विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात उन्हाळी कांद्याच्या लागणी मोठ्या प्रमाणावर होतात. कांद्याची रोपे लागणी योग्य होण्यासाठी 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागत असल्याने रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बी टाकले होते. त्यापैकी काही रोपे ही नुकतीच उगवलेली आहेत, तर काही रोपे लागणीयोग्य झालेली आहेत. मात्र, शनिवारपासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने उगवलेली रोपे मोठ्या प्रमाणावर सडू लागली आहेत, तर काही ठिकाणी रोपे विरळ झाल्याचे चित्र आहे. परिणामी, यंदा कांदा रोपांचा मोठा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लागणीसाठी अपेक्षित रोपे उपलब्ध होणार नसल्याने परिसरातील कांदा उत्पादकांवर दुसऱ्यांदा रोपे टाकण्याची वेळ आली आहे.
सद्य:स्थितीत खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील डिस्कळ, बुध, ललगुण, फडतरवाडी, नेर, विसापूर, पुसेगाव परिसरात परतीच्या मुसळधार पावसाने बहुतांश ठिकाणची कांद्याची रोपे गेलेली आहेत. त्यामुळे लागणीसाठी शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा कांदा रोपे तयार करावी लागणार आहेत. त्यातच घरगुती तयार केलेले कांदा बी संपुष्टात आल्याने नवीन बी खरेदी करून रोपे तयार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे कांद्याच्या बीसाठी शेतकरी सैरभैर फिरताना दिसत आहेत. परिणामी, कांदा बीची टंचाई निर्माण झाली असून, तीन ते साडेतीन हजार रुपये किलोप्रमाणे चढ्या दराने बी खरेदी करावे लागत आहे. एकंदरीत परतीच्या पावसाने येथील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
जी रोपे होती, ती पावसाच्या तडाख्यात सापडून खराब झाली. आता चार हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे महाग बियाणे घेऊन पुन्हा रोपे तयार करावी लागणार आहेत. कांद्याचा उत्पादनखर्च 30 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे चालू वर्षीचा उन्हाळी कांदा हंगाम अडचणीचा ठरणार आहे.
-विकास जाधव, कांदा उत्पादक, पुसेगाव, ता. खटाव
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.