डॉ. अमेय पांगारकर
या वर्षात आपण चॅट जीपीटी विरुद्ध ऑथर गिल्ड हा लेखक जॉन ग्रीशम यांनी चालवलेला खटला देखील वाचला. ‘ओपन एआय’ या चॅट जीपीटी निर्माण करणाऱ्या कंपनीद्वारे कथा-पटकथा लेखांच्या पोटावर पाय देण्याचे काम करत असून हे तंत्रज्ञान म्हणजे त्याचे काम पळवण्याचा प्रयत्न आहे, असे याचिकाकर्त्याचे मत होते.
चॅट जीपीटी जर कथा-पटकथा लिहायला लागला, तर लेखकांना मानधन कोण देणार ? असा सवाल अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने काढलेल्या मोर्चात विचारला गेला.
जगप्रसिद्ध ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स-कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाचा नुकताच (३० नोव्हेंबर) पहिला वाढदिवस साजरा झाला. एका वर्षात चॅट जीपीटी आणि यासारख्या असंख्य कृत्रिम प्रज्ञेवर आधारित टूल्सनी जगामध्ये हलकल्लोळ माजवला.
सर्वदूर या साधनांची चर्चा सुरू झाली, त्याद्वारे अनेकविध नोकऱ्यांवर गदा आली, भीतीचं सावट पसरलं. ‘न भूतो न भविष्यती’अशी परिस्थिती या तंत्रज्ञानामुळं आपण सर्वांनी अनुभवली. सामाजिक, आर्थिक, शारीरिक अशा विविध बाजूंनी ‘एआय’मुळं होणारे दूरगामी परिणाम आपण ऐकले, वाचले.
रोजच्या दैनंदिन आयुष्यापासून नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात अगदी चांद्रयान-३ पर्यंत सगळ्या ठिकाणी ‘एआय’ साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा समावेश यशस्वीरित्या आपण बघितला. भारत हा सध्या ‘एआय’ टूल्स वापरणाऱ्यांमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे लक्षात घेता,
या वर्षात खरं काय घडलं, आपल्या आयुष्यात यामुळं खरंच उलाथापालथ झाली/ होऊ शकते का? याबद्दल इथं आढावा घेऊया.
२०११ पासून गेल्या १२ वर्षांत मानवाची झालेली प्रगती ही त्या आधीच्या जवळपास शतकात झालेल्या प्रगतीएवढी आहे. म्हणजे या एका तपामध्ये माणसाला ‘शिंगं’ फुटली का? माणूस खोटं बोलतो/वागतो आहे.
मग या एका तपामध्ये असं काय बदललं ? गेल्या काही वर्षांत डिजिटल, इंटरनेट, एआय या अनेक गोष्टींमुळं प्रगती-बदल यांचा वेग सुसाट झाला आहे. जवळपास वायुवेगाने हे तंत्रज्ञान फोफावत आहे. एक दशलक्ष लोकांनी वापर करायला सुरवात करणे हे मोजमाप लक्षात घेतलं,
तर दूरध्वनीला उणीपुरी ७५ वर्ष लागली, मोबाइलला १० वर्ष, नेटफ्लिक्सला ३.५ वर्ष, फेसबुक/इंस्टाग्रामला काही महिने, तेच चॅट जीपीटीने ५ दिवसांत केले. हा सुसाट वेग पकडणे जिकिरीचं झालं आहे.
‘एआय’चा वापर करून बनवलेलं एक चित्र ‘एडमंड डे बलेमी’ हे चार लाख बत्तीस हजार अमेरिकन डॉलरला क्रिस्टी ऑक्शन हाउसनं न्यूयॉर्कमध्ये विकले.
तर सोनीने भरवलेल्या छायाचित्र स्पर्धेतील दुसरे परितोषिक ‘एआय’चा वापर करून बनवलेल्या छायाचित्रास मिळाले. नवी दिल्ली न्यायालयाने प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेता अनिल कपूर यांचा आवाज, साधर्म्य असेलेल्या चेहरा अथवा इमोजी याचा वापर करण्यावर बंदी आणली.
एखादी वस्तू विकत घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी लागणारा वेळ याविरुद्ध ‘एआय’ असलेले ई कॉमर्स मोबाइल ॲप यामध्ये जमीन-आसमानाचा फरक दिसतो. दिवसातील सरासरी जवळपास ७ तास ४२ मिनिट भारतीय माणूस मोबाइलवर घालवतो.
यामुळं आता ‘एआय’ला तुमचा स्वभाव, वागणं, संवाद (विसंवाद) यातील मथितार्थ माहीत आहे. त्यामुळे एका मोबाइल ॲपवरून तुम्ही पुण्याहून बंगलोरला जायचे विमानाचे तिकीट काढले, तर तुम्ही दर काही महिन्यांनी बंगलोर ऑफिसच्या कामासाठी जाता अमुक ठिकाणी / परिसरात राहता, काय खाता-पिता हा सगळा व्यक्ती आधारित ‘बिग डेटा’ आता माहिती आहे.
त्याचा अभ्यास करून तुम्ही तिकीट काढल्यानंतर जर ई कॉमर्स ॲप उघडून शर्ट शोधत असाल, तर एआयच्या अंतर्भावामुळे तुम्हाला बंगलोरच्या हवामानाला अनुसरून आणि ऑफिसला वापरता येईल, तुमच्या ‘सुंदर’ चेहऱ्याचा आणि आकारमानाचा विचार करून, खिशाला परवडेल अशा ब्रॅण्डचा फॉर्मल शर्ट तुमच्यासाठी ते ई कॉमर्स ॲप निवडून देते.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयातदेखील ‘एआय’ चा वापर करून जुन्या खटल्यांचा अभ्यास करून वेळोवेळी पुरावे म्हणून अभ्यास करता यावा यासाठी ‘सुपेस’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये शोध निबंध,
प्रबंध लिहिण्यासाठी त्यावर रिसर्च करण्यासाठी देखील काही टूल्स विकसित झाली आहेत. एका प्रख्यात इंजिनीअरिंगच्या प्राध्यापकानं दिलेल्या माहितीनुसार दोन पीएचडीचे विद्यार्थी व सात इंटर्न यांनी सहा महिने केलेले काम एआयने टूल्सच्या मदतीने एका आठवड्यात झाल्याचं सांगितलं.
‘दुकान’ या स्टार्टअपनं त्याच्याकडील ९० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली कारण ही माणसे जी काम करत होती, तेच काम ९० ते ९५ टक्के कमी खर्चात एआय चॅटबॉट द्वारे होऊ लागले. बऱ्याच कंपन्यांमध्ये ‘एआय’ साधनांचा वापर करून त्याचे एकजिनसी,
कष्टप्रद, वेळखाऊ काम सहजरीत्या होत असल्याचा प्रत्यय आला. दोनतीन तास चालणारं काम काही सेकंदांत होऊ लागलं, यावरून पुन्हा जाणवलं, याचा सुसाट वेळ अचंबित करणारा आहे.
१) एका ओळखीच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी गेलो होतो म्हणून विचारपूस करायला मालक आला. त्याला त्याचा क्लाउड किचनसाठी लोगो आणि वेबसाइट करून हवी होती. गप्पा मारताना माहिती मिळाली. प्रसाद व माधवी या सहकाऱ्यांनी जेवणाचे बिल येईस्तोवर ग्राहकाला आवडेल असा लोगो व वेबसाइट बनवून होस्ट देखील केली.
२) एमबीए महाविद्यालयांमध्ये एआय टूल्स ते प्रात्यक्षिकांचे वर्कशॉप घेत असताना, आम्ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांना रोज लागणारे प्रेझेंटेशन, रिपोर्ट, एक्सेलप्रणीत ग्राफ्स एआय टूल्सचा वापर करून निमिषार्धात बनवायला शिकवली. अभ्यास करताना सेल्फ स्टडी, रिविजन करताना प्रचंड प्रमाणात फायदा झाल्याचे विद्यार्थ्यांकडून कळले.
३) लार्ज लँग्वेज मोड्युल्सचा वापर करून अनेक एआय टूल्स मार्फत चॅटबॉट्स बनवले जात आहेत.
४) मिड जर्नी, आय्दियोग्राम, कॅनव्हा इ. साधनांद्वारे आपल्याला हवे असलेले क्रिएटिव्ह आज बनवता येतात. ते वापरून अनेक पुस्तकं, दिवाळी अंक, रिपोर्ट्स, प्रिंटमधील डिझाइन सध्या बनवले जात आहेत.
५) इंटेरिअर डिझाइन आर्किटेक्चर या क्षेत्रात एआयद्वारे काही प्रमाणात डिझाइन, ३-डी मॉडेल्स बनवले जात आहेत.
६) एखाद्या क्लिष्ट डेटाचे आकलन करून समर्पक रूपात मांडणी करण्यासाठी देखील एआय टूल्स आहेत.
७) चेहरा/ फोटो पाहून कुठला रंग/ ब्रॅण्डकडे तुमची ओढ जास्त असेल आणि त्या अनुरूप काही जाहिराती तुम्हास दिसणं हे आता नवीन राहिलेले नाही.
८) कायदेशीर पत्र, मसुदा, उत्तर, कॉन्ट्रॅक्ट लिहून घेण्यासाठी विविध एआय टूल्स वापरली जात आहेत.
९) कुठल्याही क्षेत्रातील एक जिनसी कंटाळवाणे ऑटोमेट करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधील काही भागासाठी या एआय टूल्सचा वापर सर्रास होताना दिसतो.
१०) एखाद्या विषयावर ब्लॉग पॉड्कास्ट व्हिडिओ संगीत निर्माण करण्यासाठी ढिगानी एआय टूल्स आणि इंटरनेट उपलब्ध आहेत.
एआयचा वापर करून नोकरीसाठीची निवड प्रक्रिया सुलभ करण्याचे प्रयत्न झाले. याद्वारे होणाऱ्या निवड प्रक्रियेत मला काही त्रुटी जाणवल्या. तांत्रिक बाजू जर लक्षात घेतली, तर एआय आपल्याला पचनसंस्थेसारखे काम करते.
आपण जे खाद्य त्याला पुरवू त्यावरच आधारित निर्णय प्रक्रिया घडते. आता पुरवली गेलेली माहिती अपुरी असल्यास अथवा त्याचा संदर्भ चुकीचा असल्यास तंत्रज्ञानाद्वारा लावला जाणारा निकाल हा संपूर्णतः योग्य असेलच नाही.
उदाहरण द्यायचं असल्यास, या माहितीच्या आधारे कदाचित एखाद्या कंपनीमध्ये एचआर साठी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्राधान्य देऊन निवड प्रक्रियेत हा वेगळाच निकष नव्याने वाढवेल. उत्तरदायित्वाचा अभाव हा देखील याचा दुष्परिणाम म्हणायला हवा. या संदर्भात स्वयंचलित कारमुळे झालेल्या अपघातात कोणाला दोषी ठरवायचे या उदाहरणाकडे बघता येईल.
सर्जनशीलता, संवेदना, अनुकंपा या मानवी भावभावना आणि याबाबतची अनास्था त्रासदायक आहे. सर्वसामान्यांमध्ये तंत्रज्ञानावरील अधिकाधिक अवलंबन, त्याचं अवडंबर माजवणं हे खरंच धोकादायक आहे.
वाढता आळशीपणा एकलकोंडेपणा, एकाकीपणा, भावनांचा उद्रेक हे सगळं स्वाभाविकच आहे. नोकऱ्यांची शाश्वती नसल्यानं म्हणा किंवा एकूणच पुढं काय याबद्दलची अस्पष्टता यामुळं मानसिक त्रास वाढणार हे नक्की.
याच वेगानं तंत्रज्ञान वाढलं तर आणि आपण स्वतःला अपडेट नाही केले तर नजीकच्या काळात लोकांना काम नसेल आणि मग अशा बेरोजगार सुशिक्षित लोकांना पोसायला सरकारलाच दरमहा त्यांना त्यांना काही पैसे द्यावे लागतील की काय, अशी भीती वाटत आहे.
भविष्यात माणसांऐवजी रोबोकडून कर वसूल करण्याबाबतची चर्चा देखील ताजीच आहे. डीप फेक आणि त्यापासून बचाव करण्यासाठी सरकार अनेकविध प्रयत्न करत आहे. कोबॉट या तंत्रज्ञानामुळे माणूस आणि यंत्रमानव परस्परपूरक कामे करतील.
काहीतरी करायला सांगणे आणि योग्य पर्यायाची निवड मानवाने करणे हा प्रकार उदयास येईल. या मार्गाने विचार केला तर नोकऱ्यांचे बदलते रूप आपल्याला जाणवेल. भांडवलशाही जगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर ज्यांचा ताबा त्याला अधिक मान मिळेल.
हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. ज्या पद्धतीनं गाड्यांचा शोध लागल्यावर बैलगाडी, घोडागाडी चालकांना स्वतःला अपडेट-अपग्रेड करावे लागले तसेच आज आपल्या सर्वांना करावे लागणार, यात शंका नाही.
भारतातील नागरिक आता डिजिटल आणि मोबाइल तंत्रज्ञानात एकरूप झालेले दिसतात. अतिशय वेगाने आपण सगळ्यांनी इंटरनेटचा स्वीकार केला. कोणीही न शिकवता (अत्यंत जटिल) व्हाॅट्सॲप,
गुगल पे सारख्या ॲपचा वापर करून आपले व्यवहार, संभाषण, दैनंदिन कामकाज यात आमूलाग्र बदल केले तसेच ‘एआय’चे आपण स्वागत करू. त्याचा अभ्यास करू. योग्य तो वापर करू. भविष्यात भारत ही जगाची ‘एआय’राजधानी बनेल, असा मला विश्वास आहे.
(लेखक टेड एक्स स्पीकर आहेत. डिजिटल मार्केटिंग, ए आय आणि मेटार्व्हस या क्षेत्रात ते कन्सल्टन्सी करतात विविध मॅनेजमेंट महाविद्यालयात अध्यापक तसेच विविध पुस्तकांचे लेखक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.