pruthu raja sakal
सप्तरंग

पृथूची महानता

मागील सदरात मी पृथूच्या जन्माबाबत माहिती दिली. पृथूला अभिषिक्त करून त्याला राज्यपदावर कसं बसवण्यात आलं, याचं भागवत पुराणात मोठं सुंदर वर्णन केलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

मागील सदरात मी पृथूच्या जन्माबाबत माहिती दिली. पृथूला अभिषिक्त करून त्याला राज्यपदावर कसं बसवण्यात आलं, याचं भागवत पुराणात मोठं सुंदर वर्णन केलं आहे. ब्राह्मणांनी त्याची स्तुती केली, गंधर्वांनी त्याचं स्तुतिगान गायलं, सिद्धांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. स्वर्गीय नर्तिकांनी नर्तन केलं.

शंख, दुंदुभी आणि नगाऱ्यांच्या आवाजांनी आकाश दुमदुमून गेलं. सर्व देव, ऋषी आणि पूर्वज गोळा झाले. यानंतर ब्रह्मदेवाचं आगमन झालं. त्याला पृथूच्या उजव्या हातावर विष्णुचिन्ह, पायाच्या तळव्यावर कमलचिन्ह आणि हाताच्या तळव्यावर चक्रचिन्ह दिसलं.

पृथू हा विष्णूचा अंश असल्याचं या सुचिन्हांवरून स्पष्ट झालं. ब्राह्मणांनी त्याला अभिषेक केला आणि राजा म्हणून सिंहासनावर बसवलं. दशदिशांकडून येणाऱ्या लोकांनी राज्याभिषेकासाठी लागणारी सामग्री आणली. नद्या, सागर, पर्वत, सर्प, गुरं, पक्षी, प्राणी, आकाश, पृथ्वी आणि इतर सर्व जिवांनी आपापला अर्पणभाग आणला आणि ते एकत्र जमले.

राजानं सुंदर वस्त्रं परिधान केली आणि आकर्षक आभूषणं धारण केली. पत्नी आर्चीसह उभा असलेला तो अग्निसमान देदीप्यमान भासत होता. त्याचा राज्याभिषेक झाला. कुबेरानं त्याच्यासाठी अत्यंत उत्तम असं सुवर्ण सिंहासन आणलं. वरुणानं त्याला शशितेज असणारं आणि जलाभिषेक करणारं छत्र दिलं. वायूनं त्याच्यासाठी याकच्या केसांपासून तयार केलेल्या चवऱ्या आणल्या. धर्मानं त्याला यश प्रदान करणारा हार घातला.

इंद्रानं एक सुंदर मुकुट आणला; तर, यमानं त्याला वर्चस्व आणि नियंत्रण ठेवणारा दंड दिला. ब्रह्मदेवानं चिलखत दिलं, सरस्वतीनं लखलखता कंठहार दिला. हरीनं त्याला सुदर्शनचक्र दिलं, तर लक्ष्मीनं अक्षयसमृद्धीचा धनी बनवलं. रुद्रानं त्याला दहा चंद्राकार चिन्हं असलेलं खड्ग दिलं, तर अंबिकेनं शतचंद्र चिन्हांकित ढाल दिली. चंद्रानं त्याला अमृतमय अश्व अर्पण केले. त्वष्ट्यानं अतिशय सुंदर रथ प्रदान केला.

अग्नीनं त्याला बोकड आणि बैलाच्या शिंगांपासून तयार केलेलं धनुष्य दिलं; तर सूर्यानं स्वतःच्या किरणांप्रमाणं तेजस्वी बाण दिले. पृथ्वीनं त्याला योगशक्ती असलेलं चंदन अर्पण केलं आणि आकाशानं त्याच्यासाठी विविध प्रकारची पुष्पं आणली.

आकाशमार्गानं प्रवास करणाऱ्यांनी त्याला धर्म, गायन, वादन आणि गुप्त होण्याच्या कलेचं ज्ञान दिलं. ऋषींनी त्याला सुयोग्य असे आशीर्वाद दिले. सागरानं त्याला शंख दिला. सागर, पर्वत आणि नद्यांनी त्या महान आत्मा असलेल्या राजाच्या रथासाठी एक मार्ग देण्याचं वचन दिलं.

सूत, मगध आणि बंदिजनांनी त्याचं स्तुतिगान गायलं. या शब्दांचा वापर होत असलेला आपण पाहिलेला आहे. त्यांच्यात नक्की काय फरक आहे? सूत हे सारथी होते, त्याबरोबरच ते कुशल कथाकारही होते. मगध हे शाहीर आणि भाट होते. बंदीही तसेच होते. पण, मगध हे स्वतःची रचनाही तयार करायचे, तर बंदिजन हे इतरांनी रचलेली गीतं गात असत.

सूत, मगध आणि बंदी हे सर्वसाधारणपणे राजाची स्तुती करत. मात्र, पृथूच्या आधी राजा म्हणावा, असा कोणीही झालाच नसल्यानं पृथूच्या आधी कोणी सूत, मगध अथवा बंदीही नव्हते. त्याच्याबरोबरच हे लोकही उदयाला आले.

त्यांनी जेव्हा त्याची स्तुती केली, तेव्हा पृथूनं त्यांना थांबवलं. ‘‘विनयशील व्यक्तीला कधीही स्तुती आवडत नाही. तसंच, स्तुती करण्यासारखं मी अद्याप काहीही केलेलं नाही; तर मग, तुम्ही माझी स्तुती का करता?’’ असं सांगितलं. मात्र, सूत, मगध आणि बंदी यांच्याकडे दिव्यशक्ती होती. भविष्यात पृथू काय पराक्रम करणार आहे, हे त्यांना दिसत होतं. त्यामुळे त्यांनी स्तुती करणं चालूच ठेवलं.

‘‘तुझ्या महानतेचं आम्ही करत असलेलं वर्णन पुरेसं नाही. तू एक उदात्त देव आहेस, जो स्वतःची माया वापरून पृथ्वीवर अवतरला आहे. आम्हाला ऋषिमुनींनी विनंती आणि सूचना केली आहे. तुझ्या स्तुत्य कामगिरीचं गौरवगीत गात आम्ही सर्वत्र फिरू. धर्मोद्धार करणाऱ्यांमध्ये पृथू अग्रभागी आहे. तो लोकांना धर्माचं पालन करण्यास भाग पाडतो.

धर्मनियमांचं तो संरक्षण करतो आणि त्याविरोधात जाणाऱ्यांना शासन करतो. दोन्ही लोकांच्या (या आणि यानंतरच्या) कल्याणासाठी वारंवार त्याचं स्वतःचं शरीर जगाच्या उद्धारकर्त्यांच्या रूपात अवतरीत होईल. योग्य वेळी तो संपत्ती निर्माण करेल आणि योग्य वेळी सूर्याच्या तेजस्वी आणि शक्तिशाली किरणांप्रमाणं त्या संपत्तीचं वितरण करेल. (तो कर गोळा करेल आणि योग्यवेळी त्याचा विनियोग करेल.

ज्याप्रमाणं उन्हाळ्यात सूर्य पाण्याची वाफ करतो आणि पावसाळ्यात जलधारा बरसवतो.) वेणाच्या या पुत्राला इतरांच्या गुन्ह्यांपासून कायम त्रास होणार असला; तरी त्याबाबत त्याची वागणूक सहिष्णुतेचीच असेल. लोकांबद्दल त्याच्या मनात आपुलकी असेल. पृथ्वीप्रमाणंच तोदेखील पश्चात्ताप झालेल्यांना माफ करेल. तो हरीस्वरूप आहे, ज्यानं मनुष्यांमधील राजाचं रूप धारण केलं आहे.

इंद्र ज्यावेळी पाऊस पडणार नाही, तेव्हा जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या प्रजेचं रक्षण करेल. चंद्राप्रमाणं शीतल मुद्रा ठेवून तो जगाला आनंद देईल. त्याचा प्रेमळ कटाक्ष आणि तेजस्वी हास्य यामुळे प्रत्येक गोष्ट सुंदर भासेल. त्यानं निवडलेला मार्ग समजण्यास अत्यंत कठीण असेल आणि त्याच्या कृती गूढ असतील. त्याची बुद्धिमत्ता सखोल असेल आणि तो आपल्या समृद्धीचं रक्षण करेल.

असंख्य गुण आणि महान गोष्टींचा तो एकमेव स्वामी असेल. वरुणाप्रमाणंच, पृथूचा स्वभावही समजणार नाही. त्याच्यावर हल्ला करणं आणि त्याच्या आक्रमणासमोर टिकणं अशक्य ठरेल. निकट असला, तरी तो दूर असल्यासारखा भासेल. वेणाचा हा पुत्र अजिंक्य असेल. सर्व प्राणिमात्रांच्या हालचाली उघडपणानं सुरू आहेत, की गोपनीय खलबते सुरू आहेत, हे तो आपल्या गुप्तचरांच्या मदतीनं जाणून घेईल. शरीरात अखंडपणानं चालणाऱ्या श्वासोच्छवासाप्रमाणंच तो सर्व घटनांचा सर्वसाक्षी असेल.

एखादी व्यक्ती शिक्षेस पात्र नसल्यास, मग ती व्यक्ती शत्रूचा पुत्र असली, तरी तो तिला शासन करणार नाही. तो स्वतःच्या पुत्रांनाही शासन करेल. त्यानं केलेलं शासन हे धर्माला अनुसरूनच असेल. मानस शिखरापर्यंत पृथू अनिर्बंध सत्ता गाजवेल.’ पृथूनं पृथ्वीचं दोहन केलं. ही कथा आपण पुढील सदरात पाहू.

अनुवाद : सारंग खानापूरकर

(लेखक पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून, पुराणे आणि वेद यांचा, तसंच भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत खळबळ! मध्यप्रदेशातील तरुण मराठा आंदोलनात घुसला अन्..., मराठ्यांनी रंगेहात पकडलं, व्हिडिओ पाहा

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली कलरफुल फीचरची एन्ट्री; कसं वापरायचं? पहा एका क्लिकवर

Narhari Zirwal : शेतकऱ्यांचे कर्ज आणि व्याजमाफीसाठी थेट मुख्यमंत्र्यांशी बैठक; मंत्री झिरवाळांचे आश्वासन

Latest Marathi News Updates: हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे - न्यायमूर्ती

Maratha Reservation: 'मुंबईतील आंदोलकांसाठी शिदोरी रवाना'; बारडगाव सुद्रिक, भांबोरा, कानगुडवाडी ग्रामस्थांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT