कास (जि. सातारा) : पश्चिमेस डोंगरपठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱ्याचे पाणी कमी होत पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले आहे. परिणामी कुसुंबीमुरा (ता. जावळी) येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. रात्री उंच कड्याकपारीत झऱ्याचे पाणी मिळवण्याच्या कसरतीतून पाय घसरून विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेकडो जनावरांनादेखील पाणीटंचाईच्या समस्येशी संघर्ष करावा लागत आहे.
डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी जास्त प्रमाणावर वाहून जाते. परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. आखाडेवाडीतील 150- 200 लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत होता. ज्या झऱ्यातून पाणी टाकीत सोडले जात होते, त्या झऱ्याचेच पाणी कमी होऊ लागल्यामुळे मागील आठवड्यात झऱ्यातून टाकीत आणण्याचा पाणीपुरवठा बंद झाला.
सद्य:स्थितीला झऱ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन डोंगरातील एकूण तीन-चार झऱ्यांवर 200 ते 250 फूट खोल कड्यालगत झऱ्यावर रात्रंदिवस पाणी भरण्यासाठी महिला, लहानगे, पुरुषमंडळी झगडताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या झऱ्यावर ग्रामस्थांना नंबर लावून रात्रभर जागून आळीपाळीने पाणी भरावे लागत आहे. तसेच रात्री पाण्यासाठी बाहेर पडताना वन्यश्वापदांच्या हल्ल्याची भीती कायम आहे. डोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अद्याप भेडसावत नसला तरी पाण्यासाठी गुराख्यांना डोंगरावर झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.
""मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी झऱ्यांचा शोध घेऊन लोकसहभागातून बरेचसे प्रयत्न केले. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. 2005-2006 पासून गाव पाणीटंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. प्रशासनाकडून बोअर मिळावी तसेच लवकरात लवकर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा.''
-ज्ञानेश्वर आखाडे, आखाडेवाडी (कुसुंबीमुरा)
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.