Karad Society Group
Karad Society Group esakal
सातारा

Apmc Election Result: साताऱ्यात कुणाचा 'बाजार' उठणार? आठ बाजार समित्यांसाठी मतदारांचा कौल पेटीबंद

सकाळ डिजिटल टीम

सातारा, ता. ३० : सत्तास्‍थानाची प्रमुख पायरी असणाऱ्या जिल्ह्यातील आठ बाजार समित्‍यांच्‍या निवडणुकीसाठी आमदार- खासदारांसह त्‍यांच्‍या समर्थकांनी पणाला लावलेल्‍या ताकदीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

आपल्‍यापरीने मतदारांना खेचण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍यानंतर अटीतटीच्‍या निवडणुकीसाठी मतदारांनी दिलेला कौल आज पेटीबंद झाला. पेटीबंद कौल उद्या (सोमवारी) उघडला जाणार आहे. त्‍यानंतरच मतदारांनी कुणाचा बाजार बसवला... आणि कुणाचा उठवला, हे स्‍पष्‍ट होईल.

आगामी पंचायत समिती, जिल्‍हा परिषदेसह विधानसभा-लोकसभेच्‍या निवडणुकांची नांदीच या बाजार समितीच्‍या निवडणुकीतून अनेक ठिकाणी पाहावयास मिळणार आहे.

ग्रामपंचायत, सोसायटीनंतर सर्व लोकप्रतिनिधींची सर्व ताकद एकवटली जाते ती बाजार समितीच्‍या निवडणुकीत. तालुक्‍याच्‍या अर्थकारणातील महत्त्‍वाची संस्‍था आपल्‍याच ताब्‍यात ठेवण्‍यासाठी या समितीच्‍या निवडणुकीत राजकारणात सक्रिय सर्वच गट ताकद पणाला लावतात.

या ताकदीमुळे संपूर्ण तालुक्‍याचे व पर्यायाने विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. नुकत्‍याच झालेल्‍या सहकार कायद्यातील बदलानुसार होणाऱ्या या पहिल्‍याच निवडणुकीमुळे गावपातळीवरील वातावरणात गेल्‍या काही दिवसांपासून खडाखडी सुरू होती.

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्‍या सातारा बाजार समितीच्‍या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या अजिंक्‍य पॅनेलला स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या पॅनेलने आव्‍हान दिले आहे. आव्‍हान देणाऱ्या शेतकरी संघटनेच्‍या पॅनेलचे बॅक बोन बनत खासदार उदयनराजे भोसले यांनी गट बांधणी केली आहे.

साताऱ्याबरोबरच वाई, कऱ्हाड, पाटण, वडूज, कोरेगाव, फलटण, लोणंद या बाजार समित्‍यांची निवडणूक स्‍थानिक आघाड्या, राजकीय पक्षांमुळे काटे की टक्कर बनली आहे. प्रचाराचा धुरळा बसल्‍यानंतर आज सकाळी सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठीची लगीनघाई सुरू झाली होती.

सकाळच्‍या टप्‍प्‍यात आपल्‍या प्रभावाखाली असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आणल्‍यानंतर होणाऱ्या खाणाखुणांमुळे मतदान केंद्राबाहेरील वातावरणात काहीसा तणाव होता. मतदानासाठी सुरू असणाऱ्या धावपळीतून अनेक ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग देखील घडले. किरकोळ वाद, आक्षेप, हरकती वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत होती. मतदारांनी प्रक्रियेत हिरिरीने सहभाग घेत मतदान केले आहे. त्‍यातून त्‍यांनी कोणाचा बाजार बसवलाय आणि कोणाचा उठवलाय, हे उद्या मतमोजणीनंतर दुपारीच स्‍पष्‍ट होईल.

संथगतीने मतदान प्रक्रिया

वाई : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सकाळपासून संथ गतीने मतदान सुरू होते. सकाळी ७ ते ९ या वेळेत ८.३८ टक्के, अकरा वाजेपर्यंत २३.९२ टक्के, तर दुपारी एकपर्यंत ४८.६५ टक्के मतदान झाले. संस्था मतदार गटात ८२.६३ टक्के, ग्रामपंचायत गटात ७९.३२ टक्के तर व्यापारी गटात ४८.६५ टक्के मतदान झाले. बाजार समितीच्या १८ पैकी ७ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

उर्वरित ११ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी सात वाजल्यापासून नरसिंह हायस्कूल (धोम), जिल्हा परिषद शाळा (मुगाव फाटा), जिल्हा परिषद शाळा (सुरूर), जिल्हा परिषद शाळा नं. १ (भुईंज), महात्मा गांधी विद्यालय (पाचवड) याठिकाणी प्रत्येकी दोन, तसेच सेंट थॉमस स्कूल वाई येथे चार मतदान अशा १४ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. दुपारी एकपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान झाले. सुरूर येथील मतदान केंद्रावर ग्रामपंचायत सदस्य, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील बैलगाडीतून मतदानासाठी आले.

कोरेगावात कार्यकर्त्यांकडून दोन्ही आमदारांसोबत सेल्फी

कोरेगाव : बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज तालुक्यातील कोरेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन येथील आठ केंद्रांवर सकाळी सातपासून उत्साहात मतदान सुरू झाले. दुपारी प्रचंड उष्मा जाणवत असल्यामुळे दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांसह कार्यकर्ते सकाळी सातपासून मतदारांना केंद्रांवर आणून मतदान करून घेण्याच्या लगबगीत होते.

त्यात त्यांना चांगले यश मिळत होते. मतदारांना सर्रास चारचाकी वाहनांतून आणले जात होते. क्वचित पायी वा दुचाकीवर मतदार येत होते. केंद्रांबाहेर दोन्ही पॅनेलनी टाकलेल्या मतदार मदत केंद्रांवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत होती. दरम्यान, कोरेगाव केंद्राला आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.

बाहेर पडताना आपापल्या बुथवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख होता.

लोणंदला दुपारपर्यंत ७३ टक्क्यांवर मतदान

लोणंद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील लोणंद, शिरवळ व खंडाळा येथील आठ केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत गावागावांतील मतदारांनी एकगठ्ठ्याने वाहनांतून येऊन मतदान केले. दरम्यान, सर्वच मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत तालुक्यात सर्वच केंद्रावर ७३ टक्क्यांपुढे मतदान झाले. एकूण १७९६ पैकी १३०८ मतदारांनी मतदान केले होते.

सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात भाजप, शिवसेना, कॉँग्रेस व अन्य पक्षांनी एकत्र येऊन केलेली महायुतीत लढत होत आहे. दोन्हीही पॅनेलकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे. त्यामुळे सर्वच केंद्रावर चुरशीने मतदान सुरू होते. येथील मतदान केंद्रावर सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी पोलिस कुमक मागवून चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT