sanjay kalamkar
sanjay kalamkar 
सप्तरंग

World Cup 2019 : उजवीकडं की डावीकडं...? (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com

आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का काय बघा' म्हणत घाबरे होऊन जायचे. बाबांमुळे आम्हालापण हळूहळू कॉमेंट्री ऐकण्याची सवय लागली. मराठीतून समालोचन ऐकण्याची मजा वेगळीच असायची. स्टम्पला यष्टी, बॉलला चेंडू, बॅट्‌समनला फलंदाज, बॉलरला गोलंदाज, विकेटकीपरला यष्टिरक्षक, अम्पायरला पंच असे मराठी शब्द आवर्जून वापरले जायचे. सुशील दोशी नावाचे समालोचक तर गोड अशा ओघवत्या भाषेत समालोचन करायचे ः "गोलंदाज वेगानं धावत आहे...त्यानं वेग घेतला आहे...चेंडू टाकला आहे...आणि उसळलेला चेंडू फलंदाजानं तडकावलेला आहे...ओ हो...झेल उडालेला आहे...चेंडूची हवेतली दिशा पाहून क्षेत्ररक्षक त्या अंदाजानं धावत आहेत...परंतु चेंडू त्यांच्यापासून दूर सीमारेषेच्या बाहेर...आणि मला वाटतं, हा षटकार!!' अशी मराठमोळी कॉमेंट्री ऐकायला मजा यायची. एकदा आम्ही सारे कॉमेंट्री ऐकत होतो. कपिलदेव गोलंदाजीला आला. रेडिओतून एकदम जल्लोष सुरू झाला. मराठीतून समालोचन सुरू झालं ः "कपिलदेवनं धावायला सुरवात केली आहे...प्रेक्षकांनी श्वास रोखला आहे...हा चेंडू अगदी वेगात चांगल्या टप्प्यावर पडला आहे...जोरात तडकावण्याचा फलंदाजाचा प्रयत्न...आणि...ओ हो..दोन यष्ट्या उडालेल्या आहेत...'

रेडिओत एकदम आनंदाचा गलका उसळला. इकडं बाबाही आनंदानं ओरडले. आम्हीसुद्धा टाळ्या वाजवत नाचू लागलो आणि शेजारी पडल्या पडल्या रेडिओ ऐकणारी आजी एकदम ओरडायला लागली ः "लाज नाही वाटत रं, मेल्यांनो! खुशाल आनंदानं उड्या मारिताय. दोन एसट्या (यष्ट्या!) उडाल्यात...एवढा मोठा अपघात झालाया...आरं, ही तर पोरं हाएत; पर तुला बी (बाबांना उद्देशून) कळत नाय व्हय रं, टोंगड्या?'
यावर तर आम्ही अजूनच जोरजोरानं हसून, आजी जे काही म्हणत होती त्याची, मौज लुटली!
***

क्रिकेटबरोबरच "बिनाका गीतमाला' हा गाण्यांचा कार्यक्रमही बाबा न चुकता लावायचे. अमीन सायानी यांचं या कार्यक्रमाचं निवेदन अत्यंत प्रभावी असायचं. "अब अगली पायदान पर होगा ये गीत...' हा त्यांचा मधुर आवाज आणि नंतर लागणाऱ्या फक्कड गाण्याचा आवाज गल्लोगल्ली ऐकू यायचा. त्या काळी रानात जाणाऱ्या शेतकऱ्याच्या, गुरं घेऊन जाणाऱ्या गुराख्याच्या खांद्याला रेडिओ हमखास लटकलेला दिसायचा. आत्ता जसं (टीव्हीचं) "चॅनल बदल' हे वाक्‍य टीव्ही पाहणाऱ्यांच्या तोंडी सतत असतं, तसं त्या वेळी (रेडिओचा) "बॅंड बदल' हे वाक्‍य रेडिओ ऐकणाऱ्याच्या तोंडी नेहमी असायचं. संध्याकाळी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असायचे. आता जसा मोबाईलच्या रेंजचा घोटाळा होतो तसा तो रेडिओच्या बाबतीतही तेव्हा व्हायचा. स्टेशन सुस्पष्ट आणि विनाव्यत्यय ऐकू यावं म्हणून अनेकजण रेडिओ झाडाच्या फांदीला लटकवून ठेवायचे. आवाज अचानक बंद झाला तर लहान पोराला मारावी तशी रेडिओला "झापड' मारली जायची. गप्प झालेल्या गायकाला मग झापडीनंतर लगेच कंठ फुटायचा! (ही "झापडमार टेक्‍नॉलॉजी' फक्त आपल्याच देशात असावी!). त्या काळी रेडिओची इतकी क्रेझ होती की लग्नाच्या हुंड्यात (हुंडा देणं-घेणं बेकायदेशीर असलं तरी!) रेडिओची मागणी व्हायची. नंतर दूरदर्शनसंच अर्थात टीव्ही आले आणि रेडिओला दुय्यम वागणूक मिळू लागली. गावात नवीन आलेल्या टीव्हीचं गावकऱ्यांना खूपच अप्रूप वाटायचं. आमच्या गावात पहिला टीव्ही गावच्या पाटलांच्या वाड्यात आला होता. कुंकू वगैरे लावून त्याची यथासांग पूजा करण्यात आली होती. गावातली बहुतेक सगळी मंडळी हा "सोहळा' पाहायला जमली होती असं आठवतंय. आम्हा साऱ्या लहान पोरांना तर टीव्हीच्या "यांटिना'चं अर्थात अँटिनाचं फारच कौतुक वाटलं होतं. एवढ्याशा काड्यांमधून माणसं घुसून, टीव्हीच्या खोक्‍यात उतरतात तरी कशी याचं आम्हाला कुतूहल होतं. आम्ही बाबांचा डोळा चुकवून पाटलांच्या वाड्यात टीव्हीचे कार्यक्रम पाहायला जायचो. मी रोज पाटलांच्या वाड्यात टीव्ही पाहायला जातो म्हणून आई एकदा बाबांना म्हणाली ः""औंदा पाऊसपाणी चांगलं झालंय. ज्वारी चांगली होईल आपल्याला. काही पोती विकून टीव्ही घ्या'. यावर आजोबा मध्येच ओरडले ः "कशाला पाहिजे ते खोकं? त्यातल्या एका तरी बयाच्या डोक्‍यावर पदर असतोय का?' यावर कडी करत आजी म्हणाली ः "घेतला तर चांगल्या कंपनीचा घ्या, म्हंजी त्यातल्या बायांच्या डोक्‍यावर पदर तरी आसंन!' हे ऐकून बाबा खळखळून हसले आणि टीव्हीचा विषय मागं पडला. मात्र, काही दिवसांतच चौकातल्या तरुण मंडळानं गणेशोत्सवाच्या उरलेल्या वर्गणीतून टीव्ही घेतला. तो चौकातल्या मंदिरात बसवण्यात आला. तो तसा उघड्यावरच ठेवण्यात आलेला होता; त्यामुळं भोवताली चांगलं अंधारून आल्याशिवाय चित्र नीट दिसायचं नाही; पण गावातले लोक उजेड असतानाच जमा व्हायचे. त्या वेळी "सह्याद्री' व "नॅशनल' अशा दोनच वाहिन्या होत्या. बातमीपत्र सांगणाऱ्या बाईंच्या टेबलावर चहाचा कप ठेवलेला असायचा. कधी कधी त्यावर एखाद्‌दुसरी माशी घोंघावताना दिसायची. बातम्या देताना त्या बाई नकळत हातानं ती माशी उडवू पाहायच्या तेव्हा कधी कधी टीव्हीच्या काचेवर बाहेरून बसलेल्या माश्‍या उडायला एकच वेळ यायची...आणि इतक्‍या लांब बसून बाई आपल्या गावातल्या माश्‍या उडवतात तरी कशा म्हणून काहीजणांना खूपच आश्‍चर्य वाटायचं! टीव्हीतलं चित्र कधी स्थिर दिसत नसे. पाण्याच्या लाटा आल्यासारखं ते हलायचं. त्याबरोबर प्रेक्षकही त्यानुसार डोकी हलवायचे. हवामानाचा अंदाज देताना "आज हवामान स्थिर राहील' असं सांगतानाही निवेदक बेसुमार हलायचा, तेव्हा वैतागलेलं एखादं म्हातारं ओरडायचं ः"आरं, त्यो टीवी आडुशाला ठिवा. निसतं वारं घुसतंय तेच्यात.' नंतर मात्र गावात अनेकांकडं टीव्ही आले. मालिका लागल्यावर एकजण माळवदावर उभा राहायचा. दुसरा कुणीतरी दारात थांबायचा. बाकीचं कुटुंब मालिका पाहायचं. टीव्हीतलं चित्र हलू लागल्यावर किंवा त्यात मुंग्या दिसू लागल्यावर दारात थांबलेला मोठ्यानं ओरडायचा ः "अँटिना हलव'
-मग माळवदार उभा असलेला कुणीतरी बांबू घेऊन तयार असायचा. चित्र स्थिर होईपर्यंत, खालून येणाऱ्या सूचनांनुसार तो अँटिना फिरवत राहायचा. चित्र स्थिर होईपर्यंत मालिका संपलेली असायची!
नंतरच्या काळात सर्वच क्षेत्रांत झपाट्यानं प्रगती होत गेली.
काल-परवा मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली ः "आता टीव्हीचं एक नवं मॉडेल येतंय...पाहणाऱ्याला झोप लागली की टीव्ही आपोआप बंद होणार! रिमोटची गरज नाही.'
शेवटी, या प्रचंड वेगानं विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा आयुष्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे ज्याच्या त्याच्या हाती आहे. गौतम बुद्धांची एक जातककथा आहे ः प्रत्येक माणसाजवळ अदृश्‍य रूपात एक किल्ली असते. ती उजवीकडं फिरवली की स्वर्गाचं दार उघडतं. डावीकडं फिरवल्यावर नरकाचं दार उघडतं.'
आजचं तंत्रज्ञान हीसुद्धा अशीच एक किल्ली आहे...ती कुठल्या बाजूला फिरवायची हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT