Rain Sakal
सप्तरंग

‘रिम झिम गिरे सावन’

मुंबईत मान्सूनचे आगमन झाले की ‘रिम झिम गिरे सावन’ हे गाणे ओठावर केव्हा येते, हे आपल्याही कळतही नाही.

विनोद राऊत

बासू चॅटर्जी यांच्या १९७९ मध्ये आलेल्या ‘मंजिल’ चित्रपटातील हे रोमँटिक गाणे. अमिताभ-मौसमी चॅटर्जीच्या या गाण्याची जादू पाच दशकांनंतरही ओसरली नाही. उलट हे गाणे अजूनही फ्रेश वाटते. ते नॉस्टॅल्जिक करणारे आहे; मात्र मुंबईतील पावसाच्या अप्रतिम दृष्यांमुळे ते आयकॉनिक ठरले आहे. पावसावर अनेक हिट गाणी आली; मात्र या गाण्याचा क्लासच वेगळा आहे. या गाण्याच्या शूटिंगचे अनेक गमतीशीर किस्से, आठवणी आहेत. गीतकार योगेश यांचे सिनेमाच्या मुहूर्तापूर्वीच ‘रिम झीम गिरे सावन’ हे गाणे लिहून झाले होते.

मुंबईत मान्सूनचे आगमन झाले की ‘रिम झिम गिरे सावन’ हे गाणे ओठावर केव्हा येते, हे आपल्याही कळतही नाही. आजपर्यंत सिनेमात मुंबईच्या पावसावर आधारित असंख्य गाणी आली आहेत. मात्र अमिताभ-मौसमी चॅटर्जीच्या या गाण्याची जादूच काही और आहे. बासू चॅटर्जी यांचे मुंबईवरचे प्रेम सर्वश्रुत आहे.

‘छोटीसी बात’, ‘रजनीगंधा’, ‘खट्टा-मिठ्ठा’ यांसारख्या बासूंच्या अनेक चित्रपटांतून मुंबई नेहमीच दिसते. पाऊस, मुंबई आणि बासुदा यांचे एक वेगळेच नाते होते. ‘स्वामी’तील ‘पल भर में ये क्या हो गया’ हे शबाना आझमी यांच्यावर चित्रित गाणे, ‘मंजिल’मधील ‘रिम झीम गिरे सावन’ तर ‘प्रियतमा’मधील ‘घटा बरसे’ या गाण्यातून बासूंचे पावसाचे आकर्षण दिसून येते.

१९७९ मध्ये अमिताभ बच्चन, मौसमी चॅटर्जी यांची प्रमुख भूमिका असलेला बासू चॅटर्जी यांचा ‘मंजिल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. गीतकार योगेश यांचे सिनेमाच्या मुहूर्तापूर्वीच ‘रिम झीम गिरे सावन’ हे गाणे लिहून झाले होते. एकाच बैठकीत त्यांनी लतादीदी आणि किशोर कुमारसाठी गाणे लिहिले. आर. डी. बर्मन यांनी हे गाणे संगीतबद्ध केले. चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी लतादीदींचे गाणे रेकॉर्ड झाले होते, तर किशोर कुमार यांचे गाणे उशिरा रेकॉर्ड झाले.

या गाण्याच्या शूटिंगसाठी मात्र वर्षभर वाट पाहावी लागली. कारण या वेळी बासूंना मुंबईच्या नैसर्गिक पावसात हे गाणे शूट करायचे होते. खऱ्याखुऱ्या पावसात चित्रीकरण करण्याचा हा पहिला प्रयोग होता. पावसामुळे लाईट कमी असतो. शॉट स्पष्ट येत नाही; मात्र आपल्या तंत्रकुशलतेमुळे सिनेमॅटोग्राफर के. के. महाजन यांनी बासूंच्या या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले.

वीकेंडला शूटिंग करणे कठीण होते. त्यामुळे इतर दिवशी या गाण्याचे शूटिंग करायचे ठरले. अमिताभ-मौसमी चॅटर्जी हे त्या वेळी बॉलीवूडमधील मोठे चेहरे नव्हते. राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या सिनेमातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे बासूंचे फेव्हरेट गाणे होते. ‘रिम झीम गिरे सावन’च्या माध्यमातून बासूंनी राज कपूर यांच्याप्रति एकप्रकारे आदर व्यक्त केला.

या गाण्याच्या शूटिंगचे अनेक गमतीशीर किस्से, आठवणी आहेत. संपूर्ण गाण्याचे शूटिंग करायला तीन दिवस लागले होते. निसर्गाने बासूंना साथ दिली. तिन्ही दिवस मुंबईत पाऊस धो-धो बरसत होता. या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण धावत्या कारमधून झाले. बासूंनी तीन जुन्या शेव्रोले गाड्या भाड्यावर घेतल्या होत्या.

एका गाडीत अमिताभचा भाऊ अजिताभ असायचा. इतर दोन गाड्यांमध्ये कॅमेरा क्रू आणि के. के. महाजन, बासूदा होते. संपूर्ण गाण्यात बहुतांश लाँगशॉट घ्यायचे होते. एवढ्या पावसात गाणे वाजवणे शक्य नव्हते. त्यामुळे या गाण्यात नायक-नायिकेचे केवळ हावभाव आहेत. कुठल्या शॉटमध्ये चेहऱ्यावर कसा भाव ठेवायचा याचे ब्रिफिंग बासूदा देत. एका टप्प्याचे शूटिंग झाले की अमिताभ आणि मौसमी चॅटर्जी धावत जाऊन गाडीत बसायचे.

दुसऱ्या टप्प्याच्या शूटिंगच्या सूचना बासूदा देत. बासूंचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे असले तरी प्रत्यक्षात अनेक रिटेक घ्यावे लागत होते. शूटिंगचे सातत्य राखण्यासाठी जेवणाऐवजी शूटिंग ब्रेकमध्ये सर्व जण कुलाब्याच्या एका कॅफेत जाऊन तिथे चहा, कॉफी आणि स्नॅक्स घ्यायचे.

त्या वेळी आजच्यासारखे वॉटरप्रूफ मेकअपचे साहित्य उपलब्ध नव्हते. मौसमी चॅटर्जीच्या आयलायनरचा रंग पावसामुळे झिरपत झिरपत चेहऱ्यावर यायचा. मौसमीचा चेहरा काळवंडून जायचा. या आठवणींना उजाळा देताना एका कार्यक्रमात मौसमी यांनी सांगितले की, ‘शूटिंगदरम्यान माझा चेहरा बघून संपूर्ण टीम हसायची.

अमिताभ मला सातत्याने चेहऱ्यावरचा रंग पुसायला सांगायचा. एक दुसरी अडचण होती.’ या गाण्यात मौसमींनी टर्काईटची हिरवी साडी परिधान केली होती. पावसात साडीचा रंग विरघळून शरीराला चिपकत होता. मौसमी चॅटर्जी यांना दिवसभर तो रंग पुसावा लागत होता. तिसरी अडचण म्हणजे नायक-नायिकेच्या असमान उंचीची. अमिताभ उंचपुरा, तर मौसमी या कमी उंचीच्या.

भिजलेली साडी आणि पायातील सँडलमुळे मौसमी चॅटर्जींना चालणे जड झाले होते. ही अडचण समजून घेत अमिताभने आपली चालण्याची गती कमी केली होती. गाणे बारकाईने बघितल्यास मौसमी चॅटर्जी या चालताना किती असहज आहे, हे सर्वांच्या लक्षात येईल.

‘पहिले भी यू तो बरसे थे बादल । पहले भी यू तो भिगा था आचल । अब के बरस क्यू सजन । सुलग सुलग जाये मन । भिगे आज इस मौसम में । लगी कैसी ये अगन... ’ योगेशने लिहिलेल्या या गीतात मौसमी म्हणते, हा पाऊस नेहमीचा आहे. असंख्य पावसात ओलेचिंब झाले. हसले, खेळले, बागडले. मात्र आज पहिल्यांदा तुझी साथ असल्यामुळे यंदाच्या पावसात माझे मन तुझ्यासाठी का बरे जळत आहे. (रोमांचित झाले आहे.)

‘रिम झिम गिरे सावन’ हे एवढे लोकप्रिय आणि आयकॉनिक गाणे का आहे, याचे कारण सांगताना ‘बासू चॅटर्जी; अँड मिडल ऑफ द रोड सिनेमा’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक अनिरुद्ध भट्टाचार्यजी म्हणतात की, ‘मुळात नैसर्गिक पाऊस असल्यामुळे या गाण्याला नॉस्टॅल्जियाचा फिल आहे. त्या वेळी मुंबईची लोकसंख्या जास्त नव्हती. ट्रॅफिक कमी होते. शहर स्वच्छ होते.

या गाण्यात दक्षिण मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया, चर्चगेट, फाऊंटन, मंत्रालय, ओव्हल मैदान, मरिन ड्राईव्हसोबत लगतच्या आर्ट डेको इमारती, चौपाटी या सर्व आयकॉनिक वास्तूंचे सौंदर्य आले आहे. पावसात या वास्तूंचे सौदर्य अधिक खुलते. दुसरे म्हणजे या गाण्यात अमिताभ-मौसमी अगदी लहान मुलासारखे पहिल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

ते एकमेकांवर पाणी उडवतात, ओव्हल मैदानात तुंबलेल्या पाण्यात उड्या काय मारतात... मुंबईतील भरधाव टॅक्सी, बस, स्कूटर पाणी उडवताना दिसतत... समुद्राच्या भरतीच्या उंचच्या उंच लाटा... योगेशचे गीत... लतादीदींचा आवाज... आरडींचे संगीत आणि बासूदांचे कॅमेरा वर्क आणि के. के. महाजन यांची उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी यांच्या सुंदर मिलाफामुळे हे गाणे आयकॉनिक ठरले.’

या गाण्याची मेल आणि फिमेल अशी दोन व्हर्जन आहेत. मेल व्हर्जन किशोर कुमार यांनी गायले. अमिताभवरचे ते गाणे खारच्या जिमखान्यात चित्रित झाले. ते महफिलमध्ये गायलेले गाणे आहे. त्यात गंभीरता आहे. मात्र लतादीदींचे गाणे हे निसर्गाचा आनंद देणारे आहे.

गाण्याच्या सिक्वेन्सवर नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल की, या गाण्यात हिरो-हिरोईन गेट-वे, चर्चगेट, मरिन ड्राईव्ह असे फिरून परत ओव्हल मैदानाकडे येताना दिसतात. त्यानंतर फाऊंटनला जातात. शेवट वरळी समुद्रकिनाऱ्यावर होतो. तसे पाहिल्यास हा सिक्वेन्स उलटा झाला आहे.

दुसरी एक गंमत म्हणजे फ्लोरा फाऊंटनजवळ शूटिंग सुरू असताना बघ्यांची गर्दी एवढी झाली की बासू चॅटर्जी यांना दिग्दर्शन सोडून क्राऊड मॅनेजमेंट करावे लागले. यादरम्यान कॅमेरा झूम झाल्यामुळे बासू चॅटर्जी या गाण्यात दिसताहेत. या गाण्यानंतर अमिताभ बच्चन यांचे ‘नमक हलाल’ या चित्रपटातील ‘आज रपट जाये’ हे दुसरे पावसाचे गाणे गाजले; मात्र ‘रिम झिम गिरे’ची त्याला सर नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT