चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘आदित्य- एल १’ अंतराळ यानाचे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण झाले. इस्रोची ही पहिलीच महत्त्वाकांक्षी सौर मोहीम.
‘आदित्य- एल १’ हे अंतराळ यान सूर्य-पृथ्वीच्या प्रणालीतील ‘एल १’ या बिंदूवर (लँगरेंज) प्रभामंडळ कक्षेमध्ये स्थापित केले जाणार आहे. हे यान म्हणजे सूर्याचा अभ्यास करणारी अवकाशातील एक प्रकारची वेधशाळाच असणार आहे.
हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख कि.मी.वर आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा ग्रहणाशिवाय सूर्याचे या बिंदूवरून निरीक्षण करता येईल. ‘एल १’ या बिंदूंच्या कक्षेतून सूर्याचा किंवा सौर घडामोडींचे सातत्याने निरीक्षण करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे. आदित्य एल मोहीम ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वेधशाळा आहे.
या यानामध्ये एकूण सात उपकरणे (पेलोड) असतील. त्यापैकी चार उपकरणे थेट सूर्याचा अभ्यास करतील तर उर्वरित तीन उपकरणे ‘एल १’ बिंदूवरील कणांचा व क्षेत्राचे निरीक्षण करतील.
सूर्याच्या वातावरणाचा ‘फोटोस्फिअर’ हा थर, त्यावरील लाल रंगाचा वायूचा थर व प्रभामंडळ या सूर्याच्या सर्वांत बाहेरील भागाचे निरीक्षण वेगवेगळ्या तरंगलांबीच्या माध्यमातून केले जाईल. या माेहिमेतून सौर वाऱ्यांच्या घडामोडी तसेच सूर्याच्या प्रभामंडळाचे तापमान, सूर्यावर ज्वाला निर्माण होण्याआधी आणि नंतर कोणत्या घडामोडी घडतात, सौरज्वाला आदींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळविली जाईल.
मोहिमेचे प्रमुख हेतू
१ सूर्याच्या प्रभामंडळाचे तापमान तसेच सौर वाऱ्यांच्या गतीची नोंद घेणे
२ सौर वाऱ्यांच्या घडामोडी, सौरज्वाला आणि पृथ्वीजवळील वातावरणावर होणारा परिणाम समजून घेणे
३ सूर्याच्या वातावरणाची गतीशीलता, सौर वाऱ्याचे वितरण आदींची माहिती घेणे
४ सूर्याचा ‘फोटोस्फियर’ हा भाग तसेच ‘क्रोमोस्फियर’ आणि ‘कोरोना’ या बाहेरच्या भागाच्या चुंबकीय क्षेत्राचा, सौर वादळांचा अभ्यास करणे
५ ‘आदित्य एल १’ द्वारे अवकाशात पहिली सौर वेधशाळा प्रस्थापित करणे
असा आहे सूर्य
सूर्य हा पृथ्वीपासूनचा सर्वांत जवळचा तारा
सौरमालेतील सर्वांत मोठा घटक
सूर्याचे अंदाजे वयोमान ४.५ अब्ज वर्षे इतके आहे
त्यास हायड्रोजन आणि हेलियम गॅसचा तप्त गोळा म्हणतात
पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५० दशलक्ष किलोमीटर आहे
तो सौरमालेसाठीचा मोठा ऊर्जेचा स्रोत
सूर्यातील गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे सौरमालेतील सर्व घटकांना एकत्र जोडून ठेवता येते
त्याच्या केंद्राला ‘कोअर’ म्हणून ओळखले जाते
‘कोअर’चे तापमान कमाल १५ दशलक्ष सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते
उच्च तापमानात ‘कोअर’मध्ये न्यूक्लिअर फ्यूजनची प्रक्रिया सुरू होते; यामुळे सूर्याला शक्ती
सूर्याच्या दृश्यमान पृष्ठभागाला फोटोस्पिअर म्हणतो
हा भाग ‘कोअर’पेक्षा तुलनेने थंड आहे; ज्याचे तापमान ५,५०० सेल्सिअस इतके आहे
अभ्यास का करायचा?
पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा असल्याने इतरांच्या तुलनेत अभ्यासाची संधी अधिक
या माध्यमातून आकाशगंगेतील ताऱ्यांबरोबरच इतर आकाशगंगांमधील ताऱ्यांचाही अभ्यास
आपल्याला दिसणाऱ्या बाबींव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी घडतात
अनेक विस्फोटक स्वरूपाच्या घटना
या सौर घटना पृथ्वीचे दिशेने सरकल्यास अंतराळ पर्यावरणात अडथळे शक्य
यामुळे विविध अवकाशयान तसेच संप्रेषण प्रणालींना बाधा पोहोचू शकते
अशा घटनांची पूर्वसूचना मिळण्यासाठी सूर्याचा अभ्यास महत्त्वाचा
एखादा अंतराळवीर अशी काही घटना घडल्यास अडचणीत सापडू शकतो
सूर्यावर औष्णिक व चुंबकीय घटना
अशा घटना बरेचदा आत्यंतिक स्वरूपाच्या
सूर्याचा अभ्यास केल्यास या गोष्टींचे आकलन करणे सोपे
आदित्य मिशनचा खर्च ३७८ कोटी
चांद्रयानच्या यशानंतर इस्रोने सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे. सूर्याचे तेज जाणून घेण्यासाठी ‘आदित्य- एल १’ मोहिमेवर तब्बल ३७८.५३ कोटी रुपये खर्च आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
इस्रोने २००८ मध्ये सूर्य मोहिमेचा आराखडा मांडला होता. मात्र बजेटच्या अभावामुळे मोहीम स्थगित करण्यात आली. चांद्रयानच्या-३ च्या यशानंतर आदित्य मोहिमेचा मार्ग मोकळा झाला. या मोहिमेसाठी इस्रोने यान सोडण्याच्या खर्च वगळता
३७८.५३ कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे. म्हणजेच लॉचिंगच्या खर्चाचा यात समावेश नाही. हा खर्च जोडला तर त्याचे बजेट आणखी वाढेल.
सूर्यावर किती तापमान
सूर्याच्या तापमानाचा विचार केल्यास दहा हजार फॅरनहिट (५५०० अंश सेल्सिअस) आहे. या ठिकाणी उर्त्सजित होणाऱ्या न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळे सूर्यमंडळाचे तापमान ७ दशलक्ष फॅरेनहिट किंवा १५ दशलक्ष सेल्सिअसपर्यंत पोचते. नासाच्या मते, शंभर अब्ज टन डायनामाईटच्या स्फोटानंतर निर्माण होणारी उष्णता ही सूर्याच्या तापमानाएवढी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.