शॉर्टसर्किट होऊ देऊ नका !
पत्रिकेतील बारा भावांचा प्रपंच मांडणारे ज्योतिष माणसाच्या जीवनाविषयीचा भावच किंवा माणसाची जीवनदृष्टीच अजमावण्याचा प्रयत्न करते. माणसाची प्रकृती ही त्याच्या शरीरभावालाच अनुसरून पोसली जाते. माणसाची आवडनिवड सांभाळणारा हा शरीरभाव मोठा अजब आहे. माणसाच्या या आवडीनिवडींचा हा घोळ माणसाच्या मृत्यूपर्यंतही साथ सोडत नाही. एवढंच काय, तर हा आवडीनिवडींचा पिंड म्हणा, मृत्यूनंतर बाराव्या दिवशी पिंडदानातून मुक्त होतो म्हणे !
माणसाचा असा हा जीवनप्रवास अजब आणि गूढ आहे. देह देवाचे मंदिर अशी श्रद्धा बाळगणारा माणूस नावाचा प्राणी देवानं दिलेल्या देहात आपलं दैव उपभोगत असतो, असेच म्हणावं लागेल. माणसं जपणारा, माणसं पोसणारा किंवा सभोवताली माणसं गोळा करून जीवनाच्या सभामंडपात समारंभ घडवून उत्सवमूर्ती होणारा माणूस फलज्योतिषाचे गूढ होऊन राहिला आहे! सप्ताहात बुध-मंगळ युतीयोग होत आहे, तसेच रवी-गुरू प्रतियुतीही होत आहे. बुध हा बुद्धीचा कारक आहे, तर मंगळ हा कृतीचा कारक आहे. मंगळ हा माणसाच्या देहाचे हार्डवेअर आहे, तर बुध माणसाच्या अंतरंगाचे सॉफ्टवेअर आहे. बुद्धी ज्यावेळी मन आणि अहंकाराच्या ताब्यात जाते त्या वेळीच मंगळाचे हार्डवेअर आवाज काढू लागते. माणसाचे मन अहंकाराच्या उरावर बसून बुद्धीला बाहेर नाचवू लागते आणि बुद्धी आवडीनिवडींच्या तावडीत सापडत सुख-दुःख अनुभवते आणि यातूनच राग, द्वेष आणि मत्सर हे त्रिकूट माणसाला अक्षरशः जळवतं किंवा फ्राय करते! मग या मंगळाच्या देहरूपी हार्डवेअरचा उच्च दाब वाढून शॉर्टसर्किट होऊन कधी-कधी मोठा स्फोटही होतो !
मित्रहो, सध्या माणसाच्या जीवनातील प्रक्षोभ वाढलाय. माणसाला आपल्या आवडीनिवडींना मुरड घालत जगावं लागतंय. माणसाच्या मनाचा कोंडमारा इतका वाढला आहे, की त्याच्या देहरूपी हार्डवेअरचे कधीही शॉर्टसर्किट होऊ शकते. तरी कुंभेतील गुरूतत्त्वाचे सॉफ्टवेअर लोड करून सप्ताहात आपला उच्च दाब नियंत्रित करावा!
स्पर्धात्मक यश व धन मिळेल
मेष : सप्ताहात मंगळ-बुध युतीयोगाचे फिल्ड दुखापतीच्या घटना घडवू शकते. बाकी तरुणांना हाच मंगळ ता. १९ व २० या दिवसांत विशिष्ट स्पर्धात्मक यश देईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० चा शुक्रवार धनवर्षावाचा. शनिवारी गर्दीच्या ठिकाणी जपा.
मनपसंत गाठीभेटी होतील
वृषभ : सप्ताहात गृहिणींनी घरात भाजण्या - कापण्यापासून सावध रहावे. बाकी कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह रवी-गुरूच्या शुभ योगातून मोठे ग्लॅमर देणारा. व्यावसायिक मरगळ जाईल. काहींना ओळखी - मध्यस्थीतून उत्तम विवाहस्थळं येतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना २० चा शुक्रवार मनपसंत गाठीभेटींचा. शनिवारी धडपडू नका.
विशिष्ट प्युअर सीक्वेन्स लागतील
मिथुन : मृग नक्षत्रांच्या व्यक्तींच्या जीवनात विशिष्ट प्युअर सीक्वेन्स लागतील. वैवाहिक जीवनातून प्रेमळ संवाद आणि विशिष्ट भाग्योदय. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-मंगळ योगांतून ता. १६ व १७ या दिवसांत स्फोटक भांडणाचे प्रसंगांना सामोरे जावे लागेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार छानच.
सुवार्ता मिळतील, वसुली होईल
कर्क : सप्ताहात सतत काही दुखत-खुपत राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस अनेक प्रकारांतून बेरंग करणारे. विचित्र खर्च. खरेदीत जपा. बाकी ता. २० चा शुक्रवार घरात सुवार्तांचा. व्यावसायिक वसुली. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींवर शनिवार सतत संतापण्याचा. स्त्रीचे मांगल्य जपा.
हुकमी यश मिळेल, गुरूबळाचा लाभ
सिंह : राशीच्या मंगळ-बुधाचे एक गुगली फिल्ड राहील. कृपया धावबाद होऊ नका. बाकी रवी-गुरू शुभ योगातून पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट हुकमी यश मिळेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस गुरूबळातून लाभ देतील. व्यावसायिक मोठे करारमदार. शनिवारी मूर्खांशी संवाद टाळा.
व्यवसायात आर्थिक रसद मिळेल
कन्या : मंगळ-बुधाची विकेटकिपिंग राहील. नियमभंग करू नका. सिग्नल पाळा. वागण्या - बोलण्यात संयम ठेवा. उगाच गॉसिपिंग नको. बाकी राशीतील शुक्रभ्रमणास एक गुप्त झरा राहील. त्यामुळेच ता. २० चा शुक्रवार व्यावसायिक आर्थिक रसद पुरवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल.
दैवी प्रचितीचा अऩुभव येईल
तूळ : रवी-गुरू प्रतियुतीची पार्श्वभूमी तरुणांना ता. १८ व १९ या दिवसांत विशिष्ट प्युअर सीक्वेन्स लावून देईल. महत्त्वाच्या कामासाठी फिल्डिंग लावाच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार दैवी प्रचितीचा. शनिवारी सूर्योदयी भांडू नका.
संकटातून सुटका होईल
वृश्चिक : सप्ताहात मंगळ-बुध योगातून मोठे प्रदूषण राहील. नोकरीत गैरसमज टाळा. ता. १६ व १७ हे दिवस उच्च दाबाचे. वागण्या - बोलण्यातील शॉर्टसर्किट टाळा. ज्येष्ठा व्यक्तींनी सांभाळावेच. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस दैवी प्रचितीचे. विशिष्ट संकटातून सुटका!
मानसिक प्रक्षोभ टाळा
धनु : सप्ताहात वैवाहिक जीवनातील विसंवाद टोक गाठू शकतात. मानसिक प्रक्षोभ टाळा. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना ता. १८ ते १९ या दिवसांत विशिष्ट शुभारंभ प्रसन्न ठेवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना बाळसं धरेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना २० चा शुक्रवार मनोरंजनाचा.
अडथळे येतील, पण विजय मिळेल
मकर : सप्ताहात एक प्रकारच्या अडथळ्याच्या शर्यतींतून जावे लागेल. मात्र विजयीच राहाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील नव्या जडणघडणींतून उत्तम दिलासा मिळेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २० चा शुक्रवार लक्ष्मीच्या वरदहस्ताचा. धनचिंता जाईल. शनिवारी सूर्योदयी भांडणं टाळा.
विवाह ठरतील, दुखापती टाळा
कुंभ : सप्ताहात शारीरिक दुखापती जपा. अंगमस्ती टाळा. वृद्धांनी कोणताही आव आणू नये. बाकी रवी-गुरू प्रतियुतीचे संवेदन काहींची मोठी विचारजागृती करेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ ची पुत्रदा एकादशी पुत्रोत्कर्षाची. घरात कोणाचा विवाह ठरेल.
नातेवाइकांचा व्हायरस जपा
मीन : शुक्रभ्रमणाचा गुप्त झरा रसद पुरवेल. सप्ताहातील मंगळ-बुध सहयोग काहींना असंगाचा संग घडवणारा. सप्ताहात नातेवाइकांचा व्हायरस जपा. बाकी श्रावणातले ता. १८ व १९ हे गुरुवार - शुक्रवार उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीचे. व्यावसायिक शुभारंभ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.