दहिवडी (जि. सातारा) : माणच्या पश्चिम-उत्तर भागात सोमवारी (ता. 20) दुपारनंतर तब्बल दीड ते दोन तास दमदार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा आनंदला असून, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओढ्या-नाल्यांमध्ये पाणी खळाळले.
माणचा पश्चिम भाग विशेषतः मलवडीपासून बोथेपर्यंतचा भाग हा माणमधील इतर भागांपेक्षा चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखला जातो. मागील काही दिवसांत या भागातसुद्धा अधूनमधून फक्त रिमझिम पावसाचा शिडकावा येत होता. त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसत होती; पण पाणी होण्यासारखा पाऊस झाला नव्हता. बिजवडी व पुढे कारखेल परिसर हा कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. साधारण आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता.
माणमध्ये सामेवारी सकाळपासूनच वातारणात कमालीचा उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची अपेक्षा होती. अनेकदा पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे बळीराजा आश्वस्त नव्हता. दुपारी आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले. साधारण चारनंतर कुळकजाई परिसरापासून सुरू झालेल्या पावसाने मलवडी, बिजवडी, मार्डी करत सायंकाळी सात वाजेपर्यंत माणच्या बहुतांशी भागाला व्यापून टाकत पूर्वेकडील कारखेलपर्यंत मजल मारली. साधारण तासभर चांगला, तर त्यानंतर अर्धा ते पाऊण तास हलका पाऊस सुरू होता.
या दमदार पावसामुळे मलवडी, कुळकजाई, बिजवडी, बिदाल, मार्डी परिसरातील अनेक ओढ्या- नाल्यांना प्रथमच पाणी आले. काही ठिकाणी माती नालाबांध भरून वाहिले, तर बंधाऱ्यामध्येही 30 टक्के पाणी आले. जमीन तहानलेली असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी शेतजमिनीतील पाणी मुरले होते. साठलेल्या पाण्याची पातळीसुद्धा कमी झाली होती.
या पावसामुळे माणची ओळख असलेल्या बाजरी पिकाला जीवदान मिळाले असून, ते तरारून येणार आहे. वाटाणा, कांदा यासह विविध पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. या पावसामुळे पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बळीराजा आनंदला असून, प्रशासनावरील ताण कमी होणार आहे.
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.