सप्तरंग

स्वराज्याचं आरमारी केंद्र - कुलाबा किल्ला

अरविंद तेलकर

वीकएंड पर्यटन
महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी ओळखलं आणि काही सागरी किल्ले जिंकून घेतले आणि काही किल्ले नव्यानं बांधले. अलिबागचा जंजिरा, कुलाबा हा त्यापैकीच एक. अलिबागचा कुलाबा किल्ला जलदुर्ग असला, तरी तिथं चालतही जाता येतं. मात्र त्यासाठी समुद्राच्या भरती-ओहोटीची वेळ तपासून पाहावी लागते. भरतीच्या वेळी हा जलदुर्ग असतो आणि ओहोटीच्या वेळी काही प्रमाणात भुईकोट होतो.

कुलाबा किल्ल्याच्या शेजारीच आणखी एक जलदुर्ग आहे. सर्जेकोट असं त्याचं नाव. कुलाबा किल्ला ज्या खडकावर बांधण्यात आला आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर आणि पूर्व-पश्‍चिम रुंदी १०९ मीटर आहे. कुलाब्याचं बांधकाम त्यांनी १९ मार्च १६८०मध्ये सुरू केलं. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी जून १६८१मध्ये ते पूर्ण केलं. कुलाबा किल्ल्याचं महत्त्व वाढलं, ते आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीपासून. त्या काळात याच किल्ल्यातून ते आरमारी डावपेच आखत असत. कान्होजी आंग्रे यांचं ४ जुलै १७२९ रोजी याच किल्ल्यात निधन झालं. त्यानंतर १७७०मध्ये किल्ल्याच्या पिंजरा बुरुजाजवळ लागलेल्या आगीत अनेक बांधकामं नष्ट झाली. त्यानंतर पुन्हा १७८७ मध्ये आग लागली. त्यात आंग्य्राचा वाडा बेचिराख झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटिश आणि पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्यानं युद्धनौकांसह कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला; पण त्यात त्यांना दारुण पराभव सहन करावा लागला.

या किल्ल्याचं बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. तटबंदी बांधताना भलेमोठे चिरे एकमेकांवर नुसते रचले आहेत. त्याचा भक्कमपणा वाढवण्यासाठी त्यात चुना भरलेला नाही. याचं कारण असं, की समुद्राच्या लाटा तटाच्या भिंतींवर आपटल्यानंतर पाणी दगडांच्या या फटींमध्ये शिरतं आणि लाटांचा जोर कमी करतं. किल्ल्याचं प्रवेशद्वार अद्याप शाबूत आहे, मात्र दुसरं प्रवेशद्वार अवशेषांच्या रूपात शिल्लक आहे. या जलदुर्गाला एकूण १७ बुरूज आहेत. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारूखानी अशी नावं देण्यात आली आहेत. हा किल्ला पाहण्यासाठी भरती-ओहोटीचं गणित लक्षात ठेवावं लागतं. ओहोटी असली, तरी गुडघाभर पाण्यातून जावं लागतंच. ज्यांना पाण्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी अलिबागच्या किनाऱ्यावरून घोडागाड्याही आहेत. सर्जेकोट छोटेखानीच आहे. त्यात एक गोड्या पाण्याची विहीर, दारूगोळ्याचं कोठार आणि एक छोटं मंदिर आहे.

कुलाबा किल्ल्यात दोन बुरुजांच्या मधोमध असलेल्या महाद्वारातून प्रवेश करावा लागतो. महाद्वारावर परंपरेनुसार नगारखाना आहे. दरवाजावर पशु-पक्ष्यांची शिल्पं आहेत. गणेशाचंही एक शिल्प आहे. किल्ल्याचं महाद्वार किनाऱ्याच्या दिशेनं असलं, तरी प्रवेशानंतर वाट ईशान्य दिशेला वळविली आहे. किल्ल्यात गेल्यानंतर उत्तरेला तटातच गोलाकृती खांबांनी तोलून धरलेल्या चार घुमटांच्या छत असलेल्या वास्तूत, त्या काळी धान्याचं कोठार होतं. प्रवेशद्वाराच्या डावीकडं जाणाऱ्या वाटेवर भवानी माता, पद्मावती आणि गुलवती देवीची मंदिरं आहेत. त्यापैकी गुलवती देवीचं मंदिर मोठं आहे. त्याच्याच पुढं निवासी वाडे, घोड्यांच्या पागा आणि कोठ्यांचे अवशेष दिसतात. इथून डावीकडं जाणारी वाट हजरत कमालुद्दीनशहा दरबार यांच्या दर्ग्याकडं जाते. परतीच्या वाटेवर आंग्र्यांच्या वाड्याचे अवशेष आणि राघोजी आंग्रे यांनी १७५९मध्ये बांधलेल्या सिद्धीविनायकाचं मंदिर लागतं. मंदिराच्या आवारातच मारुती आणि शंकराची मंदिरं आहेत. मंदिरासमोरच एक गोड्या पाण्याची पुष्करणी आहे. तिथून जवळच गोड्या पाण्याची पायऱ्यांची विहीर आहे. किल्ल्याच्या तटातच गोदीचे अवशेष आहेत. त्या काळात तिथं नवीन गलबतं बांधली जात आणि जुन्यांची दुरुस्ती केली जात असे. उत्तरेच्या एका बुरुजावर दोन चाकं असलेल्या ब्रिटिश तोफा आहेत. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला चालत जाता येतं. या दोन्ही किल्ल्यांमध्ये जाण्या-येण्यासाठी दगड टाकून वाट तयार करण्यात आली होती.

अलिबाग परिसरात इतरही काही ठिकाणांना भेट देता येईल. त्यात कनकेश्वर मंदिर, खांदेरी, उंदेरी, चौल, गणेश मंदिर, कान्होजी आंग्रे यांची समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड-जंजिरा, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला यांचा समावेश आहे. त्याशिवाय किहीम, नवगाव, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस, चौल, मांडवा, काशीद हे समुद्रकिनारे आहेत.

कसे जाल ः पुणे-मुंबई महामार्गानं १४३ किलोमीटर, ताम्हिणी घाटातून ७३ किलोमीटर, मुंबईहून गोवा महामार्गानं सुमारे ९५ किलोमीटर.
कुलाबा किल्ल्यात राहण्याची सोय नाही; परंतु अलिबागमध्ये निवास आणि भोजनाची उत्तम सोय आहे. निवासासाठी ऑनलाइन बुकिंगही करता येईल. शहरात अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. त्याशिवाय होम-स्टेदेखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT