netaji subhash chandra bose sakal
सप्तरंग

नेताजी एक जिवंत आख्यायिका

‘तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा...’ हे सांगणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं नाव निघालं की तुमच्या-आमच्या, सर्वच भारतीयांच्या रक्तात सळसळ निर्माण होते.

विनोद राऊत

‘तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा...’ हे सांगणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं नाव निघालं की तुमच्या-आमच्या, सर्वच भारतीयांच्या रक्तात सळसळ निर्माण होते.

‘तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा...’ हे सांगणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं नाव निघालं की तुमच्या-आमच्या, सर्वच भारतीयांच्या रक्तात सळसळ निर्माण होते. नेताजी हेच खरे स्वातंत्र्याचे वारसदार, अशी भावना आजही भारतीयांमध्ये आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या (२३ जानेवारी) जयंतीच्या दिवशीही त्यांचे आयुष्य एक जिवंत आख्यायिका आहे; पण त्यांच्या मृत्यूबद्दल अद्यापही गूढ आहे. एवढी वर्षं उलटून गेल्यावरही त्यांच्या अस्थी मायदेशात आणता आल्या नाहीत, त्यामागं राजकीय इच्छाशक्ती कमी पडली की आणखी काय? नेताजींच्या स्वातंत्र्याविषयीच्या भावना, त्यांचे गांधीजी आणि पंडित नेहरू यांच्यासोबतचे संबंध, त्यांचे आदर्श, त्यांचा वारसा, तसंच भारतातील सद्यस्थितीबाबत त्यांच्या कन्या अनिता बोस यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत मांडलेली सडेतोड मतं...

वडील कसे आठवतात?

अनिता बोस : प्रत्येक मूल स्वत:मध्ये आपल्या आई-वडिलांना अनुभवत असतं. मात्र, वडील म्हणून नेताजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू मला कधीच अनुभवता आले नाहीत. नेताजी गेले तेव्हा मी केवळ चार आठवड्यांची होते. त्यामुळे वडील म्हणून मला त्यांचं प्रेम कधीच मिळालं नाही. मी जसजशी मोठी होत गेले, तसतसं इतरांकडून, त्यांच्यावर झालेल्या लिखाणातून मला त्यांची ओळख होत गेली. माझे वडील किती मोठे होते ते कळलं. अशा वेळी मला त्यांची खूप आठवण येते.

नेताजींची मुलगी म्हणून दडपण आलं होतं?

मी जर भारतात राहिले असते तर माझ्यासाठी हे खूप कठीण असतं. मी माझ्या आईचा देश, ऑस्ट्रियात जन्मले, लहानाची मोठी झाले. त्यानंतर अमेरिका आणि जर्मनीमध्ये राहिले. त्यामुळं माझ्यावर नेताजींची मुलगी म्हणून तसं दडपण आलं नाही. मला स्वतंत्र ओळख निर्माण करता आली, स्वत:च्या पायावर उभी राहू शकले. मात्र मी भारतात राहिले असते तर परिस्थिती उलट असती. नेताजींची मुलगी म्हणूनच सर्वजण माझ्याशी वागले असते. कदाचित मला स्वतंत्र ओळख मिळवणं कधीच शक्य झालं नसतं.

तुमच्या आई-वडिलांचे संबंध कसे होते?

माझ्या आईचा नेताजींसोबतचा संपर्क हा त्यांची सहाय्यक म्हणून आला. कामानिमित्तानं ते एकत्र आले. यातूनच त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं दृढ होत गेलं. पण कामाचा व्यापच इतका असे की, त्यांना पती-पत्नी म्हणून खासगी आयुष्य जगण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. नेताजी त्या काळात उपचार घेण्यासाठी, आराम करण्यासाठी युरोपात आले होते. आई त्यांच्यासोबत होती. या काळात दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि याच काळात त्यांची मैत्री बहरली.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोघं दोन ते अडीच वर्षे एकमेकांसोबत होते. तो काळ अत्यंत कठीण होता. नेताजी दडपणाखाली होते. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जर्मनी आणि इटली सरकारचा पाठिंबा मिळवायचा होता. मात्र, त्यांना दोन्ही देशांकडून मदतीचं ठोस आश्वासन मिळत नव्हतं. ते खूप निराश झाले होते. मात्र, अडचणीच्या या काळात ते दोघंही एकमेकांप्रती खूप समर्पित होते. माझ्या वडिलांचा प्राधान्यक्रम अतिशय स्पष्ट होता. त्यांचं पहिलं प्राधान्य हे देशाला स्वतंत्र करण्याचं होतं. कुटुंब, मुलगी दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, माझ्या आईनं खूप त्याग केला. नेताजींसोबत आपलं आयुष्य खडतर असणार याची जाणीव असूनही तिनं ती भूमिका आनंदाने स्वीकारली, कधी तक्रार केली नाही. एका महिलेसाठी ते कठीण होतं. मात्र आई शेवटपर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ होती. दोघांमधील पत्रव्यवहारावरून ते लक्षात येतं.

मुलीचा जन्म, नेताजींची प्रतिक्रिया

मी माझ्या जन्मासंदर्भात काही गोष्टी आईकडून ऐकल्या. माझे आजोबा गोरे होते, आजीही गोरी होती. मी तशी गोरीपान होते; पण माझे केस काळे आणि डोळे खोल होते. मात्र तसं असतानाही नेताजींनी मला पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला हातात घेऊन ते म्हणाले, अरे तू आईचा रंग का घेतला नाही? त्यांची ही प्रतिक्रिया मजेशीर होती. विशेषत: त्या काळात भारतात गोरा वर्ण असणं हे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जाई. माझी आजी गोऱ्या वर्णासाठी आग्रही होती. हा एकमात्र किस्सा मला आईनं सांगितला.

कर्तृत्वानं मोठी हो...

नेताजींची एकुलती एक मुलगी आहे, म्हणून मला कधी अहंकार यायला नको, त्यामुळं आई मला नेहमी सांगायची की, बाळा तुझे वडील जरी मोठे असले तरी तू आपोआप मोठी होणार नाही. हा विचार आईनं माझ्यात रुजवला. स्वत: प्रयत्न करून आपलं आयुष्य उभं करता आलं पाहिजे आणि जगाला काही सकारात्मक देता आलं पाहिजे. एखाद्या मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीशी तुमचं नातं असणं, याला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. मात्र, केवळ त्यामुळं तुम्ही विशेष होऊ शकत नाही. आणि तुम्हाला वागताना खूप सांभाळून वागावं लागतं.

नेताजींच्या अस्थी

नेताजींच्या अस्थी हा सबंध भारतीयांसाठी आणि माझ्यासाठीही एक आस्थेचा विषय आहे. मी याबाबत पाठपुरावा केला, पण मला त्यात अडचणी आल्या. मला खात्री आहे की, रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी या माझ्या वडिलांच्याच आहेत. डीएनए चाचणीतून ते सिद्ध करणं शक्य आहे. एक मुलगी म्हणून मला नेताजींच्या अस्थी भारतात आलेल्या बघायचं आहे. काही जपानी लोकांना नेताजींच्या अस्थींचे काही अवशेष तिकडे ठेवायचे आहेत. माझ्या वडिलांनी आपल्या देशावर जिवापाड प्रेम केलं. देशाला स्वतंत्र होताना पाहण्याचं त्यांचं स्पप्न होतं. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांच्या अस्थी त्यांच्या प्राणप्रिय देशात पोचल्या पाहिजेत.

नेताजींच्या मृत्यूमागचे रहस्य...

अनेकजण नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील वादाला अधिक महत्त्व देतात. मात्र, नेताजींनी देशाला त्यापेक्षा बरंच काही दिलं, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. नेताजींनी देशासाठी लढताना एक आगळावेगळा आदर्श घालून दिला. देशात नेताजींना मानणारा एक मोठा वर्ग आहे, जो आजही त्यांच्या कर्तृत्वाला, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाला मानतो, त्यांचं स्मरण करतो. नेताजींचं संपूर्ण आयुष्यच हे एका गूढ कथेसारखं होतं. अत्यंत गुप्तपणे ते भारताबाहेर पडले. त्यांनी पूर्व युरोप आणि जर्मनीला जाण्यासाठी पाणबुडीने प्रवास केला. त्यांच्या जीवाला मोठा धोका होता. त्यामुळे अनेकांना ते आजही जिवंत असतील असं वाटतं आणि त्यांच्या मृत्यूसंदर्भात अनेक किस्से पसरवले गेले. एक युरोपीयन हिंदू व्यक्ती जो नेताजींसारखा दिसायचा, अगदी नेताजींसारखाच गोरा होता. तो भारतात जायचा तेव्हा अनेकजण त्याला नेताजीच समजायचे. त्या व्यक्तीची उंची नेताजींपेक्षा जास्त होती. तो म्हणायचा, अरे मी नेताजी कसा असू शकेन? मी नेताजींपेक्षा ८ इंच जास्त उंच आहे. तरीही लोक त्याला म्हणायचे, त्यात काय अडचण आहे. नेताजींची उंची ८ इंचापर्यंत वाढू शकते. मात्र, तो खरा नेताजी नव्हता हे वास्तव आहे. त्यामुळेच नेताजी जिवंत असल्याचा भ्रम आजही लोकांमध्ये कायम आहे. १९४५ मध्ये तैवानमधील तैपे इथल्या विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाला. ही घटना सविस्तर नोंदली आहे. त्याची कागदपत्रंही आहेत. त्यामुळे त्याच घटनेत नेताजींचा मृत्यू झाला, यावर मी विश्वास ठेवते. मात्र त्यांच्या मृत्यूबद्दलच्या इतर कल्पना अतिरंजित आहेत, असं मला वाटतं.

नेताजींच्या योगदानाकडे दुर्लक्ष...

दुसऱ्या महायुद्धानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींच्या योगदानाला दुर्लक्षित केलं गेलं असं मला प्रकर्षानं वाटतं. दुसऱ्या महायुद्धानंतर आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांना कैदी म्हणून भारतात आणलं गेलं, त्यांच्यावर खटला सुरू झाला, त्यानंतर पहिल्यांदा देशात आझाद हिंद सेनेच्या कामगिरीबद्दल, त्यांच्या धाडसाबद्दल लोकांना कळलं. त्यावेळी सशस्त्र क्रांती, लष्करात पडलेली फूट, नौसेनेची स्थापना या घडामोडी भारतीयांना महत्त्वाच्या वाटत होत्या, त्या त्यांना प्रेरित करायच्या, हा नेताजींचा प्रभाव होता. मात्र, स्वातंत्र्य यावरून एकमेकांबद्दल मत्सर, द्वेष निर्माण झाले होते. ऐतिहासिकदृष्ट्या बघता, महात्मा गांधी आणि नेताजींमधील मतभेद हे जगजाहीर होते. मात्र जवाहरलाल नेहरू आणि नेताजी एकाच पिढीचे होते, दोघांमध्ये फारसे मतभेद नव्हते, मैत्री होती.

नेताजी महात्मा गांधीजींचा सन्मान करायचे. मात्र महात्मा गांधी एक धूर्त व्यक्ती होते. ते लोकांना नियंत्रित करायचे. जेव्हा काही लोक त्यांच्या मताशी सहमत होत नसायचे, तेव्हा ते शांतपणे त्या व्यक्तीविरुद्ध सूड उगवायचे. त्याउलट माझे वडील मोठ्या मनाचे व्यक्ती होते. ते सरळमार्गी, स्पष्टवक्ते होते. आणि शेवटी महात्मा गांधी एक प्रशिक्षित वकील होते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे जाऊन गांधीजी साधेपणानं जगलेही.

नेताजींच्या वारश्यावर हक्क कुणाचा?

नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारताचे थोर सुपुत्र होते, मात्र त्यासोबत पश्चिम बंगालचे आवडते सुपुत्र होते. नेताजींचं जीवनकार्य बघता, त्यांची कमिटमेंट देशाबद्दल होती, किंबहुना भारतीय उपखंडाबद्दल होती. ते जिवंत असते तर त्यांनी फाळणीला विरोध केला असता. शरद बोस यांनी विरोध केला, महात्मा गांधीदेखील फाळणीच्या घटनेने आनंदी नव्हते.

विविध विचारधारेचे, राजकीय पक्षाचे लोक नेताजींचा, त्यांच्या कार्याचा सन्मान करतात. मात्र काही जण त्यांचे विचार, त्यांची तत्त्वं अंगिकारत नाहीत. जे काही नेताजींच्या वारश्यावर आपला दावा करताहेत, त्या लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून नेताजींनी विविध धर्मांतील लोकांना एकत्र आणलं, नेतृत्व केलं. नेताजी एक आस्थावान हिंदू होते, मात्र त्यांनी ज्या प्रमाणे स्वधर्मातील मूल्यांना महत्त्व दिलं, त्याप्रमाणे इतर धर्माचा तेवढाच आदर केला, हे त्यांचं जीवन सांगते. आज काही पक्ष, विचारधारा, प्रांत, धर्माच्या नावाने नेताजींना एका विशिष्ट वर्गाचा, विचारधारेचा हिरो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याचा दुसरा पैलू ते तुम्हाला सांगणार नाहीत. महिलांविरोधातील वाढत्या हिंसाचाराबद्दल भारताची जगात वाईट प्रतिमा आहे. मात्र नेताजी तर स्त्री-पुरुष समानतेचे कट्टर समर्थक होते. किंबहुना त्यांनी ते कृतीतून सिद्ध केलं. आझाद हिंद सेनेत महिला आणि पुरुषांना एक मानून दोघांनाही समान अधिकार, पदावर काम करण्याची संधी नेताजींनी दिली. त्यामुळे नेताजींच्या वारश्यावर हक्क सांगताना जर तुम्ही काही लोकांना दूर लोटण्याचा प्रयत्न करत असाल तर ते योग्य नाही.

नेताजींच्या संबंधित भारतीयांसोबत संपर्कात आहात?

- मी दरवर्षी भारतात येते. नेताजींशी संबंधित सर्व व्यक्तींसोबत मी फोनवर, व्हॉट्सॲपवर संपर्कात राहते. गेल्या दोन वर्षांपासून कोविड संसर्गामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात असते. माझ्या सर्व कुटुंब, नातेवाईकांसोबत माझा संपर्क असतो. वडिलांच्या प्रत्येक आठवणीशी, स्मृतीशी मी एकजीव आहे.

नेताजींना आठवायचं असेल तर..

- नेताजींच्या जन्माचे १२५ वे अर्थात शतकोत्तर हिरक महोत्सवी जन्मवर्ष आपण साजरे करत आहोत. नेताजींवर श्रद्धा असणाऱ्या, त्यांची तत्त्व पाळणाऱ्या असंख्य भारतीयासांठी ही मोठी घटना आहे. नेताजींनी घालून दिलेले आदर्श, त्यांची तत्त्व जपण्याची गरज आहे. आज काळ बदलला असेलही, मात्र नेताजींची भारताबद्दलची स्वप्नं, विचार आजही तेवढेच प्रासंगिक आहेत. त्यांचा दूरदर्शीपणा, त्यांची भाषणं ऐकली तरी आपण समजू शकतो.

नेताजी त्यांच्या नैतिकतेसाठी, त्यांच्या ध्येयाशी समर्पित होते. एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून नेताजींना देशाने लक्षात ठेवलं पाहिजे, असा एक व्यक्ती ज्याने केवळ देशाची सेवा करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हजारोंनी आपल्या वैयक्तिक आयुष्याची, कुटुंबाची राखरांगोळी केली. आपण त्यांच्याप्रमाणे त्याग करू शकत नाही, मात्र किमान आपल्या समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

भारतातील आर्थिक विषमतेकडे अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपण कसं बघता?

- अर्थशास्त्रज्ञ म्हणून मला समाजवादी आणि डावे अर्थकारण चांगले वाटते. मात्र अंमलबजावणी करताना, ते प्रॅक्टिकल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवाद, डावी विचारधारा महत्त्वाची आहे, मात्र ते प्रॅक्टीकल वागत नाहीत. त्यातून भ्रष्टाचार बोकाळतो. सोवियत रशिया, काही डाव्या विचारधारेचे देश त्याची मोठी उदाहरणं आहेत. १९९१ च्या उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापक परिवर्तन झालं. मात्र समाजात विषमता वाढली. काही लोकच श्रीमंत होत चालली आहेत. मध्यम वर्ग आर्थिकदृष्ट्या सबळ होत चालला आहे. मात्र काही लोक दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. त्यांना दारिद्र्यातून बाहेर काढणं महत्त्वाचं आहे.

फाळणीनं पेरली धार्मिक विद्वेषाची बीजं

अनेक वर्षांनंतर देशात एकपक्षीय सरकार आलं. हे सरकार स्वत:ची धोरणं राबविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अनेकदा सरकार म्हणून जे करायला पाहिजे त्यात ते कमी पडत आहेत. मात्र धार्मिक विद्वेषाबद्दल सांगायचं झाल्यास, त्याची बीजं फाळणीत पेरली गेली. महात्मा गांधींनी फाळणी टाळण्याचा प्रयत्न केला, माझे वडील हयात असते तर त्यांनी फाळणीला कठोर विरोध केला असता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ट वर्गाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी केवळ भाजप नव्हे तर पूर्वाश्रमीची सरकारंही दोषी आहेत. मात्र सध्याच्या सरकारनं हिंसाचार, द्वेष कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

अनिता बोस यांच्याविषयी...

अनिता बोस फाफ या दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस आणि त्यांची ऑस्ट्रियन पत्नी इमिली शेकल यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांचा जन्म १९४२ मध्ये ऑस्ट्रियातील वियेना या शहरात झाला. नेताजींनी ऑस्ट्रिया सोडलं तेव्हा अनिता बोस केवळ चार आठवड्यांच्या होत्या. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने त्या अमेरिकेत राहिल्या, त्यानंतर त्या जर्मनीमध्ये स्थायिक झाल्या. अनिता बोस या एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ आहे. ऑग्सबर्ग विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राच्या प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. मार्टिन फाफ यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. दोघांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मार्टीन फाफ हे जर्मनीच्या संसदेचे खासदार राहिले आहेत. दोघेही जर्मनीच्या सोशल डिमोक्रेटिक पक्षात सक्रिय कार्यरत आहेत. अनिता बोस यांनी नेताजींच्या आयुष्यावर आधारित नेताजी सुभाष चंद्र बोस ॲण्ड जर्मनी हे पुस्तक लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT