Dengue patients increased in Satara district sakal
सातारा

सातारकरांना डेंगीचा ‘ताप’

तपासणीसाठी सामान्यांची फरफट : जिल्ह्यात बालके फणफणली

प्रवीण जाधव

सातारा - मुलगी चार-पाच दिवस तापाने फणफणत होती, खोकलाही जास्त होता, औषध घेऊन फरक पडत नव्हता, काय करावे हे सूचत नव्हते. वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्त-लघवीच्या तपासण्या करायला लावल्या. तीन दिवसांनंतर रिपोर्टसाठी गेले, तरीही रिपोर्ट आला नाही, म्हणून असेच उत्तर. बरं कधी येईल? विचारल्यावर समोरून उद्धट उत्तरे सुरू, काय करायचे तेच समजत नव्हते. साताऱ्यात सॅम्पल पाठविले, असे सांगितले; परंतु तेथे सॅम्पल आले नसल्याचे समजले. शासकीय रुग्णालयात चांगले उपचार मिळतात, या अपेक्षेने गेले होते; परंतु दिरंगाईबरोबरच सौजन्याचाही अभाव आढळला. नागरिकांनी करायचे तरी काय? मुलीच्या तब्येतीची काळजी करत शुक्ला भिलारे-पाटील सांगत होत्या. या व्यवस्थेत बदल होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. असाच अनुभव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या थोड्याफार प्रमाणात येत आहे.

जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांची लाट असल्यासारखी परिस्थिती आहे. लहान मुलांना तर गेले महिनाभर त्रास होतो आहे. आरोग्य विभाग त्या दृष्टीने सतर्क झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत वेळोवेळी काय- काय करायचे याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यातून बहुतांश ठिकाणी नागरिकांना चांगले उपचार मिळतही आहेत; परंतु काही ठिकाणी निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांमुळे व कार्यपद्धतीतील दिरंगाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या चांगल्या सुविधांना गालबोट लागत आहे. त्यातून सर्वसामान्यांची परवड होते ती वेगळीच.

खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी येणारा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे त्याचबरोबर अत्यल्प शुल्कात चांगल्या सुविधा मिळत असल्याने नागरिक शासकीय रुग्णालयांमध्ये जातात. शासनानेही तोच विचार करून ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती केली आहे. विविध तालुक्यांतील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये, त्यांच्याच जवळच्या ठिकाणी सुविधा व्हावी, हा या मागचा उदात्त विचार आहे; परंतु त्याला हरताळ फासणाऱ्यांवर कारवाईसाठी वरिष्ठांनी कडक धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना योग्य वर्तणूक मिळालीच पाहिजे, यासाठी ठोस धोरण आखणे गरजेचे आहे.

डेंगीच्या तपासणीची शासकीय पातळीवर सोय करण्यात आली आहे; परंतु तपासणीची सुविधा केवळ जिल्हा रुग्णालयातच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयातून घेतलेले रक्त जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते; परंतु ९० सॅम्पल असले तरच यंत्रामध्ये सॅम्पल घातले जातात. त्यामुळे कमी सॅम्पल आल्यास रिपोर्टसाठी वेळ लागतो.

आरोग्य : श्रम की सेवा?

राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, ‘‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले।। तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’ याच वर्तनाचे तंतोतंत पालन होण्यासाठी परंपरेमध्ये आरोग्य विभागात काम करणाऱ्यांच्या श्रमाला काम न म्हणता सेवा म्हटले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वर्तनावर एक वेगळी जबाबदारी येते. येणाऱ्या रुग्णांशी योग्य पद्धतीने संवाद राखत त्याच्या मानवी हक्कांची जपणूक करण्याची जबाबदारी प्रत्येक आरोग्य सेवेतील व्यक्तीवर असते. तो समाधानी होईल, त्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असते. तशीच नागरिकांना योग्य सेवा न मिळाल्यास त्यासंबंधी गाऱ्हाणे मांडण्याचा हक्क व व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. आरोग्य सेवा असे का म्हटले आहे, याचा मथितार्थ व त्यातून येणाऱ्या जबाबदारीची जाणीव प्रत्येक आरोग्य सेवा देणाऱ्यात येते. ज्यांना ही जाणीव नाही, ती वरिष्ठांनी आणून दिली पाहिजे. शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेत असताना नागरिकांना अनेक समस्या व अनुभव येतात. या समस्या सोडविण्यासाठी ‘सकाळ’ आपल्या सोबत आहे. आपले अनुभव व सूचना आपल्या नावासह ९६०४५८५७९२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कळवा.

अहवाल आला नाही तरी घाबरू नका

डेंगी हा प्राणघातक होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे अहवाल मिळाला नाही, म्हणून घाबरून जाण्याऐवजी योग्य पद्धतीने उपचार घेत राहणे, हाच या आजारावरील मार्ग आहे. योग्य आहार, द्रवपदार्थ व आराम या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास रुग्ण बरा होतो. त्याबरोबर डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे सेवन करत राहायचे. डासांची संख्या कमी करण्यात किंवा त्यांना दूर ठेवणे हा यावरचा प्रतिबंधक उपाय आहे.

आकडे बोलतात

१ - जिल्हा रुग्णालय

३ - उपजिल्हा रुग्णालय

महिनाभरातील डेंगीची स्थिती

२३० - तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या

११४ - पॉझिटिव्ह रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या काय आहे आजची किंमत ?

Dhurandhar Trailer Launch : रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर येतोय!

बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Latest Marathi Breaking News : सबरीमाला मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी ४१ दिवसांचे उपवास अनिवार्य

Suhana Swasthyam 2025 : ‘फूडफार्मर’ रेवंत यांचे ‘स्वास्थ्यम्’मध्ये व्याख्यान; खाद्यपदार्थांवरील लेबल्स वाचायचे कसे, हे कळणार सोप्या शब्दांत

SCROLL FOR NEXT