satara sakal
सातारा

Satara : अजिंक्यतारा साद घालतोय... जीर्णोद्धारासाठी!

दरवाजे, तटबंदी धोक्यात; पर्यटनासाठी ठोस कृती हवी, सामूहिक प्रयत्नांची गरज

सकाळ वृत्तसेवा

शाहूनगर : मराठा साम्राज्याची चौथी राजधानी राहिलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ वास्तव्य केलेल्या येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या विकासाबाबत सर्वच स्तरावर अनास्था आहे. दरवाजे, तटबंदी, तलावे धोक्यात आली आहेत. अनास्थेच्या गर्तेत सापडलेला अजिंक्यतारा किल्ला जीर्णोद्धारासाठी साद घालत आहे.

मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा रोवला, तेव्हा अजिंक्यतारा किल्ल्यावरूनच कारभार केला जात होता. मात्र, हा अजिंक्यतारा आता प्रशासकीय, सातारकरांच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित होत आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य, दक्षिण दरवाजे, तटबंदीवर पिंपळासह इतर झाडे उगवली असून, ती मोठी होत आहेत. त्यामुळे मुळे खोलवर जाऊन तटबंदीचे दगड ढिले होत आहेत. परिणामी, दरवाजे, तटबंदी धोक्यात आली आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर सुमारे ९ तळी आहेत. त्यातील दोन तळ्यांचा ‘सकाळ माध्यम समूहा’ने राबविलेल्या ‘अजिंक्यतारा विकास मोहिमे’त जीर्णोद्धार केला होता. सुमारे २५ लाख रुपयांतून सिमेंट कॉँक्रिटमध्ये तळ्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे त्यात लाखो लिटर पाणी साठत आहे, तसेच श्रमदानातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आल्याने किल्ला हिरवागार बनत आहे. किल्ल्यावरच पावसाचे पाणी मुरले जावे, यासाठी किल्ल्याच्या पृष्ठभागावर सलग समतल चरी काढण्यात आल्या आहेत. या सर्व कामांसाठी हजारो हात राबले आहेत.

त्याचा फायदा पशू, पक्षी, जलचरांना होत आहे. शिवाय, अजिंक्यतारा किल्ला परिसरात राहणाऱ्या लोकांना होत आहे. या परिसरातील भूजल पातळीही वाढली आहे. मात्र, त्यानंतर या जीर्णोद्धाराला बळ मिळाले नाही. पुरातत्त्व विभागासह शासन, प्रशासकीय अनास्था असल्याने इतर तळ्यांची दुरुस्तीचे काम झाले नाही. अन्यथा आणखी लाखो लिटर पाणी अजिंक्यतारा किल्ल्यावरील तळ्यात साठले असते.

अजिंक्यतारा किल्ला आता सातारा पालिकेच्या हद्दीत आला आहे, तरीही रस्त्यालगत उभारलेले खांब आता प्रकाशमान झाले. रस्त्याच्या कामाचीही खराब परिस्थिती आहे. काही प्रमाणात रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. सततच्या पावसामुळे डांबरी रस्ते खराब होतात, त्यासाठी किल्ल्यावर जाणारा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला पाहिजे.

असा आहे किल्‍ल्‍याचा इतिहास...

अजिंक्‍यतारा किल्ला शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्‍नी चांदबिबी हिला किश्वरखान याने येथे कैद करून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महिने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. मुघलांकडून ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतर अजिंक्‍यतारा केले; पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र, १७०८ मध्ये शाहू महाराजांनी किल्ला परत घेऊन तिथे राज्याभिषेक केला.

रोपवेला गती मिळावी

अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते खालची मंगळाई मंदिर परिसर या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निश्‍चित केले आहे. डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांच्या परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजूंकडून आठ आसन क्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉली ये-जा करतील. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्‍ध असून, ९२ कोटींच्‍या केबल रोप-वे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीतून करण्‍याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिली. हा प्रकल्प लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे.

‘राज्य संरक्षित’साठी घ्‍यावा राजघराण्याने पुढाकार

अजिंक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यांमध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे. हा किल्ला राज्य संरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा, यासाठी राजघराण्यासह प्रशासनाने प्रयत्न करावेत. शिवाय किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT