत आणि आमच्या गणवेशाचा मान राखावा असे पाकिस्तानी सैन्य म्हणत होते. त्यावर आम्ही सांगितले, ‘‘भारतीय सैन्य आपल्या गणवेशाप्रमाणे इतर देशांच्या गणवेशाचा ही मान ठेवतो. त्यामुळे तुमच्या गणवेशाचा अनादर केला जाणार नाही.’’ या युद्धानंतर पाकिस्तानच्या नागरिकांनाही सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने मोलाची कामगिरी केली. या युद्धातील अनेक असे प्रसंग आहेत ज्यात भारतीय सैन्याने आपल्या शक्तीबरोबर मानवतावादी कार्याचे प्रदर्शन केले होते.
न भूतो न भविष्यती असे तंगैल एअरड्रॉप ऑपरेशन
रघुनाथ सावंत (निवृत्त) पुणे., सेकंड पॅरा स्पेशल दलाचे पॅरा कमांडो
भारत आणि पाकिस्तानमधील १९७१ च्या युद्धात २ पॅरा स्पेशल दलाच्या ८०० पॅरा कमांडोने या युद्धात आपली कामगिरी बजावली होती. या युद्धात २ पॅरा स्पेशल दलाने ११ ते १५ डिसेंबर या चार दिवसांत एअरड्रॉप ऑपरेशनद्वारे यश मिळविले. या युद्धात पॅरा कमांडो म्हणून मी भाग घेतला होता. पाकिस्तानच्या (आताचा बांगलादेश) तंगैलमध्ये पुंगाली पुलावर पॅरा स्पेशल दलाने ‘तंगैल एअरड्रॉप ऑपरेशन’ केले. पाकिस्तानद्वारे या पूलावर नियंत्रण मिळविण्या आधीच एअरड्रॉपच्या माध्यमातून आमचे पॅरा कमांडोचे गट तेथे दाखल झाले. यासाठी सर्वात प्रथम आम्ही पाकिस्तानच्या बाजूला पॅरा ट्रूपर्स सोडले. एअरड्रॉप झाल्याचे समजताच पाकिस्तानने आमच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. त्यानंतर पॅरा कमांडोच्या दुसऱ्या गटाला पुंगाली पुलावर नियंत्रणासाठी पाठविण्यात आले. या पुलावर नियंत्रण मिळविणे अत्यंत महत्त्वाचे होते. असे झाले नसते तर युद्धादरम्यान पाण्यातून सैन्याला ये-जा करणे शक्य नव्हते. या ऑपरेशनमुळे एक मराठा लाइट इन्फन्ट्रीला युद्धासाठीचा मार्ग मोकळा झाला. हवेतून भूभागावर उतरतानाच शत्रूशी लढणे अशा प्रकारची भूमिका पॅरा कमांडोला बजवावी लागते. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या प्राणांची बाजी लावून या युद्धात भारताला विजयी मिळवून दिला. ‘भूतो न भविष्यती’ अशा प्रकारचा हे एअरड्रॉप ऑपरेशन होते.
शत्रू प्रदेशात मारल्या भरदिवसा पॅराशूटने उड्या
नाईक सूर्यकांत पवार, साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी)
रात्रीच्या वेळी युद्ध हे कधी फायदेशीरच असते. त्यातून शत्रू प्रदेशात जायचे तर काळोखी रात्र उत्तम; मात्र आपल्या सहकाऱ्यांसह दिवसा पॅराशूटच्या साह्याने ढाक्यानजीक उतरून शत्रूभूमीवर थेट उतरून शत्रूसोबत दोन हात केले. मी सैन्यात तोफखाना (आर्टिलरी) विभागात गनर म्हणून सेवा देत होतो. १९६८मध्ये रुजू झालो. हिमाचल प्रदेशातील अंबालाजवळील नहान येथे पहिले पोस्टिंग झाले. १९७१ला बांगलादेश युद्धाचे वारे वाहू लागले आणि आमच्या कंपनीला ढाक्याजवळ असलेल्या एका गावात पाठविले. साधारणत: शत्रूच्या परदेशात हल्ला करण्यासाठी रात्रीची वेळ ठरवण्यात येते. त्यात आपले सैनिक विमानातून पॅराशूट लॅंडिंग करणार असतील तर ही वेळ रात्रीचीच. पॅराशूटमधून उतरत असताना शत्रूच्या निदर्शनास येण्याचा धोका कमी होतो. निदर्शनास आले तर शत्रूच्या गोळ्यांची शिकार होणार हे निश्चित असते. तरीही धोका पत्करून मी आणि माझे सहकारी ढाक्याजवळच्या गावात सायंकाळी चार वाजता पॅराशूटने उतरलो. तेथे झालेल्या संघर्षात आम्ही गावातील पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली. त्यानंतर आम्हाला पश्चिम सीमेवर पाठवण्यात आले. गंगानगर येथेही आम्ही लढलो आणि पाकिस्तानला धूळ चारली. युद्ध संपल्यानंतरही त्या भागाचे रक्षण करण्यासाठी पुढील दीड वर्षे आम्ही गंगानगर येथे राहिलो होतो. त्यानंतर मी काही काळ कारगिल आणि आसपासच्या परिसरातही काम केले. पॅराशूटमधून उतरून शत्रूवर हल्ला करण्यातील थरार काही औरच.
शत्रू सैन्याच्या ताब्यातील महिलांची मुक्तता
आनंदराव यशवंत भोसले, अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ)
आमचे अग्रण धुळगाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखतात. अनेक जवानांनी युद्धात पराक्रम गाजविल्याने माझ्या गावाचे नाव अभिमानाने घेतले जाते. बांगलादेश युद्धात मला पराक्रम दाखविण्याची संधी मिळाली. पाकिस्तानला पराभूत करताना मला पराक्रम दाखवता आला ही माझ्या आयुष्याची सर्वांत मोठी कमाई आहे. मी १४ फेब्रुवारी १९६८ रोजी सैन्यात भरती झालो. अवघ्या तीन वर्षांत १९७१ला बांगलादेश युद्धाचे वारे वाहू लागले. बांगलादेश पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. लढाई झाली आणि १६ डिसेंबरला लढाई संपल्याचे जाहीर करण्यात आले. विजय मिळविलेले सैनिक परत येत असताना अचानक शत्रू सैन्याने ढाक्याजवळ पुलावर पुन्हा हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात आमचे काही सैनिक शहीद झाले. लढाई रात्रभर सुरू राहिली. सकाळी जखमी झालेले जवान आणण्यासाठी आम्ही गेलो असता शत्रू सैन्याने पुन्हा एकदा आमच्यावर हल्ला केला. त्याला आम्ही जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही शत्रूचा मोठ्या धैर्याने सामना केला. ढाक्याजवळ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातील महिलांची मुक्तता केली आणि त्यांना साडीचोळी देऊन त्यांच्या घरी सुरक्षित पाठविले. त्या वेळी आमच्या जवानांना मिळणारे अन्नही अगदी कमी प्रमाणात होते, मात्र आम्ही कच न खाता शत्रूला धडा शिकविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.