- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com
ध्रुवाची कथा प्रत्येकालाच माहिती असते. अशाच प्रकारची एक कथा अंग राजाचीही आहे. अत्यंत नीतिमान असलेला हा राजा निपुत्रिक होता. मी भागवत पुराणातील चौथ्या स्कंदात वर्णन केलेली पृथूची कथा तुम्हाला सांगत आहे. अंग राजाला पुत्रप्राप्ती नसल्यानं त्यानं अश्वमेध यज्ञाचं आयोजन केलं. याद्वारे आपल्याला पुत्रप्राप्ती होईल, अशी त्याला आशा होती.
अनेक ज्ञानी ब्राह्मणांनी पुरोहिताची भूमिका स्वीकारत हा यज्ञ पूर्ण केला असतानाही एकही देव आपला हविर्भाग स्वीकारायला आला नाही. यामुळं राजा आश्चर्यचकित झाला, ब्राह्मणही संभ्रमात पडले. कारण, यज्ञविधी अत्यंत अचूक पद्धतीनं केले गेले होते. चिंतन केल्यानंतर ब्राह्मणांनी राजाला स्पष्टीकरण दिलं, ‘‘तू तुझ्या आयुष्यात क्षुल्लकसुद्धा पाप केलेलं नाही. तुझ्या पूर्वजन्मात मात्र एक पाप तुझ्या हातून घडलं होतं.
तू अद्यापपर्यंत निपुत्रिक असण्याचं तेच कारण आहे. तुला पुत्र हवा असल्यास यज्ञदेवाची पूजा कर, तो तुला पुत्र होण्याचं वरदान देईल. अपत्यप्राप्तीसाठी जेव्हा यज्ञदेव असलेल्या हरीला थेट आवाहन केलं जातं, तेव्हा सर्व स्वर्गस्थ देव आपापला हविर्भाग स्वीकारतात.’ यानंतर, विष्णूच्या ‘शिपिविष्ट’ या रूपाचं आवाहन केलं गेलं. शिपिविष्ट हे विष्णूचं यज्ञ, यज्ञज्वाळा आणि यज्ञबळी असं रूप आहे.
वाल्मीकि रामायणातील कथेप्रमाणंच या यज्ञाच्या ज्वाळेतूनही एक मानवी आकृती बाहेर आली. त्याच्या अंगावर सुवर्णालंकार होते, त्याचं वस्त्र झळाळत होतं. त्याच्या हातात असलेल्या सुवर्णपात्रामध्ये शिजवलेलं पायसम होतं. ब्राह्मणांनी अनुमती देताच राजानं हाताची ओंजळ करत पायसमचा स्वीकार केला आणि ते आपली पत्नी सुनीताला दिलं. गर्भामध्ये पुत्र निर्माण करण्याचे सामर्थ्य त्या पायसममध्ये होतं.
राणीनं आपल्या पतीकडून ते पायसम स्वीकारलं आणि प्राशन केलं. तिला गर्भधारणा झाली आणि योग्य वेळ येताच तिनं एका पुत्राला जन्म दिला. बालपणापासूनच हा पुत्र त्याचे आजोबा ‘मृत्यू’ यांचा भक्त होता. मृत्यू हा सुनीताचा पिता होता, आत्यंतिक दुष्टतेचं तो प्रतीक होता. आपल्या आजोबांच्या प्रभावामुळं हा वेण नावाचा पुत्र मोठा होऊन अधर्माचं जणू प्रतीकच बनला.
त्यानं अनेक प्राण्यांची विनाकारण हत्या केली व जनतेचा छळ केला. वेणावर नियंत्रण ठेवणं अशक्य झाल्यानं अंग राजा हतप्रभ झाला. नंतर एकेदिवशी, शांतपणे आणि कोणालाही न सांगता तो वनात निघून गेला. त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही.
राजा नसला की राज्यात अराजकता माजते. मूल्यांचं संरक्षण होत नाही आणि दुष्टही बेबंद होतात. त्यामुळं अनिच्छा असूनही भृगू आणि इतर ऋषींनी वेणाला राजा म्हणून सिंहासनावर बसवलं. यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. वेणानं नीतीमार्गानं राजशकट हाकावा, यासाठी ऋषींनी अनेक प्रयत्न केले; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
उलट वेणानेच त्यांना सुनावलं, ‘‘तुम्ही सर्वजण मूर्ख आहात. तुम्ही धर्म समजून अधर्माचीच पूजा करत आहात. जो तुमचा उदरनिर्वाह चालवितो त्या ‘पती’ला सोडून तुम्ही ‘बाहेरख्यालीपणा’ करत आहात. प्रत्यक्ष ईश्वराचंच रूप असलेल्या राजाचा अनादर केवळ मूर्ख लोकच करू शकतात. अशा लोकांना या जन्मात किंवा पुढील जन्मांतही कोणताही लाभ होत नाही.
विष्णू, विरंची (ब्रह्मा), गिरीश (शिव), इंद्र, वायू, यम, रवी (सूर्य), पर्जन्य, धनद, सोम, क्षिती (पृथ्वी), अग्नी, वरुण हे सर्व आणि ज्यांच्यात वरदान व शाप देण्याचं सामर्थ्य असतं ते सर्व देव राजाच्याच शरिरात वास करत असतात. राजातच संपूर्ण देवत्व असतं. त्यामुळं, केवळ माझी पूजा करण्यासाठीच तुमच्या अधिकारांचा वापर करा. यज्ञातील पहिला हविर्भाग माझ्याशिवाय इतर कोण स्वीकारू शकेल?’’ सर्व ऋषी वैतागले. त्यांनी आपल्या सामर्थ्याचा वापर करत वेणाला ठार मारलं. हे कार्य पूर्ण केल्यानंतर ते सर्वजण आपापल्या आश्रमांत परतले.
सुनीतानं विलाप केला. तिला औषधी वनस्पती आणि मंत्रांचं ज्ञान होतं. या ज्ञानाचा वापर करत तिनं वेणाचं शव जतन करून ठेवलं. एके प्रसंगी, ऋषिमुनी सरस्वती नदीत स्नानासाठी गेले होते. अग्नीला आहुती दिल्यानंतर नदीच्या किनारी बसून ते चर्चा करू लागले. या वेळी त्यांना जगात विनाश घडून येण्याचा संकेत देणारे अनेक अपशकून दिसू लागले. पृथ्वीला सध्या कोणीही रक्षणकर्ता नसल्यानंच असं होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सर्वत्र चोर आणि दरोडेखोरांचा सुळसुळाट झाला होता. हे चोर संपत्ती लुटत होते आणि यामुळं सामान्य व्यक्ती भयभीत झाल्या होत्या. या आपत्तीमध्ये दुर्लक्ष करणं परवडणारं नाही, असा निष्कर्ष ऋषींनी काढला.
वेणाचं शव ज्या ठिकाणी जतन करून ठेवलं होतं, तिथं ते गेलं. ऋषींनी मृत राजाची मांडी बळपूर्वक घुसळली आणि त्यातून बाहुक नावाचा पुरुष उत्पन्न झाला. (बाहुक म्हणजे खुजा, किंवा गुलाम आणि परावलंबी व्यक्ती.) तो कावळ्यासारखा काळा होता आणि त्याचे पाय अत्यंत खुरटे होते. त्याचे हात आखूड होते तर हनुवटी फुगीर होती. त्याचं नाकंही चपटं होतं. त्याचे डोळे आणि केस लालसर होते.
त्यानं ऋषींना वाकून नमस्कार केला आणि आदरपूर्वक विचारलं, ‘‘माझ्यासाठी काय आज्ञा आहे?’’ त्यांनी त्याला बसण्यास सांगितलं आणि तो निषाद बनला. (निषाद या शब्दाचा अर्थच खाली बसणे असा आहे. निषाद हे पर्वतांत व वनांत राहणारे शिकारी लोक होते.) निषादांचे वंशज पर्वतांमध्ये आणि वनांमध्ये फिरत राहिले. वेणाचं सर्व पाप बाहुकानं आपल्या शिरावर घेतलं.
ब्राह्मणांनी पुन्हा एकदा राजाच्या शवाचे हात घुसळले. त्यातून एक पुरुष आणि एक स्त्री उत्पन्न झाले. ऋषी म्हणाले, ‘हा पुरुष म्हणजे विष्णूचा अंश आहे आणि तो जगाचा रक्षणकर्ता आहे. ही स्त्री म्हणजे लक्ष्मीचा अंश असून, ती कधीही सर्वशक्तिमान असलेल्या ‘त्याच्या’पासून विलग होत नाही. हा पुरुष पहिला राजा ठरेल आणि त्याची कीर्ति दिगंतात पसरेल.
हा महान राजा पृथू या नावानं ओळखला जाईल, कारण त्याची कीर्ति सर्व जगात पसरलेली असेल. या सुंदर स्त्रीचं नाव अर्ची असेल आणि ती पृथूची पत्नी होईल.’ पृथू म्हणजे विराट, महान आणि अनंत असा आहे. या आवृत्तीत पृथू हे नाव पृथूच्या दिगंत कीर्तिशी जोडलं गेलं आहे. तर आवृत्त्यांमध्ये, वेणाचे हात दीर्घ होते आणि त्यावरून ‘पृथू’ हे नाव पडलं, असं म्हटलं आहे.
(अनुवाद : सारंग खानापूरकर)
(लेखक पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून, पुराणे आणि वेद यांचा, तसंच भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.