vijay tarawade write article in saptarang
vijay tarawade write article in saptarang 
सप्तरंग

जेकिल आणि हाईड (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com

रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सनच्या ‘जेकिल आणि हाईड’ या कादंबरीत डॉक्‍टर गॅब्रियलचे दोन चेहरे दाखवण्यात आलेले आहेत. दिवसा ‘साळसूद जेकिल’ आणि रात्री ‘दुष्ट हाईड’. दोघांना एकमेकांची नेमकी जाणीव नसते. मराठी साहित्यातही असे ‘जेकिल’ आणि ‘हाईड’ मला वेगळ्या अर्थानं अनेकदा भेटले. मी शाळेत असताना दारूवाला पुलावर मशिदीशेजारी संजय वाचनालय-कम-पुस्तकालय होतं. ते अक्षरशः आबालवृद्धांचं वाचनालय होतं. मोठ्या काउंटरवर ‘सिंदबाद’, ‘जादूचा दिवा’, ‘गुलबकावली’, ‘चांदोबा’ वगैरे बालसाहित्य मांडलेलं असे.

मागच्या बाजूला (बालवाचकांचा हात पोचणार नाही अशा अंतरावर) पिवळ्या जिलेटिन कागदात गुंडाळलेली पुस्तकं व मासिकं असत. मासिकांना चांदोबा मासिकातल्या नायिकांची नावं (तिलोत्तमा, रंभा, उर्वशी वगैरे) दिलेली असत. गल्लीतच राहणारे एक लेखक आमच्या घराशेजारच्या डेअरीत दूध न्यायला येत. एकदा ते माझ्यापुढं रांगेत उभे होते. अंगात बंडी-पायजमा आणि हातात पातेलं. कुणीतरी सायकलवर येऊन त्यांच्या कानात पुटपुटलं आणि पातेलं डेअरीच्या काउंटरवर ठेवून त्यांनी त्या मित्राची सायकल घेतली आणि सायकलवरून धूम ठोकली. थोड्या वेळानं ते परत आले.
***

मोठेपणी म्हणजे १९७५ मध्ये यामागचं गुपित श्‍याम घोमण यांच्याकडून ऐकलं. माझी नोकरी औरंगाबादला सुरू होऊन १९७५ मध्ये माझी पुण्यात बदली झाली. त्या वेळी बुधवार पेठेत दत्तमंदिराजवळच्या पदपथावर वाडेकर नावाचा तरुण विक्रेता संध्याकाळी जुनी पुस्तकं-मासिकं स्वस्तात विकत असे. वाडेकर गोष्टीवेल्हाळ होता. त्यानंच माझी ओळख श्‍याम घोमण यांच्याशी करून दिली होती. श्‍यामराव अतिशय कलंदर होते. सरकारी नोकरीत असताना त्यांनी ‘शृंगार’ आणि ‘अलंकार’ या नावांचे दोन अंक सुरू केले होते. ‘अलंकार’ म्हणजे ‘जेकिल’ आणि ‘शृंगार’ म्हणजे ‘हाईड’! दोन्ही अंक जोरात खपू लागल्यावर त्यांनी नोकरी सोडली. मात्र, नंतर दुर्दैवानं मासिकांचा खप ओसरू लागला. गप्पांमध्ये श्‍यामराव मासिकांच्या ऊर्जितावस्थेच्या आठवणी सांगत. शृंगारकथा असलेली मासिकं जोरात खपत; पण ना. सी. फडके यांच्या पुढची जी लेखकांची पिढी होती, त्या पिढीतल्या शृंगारलेखकांना लेखन कठीण होत चाललं होतं. चंद्रकांत काकोडकरांवर ‘श्‍यामा’ कादंबरीसाठी खटला भरला गेला व त्यातून ते सुटले. काही प्रकाशक बेळगावहून ‘बोल्ड मासिकं’ प्रकाशित करत असत आणि अंक महाराष्ट्रात आणून पिवळ्या जिलेटिनच्या कागदात गुंडाळून विकायला देत. अशा मासिकांचे एक वितरक आमच्या घराजवळ राहायचे. एकदा कुणीतरी त्या मासिकातल्या एका कथेबद्दल पोलिसांत तक्रार केली म्हणून पोलिस फक्त चौकशीला आले होते. त्यांना पाहून सायकलवरून पळून जाणाऱ्या लेखकमहोदयांचा उल्लेख मी वर केला आहेच. हे लेखक सायकलवरून स्वारगेटला गेले. तिथं भेटलेल्या वितरकांनी त्यांना धीर दिला आणि घरी जायला सांगितलं. हे लेखक पुढं ख्यातनाम झाले. अध्यक्ष वगैरे झाले. त्यांच्या समग्र कथा मी वाचल्या; पण त्यांत किंवा काकोडकरांच्या ‘श्‍यामा’ कादंबरीत अश्‍लील काही आढळलं नाही. काकोडकरांच्या ‘महापूर’ या कादंबरीचा उत्सुकता वाढवणारा ब्लर्ब पाहून मी ती वाचली होती. तीमधलं एकुलतं एक ‘तसलं’ वर्णन म्हणजे नवविवाहित दांपत्य जेवायला बसलेलं असताना आईची नजर चुकवून नवरा बायकोला पोळी-शिकरणाचा घास भरवतो. बायको चुकून त्याला चावते आणि तो किंचाळल्यावर आई मागं वळून बघते व मिश्‍किलपणे हसते. त्या काळी लेखकांना उगाच छळण्यासाठी लोक खटले भरत असावेत, असं वाटतं.

नोकरी सोडल्यावर आणि अंक खपेनासे झाल्यावर श्‍यामरावांनी उत्पादन आणि विक्रीच्या नानाविध कल्पना लढवल्या. विविध देवस्थानांची माहिती असलेल्या पुस्तिका किंवा वधू-वर सूचक मंडळ असे अनेक मार्ग त्यांनी शोधले. माझ्या मते, मराठीतली पहिली फीचर्स सर्व्हिस त्यांनीच सुरू केली आणि तीदेखील मजेदार पद्धतीनं. ग्रामीण भागात साप्ताहिकं चालवणारे संपादक दिवाळीची चाहूल लागली की पुण्यात येत आणि दिवाळी अंक छापून घेत. अभिनेत्रींचे रंगीत फोटो छापलेली ‘शिवकाशी’ची कॅलेंडर्स शेकडा दरानं स्वस्त मिळत. कमी बजेट असलेले छोटे संपादक या कॅलेंडर्सचा वापर अंकाच्या मुखपृष्ठांसाठी वापर करत. श्‍यामरावांनी त्यातले अनेक संपादक ‘पकडले’ होते. जुलै-ऑगस्ट या महिन्यांपासूनच श्‍यामराव दिवाळी अंकांसाठी नवोदितांच्या कथा-कविता-विनोद जमवत. ते स्वतः जीन हार्लो नावाच्या अभिनेत्रीवर आवर्जून लिहीत. ३१ ते ४० पानांचा मजकूर ‘कंपोज करून’ त्यावर मासिकाचं नाव न टाकता तयार ठेवत. वेगवेगळ्या गावांतले ३०० वगैरे प्रती छापणारे संपादक तो मजकूर विकत घेत आणि आपल्या अंकात समाविष्ट करत. ही कल्पना नंतर अनेकांनी उचलली.

सध्या पुण्यात जिथं दगडूशेठ हलवाई गणेशमंदिर आहे, तिथं पूर्वी अग्निशामक दलाचं कार्यालय होतं. रात्री उशिरा तिथं निळू फुले, राम नगरकर, पद्माकर गोवईकर, श्‍यामशेठ शर्मा वगैरे मंडळी जमत. त्या मैफलीत श्‍यामरावांबरोबर गेलो की मी दबकून मागं उभा राहत असे आणि मोठ्या लोकांच्या गप्पा ऐकत असे. शंकर पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले एक लेखक त्याच नावानं लिहू लागले तेव्हा काही काळ वाचकांचा गोंधळ उडाला होता. श्‍यामरावांनी दोघांशी एकत्र चर्चा करून दुसऱ्या पाटीलसाहेबांना संपूर्ण नावानं लेखन करण्याची विनंती केली होती. इरसाल ग्रामीण कथा लिहिणारे बा. भ. पाटीलदेखील श्‍यामरावांचे मित्र होते. सन १९७९ मध्ये पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका भव्य सभेला आम्ही तिघं खूप मागं बसून उपस्थित होतो. त्या वेळी बा. भ. पाटलांनी अधूनमधून मिश्‍किल शेरेबाजी करून बहार आणली होती. श्‍यामरावांच्या सहवासात मी साहित्याचा ‘जेकिल’ चेहरा जसा पाहिला, तसाच ‘हाईड’ चेहरादेखील पाहिला. त्याविषयी पुढच्या वेळी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT