Satara 
सातारा

गटाराचा तिढा, आला व्यापाऱ्यांच्या गळा!, मायणीत रस्ता रुंदीकरण रखडले

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात येत असलेल्या गटारांच्या उंचीवरून, मालमत्ताधारक, राजकीय गट व कंत्राटदार यांच्यात निर्माण झालेला तिढा सुटता सुटेना. काम रखडल्याने ठप्प झालेली बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल व्यापाऱ्यांच्या गळ्याला आली आहे. 

येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ- पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पंढरपूरकडून काम पूर्ण होत गावापर्यंत आले आहे. मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा गटार कामास सुरुवात झाली. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे लोकांनी काढून घेतली. कंत्राटदाराला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाउन सुरू होऊन काम थांबले. अनलॉकनंतर पुन्हा गटार कामाला सुरुवात झाली. मात्र, काही ठिकाणी रस्त्याची व गटारची रुंदी कमी जास्त केल्याचे व गटारची उंची त्रासदायक होत असल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले. ठिकठिकाणी "गटार दारात व सांडपाणी घरात' अशी स्थिती झाली. त्यामुळे अनेक मालमत्ताधारक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

काही नागरिकांनी तर मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत विविध अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारींची निवेदने पाठवली आहेत. त्याद्वारे गटाराची उंची कमी करण्याची मागणी होत आहे. जमिनीच्या पातळीपेक्षा तीन फूट उंच गटारे बांधले जात असल्याने सांडपाणी गटारमध्ये न जाता ते अनेकांच्या घरात साचत आहे. बाजारपेठेत रस्त्यालगत अनेक इमारतींत बेसमेंटला (तळघरात) दुकानगाळे काढण्यात आले आहेत. मात्र, उंच गटारामुळे तळघरातील दुकान गाळ्यांमध्ये ये- जा करता येणार नाही. तेथे व्यवसाय सुरू करता येणार नसल्याने ते निरुपयोगी होणार असून, अनेकांचे लाखो रुपये पाण्यात जाणार आहेत, तसेच मुख्य रस्त्याला लागूनच गांधी मैदान बाजारतळ आहे. तेथे आठवडी बाजारासह दैनंदिन मंडई व फळविक्रेते बसत असतात. उंच गटारामुळे बाजारतळावर मालाची ने- आण करणे अशक्‍य होणार आहे.

मुख्य रस्त्याला जोडलेले अंतर्गत मार्गही उंच गटारामुळे निरुपयोगी होणार आहेत, असे व्यावसायिक, मालमत्ताधारक व नागरिकांचे म्हणणे आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मालमत्ताधारक व व्यापाऱ्यांनी स्थानिक नेत्यांना साकडे घातले आहे. त्यावर वारंवार बैठका, चर्चा होऊन संबंधित कंत्राटदाराकडे गटाराची उंची कमी करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. 

दरम्यान, चावडीपर्यंत गटाराचे काम झालेले आहे, तसेच ते पुढेही पूर्ण करावे, अशी मागणी काही नागरिक करीत आहेत, तर दुसरीकडे उर्वरित गटाराची उंची कमी करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे तिढा वाढून मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम रखडले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत कऱ्हाड येथे मोजके नागरिक, बांधकामचे अधिकारी व स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मंत्रिमहोदयांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. संबंधित विभागाला फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे फेर सर्वेक्षण होऊन नागरिकांच्या मागणीनुसार गटार कधी बांधली जाणार. रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार व मोडकळीस आलेली, व्यवहार ठप्प झालेली मुख्य बाजारपेठ पुन्हा कधी फुलणार. अशा विविध प्रश्नांनी व्यापारी अस्वस्थ झालेत.

दरम्यान, मार्चअखेर नागरिकांनी अतिक्रमणे काढून घेणे व त्यानंतर कंत्राटदाराने महिनाभरातच बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करून देणे असे संयुक्त बैठकीत ठरले होते. मात्र, अद्याप काम रखडले आहे. त्यामुळे दुकानांची दुरुस्ती व नव्याने उभारणीची कामेही खोळंबली आहेत. परिसरातील ग्राहक बाजारपेठेकडे पाठ फिरवत आहेत. मालाचा उठाव होत नसल्याने बाजारपेठ कोलमडून पडली आहे. आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी रोजीरोटीच्या प्रश्नासह अनेकांचे संसार उघड्यावर पडू लागलेत. बाजारपेठ पूर्ववत कधी बहरणार या विवंचनेने सर्व व्यावसायिक अस्वस्थ झाले आहेत. गटारप्रश्नी लवकरात लवकर नागरिकांच्या हिताचा मार्ग काढून दिलासा द्यावा. सर्वमान्य तोडगा काढून रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 


""गटाराची उंची कमी करून नागरिकांच्या हिताचे काम करावे. लवकरात लवकर सर्वमान्य तोडगा काढून काम पूर्ण करावे एवढीच सर्व व्यावसायिकांची मागणी आहे.'' 
- अनिल माळी, व्यावसायिक, मायणी 


संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT