कऱ्हाड (जि. सातारा) : शासनाने मागील वर्षी तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक 114 जागांसाठी तब्बल 30 हजारांवर उमेदवारांनी परीक्षा दिली. त्याच्या निकालाची यादी पाच महिन्यानंतरही जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित परीक्षार्थींना नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे 30 हजार जणांचे डोळे निकालाकडे लागलेले आहेत. प्रशासनाचे मात्र याप्रश्नी तोंडावरच बोट आहे. दरम्यान, एखाद्या उमेदवाराने जर चुकीचे पाऊल उचलून स्वतःच्या जिवाचे बरे वाईट केले तर यास जबाबदार कोण, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात तलाठी भरती संदर्भात वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर परीक्षा झाल्यावर लवकरच नियुक्ती मिळेल, या आशेने बहुतेक उमेदवारांनी आपल्या आधीच्या नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, तलाठी परीक्षेच्या निकालाची यादीही जाहीर झाली नाही. त्यामुळे अनेकांवर घरीच बसण्याची वेळ आली आहे. उमेदवारांनी भरतीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यावर त्यांना प्रशासनाने 114 उमेदवारांच्या पगाराचा भार उचलू शकेल एवढा महसूलच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाला शासनाकडून मदत हवी आहे, म्हणून शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे, असे सांगण्यात आले.
त्याचबरोबर संबंधित परीक्षार्थींनी संभाव्य निवड यादी तरी जाहीर करावी, असा आग्रह धरला. परंतु, निवड यादी तयार आहे. परंतु, ती जाहीर केली तर नियमाप्रमाणे संबंधित उमेदवारांना वर्षाच्या आत नियुक्त्या देणे बंधनकारक आहे, नाही तर भरती प्रक्रिया बाद होईल, असे उत्तर देण्यात येत असल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे. त्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाने वन व महसूल विभागाकडे मार्गदर्शन मागवले होते, त्याचे उत्तर काय आले, हे सांगण्यात आले नाही. यासंदर्भात संबंधित परीक्षार्थींनी महसूल सचिव गीता कुलकर्णी, मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन त्वरित मिळावे याबाबत पत्रव्यवहार केला. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यात लक्ष घालू, असे उत्तर मिळाले. मात्र, महसूल विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रशासनाला कर्मचाऱ्यांची गरजच नाही तर भरतीची जाहिरातच का केली ? कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. परंतु, सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे भवितव्य या भरतीवर अवलंबून आहे. उमेदवारांनी लवकरच नियुक्ती मिळेल, या आशेने आपल्या आधीच्या नोकरीच्या ठिकाणी राजीनामा दिला आहे. मात्र, नियुक्ती न मिळाल्याने अनेकांना घरीच बसावे लागले आहे. आणखी विलंब झाला तर उमेदवार न्यायालयात पण जाण्यास तयार आहे. एखाद्या उमेदवाराने जर चुकीचे पाऊल उचलून स्वतःच्या जिवाचे बरे वाईट केले तर यास जबाबदार कोण, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शासन एकीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करत आहे, इतर जिल्ह्यांत भरती प्रक्रिया पूर्ण करून मार्गदर्शन घेऊन निकाल जाहीर करत आहे. मग, सातारा जिल्हा प्रशासन शांत का? नेमकं घोडं अडलंय तरी कुठे? अशी विचारणा परीक्षार्थींनी केली आहे.
""तलाठी परीक्षेचा पेपर झाला. मात्र, त्याचा निकाल लागेना. त्यातच परीक्षार्थींचे वय पुढे जात आहे. अनेकांच्या घरची परिस्थितीही बेताची आहे. त्यामुळे सर्वजणच तणावात आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने भरती प्रक्रिया राबवावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही.''
-एक परीक्षार्थी
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.