गोंदवले (जि.सातारा) : दरवर्षी मॉन्सूनपूर्व काळात पाणीसाठ्यात खडखडाट असणाऱ्या माणमध्ये तलावात अद्यापही अपवाद वगळता पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पहायला मिळत आहे. जलसंधारणाच्या कामाबरोबरच गेल्या वर्षी झालेल्या पावसाचा परिणाम अद्यापही दिसत असून, यंदाच्या पावसाने माण पुन्हा पाणीदार होण्याचे स्वप्न साकारण्याची शक्यता आहे. सध्या तरी दुष्काळी कलंक काहीसा पुसला गेल्याने माणवासीय सुखावले आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी पावसाअभावी पडलेल्या दुष्काळाने माणसं होरपळून निघाली खरी, परंतु गेल्या वर्षी सरासरी ओलांडत पडलेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. आधीच उरमोडीचे पाणी पोचलेले काही पाणीसाठे या पावसाने लगेच भरून वाहिले. इतर पाणीसाठेही पूर्ण क्षमतेने भरले. कधी नव्हे ते या पावसामुळे माणचा निसर्ग नटलेला पहायला मिळाला. त्यामुळे काही काळ तरी दुष्काळ हटल्याची भावना सर्वांच्याच मनाला सुखावून गेली.
दरवर्षी पुरेशा पावसाअभावी डिसेंबर-जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यंदा मात्र अगदी पावसाळ्याच्या तोंडावर अपवाद वगळता दुष्काळ जाणवलाच नाही. सध्या लोधवडे तलाव वगळता सर्वच पाणीसाठ्यात मिळून साधारणतः 37 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे. उरमोडी योजनेतून पिंगळी, लोधवडे, ढाकणी आणि गंगोती तलावात पाणी पोचत असले तरी इतर पाणीसाठ्यात मात्र पावसाच्याच पाण्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे यंदा पडणाऱ्या पावसाने तालुक्यातील सर्वच पाणीसाठे पुन्हा "फुल्ल' होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी यंदाचे वर्ष कोरोनाच्या विळख्यात असले तरी पाण्याच्या बाबतीत मात्र काहीसे सुखावह असल्याने माणवासीयांची वाटचाल दुष्काळमुक्तीच्या दिशेने होत असल्याचे चित्र आहे. माणमधील दहा तलावांची मिळून 34.39 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता आहे. त्यापैकी सध्या 12.62 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दरवर्षी खडखडाट असणाऱ्या माणमध्ये 37 टक्के पाणीसाठा सध्याही शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे.
पाणीसाठ्यांची सद्यस्थिती : कंसात एकूण पाणीसाठा क्षमता (दशलक्ष घनमीटरमध्ये)
राणंद (7.12) 2.63, पिंगळी (2.38) 1.56, आंधळी (9.28) 4.63, लोधवडे-(0.99) मृतसाठा, जांभूळणी (2.42) 0.77, गोती (1.79)----0.49, महाबळेश्वरवाडी (2.01), 0.55, ढाकणी (3.05) 0.77, मासाळवाडी (2.42) 0.53, जाशी (2.93) 0.69.
पालिकेच्या 'त्या' दोन नगरसेविकेंच्या पदाबाबत आज साताऱ्यात फैसला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.