कऱ्हाड (जि. सातारा) : महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. त्याचा विचार करून महिलांमध्ये आरोग्य आणि सॅनिटरी नॅपकीनबाबत जनजागृती करून त्याचा वापर वाढवण्यासाठी महिला बचत गटांव्दारे त्यांना गावातच सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू आहे. 31 ऑगस्टपर्यंत गावोगावच्या महिलांपर्यंत नॅपकीन पोचवण्यासाठी जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक बचत गट सक्रिय झाले आहेत.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वापरण्याबाबत अनेक गैरसमजुती आहेत. त्याचबरोबर ते वापरण्याबाबतचे अज्ञान, आवश्यकता असूनही सहजतेने ते न उपलब्ध होणे, अकारण भीती यामुळे महिला ते वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत हे स्पष्ट झाले असून, त्यातून महिलांचे सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचेही पुढे आले. नॅपकीन वापराने आरोग्यास हितकारक असल्याने त्याचे फायदे कळावेत आणि आरोग्यासंदर्भात जनजागृती होऊन महिलांना घरच्या घरीच ते सहजतेने उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत.
त्यानुसार ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत "जागर अस्मिते'चा हे अभियान सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत आता जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गावांत हजारहून अधिक महिला बचत गटांव्दारे ही कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी बचत गटांची नोंदणीही ग्रामीण विकास यंत्रणेकडे झालेली आहे. बचत गटांच्या महिलांना त्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षणही देण्यात आले आहे. महिला बचत गटांव्दारे केवळ 24 रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकीन देण्यात येतील. त्यातून बचत गटांनाही चार पैसे फायदा मिळणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत गावोगावच्या महिलांपर्यंत हे नॅपकीन पोचवण्यात येणार असून, ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरू आहे.
दुकाने, मॉलमध्येही...
सॅनिटरी नॅपकीनचा वापर वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिला जेथे जेथे खरेदीसाठी जातात, तेथे त्यांना ते सॅनिटरी नॅपकीन अत्यल्प किमतीत सहज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याअंतर्गत बचत गटांतील महिला या गावा-गावांतील किराणा व स्टेशनरी दुकाने, मॉल, मिरची कांडप केंद्र, मेडिकल आदी ठिकाणी ती विक्रीस ठेवली जाणार आहेत. त्यासाठीचीही कार्यवाही करण्यात येणार आहे.
विक्रीसाठी बंधन नाही
बचत गटांच्या महिलांनी ग्रामीण विकास यंत्रणेकडून विक्रीसाठी नॅपकीन घेतल्यावर त्यांनी त्याच गावात त्याची विक्री केली पाहिजे, असे बंधन घालण्यात आलेले नाही. त्यांना कोठेही ते विकण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना त्या विक्रीची संधीच उपलब्ध होणार आहे.
""महिलांना कमी किमतीत चांगले सॅनिटरी नॅपकीन मिळण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत "जागर अस्मिते'चा हा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांतील महिलांना गावातच नॅपकीन उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.''
-अविनाश फडतरे,
प्रकल्प संचालक,
ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.