Lonand Nagar Panchayat Election
Lonand Nagar Panchayat Election esakal
सातारा

NCP, BJP, काँग्रेससह शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार

रमेश धायगुडे

काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीनेही तीच वाट चोखाळली आहे. भाजप, शिवसेनाही त्याच मार्गावर आहेत.

लोणंद (सातारा) : नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या (Lonand Nagar Panchayat Election) पार्श्वभूमीवर येथील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. प्रत्येक प्रभागात मतदार व कार्यकत्यांच्या बैठकांद्वारे कानोसा घेऊन उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), काँग्रेस, भाजप व शिवसेना आदी सर्व पक्षांनी स्वतंत्र पॅनलद्वारे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीनेही तीच वाट चोखाळली आहे. भाजप (BJP), शिवसेनाही त्याच मार्गावर आहेत. त्यामुळे आघाडी व युतीची शक्यता जवळपास धूसर झाली आहे. त्यातून गतवेळची निवडणूक सर्व पातळ्यांवर सर्वकाही शिकवून गेल्याने येथील तरुणांत निवडणुकीबाबत वेगळीच ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. परिणामी यावेळीही प्रत्येक पक्षापुढे बंडखोर व अपक्षांना रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

लोणंद नगरपंचायतीची एप्रिल २०१६ मध्ये झालेली पहिली ऐतिहासिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप व शिवसेना (Shivsena) आदी सर्व पक्ष चिन्हावर स्वतंत्र लढले. त्यावेळी सर्व पक्षांचे दिग्गज नेते, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार प्रचारात सहभागी झाल्याने पहिलीच निवडणूक चांगलीच गाजली होती. त्यावेळी एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, काँग्रेसला सहा, भाजपला दोन व एक अपक्ष असा त्रिशंकू कौल मतदारांनी दिल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळीही वेगवेगळ्या खेळी, डाव प्रतिडाव पाहायला मिळाले. त्यावेळी आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील यांनी ऐनवेळी काँग्रेसला दूर ठेवत भाजपशी सलगी साधून बहुमताचा आकडा गाठून सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील या पहिल्या नगराध्यक्षा तर भाजपचे लक्ष्मणराव शेळके-पाटील हे पहिले उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. केवळ दोनच जागा मिळूनही भाजप सत्तेत सहभागी झाले होते, तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याकडे सातत्याने चिकाटीने पाठपुरावा व अनेक पातळ्यांवर आटापिटा करून नगरपंचायत अस्‍तित्वात आणणाऱ्या जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष (कै.) अॅड. बाळासाहेब बागवान यांच्या सहकाऱ्यांना मात्र विरोधी बाकावर बसावे लागले होते.

तसेच लोणंदच्या राजकारणात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आनंदराव शेळके-पाटील व कॉंग्रेसचे ज्‍येष्ठ नेते अॅड. बाळासाहेब बागवान या दोन्ही नेत्यांना मात्र नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यानंतर (कै.) अॅड. बागवान हे स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात दाखल झाले तर राष्ट्रवादीने राजकारणापासून अनेक वर्षे दुरावलेले लोणंद बाजार समितीचे माजी सभापती अॅड. सुभाषराव घाडगे यांना स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात संधी दिली. ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. कसाबसा वर्षभर कारभार सुरळीत चालला मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राष्ट्रवादीत फूट पडली. ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्याचा नगराध्यक्ष स्नेहलता शेळके -पाटील यांच्यावर ठपका ठेवला. मात्र, त्यांनी पद सोडले नाही. कॉंग्रेसच्या सहकार्याने त्यांनी काहीकाळ कारभार पुढे रेटला. मात्र, बेकायदा बांधकामप्रकरणी त्यांना नगराध्यक्षपद सोडावे लागले. त्यांच्यानंतर अपक्ष नगरसेवक सचिन शेळके -पाटील यांना आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी राष्ट्रवादी व भाजपच्या सहकाऱ्याने नगराध्यक्षपदाची संधी दिली तर भाजपचे किरण पवार हे उपनगराध्यक्ष झाले. मात्र, वर्षेभरानंतर नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी आणलेला अविश्वास ठराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते असलेल्या योगेश क्षीरसागर यांनीच पक्षाच्या विरोधी भूमिका घेत अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान न केल्याने सचिन शेळके-पाटील यांच्यावरचा अविश्वास ठराव बारगळला होता. त्यावेळी योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व दस्तुरखुद्द आमदार मकरंद पाटील यांचाच विश्वासघात केला. त्यावेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यानंतर मात्र सचिन शेळके - पाटील यांनी आपला नगराध्यक्षपदाचा पुढचा कार्यकाळ पूर्ण केला. या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक न्यायालयीन लढाया लढल्या गेल्या. त्यामुळे ही निवडणूक सर्वच पातळ्यांवर बरेच काही शिकवून गेली. विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी आनंदराव शेळके-पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीची फारकत घेऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केला. तर भाजपचे उपजिल्हाध्यक्ष विनोद क्षीरसागर व माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील, किरण पवार यांनी भाजपला रामराम ठोकत आमदार मकरंद पाटील यांचे नेतृत्व शिरसावंद मानत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनोद क्षीरसागर हे सध्या लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. खरे तर त्या निवडणुकीत केवळ सहा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सर्वाधिक २५ टक्के इतके मतदान मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस २४.२९ टक्के इतके मतदान मिळवून दुसऱ्या स्थानवर, १२.६२ टक्के इतके मतदान मिळवत भाजप तिसऱ्या स्थानावर होते. शिवसेनेला मात्र त्या निवडणुकीत फारसे काही साध्य करता आले नव्हते. केवळ ०.७ टक्के इतकीय मते मिळाली होती. तर एकूण १७ पैकी ११ प्रभागांतील २३ अपक्षांनी मात्र १०.६९ टक्के इतके मतदान मिळवले होते. प्रभाग ७, ८, ९, १३, १६ व १७ येथे तिरंगी, चौरंगी अशा लढती झाल्या होत्या. मात्र, अन्य ११ प्रभागांत अपक्ष व बंडखोरांची मोठी गर्दी झाली होती. तीच पुनरावृत्ती या वेळच्या निवडणुकीत होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. सर्वच प्रभागांतील बंडखोर व अपक्षांना रोखण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे. तरीही प्रत्येक प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे.

गत निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणारे आनंदराव शेळके-पाटील हे भाजपवाशी झाल्याने आमदार मकरंद पाटील यांनी शहरात बेरजेचे राजकारण करत प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढण्याची तयारी केली आहे. मात्र, उमेदवारी देताना आमदार मकरंद पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. तर काँग्रेस ही निवडणूक (कै.) अॅड. बाळासाहेब बागवान यांच्याशिवाय लढत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. (कै.) बागवान यांचे चिरंजीव अॅड. सर्फराज बागवान यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागांत उमेदवार देण्याची तयारीही काँग्रेसने केली आहे. आनंदराव मामांच्या प्रवेशाने शहरात भाजपची ताकद काहीशी वाढली आहे. त्यातून मामांना मानणारा वर्गही प्रत्येक प्रभागात कमी अधिक प्रमाणात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व जागा कमळाच्या चिन्हावर लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. शिवसेनेनेही सर्वच्या सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची तयारी केली आहे. ज्‍येष्ठ नेते लक्ष्मणराव जाधव, संदीप शेळके -पाटील, अविनाश नलवडे, सुनील यादव, शंभूराज भोसले आदी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधून पॅनेल निश्चिती करत आहेत. गेल्यावेळी पक्षाची झालेली नाचक्की यावेळी मोठे यश पदरात पडून घेऊन ते भरून काढण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पेटून उठले आहेत. त्यामुळे यावेळीही प्रत्येक प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती रंगण्याचे संकेत आहेत. परिणामी ही निवडणूकही रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT