red flag sakal
सप्तरंग

‘रेड फ्लॅग’ का शोधायचे?

‘रेड फ्लॅग’ फॅड म्हणजे आपल्या मराठीतली धोक्याची घंटा किंवा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा.

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

‘रेड फ्लॅग’ फॅड म्हणजे आपल्या मराठीतली धोक्याची घंटा किंवा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा. समोरच्या माणसात मनासारखा गुण सापडला नाही की त्याला ‘रेड फ्लॅग’ संबोधण्याचं खूळ हल्ली दिसतंय. इतरांचे ‘रेड फ्लॅग’ मोजण्यापेक्षा आपल्यातले न्यून दूर करण्यात गैर असं काय आहे?

‘जेनझी’ मुलं आणि इन्स्टाग्राममुळे रोज नव्याने आधी न ऐकलेले कितीतरी शब्द माहीत होतात. त्या शब्दांच्या वापराचा अट्टहास प्रत्येक जण करतो. कधी यात संज्ञा असतात, तर कधी सुटे शब्द... कधी विशेषण, कधी शब्दप्रयोग. याच सगळ्या गोतावळ्यातला एक शब्द म्हणजे ‘रेड फ्लॅग’. आठ दिवसांपूर्वी एका इन्स्टाग्राम पेजवर ‘रेड फ्लॅग’विषयीचं मीम पाहिलं. त्यातला डार्क ह्युमर फार आवडला.

आता ‘रेड फ्लॅग’ फॅड म्हणजे आपल्या मराठीतली धोक्याची घंटा किंवा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा हे आधी लक्षात घ्या आणि पुढचं वाचा. तर, ते मीम असं होतं की ‘रेड फ्लॅग सगळीकडेच आहेत; पण आवडत्या लाल छटेचा रेड फ्लॅग निवडण्याची मुभा आपल्याला असते.’ अनेक मीम पाहण्यात येतात.

त्यातलं हे मीम विशेष ध्यानात राहिलं ते ‘रेड फ्लॅग’ मोजत राहण्याच्या आणि ते दिसलं की ती व्यक्ती, ठिकाण, नातं यांपासून दूर जाण्याच्या फॅडमुळे. नोकरीच्या ठिकाणी मॅनेजरपासून आयुष्यातल्या जोडीदारापर्यंत जिकडे-तिकडे जरा जरी समोरच्या माणसात स्वतःच्या मनासारखा गुण सापडला नाही की त्याला ‘रेड फ्लॅग’ संबोधण्याचं खूळ हल्ली सगळीकडे दिसतंय.

या सगळ्यात मला त्या मीमचा अर्थ ‘उणिवा सगळ्यांतच असतात. आपण कुणाच्या उणिवा दूर करू शकतो, झाकू शकतो किंवा त्या पूर्ण करण्यासाठी पूरक आहोत याचा शोध घेणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे’ असा काहीसा उमगला आणि मग समजलं, जशा त्या इतरांमध्ये आहेत तशा आपल्यातही आहेत.

इतरांचे ‘रेड फ्लॅग’ मोजण्यापेक्षा आपल्यातले असे ‘रेड फ्लॅग’ दूर करण्यात गैर असं काय आहे? त्याकडे चॅलेंज म्हणून पाहिलं आणि ते स्वीकारून कामाला लागलं तर... या ‘तर’मध्ये अनेक शक्यतांचा उगम आणि जटील प्रश्नांची फार सोपी उत्तरं दडलेली आहेत.

आपण एखाद्या परिस्थितीत अडकल्यावर काहीही निर्णय न घेता येणं, ॲक्शन मोडमध्ये न येणं हे सगळं प्रत्येकाच्या बाबतीत होतं; पण माणूस इथे चटकन मी आणि इतर असं गणित करतो. स्वतःच्या बाबतीत झालं तर बॅडपॅच, नियती वगैरे आणि दुसऱ्याच्या बाबतीत झालं तर त्याची कमी असलेली निर्णयक्षमता. पुढे याचाच होतो ‘रेड फ्लॅग’.

आमच्या पिढीला हे ‘रेड फ्लॅग’ स्वतःत आणि इतरांमध्ये प्रत्येकदा दिसतातच असं नाही. मग अशा वेळी मोठे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थाने दुसऱ्यातल्या या उणिवा दाखवत राहतात. उणिवा प्रत्येकात असतात. आपण कुणातल्या उणिवा झाकू शकतो याची जाणीव मुलांना असणं महत्त्वाचं असतं.

याउलट स्वतःकडे पाहिलं तर समयसूचकतेने न वागणं, हायपर होणं, अतिविचार करणं, आधी एक आणि नंतर दुसरं बोलणं, स्वतःच्या सोयीचं तेवढं पाहणं हे आणि असे कितीतरी ‘रेड फ्लॅग’ प्रत्येकात असतात. मग स्वतःचे सोडून इतरांचे का मोजत बसायचे, हा प्रश्न कधी कुणाला का पडत नाही?

माणसाच्या अंगी षडरिपू असणारच इतकी स्वाभाविक गोष्ट आपल्याला अजिबातच मान्य नसते. मग हे ‘रेड फ्लॅग’चे ओव्हर हाईप केलेले झेंडे माणसांना माणसांत फडकवले जातात. म्हणूनच मला सगळीच माणसं, सगळीकडेच गुण - सगळीकडेच दोष जर आहेत तर आपल्याला झेपेल असा मध्यम मार्ग स्वीकारणं महत्त्वाचं वाटतं.

उलट आपले आणि समोरच्याचे ‘रेड फ्लॅग’ आलेच ध्यानात तर ते दूर करण्यासाठी अत्यंत पोटतिडकीने, जीव ओतून एकमेकांना मदत करणंही अतिगरजेचं वाटतं. या मदत करण्यात आपण फार मोठं काही करत नसतो हे आधी नमूद केलेलं बरं.

म्हणजे अगदी काल-परवाची गोष्ट... मला एका फेसबुकवर मैत्री असणाऱ्या ओळखीतल्या माझ्याच वयाच्या मुलीचा कॉल आला. ती ज्या मनस्थितीत आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली अडकून पडली होती त्याने तिचा बराच वेळ आणि शक्ती पणाला लागत असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे तिला त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं, हे सुचत नव्हतं.

तेव्हा गप्पा गप्पांमध्ये मी तिला चार पर्याय सुचवले आणि अचानक माझ्याच लक्षात आलं, की आपण एखाद्याला मदत करतो म्हणजे, त्याला अडचणीच्या काळात न सुचणाऱ्या; पण आपल्याला सुचू शकणाऱ्या पर्यायांच्या वाटा दाखवून देतो.

मला वाटतं एकमेकांना, एकमेकांच्या दिशेने चालत येताना जे लाल बावटे दिसतात त्यातही हे अगदीच कामी येऊ शकतं. त्या सात बदकांच्या पिल्लांची गोष्ट ना अगदी तसं. त्यातलं कुरूप पिल्लू स्वतःला जेव्हा पाण्यात पाहतं आणि मग त्याला उमगतं, की इतर त्याचा राग-राग का करतात, त्याचप्रमाणे आधीच दुसऱ्याच्या स्वभावातील ‘रेड फ्लॅग’ शोधण्यापेक्षा स्वतःला पाण्यात पाहून सुधारणा घडवून आणणं जास्त श्रेयस्कर आहे. न जाणो त्या वेड्या कुरूप पिल्लाला आणि इतरांना जसं नंतर समजलं, की रंग वेगळा असलेलं ते पिल्लू राजहंस होतं, तसं आपलं स्वतःच्या आणि इतरांच्या बाबतीत झालं तर...

vishakhavishwanath११@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT