औरंगाबादमधील चिकलठाणा परिसरात एक ओढा आहे. कुणी त्याला नाला म्हणतं, तर कुणी नदी. रोज या रस्त्यानं जातो-येतो. तो ओढा की नाला नेमकं माहीत नाही. तिथं थांबून स्थानिकांनाही कधी विचारलं नाही. या ओढ्यात कुणी कचरा टाकतं, कुणी सांडपाणी सोडतं. त्यामुळं तिथं थांबलं की दुर्गंधी येते. त्याच्या काठावर एकीकडून हिंदू स्मशानभूमी, दुसरीकडून मुस्लिम दफनभूमी आहे.
हिंदू स्मशानभूमीत रोज किमान एक तरी सरण पेटतं. दफनभूमीत तीन-चार दिवसांतून एक-दोघांवर अंत्यसंस्कार होतात. स्मशानभूमीत ज्वाळा अन् दफनभूमीत फुलं दिसली की सुरुवातीला मन उदास होत होतं. आता रोजचं म्हणून त्याची सवय झाली. चार खांद्यांवर कुणी दिसलं तरीही काहीच वाटत नाही. ओढ्याप्रमाणेच माझ्या संवेदनाही गोठल्या. आता तिकडं पाहतही नाही. एकदा ओढ्यासकट संवेदनाही जाग्या झाल्या. ही गोष्ट याच पावसाळ्यातील. मध्यान्ह रात्रीची. धोऽऽ धोऽऽऽ मुसळधार पाऊस सुरू होता. तो थांबण्याची वाट पाहत ऑफिसलाच थांबलो होतो.
पावसाचा जोर कमी झाला. तो थांबला नव्हताच. तो कधी थांबेल, याची वाट न बघता घरी निघालो. रस्त्यातील या ओढ्याला पूर आला होता. पुलावरूनही पाणी वाहत होतं. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी अलीकडेच थांबलो. इकडून स्मशानभूमी होती, तिकडून दफनभूमी. मधोमध मी. मी बघत होतो, ओढ्याचा पूर स्मशानभूमी, दफनभूमीत शिरला. भिंती, कुंपण घातलेल्या दोन्ही भूमी एक झाल्या. दफनभूमीतील माती अन् स्मशानभूमीतील राख एकमेकांत मिसळली. एकरूप, एकजीव झाली. त्यांनी स्वतःला सामावून घेतलं; कारण मातीला, राखेला धर्म असतोच कुठे? राख झालेला हिंदू, माती झालेला मुसलमान आता एक झाले होते. एकाच धारेत वाहत होते. या भूमीत येण्यापूर्वी ते हिंदू होते.
मुसलमानही होते. पण, आता ते ना हिंदू होते, ना मुसलमान. ते वाहत होते ओढा नेईल तिकडं. ही राख, ही माती एक होऊन दूर कुठे तरी गेली असेल. पाण्यासोबत एखाद्या ‘बी’ला ती भेटली असेल. तिच्यासाठी खत झाली असेल. तिच्या मुळाभोवती लीन होऊन झाडं म्हणून उगवून आली असेल, की पुढे एखाद्या नदीत मिसळून या पाण्यानं एखाद्याची तहान भागवली असेल. मुसलमानाची माती, हिंदूंची राख आता ना हिंदू होती ना मुसलमान. ती मुक्त होती धर्माच्या बंधनातून. आता ओढाही स्वच्छ झाला होता. त्यात असलेला कचरा, मिसळलेलं सांडपाणी अशी सगळी घाण दूर कुठे वाहून गेली होती.
माझ्यासह याचा साक्षीदार होते ते महापालिकेचे पथदिवे, ढगाआड लपलेला चंद्र, जो चंद्र की मुसलमानांना ईदचा आनंद देतो. हिंदूंनाही करवाचौथ, भाऊबीजेच्या दिवशी तो भेटतो; कारण तो ना हिंदू आहे ना मुसलमान. तोच चंद्र ढगाआडून हे बघत होता. पावसानं ओढ्याला स्वच्छ केलं. पण, हिंदू-मुसलमान ही भेदाभेदाची घाण डोक्यातून कधी वाहून जाणार, भारतीय म्हणून आपण कधी एकरूप होणार, हा प्रश्न अस्वस्थ करून गेला. हे सगळं आठवलं ते श्रद्धा-आफताब प्रकरणावरून. पोरगी जिवानिशी गेली; त्याचं दुःख होण्याऐवजी तिची क्रूरतेने हत्या करणारा ‘आफताब’ होता हाच मुद्दा पकडून एका विशिष्ट धर्मातील सगळ्यांनाच ट्रोल करणाऱ्यांवरून. सोबत आठवल्या त्या महाकवी सुधाकर गायधनी यांच्या या ओळीही :
‘सोन्याच्या ज्वाळा
चांदीची राख;
रंकही खाक, रावही खाक’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.